शापित अप्सरा भाग 51

मृत्यूचे तांडव सुरू.

शापित अप्सरा भाग 51


मागील भागात आपण पाहिले ग्रंथ पूर्ण सुरक्षित झाला आणि केशर आता लवकरच निघून जाणार होती. पकडलेल्या दासीने सगळे कबूल केले आणि आता शत्रू सुगंधाला समजला होता.
तिकडे दोन गर्भ मिळणार असल्याने चेटकीण आनंदी होती. कलिकादेवीसाठी घुंगरूला बळी द्यायचे ठरवून महालात गुणवंताबाई पुढची तयारी करत होत्या. आता पाहूया पुढे.



सुगंधा जवळपास तीन दिवसानंतर गाढ झोप घेऊन उठली होती. तिने छान देवपूजा केली आणि बाहेर येऊन समोर ठेवलेले घुंगरू तिने कपाळावर लावले. आज खूप दिवसांनी तिच्यातील लावण्यवती बाहेर येत होती. सुगंधाने घुंगरू पायात बांधले आणि त्याबरोबर ताल धरला. बेभान होऊन नाचताना सगळा भोवताल ती विसरून गेली.


ती नाचत असतानाच सुभानराव आले. रखमा तिला थांबवणार होते पण सुभानरावांनी तिला खुणेने गप्प केले.
सुगंधा नाचत असताना तिच्या नृत्याच्या तालावर नकळत सुभानराव गाऊ लागले.


धुंदी ज्वानीची अवती भवती भरती शिणगाराला आली.
तुझी सुगंधी काया बघुनी बाधा मदनाची सखे मला झाली.


तुझ लाडिक हसणं आन डोळ्यामधल जहरी बाण इशकाच.
झोक कमरेचा बघून सजनी किती झुरण तुझ्या आशिकाच
वेड लागलं मला हरणी किती गाऊ कवन तुझ्या प्रेमाचं.


सुगंधाचा अप्रतिम नाच,त्याला साथ देणारा सुभानरावांचा पहाडी पण तितकाच गोड आवाज आणि सोबत असलेले स्वर्गीय संगीत. आपसूक महालातील सगळ्यांचे पाय सुगंधाच्या दालनाकडे वळले. सगळेजण मंत्रमुग्ध होऊन समोरचा स्वर्गीय आविष्कार पहात होते.


"थांबा! काय लावल आहे हे?"
गुणवंताबाईंचा करारी आवाज घुमला आणि सुगंधाची नृत्याची लय तुटली.

त्याबरोबर एक घुंगरू तुटले आणि ताडकन उडून गुणवंता बाईंच्या दिशेने गेले. सुभानरावांनी ते घुंगरू झेलले.

"ह्या निर्जीव घुंगराला देखील असा व्यत्यय आवडला नाही बहुतेक."
सुभानराव म्हणाले.


"सुभानराव,असली थेरे तमाशाच्या तंबूत करायची आमच्या महालात नाही. "
गुणवंताबाई कडाडल्या.


"खामोश,आम्ही थोरले इनामदार आहोत. आम्हाला शिकवू नका." सुभानराव गरजले.


"सुभानराव,एका दिड दमडीच्या नाचीसाठी आमचा अपमान करताय तुम्ही."
समोरून पुन्हा उत्तर आले.


" खबरदार,सुगंधा आमची पत्नी आहे. तसेही ह्या महालातील जनाना काय करू शकतो ह्या भिंतीना चांगलेच ठाऊक आहे."


सुभानरावांनी उत्तर दिले आणि गुणवंताबाई रागाने माघारी फिरल्या. वाड्यातील सगळेजण तोपर्यंत तिथून निघून गेले होते. समोर घामाने भिजलेली तेजस्वी सुगंधा जागेवरच उभी होती.



" राव,तुम्ही त्यांना असे बोलायला नको होते."

सुभानरावांच्या हातातले घुंगरू काढत सुगंधा म्हणाली.


"त्यांनी तुमचा केलेला अपमान आम्ही यापुढे सहन करणार नाही."

सुगंधाला मंचकी बसवत सुभानराव हळूवार आवाजात म्हणाले.


" पण त्या ह्या महालाच्या मालकीण आहेत. त्यांना असे अपमानित करणे योग्य नाही."
ती पुन्हा म्हणाली.


" सुगंधा, जगासमोर स्वच्छ चेहऱ्याने नाचणारी पापी आणि महालाच्या काळोख्या अंधारात चाली रचणारी साध्वी?"

सुभानराव नकळत बोलून गेले.


" राव,प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळत असतेच."

सुगंधा त्यांची तलवार आणि मंदील जागेवर ठेवत म्हणाली.


" बेशक,मिळणारच. फक्त अपराधी पुराव्यासह सिद्ध होउद्या मग बघा."

