शापित अप्सरा भाग 49

अघोरी शक्ती चारही बाजूंनी चाल करून येत असताना सुगंधा काय करेल?

शापित अप्सरा भाग 49


मागील भागात आपण पाहिले घुंगरू बरोबर सफल प्रणय झाल्याने सुभानराव आनंदी झाले. योगिनी ग्रंथ सुरक्षित करत होत्या. तिकडे दोन गर्भार बायका महालात आल्याने चेटकीण आनंदी झाली. सुगंधावर झालेला जादुई औषधाचा प्रयोग पुढे काय रंग दाखवणार. पाहूया पुढे.


सकाळी उठल्यावर आपल्या शेजारी तृप्त झोपलेल्या घुंगरुला पाहून सुभानराव हसले. आपल्यातील पुरुष पुन्हा प्राप्त झाल्याबद्दल त्यांना प्रचंड आनंद झाला. शेवटी पुरुष शरीराचा भोगी कारण त्याची भूक दिसते आणि जाणवते देखील.


त्यांनी अंगावरचे पांघरुण दूर केले आणि तसेच अंघोळीला गेले. आज त्यांना काही कामे संपवायला लवकर बाहेर पडायचे होते. घुंगरूला जाग आली. सुभानराव अंघोळीला गेल्याचे पाहून त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले. ओलेत्या अंगाने बाहेर आलेले सुभानराव पाहून घुंगरू आपले भान हरपला.


" घुंगरू,तू महालात जा. आम्ही दोन दिवसांनी कामे आटोपून येऊ असा सुगंधाला निरोप दे."

त्यांनी घुंगरूला निरोप घेऊन महालात पाठवले.


सगुणाबाईंनी दिलेली हिऱ्याची अंगठी घेऊन ती दासी स्वतःच्या खोलीत आली आणि तिथे येत असलेल्या उग्र वासाने तिची शुद्ध हरपली.


त्याबरोबर दोन योगिनी तिला ताब्यात घेऊन गुपचूप सुगंधाच्या दालनात पोहोचल्या. सुगंधाने त्यांना तिला आत गुप्त खोलीत न्यायचा इशारा दिला.


इकडे सगुणाबाईंची माणसे तिला संपवायला तिच्या मागावर होती. बराच वेळ झाला तरी ती बाहेर येत नाही असे पाहून त्यातील दोघे जण आत घुसले.


आतमध्ये कुठेही ती दासी नव्हती.


"आर देवा,ही बया कुठ गेली?"

"गणपा,हिला जमिनीन खाल्ली का काय?"

"सख्या गप. लपली असल हितच कुठतरी." दोघांनी सगळी खोली शोधली.

तिचा कुठेही मागमूस लागत नव्हता.

"सखा,आता काय सांगायचं?"

"काहीच सांगायचं नाय. इचारल तर काम फत्ते केल आस सांगू."

दोघे असे ठरवून गुपचूप खोलीच्या बाहेर पडले.



सुगंधाने दिव्य औषधीने सिद्ध केलेले पाणी अंगावर घेऊन अंघोळीला सुरुवात केली. तोपर्यंत घुंगरू आला होता.


त्याने सुगंधा कुठे आहे असे विचारले त्यावर रखमा म्हणाली,"आमी देतो निरोप. "


त्यावर सुभानराव दोन दिवस येणार नसल्याचे त्याने सांगितले. घुंगरू बोलत असताना त्याच्या मानेवर,हातावर असणारे वळ बघून रखमा अस्वस्थ होत होती. ही गोष्ट लक्षात येताच घुंगरू वेगाने बाहेर पडला आणि स्वतः च्या खोलीत येऊन त्याने दरवाजा बंद केला. आता दिवसभर शांत झोपून राहायचे त्याने ठरवले.



इकडे सुगंधा जवळपास तासाभराने बाहेर आली. तिचे रूप पूर्वीसारखे तेजःपुंज आणि सुंदर दिसत होते.


"रखमा,देवळात जायची तयारी कर आणि केशरला तसा निरोप पाठव."


सुगंधा स्वतः पूजेची थाळी तयार करत असताना मंद स्मित करत होती. आता अनेक प्रश्नांची उत्तरे तिला लवकरच मिळणार होती.



सगुणाबाई आपली योजना यशस्वी झाल्याने प्रचंड आनंदी होत्या. आपल्यावर आलेले सुगंधारुपी किटाळ दूर झाल्याने देवीची ओटी भरायला जायचे त्यांनी ठरवले.


केशरी काठ असलेली गर्भरेशमी पैठणी,त्यावर सगळे सुवर्ण अलंकार घालून कपाळावर चंद्रकोर रेखाटताना आज त्यांना मनापासून मोकळे वाटत होते. त्यांचे सौभाग्य आता त्यांना परत मिळणार होते. चांदीच्या ताटात पूजेचा सगळा सरंजाम घेऊन सगुणाबाई देवळात पोहोचल्या. त्यांना पाहून पुजारी घाबरत पुढे आले.


"बाईसाहेब आपण?"

"हो आम्ही! आम्हाला विसरलात की काय तुम्ही?" सगुणाबाई हसून म्हणाल्या.


