शापित अप्सरा भाग 52

एक अनामिक संकट येतेय. सुगंधा ते ओळखू शकेल?

शापित अप्सरा भाग 52
मागील भागात आपण पाहिले सुभानराव आणि सुगंधा खऱ्या अर्थाने एकत्र येतात. दुसरीकडे घुंगरूचे अपहरण होते. कलिका शक्ती प्राप्त करण्यासाठी त्याचा बळी देणार असते. आता पाहूया पुढे.


नाभीजवळ कोरलेल्या उलट्या स्वस्तिक मधून रक्त वहात होते. असह्य वेदना घुंगरू सहन करत होता.


"दंडावर आणखी एक चिन्ह कोरा आणि पाठीवर तिसरे अंतिम चिन्ह कोरायचे आहे."
कलिकाने पुन्हा आदेश दिला.

त्याबरोबर दोन शिष्य उठले एकाने डाव्या दंडावर उलटा शंकूच्या चिन्हाचा आकार काढला ज्याला दोनच बाजू होत्या. दुसऱ्याने पाठीवर एक सरळ रेषेत जाणारे चिन्ह कोरले.


काम होताच कलिका आणि तिच्या शिष्यांनी पुन्हा मंत्रघोष सुरू केला. त्याबरोबर घुंगरूच्या भोवती आखलेल्या यंत्रातून प्रकाश बाहेर येऊ लागला ते यंत्र कार्यान्वित झाले. आता अंतिम क्षण जवळ आला होता.


कलिका जागेवरून उठली. हातात धारदार सुरा घेऊन ती शांत पावले टाकत घुंगरूच्या दिशेने निघाली. घुंगरू आपला मृत्यू समोर उभा असलेला पाहून स्तब्ध झाला होता. कलिकाने एका हाताने त्याचे लांब केस पकडले आणि दुसऱ्या हातातील चाकूने सरकन गळ्यावर वार केला.


रक्ताची चिळकांडी बरोबर त्या कार्यान्वित यंत्राच्या मध्याभगी उडाली. त्याबरोबर त्यातून एक विजेचा लोळ बाहेर पडला आणि त्याने कलिकाच्या शरीरात प्रवेश केला. घुंगरूचा निष्प्राण देह बाजूला करून कलिका यंत्राच्या बाहेर आली. यंत्र गायब झाले होते आणि कलिकाच्या चेहऱ्यावर विजयाचे क्रूर हास्य होते.



कलिका आणि तिचे शिष्य तो अघोरी विधी संपवून उठले. कलिकाने शिष्यांना बाहेर जायला सांगितले. "कलिका,तुझ्या औषधींचा काहीही परिणाम सुगंधावर झाला नाही."
सगुणाबाई हतबल होत म्हणाल्या.


" नाहीच होणार. कारण ती कोणी सामान्य स्त्री नाही."

"मग कोण आहे ती?"
गुणवंताबाई चिडल्या.


"इनामदार बाई,सुगंधा एक प्रचंड शक्तिशाली योगिनी आहे आणि तिच्यात एका चेटकीण स्त्रीचा अंश आहे. त्यामुळे तिला हरवणे सोपे नाही."


"आम्ही तुला बळी मिळवून दिला. आता तुला आम्हाला मदत करावीच लागेल."
गुणवंताबाई चिडल्या.


"एक योगिनी गरोदर असताना तिच्या शक्ती वापरू शकत नाही. तेव्हा तुम्हाला वाट पहावी लागेल. सुगंधा गरोदर असतानाच तिला जाळून मारावे लागेल. तोच एकमेव मार्ग आहे."


कलिकाने सांगितलेला मार्ग ऐकून सगुणाबाई क्षणभर घाबरल्या. परंतु आपल्याला स्वतः चा संसार आणि नवरा परत हवा आहे. याची जाणीव होताच त्यांनी स्वतःचे मन तयार केले.


"पण कलिका आम्हाला तिच्यापासून काही धोका झाला तर आधीच."
गुणवंताबाई म्हणाल्या.


" त्यासाठी तुम्हाला सुरक्षा देण्याची जबाबदारी माझी. फक्त जपून रहा."
कलिकाने सगळे समजावून दोघींना परत पाठवले.




सुगंधा आणि सुभानराव दोघेही संपूर्ण दिवस आणि रात्र एकमेकांच्या सान्निध्यात होते. दुसऱ्या दिवशी उशिरा जागे झाल्याने सुगंधा भरभर सगळे आटोपत होती. तेवढ्यात केशरचा निरोप घेऊन रखमा आली.


