शापित अप्सरा भाग 50

वर्चस्वाचा क्रूर खेळ कोणाचा बळी घेईल?

शापित अप्सरा भाग 50


मागील भागात आपण पाहिले सुगंधा तिच्या दुधात औषध मिसळणाऱ्या दासीला पकडते. गुणवंताबाई कलिकादेवीला निरोप पाठवतात. तिकडे चेटकीण आणखी दोन गर्भ मिळवायची योजना तयार करत असते. आता पाहूया पुढे.


गुणवंताबाईंचा माणूस महालातून बाहेर पडताच खंडोजीने इशारा दिला आणि त्याची चार माणसे सोबत घेऊन त्याने पाठलाग सुरू केला. कारण सुगंधा आणि सुभानराव यांना धोका असल्याचे त्याला वाटत होतेच.

गुणवंताबाईंचा माणूस वेगाने निरोप घेऊन निघाला आणि त्याच्या पाठोपाठ खंडोजी आणि त्याची माणसे मागावर निघाली.



इकडे योगिनी आज ग्रंथ पूर्ण सुरक्षित करणार होत्या. सुगंधा आणि केशर तयार झाल्या.

"सुगंधा,आजचे काम पूर्ण झाल्यावर मी इथून जायला निघणार."

"केशर,अजून थोडे थांब ना. तू गेल्यावर मला एकटे पडायला होईल."

"नाही सुगंधा,मला पुन्हा आग्रह करू नकोस. तसेही रखमाला तुझ्यासोबत ठेवून जात आहे. काळजी करू नकोस."


केशरने मंत्र जपताच संपूर्ण महालाच्याभोवती सुरक्षा रिंगण आखले गेले. आता महालातील माणसांना हे रिंगण असेपर्यंत जाग येणार नव्हती.


सुगंधा आणि केशर बाहेर पडल्या. चेटकीण मात्र आज महालातच थांबून होती. कारण योगिनी सामर्थ्यवान होत्या. तिला त्या सहज संपवू शकत होत्या. आज महालात राहून गर्भ चोरणे शक्य असले तरी चेटकीण तसे करणार नव्हती. ह्या दोन्ही स्त्रिया महालातून बाहेर पडल्यावर गर्भ मिळवणे आणि विधी पूर्ण करणे जास्त सोपे होते.




कमळा जागीच होती. आपल्या आसपास चेटकीण वावरत असल्याचे तिला समजले होतेच. चेटकीण तिची सिद्धी मिळवायचा अवकाश तिला संपवायचे कमळाने ठरवले होते. पण ह्या कामात घाई करून चालणार नव्हते. शांतपणे वाट पाहण्यात फायदा होता.


तसेही तिला आधी सुभानराव हवे होते. कमळा विचार करत जागीच होती. संपूर्ण महाल मात्र अतिशय गाढ निद्रेत होता.



केशर आणि सुगंधाने त्या गुप्त योगिनी मंदिरात प्रवेश केला. आज ह्या साधनेचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अमरत्व मिळवायचे रहस्य असलेला तो ग्रंथ शोधणे कोणालाही अशक्य कोटीतील असणार होते.


चंद्राचा प्रकाश ग्रंथावर पडला आणि साधना सुरू झाली. जवळपास दोन प्रहर सुरक्षाकवच सिद्ध करण्यात गेले आणि ग्रंथ अदृश्य झाला.


" सुगंधा,आता हा ग्रंथ त्यालाच सापडेल ज्याला अमर व्हायचा मोह नाही. तू काढलेली सात चित्रे ह्या मंदिरापर्यंत पोहोचवतील पण त्यानंतर केवळ योगिनी स्त्री किंवा तिची वंशज हा ग्रंथ प्रकट करू शकेल."

केशर थांबली.


सगळ्या योगिनी आता शांत होत्या. महालात परत जायच्या आधी केशरने सर्वांना इथून निघायची वेळ सांगितली. आता उत्तरेकडे प्रवास सुरू होणार होता.



गुणवंताबाईंचा माणूस त्या पडक्या वाड्याजवळ पोहोचला. रात्रीच्या अंधारात तो वाडा अधिकच गूढ भासत होता. त्याने वाड्यात आत प्रवेश करताच आतून आवाज आला.


" काय निरोप हाय गुणवंताबाईंचा?"

"त्ये न्हाय ठाऊक. ह्यात समद लिवल हाय."

निरोप घेऊन आलेला इसम घाबरला होता.


