शापित अप्सरा भाग 48

सुगंधा आता तिच्या शत्रूंची ताकद जोखायला तयार.

शापित अप्सरा भाग 48


मागील भागात आपण पाहिले योगिनी त्यांची साधना सुरू करायला पुन्हा मंदिरात पोहोचल्या. चेटकीण गर्भ घेऊन स्मशानात साधना सुरू करायला पोहोचली. सुभानराव घुंगरूकडे पोहोचले आता पाहूया पुढे.



शेतातील घरात घुंगरू वाट पहात उभा होता. सुभानराव सगळी कामे आटोपून आले. घुंगरूने अंघोळीला पाणी तयार ठेवले होते. सुभानराव आज पुन्हा स्वतः ला आजमावत होते. त्यांना सर्व मर्यादा झुगारून सुख केवळ घुंगरू देत असे. त्यामुळे आपल्याला येत असलेला अपुरा अनुभव खरा आहे का ते पडताळून पाहायचे होते.



त्यांनी भव्य मोठ्या घंगाळात स्वतःचा नग्न देह झोकून दिला. उष्ण पाण्याच्या स्पर्शाने सर्वांगावर शिरशिरी उलटली. आजची रात्र त्यांना त्यांच्यातील आत्मविश्वास देणार की संपवणार ? सुभानराव डोळे मिटून पडून होते.



चेटकीण स्मशानात पोहोचली. तिने रिंगण आखले आणि आठही दिशांना जोडणारी चांदणी आत आखून त्याच्या मधोमध तो पळवून आणलेला गर्भ ठेवला. तिने आता विधीला सुरुवात केली. अनेक काळया शक्ती तिला प्राप्त होणार होत्या.


फक्त त्यासाठी अजून दोन असे गर्भ हवे होते. आईच्या गर्भात पूर्ण वाढ झालेले. चेटकीण भराभर साहित्य मांडत होती. तिला लवकरात लवकर विधी संपवून परत जायचे होते.



योगिनी त्या गुप्त मंदिरात पोहोचल्या. चंद्राचा प्रकाश बरोबर त्यांनी सिद्ध केलेल्या ठिकाणी रिंगणात पडत होता. काल सिद्ध केलेल्या रिंगणात तो अनेक दिव्य औषधी आणि अमरत्व यांचे रहस्य असणारा ग्रंथ केशरने ठेवला आणि मग दिव्य मंत्रांचे पठण सुरू झाले. चंद्राचा प्रकाश जसजसा ग्रंथावर पडत होता ग्रंथ अदृश्य होत होता. संपूर्ण ग्रंथ अदृश्य झाल्यावर केशरने थांबायचा इशारा दिला.



"उद्या आपल्याला सुरक्षा कवच बांधायचे आहे. त्यानंतर हा ग्रंथ पूर्ण सुरक्षित होईल."


"केशर,काही योगिनी आजही शेकडो वर्षे जगतात. त्यांना हे रहस्य माहित आहे का?" एका योगिनीने प्रश्न विचारला.


"नाही,त्यांना फक्त काही औषधे माहित आहेत. ज्यामुळे त्यांना मृत्यू हवा तितका काळ लांबवता येतो."


"केशर,आपण उत्तरेकडे गेल्यावर हा ग्रंथ आणि सुगंधा यांना आपली गरज लागली तर?" परत एक प्रश्न आला.


"तसे होऊ नये. कारण सुगंधा अतिशय शक्तिशाली आहे. तिला ह्या सामान्य लोकातील कोणीच हानी पोहोचवू शकत नाही." केशरने उत्तर दिले.


"पण काल वाड्यात घडलेला प्रकार कोणी सामान्य व्यक्तीने केला असेल असे नाही वाटत." आणखी एक आवाज आला.


" हो,त्याचा शोध आपण घेऊच. सध्या आपल्याला इथून परत जायला हवे." केशरने संभाषण संपवले.




घुंगरूने अंघोळ करून आलेल्या सुभानरावांचा कातीव नग्न देह पाहिला आणि त्याचे भान हरपले. त्याने शृंगाराच्या सगळ्या प्रकारांचा अवलंब सुरू केला. सुभानराव आणि घुंगरू प्रणयात बुडून गेले. प्रणयाचा चरणबिंदू गाठून सुभानराव शांत झाले. त्यांनी आवेगाने घुंगरूला मिठीत घेतले.


"घुंगरू,तू आज आम्हाला परत आणलेस."


"राव,तुम्ही कुठेच हरवले नव्हता. नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार ह्यामागे आहे."


