नाती सांभाळताना भाग-2

नातं जपणे
मोना रागाने आईला म्हणते, म्हणजे मी खोटी कारणे देते आहे असे म्हणायचे आहे का तुला ?
त्यावर मोनाची आई मोनालाऔ म्हणते, तुझ्या सासुसासऱ्यांना तुम्ही फिरायला नेणार नाही म्हणुन ते रागवतील. हे कारण खरं आहे, पण बाकीची दोन कारणे खोटी आहेत. तुझ्याकडे सगळ्या कामाला बाई आहे आणि त्यामुळे तुझ्या सासुबाईंना काही काम करायला लागत नाही आणि तुझी लेक मोठी झाली आहे. ती आजीआजोबांसोबत राहु शकते. तुला राजनबरोबर महाबळेश्वरला जायचे नाही म्हणुन तु ही कारणे सांगत आहेस मला.
अगं आई अगदी तसंच काही नाही, पण आता ह्या वयात आम्ही दोघेजण काय करणार महाबळेश्वरला जाऊन? ज्यावेळी फिरायचे दिवस होते तेव्हा राजनला काम होती ऑफिसची आणि आता उतारवयात उत्साह संचारला आहे महाबळेश्वरला फिरायला जायचा.
अगं मोना त्यावेळी नेलं नाही म्हणुन आता नाही जायचे फिरायला हे कसले लॉजिक आहे तुझे. इतर वेळी ओरडत असतेस नवऱ्याच्या नावाने कुठे फिरायला नेत नाही? माझ्या मैत्रिणी त्यांच्या नवऱ्याबरोबर इकडे गेल्या फिरायला, तिकडे गेल्या फिरायला. अनरोमॅंटिक नवरा आहे माझा. मी आपली बायको, सुन, आई म्हणुन घरातली सगळी नाती निभवायची आणि हा अगदी नामानिराळा असतो.
मग त्यात काय खोटे आहे ? आमच्या लग्नाला आता पंचवीस वर्षं होत आली. मी एकटीने माझी नोकरी सांभाळुन सासुसासरे, सोनल, नातेवाईक व मित्रपरिवार ही नाती जपली. त्यावेळी नवरा म्हणुन हा कुठेच नव्हता सोबत. नाती निभावताना कधीकधी कसोटी लागायची माझी. कुठे फिरायला, लग्नाला जायचे असेलतर मी एकटी सासु सासरे आणि सोनलला घेऊन जायचे. मला कधीकधी एकटे वाटायचे. नवरा सोबत हवा वाटायचा. कधीतरी त्याने म्हणावे. थकलीस का ? मी तुला काहीच मदत करु शकत नाही आणि आता त्याला गरज वाटत आहे माझी म्हणुन तो महाबळेश्वरला फिरायला चल म्हणत आहे. आता मला एकटीने जगायची सवय झाली आहे. आता त्याच्या सोबत महाबळेश्वरला जाऊन काय करणार ? कित्येक दिवसात आम्ही समोरासमोर बसुन बोललो नाही आहे. जे काही बोलणे होते ते मोबाईलवरुन.
मोना तु म्हणतेस ते काही अंशी बरोबर आहे; पण पुर्वी जावईबापुंनी तुला फिरायला नेलं नाही. म्हणुन ती अढी मनात ठेवुन तु आता त्यांच्या सोबत फिरायला जात नाही हे चुकीचे आहे आणि नवऱ्याला उतारवयात उत्साह संचारला म्हणतेस; पण उतारवयात शारीरिक गरजा पुर्ण करायच्या नाही हे कोणी सांगितले तुला. नवराबायको फिरायला जातात ते फक्त शारीरिक गरजेसाठी नाही‌. मानसिक आनंदासाठीही जातात. मी आणि तुझे बाबा तुला मेड फॉर इच अदर वाटतो. तुझे बाबा तुझे हिरो आहे म्हणुन मी कधी बोलले नाही तुला. अगं तुझे बाबा आता तुला घरातील सगळी नाती निभावताना दिसतात. माझ्या सोबत भाजी खरेदी करायला येतात, मला घरात मदत करतात. तरुणपणी ते पण ऑफिसच्या कामात व्यस्त होते. मी एकटीनेच घरातील सगळी नाती निभावली. आता त्यांना जाणीव होते. मी एकटीने सगळं घर, घरातील नाती सांभाळली. त्यामुळे आता ते उशीरा का होईना माझी काळजी घेतात. आम्ही तरुणपणी हनिमुनला गेलो नाही, पण आता फिरायला जाऊन त्याचा आनंद घेतो. नवरा बायकोचे नाते जगातील खास व नाजुक नात असत. त्यात राग, रुसवा, भांडण हे पाहिजेच त्याशिवाय नात्याला मजा नाही, पण ते काही क्षणापर्यंत, चार भिंतीत ठेवावे. ते सांभाळताना एक चुकले तर दुसऱ्याने त्याला सावरायचे असते. एकाने पसारा केलातर दुसऱ्याने तो आवरायचा असतो. नवरा बायकोचे नाते असो किंवा इतर कुठलेही नाते मनात पुर्व आयुष्याची अढी ठेऊन नाती नाही जपली जात.
मोना तुझे तरुण वय गेलं ते काही परत येणार नाही; पण आता उतारवयात तुझा नवरा तुमचे नातं जपण्यासाठी पुढाकार घेत आहे तर तु मागच्या कटु आठवणीत रमण्यात काय अर्थ आहे. झालं गेल विसरुन पुढे नविन आयुष्य जग. महाबळेश्वरला जाऊन एकमेकांशी बोला, भांडा, हवं तर रुसा आणि रुसवा काढुन संवाद साधा ऐकमेकांशी. तुमचे दोघांचे नाते घट्ट करा. तसंही जगजाहीर आहे पुरुषांपेक्षा बायका जास्त हुशार असतात नाती जपण्यात. नवऱ्यांना नाती जपण नाही जमत.
आई तु खुप छान समजावले मला. मी आता राजनला फोन करते आणि त्याला सॉरी म्हणुन त्याचा रुसवा घालवते. मोना राजनला फोन लावते‌ आणि राजनला म्हणते,‌ राजन, तु आणि मी दोघेजण महाबळेश्वरला फिरायला जाऊ या. त्या आधी आपण दोघेजण बाजारात जाऊन महाबळेश्वर ट्रिपसाठी मस्त खरेदी करु या.
©️®️ सौ. ज्योती प्रशांत सिनफळ

🎭 Series Post

View all