तो तिथेच खलिता घेऊन उभा होता. कलिका पुढे आली. अंधारात तिचे काळे केस,कपाळावर भरलेला मळवट,अंगावर असलेल्या चित्र विचित्र माळा ह्यामुळे ती अधिकच भयानक दिसत होती.


तिने खलिता वाचला.


"म्हणजे एकतर औषध दिलेच नाही किंवा जिला दिले ती सामान्य स्त्री नाही."


कलिका स्वतःशीच बोलत होती. तिने पुन्हा उलटा निरोप सांगितला.


"तुझ्या मालकीण बाईला सांग ह्यात लिहिलेल्या सगळ्या वस्तू आणि स्त्री,पुरुष दोन्ही नसलेला एक बळी लागेल."


कलिकाने त्याला निरोप देऊन पाठवले. खंडोजी तो निरोप ऐकताच स्तब्ध झाला. काहीतरी वेगळेच घडणार असल्याचे त्याला आतून वाटत होते. त्यांनी स्वाराचा पाठलाग सुरू केला.



खंडोजी अस्वस्थ मनाने पाठलाग करत होता. एकदा त्याला वाटले सरळ ह्या निरोप्याला मारून टाकावे. दुसरे मन सांगत होते तो खलिता ताब्यात घे .


खंडोजी जाणून होता यातील काहीही केले तरी त्याच्या जीवाला धोका होत्या. त्यापेक्षा सरळ सुगंधाला सगळे सांगावे असे त्याने ठरवले.


महाल जवळ येऊ लागला. घोडे वेगाने धावत होते. समोर दिसणारा स्वार अचानक नजरेच्या टप्प्यातून नाहीसा झाला. खंडोजीने थांबायचा इशारा दिला. गावच्या सीमेजवळ असणाऱ्या ह्या छोट्या मंदिराजवळ अचानक तो गायब झाला होता.


"खंडोजी,त्यो कुठ गेला आसल?"
बरोबरचा एकजण म्हणाला.

"मालकीण बाईंना भेटायला. खंडोजी हे समद येगळ हाय. ह्यात पडायला नग."
एकाने सल्ला दिला.


"मालक आल की आपल काम संपल. पर खलिता मिळाला असता तर त्यासनी दावता आला असता."


तेवढ्यात खंडोजीला धड पुरुष ना धड स्त्री असा बळी हवा असल्याची गोष्ट आठवली. महालात असा एकच होता .


"चला,समदी महालात. मला रस्ता घावला हाय."


खंडोजी घोडे पुढे काढत म्हणाला.



योगिनी ग्रंथ सुरक्षित करून बाहेर पडल्या. बाहेर येताच केशरने त्या गुप्त मंदिराकडे जाणारा मार्ग मंत्र जपून कायमचा बंद केला. आता वेगाने महाल गाठणे आवश्यक होते. सगळ्या योगिनी महालात आल्या.


रिंगण संपले आणि त्याबरोबर आलेली झोपदेखील उडून गेली. सगुणाबाई आणि गुणवंताबाई आपापल्या दालनात अस्वस्थ होत्या. काहीही करून सुगंधा संपायला हवी. दोघींच्या मनात ह्याच विचाराचा जप चालू होता.



इकडे सुगंधा आणि केशर दालनात परत आल्या.


"सुगंधा,तू जिला पकडले आहे त्या दासीला भेटू."
दोघींनी त्या गुप्त खोलीत प्रवेश केला.


एका कोपऱ्यात तिला बांधून ठेवले होते. आपल्याला सगुणाबाईंच्या माणसांनी पकडले असेच तिला वाटत होते. अंधारात हालचाल झालेली पाहून ती सावध झाली.


केशरने फक्त हात फिरवून खोलीतील मशाली पेटवल्या. सुगंधा आणि केशर समोर बघताच तिला समजले आता आपले काही खरे नाही.


" सकाळी मला दिलेल्या दुधात काय होते?"
सुगंधा करारी आवाजात म्हणाली.
ती तोंड उघडेना.


"थांब सुगंधा,ही अशी बोलणार नाही."
केशरने मंत्राने विषारी साप प्रकट केला.


" आम्हाला सगळे सांगितले तर तू जिवंत राहशील."
सुगंधा निर्धाराने म्हणाली.

तशी ती मोठ्याने हसली.
"ह्या महालात तीस वर्षे हाय. काम झाल की हित कुणी जित्त रहात न्हाय. म्हणून तर पळून जाणार व्हते. तुमी कायबी करा. म्या काहीच सांगणार नाय."
तिने बेफिकीर उत्तर दिले.


