शापित अप्सरा भाग 54

इरावती हा शाप संपवू शकेल का?
शापित अप्सरा भाग 54

मागील भागात आपण पाहिले कमळा चेटकीवणीला मारून सगळ्या शक्ती मिळवते. सुभानराव महालातून बाहेर कामगिरीवर जातात. सुगंधा देवीच्या देवळात काही रहस्य लपवते. सगुणाबाई सुगंधाला मारायचे पुन्हा प्रयत्न करतात आणि अशातच एक दिवस सुगंधा गरोदर असल्याची बातमी सगुणाबाईंना समजते. आता पाहूया पुढे.



सगुणाबाई बातमी कळताच धावत सासूबाईंच्या दालनात निघाल्या. गुणवंताबाई पूजा आटोपून बसल्या होत्या.

" या सूनबाई. आज इतक्या लगबगीने आलात?"
त्यांनी नजर रोखून विचारले.

"आत्या ताकाला जाऊन भांडे लपवत नाही सगुणा . सुगंधा गरोदर आहे . तिला संपवायची हीच संधी आहे ."
सगुणाबाई सगळे बोलून मोकळ्या झाल्या .


गुणवंताबाई जरा शांत झाल्या .

"आत्या,अजून आमच्यापोटी काही नाहीय . तुमचा जीव अडकतो काय नातवंडं पाहायला ."
सगुणाबाईंच्या आवाजाला धार आली .

"सगुणा, नाचीच्या पोटी जन्मलेल्या मुलाला वारस मानू का आम्ही ? पण ही गोष्ट नाजूक आहे . आपण ह्या सगळ्याचे मूळ असल्याचे सुभानरावाला कधीही समजायला नको . तरच पुढे तो तुमचा स्वीकार करेल ."

गुणवंताबाई एकेका शब्दावर जोर देत होत्या.

" पण मग काय करायचे आत्या ? "
सगुणाबाई हताश झाल्या.


" नाराज होऊ नका . सुभानच्या मर्दानी देहाची आस असलेल्या अनेक आहेत . त्यातीलच एक कमळा ."
त्यांनी उत्तर दिले.

"पण कमळा आपल्याला मदत करेल ? "
सगुणाबाई साशंक होत्या .

" तिची मदत नाहीच घ्यायची . परंतु तीच गुन्हेगार असल्याचे पुरावे तयार करायचे . ते माझ्यावर सोडा . आता सुभान परत यायच्या आधी योजना तयार करू ."
गुणवंताबाई म्हणाल्या.


" पण आत्या ते नसताना तिला मारायचे सोपे आहे ."

" चुकताय तुम्ही . त्याला आपल्यावर आधीच संशय आहे . तो असताना समोर सगळे घडवायचे ."
गुणवंताबाई म्हणाल्या .

" पण कसे ? सुगंधा त्यांना बातमी सांगेल तेव्हा तिला एकटीला सोडणार नाहीत मग ."
सगुणाबाई म्हणाल्या .
गुणवंताबाई फक्त हसल्या .


सुगंधाने वैद्यांना बोलावले .
" वैद्यकाका नाडी तपासून आमची शंका खरी आहे का सांगा?
कधी एकदा ह्यांना सांगते असे झालेय मला ."

सुगंधा उत्साहात होती. वैद्यांनी सगळी तपासणी केली.

"लक्षणे सगळी बरोबर आहेत . तरीही पुढील मासिक धर्माची तारीख येईपर्यंत कोणाला सांगू नका . काही वेळेस मानसिक पण असते सगळे . किमान एक महिना अगदी इनामदार साहेबांना देखील सांगू नका ."

सगळी पथ्ये सांगून वैद्य बाहेर पडले . ते घरी आल्यावर त्यांच्या लेकीच्या मानेवर रोखलेला सुरा हटवून एक हशम बाहेर पडला .


गुणवंताबाईंनी खास दालन सजवायला घेतले . तिथल्या एका पूजेला घरातील मोठ्या मुलाच्या सगळ्या पत्नी बसतील अशी वावडी त्यांनी उठवली . सुगंधाच्या कानावर ही गोष्ट आली . परंतु अजून कोणी काही म्हणाले नसल्याने ती शांत होती . सुभानराव दोन दिवसांनी परत येणार होते . सुगंधा खूप आनंदी होती .


ती गाणे म्हणत असताना तिला थोरल्या दालनात बोलावले असल्याचा निरोप आला . सुगंधा आणि रखमा निघाल्या . आपल्याबरोबर एकही योगिनी नाही ही गोष्ट सुगंधा विसरली होती . सगुणाबाई आणि ती एकाच वेळी तिथे पोहोचल्या .


" आत्या ह्यांना कशाला बोलावले आहे ? " सगुणाबाई चिडल्या .