सुभानराव अजूनही रागात होते.

"तुम्ही अंघोळीला जा बरे. रखमा केशर घातलेले दूध घेऊन ये." सुगंधा सूचना देत म्हणाली.


"अंघोळीला,एकटाच?"

सुभानराव गालात हसले आणि पुढे चालू लागले. रखमा बाहेर जाताच दालनाचे दरवाजे बंद झाले.



सुभानराव अंगावरील सर्व वस्त्रे दूर करून समोरील पाण्यात पहुडले. मागाहून आलेली सुगंधा त्यांना पाहून थबकली.


"राव,काय विचार आहे आज?"


"आमच्या प्रिय पत्नीला आम्ही एकत्र स्नान करायला बोलावतो आहोत."
खट्याळ हसत उत्तर आले.


"अस्स,मग मी पाणी घालते छान."
सुगंधा म्हणाली.


तसे सुभानराव उठून बाहेर आले. दिवसाच्या लख्ख प्रकाशात तो मर्दानी पुरुषी देह पाहून सुगंधा क्षणभर लाजली.


"छे, प्रणयाच्या खेळात प्रियकराला पाहून लाजायचे नाही."

जवळ येत सुभानराव म्हणाले.


त्यांचे उष्ण श्वास सुगंधाला जाणवत होते. सुगंधा वेल झाडाला बिलगावी तशी त्यांना बिलगली आणि धुंद क्षण बहरू लागले. प्रणय पूर्ण झाला आणि दोघानाही आपापले उत्तर मिळाले होते.


"सुगंधा,आज आम्हाला आमच्या मनातील शंका दूर झाल्याचे पटले आहे."


" हो का? त्यासाठी घुंगरूमध्ये यावे लागले पण."

तिचे दुहेरी बोल ऐकताच सुभानराव हसले.


दोघेही सुस्नात होऊन बाहेर आले. आरस्पानी सौंदर्य लाभलेली एक अप्सरा आणि पुरुषी सौंदर्याचा मापदंड असलेला एक गंधर्व यांचा स्वर्गीय प्रणय आज खऱ्या अर्थाने फुलला होता.



टकटक असा दारावर कडी वाजवल्याचा आवाज झाला आणि घुंगरू झोपेतून जागा झाला. त्याने अंगाला अळोखे पिळोखे दिले आणि तो कडी उघडुन बाहेर आला. तेवढ्यात एका पुरुषी हाताने त्याचे तोंड बंद झाले आणि दुसऱ्या क्षणी घुंगरूला गुप्त मार्गाने महालाच्या बाहेर आणले गेले.


हातपाय आणि डोळे बांधलेल्या अवस्थेत त्याला घेऊन स्वार रवाना झाले.


"खंडोजी,त्यांनी कुठ नेल असल घुंगरूला?"

"कुठ म्हंजी,त्याच कलिकादेवीकड . चला लवकर रस्त्यात हाणू त्यांना ."
खंडोजीने आदेश दिला.


परंतु ह्यावेळी शत्रू सावध होता. घुंगरूला विरुद्ध दिशेला असलेल्या एका गावातील सावकाराच्या वाड्यात आजचा दिवस ठेवा असा आधीच आदेश आला होता.


अंधाऱ्या कोठडीत घुंगरूचे गाठोडे फेकण्यात आले. आपल्यावर संकट आल्याची जाणीव त्याला झाली. नक्कीच महालातून आपले अपहरण करण्याचा आदेश दिला असणार. पण कोणी? कशासाठी? घुंगरू विचार करत असताना अचानक दरवाजा उघडला.


एक बलदंड देहाचा पुरुष आणि त्याचे तीनचार मित्र आत आले. त्याने इशारा करताच ते चार जण आणि तो स्वतः घुंगरूवर तुटून पडले. अमानुष अत्याचार आणि रक्तबंबाळ घुंगरूला प्रचंड वेदना होत होत्या. ते सगळेजण निघून गेले.


"सुभानराव,कुठे आहात तुम्ही?"
घुंगरू रडत होता.


इकडे खंडोजी पाठलाग करत बराच लांब येऊन पोहोचला. कुठेही कसलाच मागमूस लागत नव्हता.


बळी आज रात्री पोहोचेल असा निरोप कलिका देवीला आधीच मिळाला होता. तिने काली मातेच्या आणि भैरवीच्या मूर्तीसमोर पूजेची तयारी केली. प्राचीन अघोरी शक्ती प्राप्त करण्यापासून आता तिला कोणीही थांबवू शकत नव्हते. तिने सगुणाबाईंनी पाठवलेले तैलचित्र समोर ठेवले.