"राव,केशर आणि आमच्या सगळ्या सोबती आता पुढे निघतील. फक्त रखमा आणि आणखी चारजण इथे थांबतील. चालेल ना?"


"सुगंधा, केशरने देखील कुठेही जाऊ नये असेच आम्हाला वाटते."
"मी केशरला भेटून येते."
"आम्ही सोबत येऊ का?"
"आमच्या दोघींना जरा बोलायचे आहे. ती निघताना आपण दोघे भेटूच संध्याकाळी."


सुगंधा भरकन निघून गेली. केशर पाठमोरी उभी होती. सुगंधाला ह्या अशा माणसांत सोडून जायचे तिला कठीण जात होते. परंतु तिला पुढचा योगिनी पंथातील अभ्यास खुणावत होता. इथे अडकून पडणे चालणार नव्हते.



"केशर,सगळी तयारी झाली का?"
सुगंधाचा आवाज ऐकताच डोळ्यातील चुकार थेंब पुसून केशर मागे वळली.

"हो,आज संध्याकाळी आम्ही निघू."
अचानक केशर गप्प झाली.


"केशर,माझ्याकडून तुला हे ठेव."
तिने दिलेली भेट पाहताच केशर मागे सरली.


"सुगंधा,हे मला नकोय."

"केशर,आपले वाढणारे वय कितीही काळ रोखून जिवंत रहायच्या ह्या शक्तीची तुला योगिनी पंथात अभ्यास करताना गरज असेल. मला मात्र संसारी स्त्री म्हणून राहताना तसेच सामान्य वाटेल असे जगायला हवे."
सुगंधाने समजावले.


" सुगंधा,ही माणसे तुला जगू देतील ना?"

"केशर,मी काही सामान्य स्त्री नाही. माझी काळजी अजिबात करू नकोस. मी काढलेल्या सात चित्रांपैकी चार चित्रे इथेच राहतील. उरलेली तीन तू प्रवासात सुरक्षित ठेव."


सगळी योजना ठरवून सुगंधा परत आली. केशरने आवराआवर करायला घेतली.



सगुणाबाई मात्र कलिकाने सांगितलेल्या मार्गावर फार खुश नव्हत्या. आपल्याच नवऱ्यापासून दुसऱ्या बाईला दिवस जाऊ द्यायचे? ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. गुणवंताबाई मात्र कलिकाची शक्ती ओळखून होत्या. तिच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.



घरी येताना त्यांनी हलकेच सगुणाबाईंना समजावले.

"सुनबाई,तुमच्या मनात काय चालू आहे आम्हाला कळतेय. परंतु कोणताही अविचार करू नका. कलिका सांगते तोच मार्ग आपल्याला सुरक्षित आहे."

सगुणाबाई होकारार्थी मान हलवत होत्या.



इकडे सायंकाळी केशर आणि तिच्या सर्व सहकारी जायला निघाल्या. महालातील सगळी लोक त्यांना निरोप द्यायला जमली. चेटकीण आणि कमळा दोघी मात्र दालनातून बाहेर आल्या नाहीत. कारण दोघींनाही केशर जातेय याचे काहीच सोयरसुतक नव्हते.


केशर जायला आणि गुणवंताबाई परत यायला साधारण एकच वेळ झाली. त्यांना केशर जात असलेले पाहून प्रचंड आनंद झाला. काहीही झाले तरी सुगंधाच्या बाजूने असलेली माणसे कमी होतायेत याचा आनंद त्यांना होताच. आता कलिकाने सांगितल्याप्रमाणे वाट पाहणे गरजेचे होते.



सुभानराव आता पूर्ण आनंदी होते. त्यांचा आत्मविश्वास परत आला होता. त्यांना घुंगरूचे आभार मानायचे होते.

त्यांनी आनंदाने केशरला निरोप देऊन घुंगरूकडे धाव घेतली.

"घुंगरू ! घुंगरू! बाहेर ये लवकर."
सुभानराव मोठ्याने हाक मारत होते.


आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी आत प्रवेश केला. खोलीत कोणीही दिसत नव्हते. घुंगरू महालाच्या बाहेर जाताना सुभानरावांची परवानगी घेत असे. आज अचानक तो कुठे गेला असेल.


तेवढ्यात गुणवंताबाई महालात प्रवेश करत होत्या. घुंगरू ह्या जनावरे बांधायच्या खोलीत राहील हा आदेश त्यांनीच तर दिला होता. सुभानराव बाहेर यायला आणि त्यांच्या आईने तिकडे पहायला एकच वेळ झाली. त्याक्षणी घुंगरूचे नक्कीच काहीतरी बरेवाईट झाल्याची शंका सुभानरावांना आली.