सुगंधा तिच्या अगदी जवळ गेली. सुगंधाने आपले काळेभोर डोळे तिच्या डोळ्यात रोखत एकेक शब्द पुन्हा उच्चारला. तसे तिने पानात औषध टाकण्यापासून ते आजपर्यंत सगळे सांगितले. सुगंधा बाजूला झाली.


"केशर आता हीचे काय करायचे?"
" सोडून देऊ ती फक्त हुकूम ऐकत होती."
त्याबरोबर ती रडायला लागली.

" मला सोडु नगा. मला ते जिवंत सोडणार न्हाय. गावाला माझी पोरगी,नात आन नवरा हाय."
केशरने तिला मोकळे केले.

"घाबरु नकोस. तुला तुझ्या गावी सुखरूप पोहोचवू."


हे ऐकताच ती म्हणाली,"तायसाब, तुमासनी काय झालं न्हाय ते बगून थोरल्या मालकीणबाई पुन्यांदा तेच करत्याल जे आधी केल व्हत."


असे म्हणून तिने पुतळाबाईला कसे मारले आणि मालक जागेवर कसे ह्याचे उत्तर दिले.


सुगंधा आणि केशर दरवाजा बंद करून बाहेर आल्या.


"सुगंधा,ही माणसे प्रचंड क्रूर आहेत. आम्ही उद्या जायला निघू. सांभाळून रहा."

केशर दालनातून बाहेर पडली.




सुगंधा मात्र घडलेला प्रकार ऐकून हतबल झाली होती. तिला एकक्षण वाटले केशरसोबत निघून जावे इथून . दुसऱ्या क्षणी सुभानराव नजरेसमोर आले. आपले प्रेम आपण असेच सोडून जायचे?


ह्यापूर्वी महालात आलेल्या स्त्रिया सामान्य होत्या. आता तुमची गाठ ह्या सुगांधाशी आहे. एका योगिनिशी लढताना तुम्हाला माघार घ्यावीच लागेल. सुगंधाने स्मितहास्य केले आणि स्वतः ला झोपेच्या स्वाधीन केले.



गुणवंताबाई जाग्याच होत्या. त्यांचे भव्य तैलचित्र समोरच्या भिंतीवर होते. अचानक त्या चित्राच्या आतून टकटक आवाज येऊ लागला आणि त्या हसून उठल्या. त्यांनी गुप्त कळ फिरवली. चित्र बाजूला सरले आणि आतून निरोप आणणारा बाहेर आला.


" बोल काय निरोप आहे?"
त्यांनी अधीर होऊन विचारले.


" मालकीणबाई, खंडोजी माझा पाठलाग करत व्हता. तुमचा अंदाज खरा ठरला."

त्याने खलिता सोपवत उत्तर दिले. खलिता हातात घेऊन त्यांनी त्याला जायचा इशारा दिला.


" गुणवंताबाई ह्यावेळी समोर कोणी सामान्य स्त्री नाही. माझ्या औषधीपासून एकतर चेटकीण वाचू शकते किंवा सिद्धहस्त योगिनी. सुगंधा सामान्य स्त्री नाही. तिला संपवायला आपल्याला वेगळा उपाय करावा लागेल. मात्र त्याची किंमत म्हणून माझ्या साधनेसाठी तुम्हाला एक बळी आणून द्यायचा आहे. तसेच सोबत सुगंधाचे तैलचित्र आणायला विसरू नका."


खलिता बंद करताच त्यांच्या क्रूर डोळ्यात वेगळेच हसू खेळू लागले. सुगंधा इतकाच आणखी एकजण त्यांच्या डोळ्यात खुपत असे.

"घुंगरू."
त्यांनी आपले दात खालच्या ओठात रोवत खुनशी हास्य केले.


सुभानराव आणि घुंगरू यांचे संबंध जगजाहीर असल्याने अनेकदा त्यांना टोमणे ऐकावे लागत. त्यामुळे आता घुंगरूला संपवायची संधी त्या सोडणार नव्हत्या. त्याच्याआधी सुगंधाचे चित्र गुपचूप काढून घ्यायची व्यवस्था करायला हवी. उद्या एकाच दिवसात चित्र मिळायला हवे. मनाशी पुढील योजना आखत त्या झोपी गेल्या.


घुंगरूचा बळी जाईल का?


खंडोजी त्याला वाचवू शकेल?


सुगंधा आपल्याला समजले ते सुभानरावांना सांगेल?


कलिका सुगंधाला संपवायचा कोणता उपाय सांगेल?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all