शापित अप्सरा भाग 53

इनामदार घराण्याला शाप का? याचे उत्तर पुढील भागात आहे.

शापित अप्सरा भाग 53

मागील भागात आपण पाहिले

घुंगरू गायब झाल्यामुळे सुभानराव अस्वस्थ झाले होते. तिकडे कलिका अघोरी शक्ती मिळाल्याने आनंदी होती. सगुणाबाईंनी मनात एक वेगळा निर्धार केलाच होता. महालात उभ्या रक्तबंबाळ दासीकडे बघत सगळे स्तब्ध उभे होते. आता पाहूया पुढे.


संपूर्ण इनामदार महालातील झाडून सगळेजण त्या खोलीत जमले होते.

"शेवंता! तू अशा अवस्थेत परत कशी आलीस?"
गुणवंताबाई बोलत असताना त्यांचा आवाज कंप पावत होता.


एका अनामिक भीतीने त्यांच्या मनात प्रवेश केला होता. शेवंता थरथर कापत तशीच उभी होती. सुभानराव उठले आणि तिच्याजवळ गेले.

" शेवंता,तू घाबरु नकोस. काय झालेय? बाकीची माणसे कुठे आहेत?"
त्यांनी अगदी मृदू आवाजात विचारले.

"गावाबाहेर,चिंचेच्या बनात."
शेवंताने कसेबसे शब्द उच्चारले.

" हत्यार काढा!"
सुभानराव ताडकन उठून उभे राहिले.



त्यांचा इशारा होताच पन्नास साठ हत्यारबंद माणसे शोध घ्यायला निघाली. सगुणाबाई, गुणवंताबाई, तसेच इतर स्त्रिया सुन्न होऊन आहे त्याच जागी बसून होत्या.


" शेवंताला अंघोळ घाला आणि झोपू द्या."
गुणवंताबाई कसेबसे म्हणाल्या.


मुलींना स्वतः च्या माहेरी पाठवायची कल्पना त्यांचीच होती. त्यामुळे त्या प्रचंड अस्वस्थ होत्या. आनसाबाई आणि त्यांच्या बाळासोबत झालेला भयंकर प्रकार पुन्हा घडलेला नसावा एवढाच धावा त्या करत होत्या.


इकडे सुभानराव आणि त्यांची माणसे वेगाने चिंचेच्या बनाकडे निघाली होती. चिंचेचे बन गावापासून जवळपास चार मैल दूर होते. बन जवळ येताच सुभानराव सजग झाले. त्यांची सोबतच्या माणसांच्या चार तुकड्या बनवल्या त्यामुळे कमी वेळात जास्त परिसर शोधता येणार होता.



आठ दहा स्वार,दोन जुंपलेल्या गाड्या सगळे कुठे असेल असा विचार करत असतानाच लांबून बैलांच्या हांबरण्याचा आवाज ऐकू आला आणि सुभानराव वेगाने त्या दिशेला निघाले.



समोरचे दृश्य बघून सुभानराव जागीच स्तब्ध उभे राहिले. सगळ्या हत्यारबंद स्वरांच्या माना मुरगळून त्यांना मारण्यात आले होते. एकेकजण ठराविक अंतरावर पडलेला होता. जणू एखाद्या अदृश्य शक्तीने मागून पोलादी पंजाने त्यांच्या माना पिरगळल्या असाव्यात .


सुभानराव पुढे चालत होते. अजून काय भयंकर पहावे लागेल? हा प्रश्न त्यांच्या डोक्यात थैमान घालत होता. दूर एका चिंचेच्या झाडाजवळ दोन्ही गाड्या उभ्या होत्या. सुभानराव धावतच तिथे पोहोचले. समोरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. दोन्ही स्त्रियांची पोटे आडवी फाडली होती. आजूबाजूला रक्ताचा सडा पडला होता.


क्षणभर सुभानरावांना संपूर्ण आसमंत आपल्या भोवताली फिरत आहे असे वाटले. मागाहून आलेल्या माणसांनी सगळे मृतदेह पांढऱ्या कपड्यात बांधले. सुन्न मनाने सगळेजण इनामदार महालाची वाट चालू लागले. इकडे दाट झाडीत लपलेले क्रूर डोळे खुनशी हसत होते.



गुणवंताबाई अस्वस्थ मनाने बाहेर पहात होत्या. इनामदार महालाच्या भव्य अंगणात ओळीने ठेवलेले सर्व मृतदेह पाहून अक्षरशः आभाळ फाटल्याचा भास होत होता. गावाच्याबाहेर स्मशानभूमीत ओळीने चिता पेटल्या होत्या. त्याच्या प्रकाशातील हलणाऱ्या झाडांच्या सावल्या अधिकच गूढ भासत होत्या.