त्यांनी तात्काळ आपल्या माणसांना खंडोजीला बोलावून आणायला पाठवले. परंतु निरोप घेऊन गेलेला माणूस तसाच परत आला. आता मात्र काहीतरी विपरीत घडल्याची त्यांना खात्री पटली. त्यांनी लागलीच चारही दिशांना घुंगरू आणि खंडोजी दोघांना शोधायला माणसे पाठवली.


सगुणाबाई दालनात परत आल्या. कलिका काहीही म्हणाली असली तरी त्यांना असे स्वस्थ बसून चालणार नव्हते. त्यांनी आता स्वतः सुगंधाला संपवायचे ठरवले.


गुणवंताबाई ठरल्याप्रमाणे आपल्या जावेकडे गेल्या. घरातील दोन्ही गरोदर मुलींना त्यांच्या माहेरी पोहोचवायची व्यवस्था करायला.

"आम्ही कालच दादासाहेबांशी सगळे बोलून आलोय. उद्या निघायची तयारी करा."

त्यांनी जावेला समजावले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून बांधाबांध सुरू झाली. गुणवंताबाई जातीने सगळे बरोबर देत होत्या. सगळे आवरायला दुपार झाली.


"चला,आता हळदी कुंकू लावून निरोप देऊ माहेरवाशीण पोरींना."
त्या म्हणाल्या.

"पण काकीसाहेब,आम्ही सुरक्षित आहोत इथे."
त्या पुन्हा म्हणाल्या.

" विषाची परीक्षा नकोच."

असे त्या निर्धाराने उच्चारत असताना त्यांची नजर अध्यात्मिक यंत्रावर गेली. यंत्र लाल झाले होते.


याचाच अर्थ काळी शक्ती आसपास होती. कोण? सुगंधा? पण सुगंधा तर योगिनी आहे. असा विचार करत त्यांची नजर कमळावर स्थिरावली. तेवढ्यात मुलींना घेऊन जायला गाड्या तयार असल्याचा निरोप आला. सगळ्याजणी एकदम बाहेर आल्या. चेटकीण ह्या गडबडीत कधीच पसार झाली होती.



सुभानराव वेड्यासारखे निरोप घेऊन येणाऱ्या लोकांची वाट बघत होते. दोन्ही बहिणी मार्गस्थ झाल्यावर ते आपल्या दालनात आले. त्यांना असे अस्वस्थ बघून सुगंधा त्यांच्याजवळ आली.


"राव,काही झालेय का? तुम्ही खूप अस्वस्थ आहात?"
तिने त्यांना थंड सरबत देत विचारले.


"सुगंधा,घुंगरू आणि खंडोजी सकाळपासून कुठेच नाहीत."

"एवढेच? अहो खंडोजी असतील काही कामगिरीवर. घुंगरू मात्र कुठे जाईल याचा अंदाज येत नाहीय."

सुगंधा त्यांना समजावत होती.


"नाही सुगंधा,माझे मन सांगतेय नक्कीच काहीतरी बरेवाईट झाले असणार."

सुगंधाने आपले नाजूक बोट त्यांच्या ओठांवर ठेवले आणि दुसऱ्या क्षणी तिचे लालबुंद ओठ त्यांच्या भव्य कपाळावर टेकले होते.


सुगंधाच्या प्रेमळ मिठीत सुभानराव पाण्यात साखर मिसळावी तसे विरघळून गेले. प्रणयाचा बहर ओसरला आणि सुभानराव शांत झोपी गेले. सुगंधा मात्र काही नोंदी करत होती. अचानक वाड्यात गडबड गोंधळ ऐकू यायला लागला.


दालनाच्या दारावर थाप मारून कोणीतरी ओरडत होते. सुभानराव जागे झाले. अंगावर वस्त्र चढवली आणि त्यांनी दरवाजा उघडला. "रावसाहेब खाली चला लवकर." निरोप्या कसेबसे बोलू शकला. सुभानराव धावत खाली आले. दोन प्रहरापुर्वी गेलेल्या गाड्यांसोबत गेलेली एक दासी संपूर्ण रक्तबंबाळ अवस्थेत समोर उभी होती.



कलिकाने सांगितलेला मार्ग यशस्वी ठरेल का?

सुगंधाचे काय होईल?

चेटकीण पकडली जाईल?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all