"तसे नाही बाईसाहेब,आत अभिषेक चालू आहे." पुजारी अदबीने म्हणाले.


" आत्याबाई असतील. आमचाही त्यातच करा मग." सगुणाबाई लगबगीने आत जाऊ लागल्या.


"थोरल्या मालकीण नाहीत आत." पुजारी कसेबसे म्हणाला.


त्याचक्षणी सगुणाबाई जागेवर थबकल्या.

"मग कोण आहे? कोणी मानकरी आहे का?" त्यांनी विचारले.


पुजारी गप्प राहिले.

"आम्ही काहीतरी विचारत आहोत?"


"सुगंधाबाई आहेत आत." समोरून उत्तर आले आणि त्याच वेळी सगुणाबाबाईंचे पूजेचे ताट खाली कोसळले.



सुगंधा आणि केशर स्वतः देवीचे स्तोत्र पठण करत अभिषेक करत होत्या. बाहेर आवाज आलेला ऐकूनही त्यांचे लक्ष विचलित झाले नाही. इकडे सगुणाबाई मात्र प्रचंड चिडल्या.


"पुजारी काका,असे कोणालाही अभिषेक करून द्यायला कोणी परवानगी दिली?"


"बाईसाहेब खुद्द मालकांनी सांगितले आहे. सुगंधाला इथे इनामदार असण्याचा मान मिळाला पाहिजे म्हणून."

"अस्स, आता तिला बाहेर काढा. थोरल्या इनामदार बाई आल्यात म्हणाव."
सगुणाबाईंनी हुकूम सोडला.



पुजारी तसेच जागेवर उभे असलेले पाहून सगुणाबाई चिडल्या. रागाच्या भरात त्यांनी स्वतःच सुगंधाला मंदिरातून बाहेर काढायचे ठरवले. पदर खोचून त्या पुढे झाला पण.. त्यांना समोर गाभारा दिसत असूनही तिथवर जाता येईना. आपल्याला काय होतेय हेच त्यांना समजत नव्हते. जणू कुठल्यातरी अज्ञात शक्तीने त्यांना एका जागेवर जखडून ठेवले होते.


अभिषेक पूर्ण करून सुगंधा आणि केशर बाहेर आल्या. त्याबरोबर सगुणाबाईंचे पाऊल पुढे पडले. आपण दिलेले औषध घेऊनही सुगंधा आहे तशीच सुंदर कशी? त्यांना काहीच समजत नव्हते.



"थोरल्या बाई,प्रसाद घ्या." सुगंधा त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.


"नाचगाण करणाऱ्या बाईच्या हातून काही खात नाही आम्ही." समोरून उत्तर आले.


"जशी तुमची मर्जी. फक्त एक सांगते. तुम्ही तुमचा वाटा आनंदाने जगा आणि मला माझा जगू द्या."
सुगंधा डौलदार पावले टाकत निघून गेली.


पुजारी दुसरे पूजेचे तबक घेऊन आले. अभिषेक सुरू झाला खरा पण सगुणाबाई मात्र अस्वस्थ होत्या. आधी त्या दासीला गाठायला हवे. त्यांनी मनात पुढचे मनसुबे आखले.



इकडे चेटकीण दोन गर्भार स्त्रिया पाहून आनंदाने वेडी झाली होती. तिकडे गुणवंताबाई आपल्या जावेच्या दोन्ही मुली बाळंतपणासाठी आल्याने आनंदी झाल्या होत्या तर दुसऱ्या बाजूने आनसाबाईंसोबत घडलेला प्रकार त्यांना अस्वस्थ करत होता.



गंगाधर शास्त्री कधी येतात याची वाट बघत त्या अस्वस्थ फेऱ्या मारत होत्या. इतक्यात शास्त्री आल्याचा निरोप पोहोचला. त्यांना दालनात पाठवून द्यायला सांगून गुणवंताबाई आसनावर बसल्या. गंगाधर शास्त्री येताच त्यांना बसायला आसन देऊन नमस्कार केला.



"बाईसाहेब,महालात घडलेला प्रकार अघोरी आहे. तसा प्रकार पुन्हा घडू शकतो."


"त्यासाठीच तुम्ही उपाय करावा असे आम्ही सुचवले." गुणवंताबाई नम्रपणे म्हणाल्या.


"आम्ही शिव तांडव स्तोत्र आणि इतर काही सुरक्षा मंत्र जपून एक अध्यात्मिक यंत्र बनवले आहे. ते बैठकीच्या दालनात लावा. त्यामुळे आपल्याला नक्कीच अघोरी शक्तींना थांबवता येईल."

गंगाधर शास्त्री म्हणाले.



"पण कसे? गुन्हा घडला तरी तो तिथे नक्कीच घडणार नाही." गुणवंताबाई म्हणल्या.


" हे घ्या. हे पदक तुमच्याजवळ ठेवा. जेव्हा कधी अशी अघोरी शक्ती त्या यंत्राजवळ जाईल पदकाचा रंग बदलेल."

गंगाधर शास्त्री म्हणाले.



