नवलाई-1

नवी नवरी

"काय केलंस तू? काय बोललीस माझ्या मुलाला? मी आजवर माझ्या मुलाला कधीच असं नाराज झालेलं पाहिलं नाही.."

लग्न होऊन अवघे 4 महिनेच झाले होते. कविताचा नवरा आणि कविता यांचं क्षुल्लक करणावरून वाद झाला. कविताला नेहमी वाटायचं की आपल्या दोघांत वाद झाले तर ते चार भिंतीतीच राहू द्यायचे. घरच्यांना त्याचा त्रास होता कामा नये.

पण कविताचा नवरा तो नवरा कसला, जरा काही बिनसलं की असं तोंड घेऊन घरात फिरायचा की लगेच समजायचं. आई वडिलांशी नीट बोलायचा नाही, नीट वागायचा नाही. साहजिकच सर्वांना समजून जायचं आणि सगळं खापर कवितावर पडायचं.

कविता त्या घरात नव्या संसाराचे, नवऱ्यासोबतच्या नात्याचे स्वप्न घेऊन गेलेली. पण तिला माहीत नव्हतं की सासूबाईंनी तिच्या जाचाची पूर्ण पूर्वतयारी करून ठेवली होती.

लग्न ठरलं तसं दोन्ही कुटुंबाचं खरेदी, बस्ता यासाठी बाहेर जाणं झालेलं. सासूबाईंचं सगळं लक्ष कविता आणि तिच्या कुटुंबाकडे होतं. त्यांना जरा काही खटकलं की घरी आल्यावर कविताच्या नवऱ्याला सांगत. तिचा नवरा आधीच मम्माज बॉय, तोही सगळं ऐकायचा, त्याला खरं वाटायचं. प्रत्यक्षात तोही तिथे हजर असतांना हे कधी घडलं याचा तो विचारही करायचा नाही. आई सांगेल तीच पूर्व दिशा हेच त्याच्या डोक्यात कायम असायचं.

लग्न झाल्यावर मुलाच्या आयुष्यात भागीदार येईल या जाणिवेने तिच्या सासूला भीती वाटे. मग लग्नाआधीच भावनिक होऊन मुलासमोर त्या कितीतरी वेळा रडायच्या,

"आता तुझी बायको येईल, तिने तुला आमच्यापासून दूर केलं तर??"

मुलगा सावध होई, आईला वचन देई की मी असं काहीही घडू देणार नाही. एकीकडे कविता संसाराची स्वप्न पहायची आणि दुसरीकडे तिचा नवरा बायकोला कसं वरचढ होऊ द्यायचं नाही याचा. लग्नाआधीच त्याचं ब्रेनवॉश करून ठेवलं होतं आणि याची कल्पना कविताला मुळीच नव्हती.

लग्न झालं, रुटीन सुरू झालं..कविताचा नवरा सकाळी लवकर ऑफीसला निघून जाई, आल्यावर आई वडिलांसोबत बसून असे, खोलीतही लवकर येईना. तिला वाटायचं की नवऱ्याने घरी आल्यावर आपल्याशी दोन शब्द बोलावं, विचारपूस करावी..पण कसलं काय, नवरा आला की ती दार उघडे, तिच्याकडे न पाहता तो सरळ आईजवळ येऊन बसे.

तिला काही बोलताही येईना. एके दिवशी रात्रीचं जेवण आटोपून ती खोलीत गेली...




🎭 Series Post

View all