त्यावरील पडदा दूर सारताच ती ओरडली,"कामाक्षी? तुझा सूड घेण्याची संधी मला नियतीने दिलीच. चेटकीण असूनही योग्याच्या नादी लागलीस. आता तुझ्या मुलीचा बळी मी घेणार. तुला संपवले तसेच तुझ्या मुलीला तेव्हाच संपवता आले नाही. आता नियती ती संधी मला परत देत आहे. तुझा आत्मा अनंतकाळ माझ्या कैदेत आहे. लवकरच तुझ्या मुलीला तशीच शिक्षा मिळेल."

कलिका मोठ्याने हसत म्हणाली.



गुणवंताबाई आणि सगुणाबाई माहेरी जायचे आहे असे सांगून बाहेर पडल्या. आपला पाठलाग होणार नाही याची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली होती. तिकडे खंडोजी आणि त्याची माणसे आजूबाजूला दबा धरून होती.



"खंडोजी पखालीतल पाणी संपल. "
" चला समोर हिर हाय. पाणी पिऊन घिऊ."

खंडोजी आणि त्याचे साथीदार विहिरीवर पाणी प्यायला आले. तेवढ्यात एक लहान मुलगी आली.


"काका,पाणी हवे का प्यायला? माझ्या हंड्यात आहे."
खंडोजी आणि त्याच्या साथीदारांनी पाणी प्यायले.


अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. ती छोटी मुलगी क्रूर हसू लागली.


"मूर्खा,एक सामान्य माणूस अघोरी शक्ती बरोबर लढूच शकत नाही. "


कलिका आपल्या मूळ रूपात आली. तिने इशारा करताच विहिरीतील अतृप्त शक्तींनी सर्वांना विहिरीत खेचून घेतले.



घुंगारूचे रक्तबंबाळ गाठोडे उचलून घोडेस्वार रस्ता कापू लागले. सूर्य मावळतीला गेला होता. अंधार पडला होता. घुबडांचे ओरडले,रातकिड्यांची किरकिर,झाडांच्या पानांचा सळसळ येणारा आवाज,मधूनच येणारी एखादी कोल्हेकुई. सगळे वातावरण अघोरी आणि भयंकर झाले होते.


थोड्याच वेळात कलिकादेवीचा गावाबाहेर असलेला वाडा दिसू लागला. वाड्याच्या बाहेर इनामदार घराण्यातील शाही मेणे बघताच घुंगरूला घेऊन येणारे आनंदी झाले. त्यांनी हातपाय आणि डोळे बांधलेल्या घुंगरूला आत आणून फेकले.


"सोडा मला, सुभानराव सोडणार नाहीत तुम्हाला." घुंगरू ओरडला.


"त्याचे डोळे उघडा. तोंड मोकळे करा."
कलिकाने आदेश देताच तिच्या शिष्यांनी घुंगरूचे डोळे उघडले. समोर मांडलेली पूजा पाहून घुंगरू घाबरला.


"घाबरु नकोस,लवकरच तुला ह्या अर्धवट देहातून मुक्त करणार आहे."
कलिका मोठ्याने हसली.


तेवढ्यात घुंगरूला गुणवंताबाई आणि सगुणाबाई दिसल्या.


"थोरल्या मालकीण मला वाचवा. तुम्ही सांगाल ते करीन . तुमचा गुलाम होऊन राहीन."
रडत घुंगरू म्हणाला.


" तुझ्यासारखी लोक जवळ घ्यायला मी सुभानराव नाही. कसले विकृत चाळे करुन माझ्या मुलाला फसवल?"
गुणवंताबाई क्रोधाने म्हणाल्या.


"आता विधी सुरू होणार आहे. त्याचे तोंड बंद करा आणि अंगावरची कपडे उतरवून समोरील वेदीवर बसवा."

कलिका हुकमी आवाजात म्हणाली.


कलिकाने तो प्राचीन तंत्र मंत्र असणारा ग्रंथ उघडला. घुंगरू बसला त्याच्याभोवती तिने एक यंत्र आखले. चारही दिशांना तिचे शिष्य बसले.


समोर अग्नी प्रज्वलित केला आणि कलिका म्हणाली,"नाभी जवळ खूण करून रक्त आणा."


त्याबरोबर एक शिष्य उठला आणि त्याने टोकदार चाकूने घुंगरूच्या नाभीभोवती उलटा स्वस्तिक कोरला आणि आणलेले रक्त घेऊन एक चिन्ह कलिकाने रेखाटले. घुंगरू प्रचंड घाबरला होता. समोर मृत्यू दिसत होता. कलिकाचा विधी संपायची वाट बघत गुणवंताबाई आणि सगुणाबाई उभ्या होत्या.


घुंगरूचा बळी दिल्यावर काय होईल?

कलिका सुगंधाला संपवू शकेल?

इनामदार महालात मृत्यूचे तांडव सुरू होईल का?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all