सुभानराव सगळे विधी आटोपून परत आले. त्यांची आंघोळीची व्यवस्था आधीच सुगंधाने केली होती. सगळा घडलेला प्रकार पाहता वाड्यात चेटकीण असल्याची तिला खात्री होती. परंतु आता इथे तिला शोधायला ध्यान लावणे अशक्य होते. सुभानराव सुन्न मनाने झोपी गेले. त्या दिवशी इनामदार महालातच नव्हे तर संपूर्ण गावातील एकाही घरात चूल पेटली नाही.



चेटकीण मध्यरात्री लपलेल्या ठिकाणाहून बाहेर आली. सभोवताली पडलेल्या चितांच्या प्रकाशातील तिचे रूप आणखी भीतीदायक दिसत होते. तिने विधीसाठी रिंगण आखले. दोन्ही गर्भ मध्ये मांडले आणि तो अघोरी विधी सुरू झाला.



काळया शक्तींचे आवाहन करताच आजूबाजूचे वातावरण बदलू लागले. विधी पूर्ण झाला आणि तिला वाटेल तितका काळ जगण्याची आणि तरुण राहण्याची सिद्धी प्राप्त झाली. फक्त त्यासाठी तिला दर पंचवीस वर्षांनी एक बळी द्यावा लागणार होता.


आपले कार्य पूर्ण झाल्यामुळे आता तिला इनामदार महालात जायची गरज नव्हती. चेटकीण आता आपल्या मूळ रूपात होती. पाठीवर रुळणारी वेणी तिच्या शक्तीची जाणीव करून देत होती.


तितक्यात कोणीतरी तिच्या वेणीवर मुळापासून वार केला. संपूर्ण वेणी कापली जाताच ती असह्य वेदना होऊन कोसळली. समोर कमळा उभी होती.


" तुला काय वाटले तुला मी पहिल्यांदा भेटले तेव्हाच ओळखले होते. आज मला ती सिद्धी आणि रूप बदलायची तुझी शक्ती आयती मिळाली."
कमळा मोठ्याने हसली.



तिचे हसणे त्या स्मशानात आणखीच भय निर्माण करत होते. कमळाने समोरच्या चितेतून अग्नी घेतला आणि चेटकीण पडली होती तिथे गेली. तिने चेटकीणीचे शरीर पेटवले. चेटकीण जळून भस्म होताच तिची वेणी कमळाच्या वेणीमध्ये समाविष्ट झाली. इनामदार महालात आता आणखी एक युद्ध रंगणार होते.



पुढचे अनेक दिवस महालावर ह्या दुःखाचे सावट होते. घुंगरू आणि खंडोजी पळून गेले अशी वावडी गुणवंताबाईंनी उठवली. तरीही सुभानरावांचा त्यावर विश्वास नव्हता.


"सुगंधा घुंगरू आणि खंडोजी असे करणे शक्य नाही."

"राव, माझाही ह्या गोष्टीवर विश्वास नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण शोध सुरू ठेवू."


दोघेही असे बोलत असताना एकमेकांत मिसळून गेले. खूप दिवसांनी त्यांचे मिलन घडून आले होते. दुसऱ्या दिवशी पहाट अतिशय प्रसन्न होती. सुभानराव लवकर उठले. त्यांनी अंघोळ उरकली आणि अचानक त्यांना एक निरोप आला.


जहागिरीत दुसऱ्या टोकाला एक दरोडेखोर लोकांना त्रास देत होता. त्यांनी लागलीच मोहीम काढायचे ठरवले. त्यानिमित्त सगळीकडे फिरता येणार होते.


" राव,मी तुमच्यासोबत येते."
सुगंधा नाराज होत म्हणाली.

"सुगंधा,ह्या मोहिमेत कोणीही स्त्री नाहीय. महिनाभराचा तर प्रश्न आहे."
सुभानरावांनी तिची समजूत काढली. सुभानराव मोहिमेवर निघून गेले.



कमळा फक्त संधीची वाट पहात होती. सुभानराव जाताच सुगंधाने आपल्या योगिनी शक्तींच्या मदतीने घुंगरू आणि खंडोजी दोघांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. घुंगरू आणि खंडोजी दोघेही एका वाड्यात गायब झाल्याचे तिला दिसले.