"शास्त्रीबुवा तुमचे खूप आभार."

"इमानदार घराण्याचे रक्षण करणे आमचे काम आहे. पण...बाईसाहेब ह्यावेळी कोणत्याही शक्तींची मदत टाळा आणि देवावर विश्वास ठेवा."

शास्त्री निघताना म्हणाले.


गुणवंताबाई शांत झाल्या. त्यांनी नोकरांना घेऊन ते यंत्र बैठकीच्या दालनात लावले आणि त्या पुन्हा परत आल्या.



सगुणाबाई मंदिरातून थेट आपल्या दालनात आल्या. त्यांनी सखा आणि गणपा दोघांना बोलावणे पाठवले. ते दोघे येईपर्यंत त्या कशाबशा शांत होत्या.


त्या दोघांना आलेले पाहून सगुणाबाई कडाडल्या,"कुठेय ती हरामखोर. तिला आता आमच्यासमोर हजर करा."


त्यांचा रुद्रावतार बघून ती सापडत नसल्याचे गणपाच्या तोंडून निघून गेले.


"आज रात्रीपर्यंत तिला हजर करा नाहीतर तुमचे काही खरे नाही. निघा इथून." सगुणाबाई चिडून म्हणाल्या.



सखा आणि गणपा जातात सगुणाबाई वेगाने आपल्या सासुकडे पोहोचल्या.


"आत्याबाई,तुमची ती कलकीदेवी खोटी आणि तिचे उपाय देखील."
सगुणाबाई रागाने म्हणाल्या.


" सगुणा,कोणाबद्दल आणि कोणापुढे बोलतेस?"


"आत्या,तुमच्या त्या कलकीने दिलेले औषध खाऊनदेखील सुगंधा पूर्वीप्रमाणे सुंदर आहे. मी स्वतः तिला बघून आले आहे."


"काय? कसे शक्य आहे?" गुणवंताबाई आता जरा घाबरल्या.


तरीही त्यांनी तसे दाखवले नाही.


"सगुणा,आपल्याला आजच हा निरोप कलकीपर्यंत पोहोचवावा लागेल. तुम्ही काळजी करू नका. आपल्याला सुगांधापासून सुटका मिळणार."


सगुणाबाई कशाबशा शांत होऊन परत आल्या आणि इकडे आपल्या खास माणसांकडून गुणवंताबाईंनी निरोप पोहोचता करायची व्यवस्था केली. गुणवंताबाईंचा गुप्तहेर महालातून बाहेर पडताच खंडोजी त्याच्या मागावर निघाला.



सुगंधा देवीला अभिषेक करून परत आली. तिने केशरला आपल्यासोबत झालेला सगळा प्रकार सांगितला. तसेच त्या दासीला कैद केल्याचे देखील सांगितले.


" मग आपल्याला सत्य वदवून घेणे फार अवघड नाही."

"हो,पण तिला आताच बोलते करावे लागेल." सुगंधा म्हणाली.


"नाही,आजचा विधी पूर्ण होऊ देत. मग आपण तिला बोलते करू. तोपर्यंत तिला असेच कैद ठेवू."

केशर आणि सुगंधा दोघींनी ह्यावर विचार करून आज रात्री ग्रंथ सुरक्षित केल्यावर हे सगळे करायचे ठरवले.



इकडे कलिका देवीला निरोप पाठवून झाल्यावर गुणवंताबाई आपल्या दोन्ही पुतण्या आणि जावेला भेटायला गेल्या.


"थोरल्या बाई,ह्यांना इथे ठेवायला नको." मुलींच्या आईने काळजी व्यक्त केली.


"असे घाबरून कसे चालेल. आपल्या लेकी इथे सुरक्षित राहतील." गुणवंताबाई म्हणाल्या.


"पण विषाची परीक्षा नकोच. मला मेलीला माहेर नाही. नाहीतर तिकडे घेऊन गेले असते."
आता मात्र गुणवंताबाई हतबल झाल्या.


"ठीक आहे. त्यांना माझ्या माहेरी पाठवू. पण आल्यासारखा पाच दिवस राहू दे पोरींना." त्यांना समजावून गुणवंता बाई बाहेर पडल्या.


अचानक त्यांना कोणीतरी आसपास असल्याचा भास झाला. त्यांनी गळ्यातील पदक पाहिले. पदक रंग बदलू लागले होते. पण आसपास कोणीच दिसत नव्हते. परंतु काही क्षणात पदक पुन्हा पूर्वीच्या तेजाने चमकू लागले आणि त्या आपल्या दालनात परतल्या.


चेटकीण सगळे ऐकून आनंदी झाली. महालाच्या बाहेर तिला सहज दोन्ही गर्भ मिळवता येणार होते. फक्त पाच दिवस वाट पाहायची होती. तेवढ्यात कमळाने आवाज दिला आणि आपले क्रूर हास्य लपवत ती बाहेर आली.


ग्रंथ सुरक्षित होईल?

चेटकीण दोन गर्भ मिळवू शकेल?

सुगंधावर नवे संकट येईल का?


वाचत रहा.

शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर.




🎭 Series Post

View all