"हो,आम्हालाही तेच पाहायचे होते." सुभानराव हसले.


त्यांचा नग्न देह कुरवाळत घुंगरू कितीतरी वेळ पडून होता. नंतर त्यांना कधी झोप लागली समजलेच नाही.



चेटकीण विधी आटोपून परत आली. वाड्यात किंवा जवळपास अजून दोन गरोदर महिला तिला शोधायच्या होत्या. योगिनी परत आलेल्या नसल्याने ती तशीच एका ठिकाणी लपून राहिली. तिला आता वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.



इकडे गुणवंताबाई पंचवीस वर्षांनी पुन्हा तिथेच येऊन पोहोचल्या होत्या. एक स्त्री असूनही अघोरी शक्ती प्राप्त असलेली कलकीदेवी.


"पुन्हा परत आलीस? आता काय घडले." समोरून आवाज येत होता पण कोणीही दिसत नव्हते.


तेवढ्यात समोरून संपूर्ण काळी वस्त्रे परिधान केलेली एक वृद्ध स्त्री चालत आली.


"काय हवे आहे तुला आता?" तिने प्रश्न विचारला.


"कलकी,पंचवीस वर्षांपूर्वी जे घडले तेच पुन्हा घडत आहे. माझ्या सुनेला घेऊन आलेय."


"इनामदार घराण्यातील पुरुषांना असलेले हे वेड ह्या घराण्याला कधीच सुख लागू देत नाही." सगुणा मध्येच म्हणाली.


"कलकी,मला आता असा उपाय हवाय ज्यामुळे सुभान परत त्या वाटेला जाणार नाही." गुणवंताबाई क्रूरपणे म्हणाल्या.


"ठीक आहे. मी तुम्हाला एक अशी औषधी देते जी खाल्ल्यावर ती स्त्री तिचे सौंदर्य गमावून बसेल आणि आठ दिवसात तिचा मृत्यू होईल. पण..."


"पण काय? ह्यावेळी काय किंमत हवी आहे तुला?" गुणवंताबाई चिडल्या.


" मला ह्यावेळी एक पुरुष आणि स्त्री दोन्ही नसलेला बळी हवाय. तुम्ही तो आणून द्या." कलकी म्हणाली.


"आमचे काम झाले तर तुझेही होईल." औषधी घेऊन गुणवंताबाई वेगाने बाहेर पडल्या.

अंधार ओसरयच्या आत महालात परतणे आवश्यक होते.



केशर आणि सुगंधा परत आल्या. महालाच्या सभोवती असलेले रिंगण केशरने नष्ट केले आणि त्यांनी गुपचूप आत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ चेटकीण आत आली. सगळेजण आपापल्या जागेवर जाऊन झोपले. सुभानराव परत आलेले नसल्याने सुगंधा निश्चिंत होती. गुणवंताबाई आणि सगुणा महालात परत आल्या.



"आत्या,ही औषधी सुगंधाला खाऊ घालू आजच." सगुणाच्या डोळ्यात रक्त उतरले होते.


" हो,मलाही ती सुगंधा डोळ्यासमोर नकोच आहे."

गुणवंताबाई चिडून म्हणाल्या. दोघीही आपापल्या दालनात निघून गेल्या.



सकाळी सुभानरावांना जाग आली. शेजारी झोपलेला घुंगरू आणि त्यांच्या अंगावर असलेले व्रण पाहून त्यांना कालची रात्र पुन्हा आठवली. त्यांनी झोपेत असलेल्या घुंगरूला जवळ घेतले आणि पुन्हा प्रणयाला रंग चढला.



थोड्या वेळाने शांत होऊन पहुडलेले सुभानराव म्हणाले,"घुंगरू,हे अंगावरचे व्रण पाहून आमचा राग येत नाही?"


"राव,मी असा असूनही तुम्ही मला जे प्रेम,आदर दिला आहे. त्यापुढे हे व्रण काहीच नाहीत. नाहीतर कित्येक जण काय हाल करतात पाहिले आहे. इथे तुम्ही सोडून कोणी माझ्याजवळ येऊ शकत नाही."


असे म्हणून घुंगरुने आपल्या ओठानी त्यांचे ओठ बंद केले.

सुभानराव आनंदी मनाने महालात परत जाऊ शकत होते.



सुगंधा सकाळी झोपेतून जागी झाली. गुलाब पाण्याने स्नान केल्यावर तिने केसांना सुगंधी धूप दिला. त्यानंतर सुगंधी तेल लावून दासीने केस विंचारले. डोळ्यात काजळ घालून तिने शांतपणे दागिने घालायला घेतले. गुलबक्षी रंगाची पैठणी तिला अगदी खुलून दिसत होती. तेवढ्यात दासी केशर घातलेले दूध घेऊन आली.


