प्रेमावरचा विश्वास (३ अंतिम भाग)

कथामालिका
प्रेमावरचा विश्वास ३

माई बोलायच्या थांबल्या. त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांनी पाणी प्यायले आणि अश्रु पुसले. डॉ. किरण सुध्दा अस्वस्थ झाला होता.‌ आपल्या आयुष्यात अशीही केस बघायला मिळेल हे कधीच वाटल नाही.

"तिला बाहेर काढायच आहे मला या सर्वातून. मी तिला माझ्या आश्रमात मोठ्या विश्वासाने आणले आहे. तिच्या चेहरा नेहमीसाठी विद्रुप झाला. त्यामुळे ती जास्तच दुखावलेली आहे."

" त्यासाठी मी मदत करेल माई तुम्हाला." किरणने माईंना आश्वस्त केल.

"उद्यापासून माझ ध्येय एकच. 'मिशन स्वाती'

आता नित्यनेमाने डॉ. किरण येत होते आणि माईंच्या समोरच तिच्यावर फिजिओथेरपी सुरु करत होते. सुरूवातीला स्वाती घाबरत होती.‌ हळूहळू त्या मोठ्या धक्क्यातून सावरायला किरणची मदत होऊ लागली. डॉ. किरणने तिच्या मनात विश्वास निर्माण केला. जवळपास एक महिना ही ट्रीटमेंट सुरू होती.

दवाखान्यातून आल्यापासून ती खोलीच्या बाहेर पडलीच नव्हती. पण किरणच्या मदतीने , विश्वासाने तिच्यात बदल होत गेला.‌ आत्मविश्वासाची झालर तिच्यामध्ये‌ दिसून येऊ लागली. गप्पाटप्पा करत, हसत ती आश्रमात वावरू लागली. किरणच्या स्पर्शाने तिच्या मनावरचे मळभ दूर होत होते. स्वतः साठी जगायचे ठरवले होते. जवळपास दोन अडीच महिने होऊन गेले.

एके दिवशी अचानक किरण माईंना भेटला.

"माई आता माझी ट्रीटमेंट पुर्ण झाली आहे. तिने खूप लवकर कव्हर केले. त्यामुळे मी उद्यापासून येणार नाही."

"ही गोष्ट स्वातीला माहिती आहे का?"

"नाही. आता भेटणार आहे मी. पण हिंमत होत नाही तिच्या समोर जायची. पण मी तिला एक सरप्राइज गिफ्ट देणार आहे."

"किरण, काहीही बोलायच्या आधी पुर्ण विचार कर. नंतर विचार करायला वेळच मिळत नाही."

"हो माई , तुम्ही काळजी करू नका."

तेवढ्यात स्वाती माईंना भेटायला ऑफीस मध्ये आली तिच्या कानावर किरणचे शब्द पडले. ते ऐकताच ती माघारी फिरली.

" थांब स्वाती. कस‌ वाटत आहे आता. तू आता .."

तिने स्वतः चा चेहरा हाताने झाकून घेतला.

"स्वाती सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावर नाही. तर मनात आहे. मला तू सुरूवातीपासूनच आवडली आहे. तुझा आवाज त्याहून सुंदर आहे."

"पण आवडी निवडीचा प्रश्न येतोच कुठे? माझं जग वेगळ, माझं अस्तित्व आणि असण त्याहून वेगळ. मी एकदा फसली आता परत प्रेमात पडायची इच्छा नाही. माझा प्रेमावरचा विश्वास उडाला आहे."

तेवढ्यात माई बाहेर आल्या.

" स्वाती मला वाटत तुझ्या आयुष्यात जर आशेचा नवीन किरण येणार असेल आणि तर या किरणात तू स्वतः ला समर्पित करायला हरकत नाही.‌"

"नाही माई नाही. मला असा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नका. भविष्यात या गोष्टीचा डॉ. किरण यांना त्रास होऊ शकतो."

"नाही होणार कसलाही त्रास."

"स्वाती अग एकदा वाईट झाले म्हणून माणूस जगायचे थोडी सोडून देतो.‌ वसंताची चाहूल लागताच वृक्ष निष्पर्ण होतात आणि पालापाचोळा जमा होतो. पण निष्पर्ण वृक्षावर परत पालवी फुटत नाही. असे कधीच शक्य नाही. निसर्गाच्या नियमानुसार आपणही पुढे जायलाच हवे. नेहमी साचलेल्या पाण्यात जीवजंतू लवकर उत्पन्न होतात. पण सतत वाहणारे पाणी निर्मळ आणि स्वच्छ असते. बाकी निर्णय तुझा आहे. कारण किरणला मी चांगले ओळखते."

स्वातीच्या डोक्यात अनेक विचार येत होते.

"स्वाती काय विचार करत आहे. माझा हात धरशील का?"

"पण तू का मला स्वीकरतो आहे. तुझे आईवडील माझा स्वीकार करतील. मला कोणाचीच दया, सहानुभूती वगैरे नको आहे.‌ मी सक्षम आहे. एकट्याने जगण्यासाठी. "

"थांब, एक तर मी अनाथ आहे. त्यामुळे माझ जवळच अस कोणीच नाही. माई सारख्या एका आधारस्तंभ देणाऱ्या एका संस्थेने मला ठेवले. तिथेच मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे माझा निर्णय फक्त माझा आणि माझा आहे."

"पण हे जग चांगले नाही. मला तुझ्या सोबत फिरतांना तुलाच माझी लाज वाटेल. तुला प्रत्येक जण विचारणारच."

"अग किती प्रश्न विचारशील. त्याने सगळ विचार पुर्वकच निर्णय घेतला आहे. तू फक्त हो म्हण. त्याच्या प्रेमाची अशी परिक्षा घेऊन तू स्वतः लाच दोष देत आहे."

"पण..."

"अजूनही पण आहेच का स्वाती. ठीक आहे. जोपर्यंत तू स्वतः हून तुझा निर्णय मला सांगणार नाही. तोपर्यंत मी तुला भेटणार नाही." असे म्हणत तो जाणारच...

तेवढ्यात स्वातीने त्याला हो म्हटले. एका नवी जीवनाची सुरुवात करायला ती तयार झाली. माईने मोठ्या विश्वासाने तिचा हात किरणच्या हातात दिला. "आता सांभाळ माझ्या लेकीला."

"काळजी करू नका माई. तिच्यावर असलेल्या प्रेमाचा मी विश्वासघात कधीच होऊ देणार नाही. आम्हाला आशीर्वाद द्या."

©®अश्विनी मिश्रीकोटकर



🎭 Series Post

View all