" तुम्ही दोघी माझे शांतपणे ऐकून घ्या . वाड्यात जे अशुभ प्रसंग घडले त्यानंतर मी एका मोठ्या सिद्ध पुरुषांना विचारले . त्यांनी असे सांगितले की दक्षिणेकडे असलेल्या दालनात एक अतृप्त चेटकीण स्त्री आहे . तिथे महालातील मोठ्या मुलाच्या सगळ्या पत्नी मिळून एक गुप्त पूजा करायची . अन्यथा जन्म घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक मुलावर मृत्यूचे संकट असेल . ही पूजा अगदी गुप्त असली तरच फलदायी होईल ."
गुणवंताबाई थांबल्या .


सुगंधा आता एक आई होती . आपल्या बाळाचे अशुभ होईल हा विचार मनात येताच तिने ह्या पूजेला होकार दिला . रखमा आणि सुगंधा बाहेर पडल्या आणि गुणवंताबाईंच्या चेहऱ्यावर विजयी हसू पसरले .


कमळा अंघोळ करून बाहेर आली . तिचा मादक देह पाहून ती स्वतः वरच खुश झाली . तेवढ्यात तिला सुभानराव आणि त्यांच्यासोबत घालवलेली रात्र आठवली . ती अस्वस्थ झाली तेवढ्यात खिडकीतून एक खलीता आत पडला .


कमळाने हळूच खलीता हातात घेतला.

" तुला सुभानराव हवा असेल तर आजपासून तीन दिवसांनी रात्री त्यांच्या दालनात जा ."
खाली नाव नव्हते .

ही कोणाची चाल असेल तर ? असली तरी आपल्याकडे असलेल्या शक्ती आठवून कमळा हसली . तिला सुभानरावांच्या मिठीत घालवलेले क्षण आठवत होते आणि कामज्वर विचारांवर मात करत होता .



" सुगंधा,इनामदार बाईवर इस्वास नको ठेवू ."
रखमा म्हणाली.

"रखमा , आत माझ्याबरोबर सगुणा आहे . योगिनी शक्ती नसल्या तरी मी एक योद्धा आहे याचा विसर पडू देऊ नकोस . माझ्या बाळासाठी मी ह्या पूजेला बसणार ."
सुगंधाचा निर्धार पक्का होता .


आज सुभानराव परत येणार होते . सुगंधा त्यांना भेटायला आतुर होती . महालात सुभानरावांचे भव्य स्वागत झाले . त्यांनी कामगिरी फत्ते केली होती . सगळी कामे आटोपून सुभानराव दालनात आले .

" सुगंधा ,तुझ्या देहाचा हा कस्तुरी गंध आम्हाला हवाय ."
त्यांनी तिला जवळ ओढले.
"राव ,अजून दोन दिवस नको ना ! आमचे एक अनुष्ठान आहे ."
सुगंधा त्यांना रोखत म्हणाली.

" जशी तुमची मर्जी बाईसाहेब ." खट्याळ हसत सुभानराव म्हणाले.

" राव,तुम्ही नाराज नाही ना ? " सुगंधा हळूच म्हणाली .

" सुगंधा प्रेम म्हणजे केवळ देह नव्हे हे तूच तर शिकवले मला ." सुभानराव म्हणाले .

तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवले .

" सुगंधा , एका खेड्यात एका म्हाताऱ्या बाईला चेटकीण असल्याचे समजून गावकरी लोकांनी मारायचा प्रयत्न केला . परंतु तिला मारायला गेलेले कोणीच परत आले नाहीत . आम्हाला तिथेही लक्ष द्यायचे आहे ."
सुभानराव थांबले .


"राव , मी असे ऐकले आहे की जर चेटकीणीला संपवायचे असेल तर तिची वेणी कापून तिला जाळून मारायचे ."

त्या रात्री दोघेही भरपूर गप्पा मारत पहाटेपर्यंत जागे होते .


दुसऱ्या दिवशी गुणवंताबाईंनी आपली खास माणसे लावून सगळी तयारी करून घेतली . सगुणाबाईंना एक खास निरोप त्यांनी पाठवला . त्या दिवशी पहिल्यांदा संपूर्ण इनामदार कुटुंब एकत्र देवीच्या दर्शनाला गेले . देवळातून आल्यावर रात्री देवीचा जागराचा कार्यक्रम महालात झाला . पहाटे सगळेजण विधी आणि पूजा आटोपून आपापल्या दालनात गेले . सुगंधा एका बाजूला अस्वस्थ होती .