ते दोघेही जिवंत नसल्याचे ओळखून तिने त्यांच्या आत्म्यांना आवाहन केले. खंडोजीच्या आत्म्याने तिला तो एका विहिरीत कैद असल्याचे सांगून त्याला कसा मृत्यू आला ते सविस्तर सांगितले. परंतु सुगंधा त्याच्या आत्म्याला सोडवू शकली नाही. याचाच अर्थ कैद करणारा तेवढा शक्तिशाली होता.


सुगंधा ध्यानातून बाहेर आली. तिने रखामाला संध्याकाळी देवीच्या दर्शनाला जायचे असल्याचे सांगितले. दर्शन हे फक्त निमित्त होते. तिला देवीच्या सात मजली कळसावर काही रहस्ये कोरून ठेवायची होती. सुभानराव आसपास नसल्याने ही सगळी कामे करणे सोपे होते.



सगुणाबाई आपल्या दालनात बसल्या होत्या. आज सुगंधा महालातून बाहेर पडणार असल्याची पक्की खबर त्यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या खास माणसांना बोलावले.


" आज काहीही झाले तरी सुगंधा जिवंत परत महालात येता कामा नये."

मोहरा भरलेल्या पिशव्या देत त्यांनी काम सांगितले.

" तीच नखसुदिक कुणाला दिसणार न्हाय."
मोहरा घेऊन ते चारजण बाहेर पडले.


सुगंधा आणि रखमा देवीच्या दर्शनाला निघाल्या. गावाची वेस ओलांडताच समोर मंदिर दिसू लागले. गाव मागे पडल्याने आता रस्त्यावर वर्दळ नव्हती. अचानक तोंडावर मुंडाश्याने झाकलेले चारजण समोर आले. त्यांच्या हातात हत्यारे होती.

" धरा र तिला."
एकजण गरजला.


" तुम्हाला जीव प्रिय असेल तर मागे फिरा."
सुगंधा शांतपणे म्हणाली.


ते चारही जण मोठ्याने हसले. त्यातील एकाने पुढे पाऊल टाकताच तो हवेत उचलला गेला आणि वेगाने समोरच्या झाडावर आदळला.


इतर तिघांनी कुऱ्हाडी सावरल्या आणि निघाले परंतु त्यांचीही तीच गत झाली. सुगंधा शांतपणे चालत देवीच्या मंदिरात गेली. तिथे आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावर इच्छित कार्य करून सुगंधा परत आली.



सगुणाबाई तिला परत आलेले बघून हादरल्या. सुगंधा मात्र शांत होती. पुढील आठ दिवस महालात अगदी शांतता होती.

आज सकाळपासूनच सुगंधाला अस्वस्थ वाटत होते. रखमा दूध घेऊन आली आणि त्याच्या वासाने सुगंधाला उमदळले.

" रखमा सकाळपासून काहीच खावेसे वाटत नाहीय आणि कशाचाच वास सहन होत नाही."
सुगंधा म्हणाली.


त्याबरोबर रखमा खुदकन हसली.

" इथे मला त्रास होतोय आणि तू हसतेस काय?"

रखमा तिच्याजवळ जाऊन म्हणाली," आव ही आनंदाची गोष्ट हाय."


रखमाने सुगंधाला कानात काहीतरी विचारले आणि क्षणात सुगंधाला सगळा उलगडा झाला. आपल्या आत सुभानरावांच्या प्रेमाचा अंकुर रुजतोय ही जाणीवच सुखद होती.



सुगंधा एकीकडे आनंदित झाली असताना दुसरीकडे सावध देखील झाली. आता तिला योगिनी शक्ती वापरता येणार नव्हत्या. जर ही गोष्ट तिच्या शत्रूंना माहित असेल तर तिला आणि होणाऱ्या बाळाला धोका होता.

" रखमा,ही गोष्ट बाहेर जाता कामा नये."
तिने बजावले.


परंतु सगुणाबाई महालात अनेक वर्षे होत्या. त्यांच्या विश्वासाची माणसे महालात होती. सुगंधाला दिवस गेल्याची बातमी थोरल्या दालनात पोहोचली. त्याक्षणी आनंदाने स्वतःभोवती गिरकी घेऊन सगुणाबाई खुश झाल्या. आता ती वेळ आली होती. सुगंधा नावाचा पायात सलणारा काटा मुळापासून उपटून फेकण्याची.


सुगंधा आणि तिच्या बाळाचे काय होईल?

ही अप्सरा स्वतःचा जीव वाचवू शकेल का?

इनामदार महालातील हा सुडाचा खेळ कोणते वळण घेईल?


वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all