"बाईसाहेब,दूध घेताय ना?" तिने अदबीने विचारले.


"राव आले का? आम्ही बरोबरच घेऊ." सुगंधाने उत्तर दिले.


तेवढ्यात सुभानराव जहागिरीच्या कामासाठी बाहेर गेले असून दोन दिवसांनी परत येतील असा निरोप आला.


"बाईसाहेब,आतातरी घेताय ना दूध?" दासीने विचारले.


सुगंधाने तो चांदीचा प्याला ओठांना लावला आणि दासी परत फिरली. सुगंधा आणि तिच्या दोन खास दासी रखमा आणि सुभा तिच्याजवळ होत्या.



दूध पिऊन झाले आणि अचानक सुगंधाचे रुप पालटू लागले. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या. त्वचा ओघळली. केस विरळ आणि पांढरे झाले. गालांची हाडे वर आली. रखमा ओरडणार एवढ्यात सुभाने तिच्या तोंडावर हात ठेवला. स्वतः ला आरशात पाहून त्याही परिस्थितीत सुगंधाला हसू आले.


"एका योगिनीवर असला प्रयोग करायची हिंमत कशी झाली त्यांची. रखमा, माझी पेटी घेऊन ये."
सुगंधाने तिला फर्मावले.




इकडे सुगंधाने दूध प्यायले ही आनंदाची बातमी सांगायला दासी पळतच सगुणाबाईंच्या दालनात आली.


"बाईसाहेब काम फत्ते. आता मरेल बघा सटवी."

दासी आनंदाने म्हणाली. सगुणाबाईंनी बोटातली हिऱ्याची अंगठी दासीला दिली आणि तिला जायला सांगितले.




चेटकीण कमळासाठी पाणी गरम करायला चालली होती. तेवढ्यात तिला एक सुंदर मेणा आलेला दिसला. त्यातून दोन स्त्रिया उतरल्या. त्यांना पाहून चेटकीण आनंदाने वेडी व्हायची बाकी होती. त्या दोन्ही स्त्रिया गरोदर होत्या.



त्या दोघी येताना पाहून सगुणाबाई पळतच आल्या. आपल्या दोन्ही नणंदा एकत्रित बाळंतपणं करण्यासाठी आलेल्या पाहून त्यांना आनंद झाला.


तेवढ्यात मागून आनसाबाईंच्या माहेरची एक बाई म्हणाली,"सुनेला आणि तिच्या लेकराला खाल्ल ह्या महालाने आता लेकी कशाला बोलावल्या."


"खबरदार, सूनबाईंचे दिवस कार्य करायला आलात तेवढेच करा. बाकी बघायला आम्ही समर्थ आहोत." सगुणाबाई क्रोधाने म्हणाल्या.


त्यांनी दोघींना आत घेतले आणि त्यांची दृष्ट काढली. इकडे चेटकीण आपले काळे डोळे स्थिर ठेवून त्यांच्याकडे बघत होती. तिला गर्भातील बाळांचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. ती आनंदाने तिथून निघून गेली.



सुगंधाने दिव्य औषधी असणारी ती पेटी उघडली.


"रखमा,मी औषधी करायला घेते. तुम्ही दोघी फक्त खाली कुजबुज करा की सुगंधाला काहीतरी झाले आहे. ती खूप आजारी आहे. आणखी एक आता जी दासी दूध घेऊन आली होती तिला पकडा. कारण तिला गायब केले जाऊ शकते."


दोघींना सूचना देऊन सुगंधा दिव्य औषधी सिद्ध करायची तयारी करू लागली. आता ह्या दासीमार्फत अनेक प्रसंगांचा उलगडा होणार होता.




हिऱ्याची अंगठी मिळाली म्हणून आनंदाने ती दालनातून बाहेर पडली तेव्हाच तिला आज संध्याकाळी संपवा असा आदेश सगुणाबाईंनी दिला होता.


आपल्यावर येणाऱ्या संकटांशी अनभिज्ञ असणारी ती दासी हिऱ्याची अंगठी सुरक्षित ठेवायला आपल्या खोलीकडे गेली. तिने खोलीचे दार उघडले आणि आत येत असलेल्या वासाने तिची शुद्ध हरपली.



चेटकीण तिची साधना पूर्ण करेल का?


सुगंधा त्या दासीला बोलते करू शकेल?


घुंगरूचा ह्या सगळ्यात बळी जाईल का?


वाचत रहा.


शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all