तिच्यातील योगिनी तिला काही सांगू पहात होती तर दुसरीकडे तिच्यातील आई तिला पूजेला जायचा निर्धार आठवून देत होती . शेवटी ह्या युद्धात आईचा विजय झाला . इकडे सुभानराव आज सुगंधाच्या व्रताचा अडथळा नसल्याने आनंदी होते .



सुभानराव संध्याकाळी दालनात आले . त्यांच्या अंगात सदरा नवहता . केवळ धोतराच्या कदामध्ये त्यांचे मर्दानी सौंदर्य उठून दिसत होते. इकडे सगुणा आणि सुगंधा दोघीही ठरल्यानुसार पूजेसाठी दक्षिणेला असलेल्या दालनात पोहोचल्या . आतमध्ये एक देवीची मूर्ती मांडली होती . समोर एक पोथी होती .


"सगुणा आणि सुगंधा ह्या पोथीतील मंत्र आम्ही वाचू . तुम्ही दोघींनी पूजा संपेपर्यंत ध्यान लावायचे आहे ."

गुणवंताबाई आत प्रवेश करताना सूचना देत होत्या . तिघी आत जाताच दरवाजा बंद झाला . रखमा दाराबाहेर उभी होती . अचानक तिच्या तोंडावर एका पोलादी पंजाची घट्ट पकड बसली आणि दुसऱ्या क्षणी धारदार सुरा गळ्यावर फिरला .



सुभानराव पाठमोरे उभे होते . अचानक मागून मिठी पडली आणि दोन नाजूक हात त्यांच्या मर्दानी छातीवर होते . त्यांनी फिरून सुगंधाला जवळ ओढले . तेच बदामी टपोरे डोळे त्यांना धुंद करत होते . पुरुषी देह आगीत वितळू लागला . वस्त्रे दूर व्हायला लागली आणि दालनात प्रितीचा खेळ सुरू झाला .



सुगंधा आणि सगुणा ध्यान लावून बसल्या . मंत्र पठण सुरू झाले. थोडा वेळ गेला आणि सगळीकडे धूर झाल्याची जाणीव सुगंधाला होऊ लागली . सुरुवातीला तिला वाटले धूप असेल परंतु आगीच्या धगी लागू लागल्या आणि सुगंधाने डोळे उगडले .


इकडे एकमेकांत मिसळून सुभानराव प्रणय करत असताना अचानक त्यांचे लक्ष सुगंधाच्या छातीवर गेले . डाव्या स्तनावर तीळ दिसला आणि सुभानराव सावध झाले . त्यांना जाणीव झाली की सुगंधा एकांतात केस मोकळे सोडते .


त्यांनी आपल्यासोबत असलेल्या स्त्रीला तसेच चुंबनाचा वर्षाव करत गुंतवून ठेवले आणि त्यांनी एका हाताने खंजीर उचलला . तेवढ्यात जोराची किंचाळी ऐकू आली .


" सुभानराव वाचवा ! "

त्याचक्षणी सुभानरावांनी खंजीर चालवला आणि वेणी कापली जाताच कमळा मूळ रूपात आली . नग्न कमळाला बाजूला ढकलून त्यांनी धोतर गुंडाळले .


"ह्या दालनात असणाऱ्या बाईला बाहेर जाऊ द्यायचे नाही ."

महालाच्या दक्षिणेला भडकलेल्या आगीकडे पळत सुभानराव ओरडले.


चारही बाजूंनी आगीच्या ज्वाळा जवळ येत होत्या .
सुगंधाचा कस्तुरी देह आगीत वितळू लागला आणि तिने शापवाणी उच्चारली, " दुसऱ्यांच्या लेकीबाळी जाळून मारता . एका योगिनीचा तुम्हाला शाप आहे . इनामदार घराण्यातील प्रत्येक लेक शापित अप्सरा म्हणूनच मरेल ."


तिचा आवाज शांत होत गेला आणि सुभानराव तिथे पोहोचले . सगुणाबाई आणि गुणवंताबाई दोघींच्या अंगावर असलेले शालू जळाले होते . त्यांचेही हात भाजले होते .


इकडे वेणी कापली गेल्याच्या अवस्थेत कमळा नग्न देहाने तशीच पडून होती . तिने तसेच ध्यान लावले . आपली अपुरी इच्छा पूर्ण करायला तिचा सैतानी आत्मा आता ह्या देहातून मुक्त करणे आवश्यक होते . ह्या लोकांनी आपल्याला जिवंत जाळले तर आपल परत येऊ शकणार नाही . कमळाने अघोरी शक्तींचा वापर करून आपला देह सोडला .



ग्रंथ वाचून संपला होता . पुढील पाने फाटलेली होती . श्रेयस थांबला . इरावती आणि बाकी सगळेजण थक्क झाले होते . शाप कोणी आणि कसा दिला समजले होते . आता सुगंधाला मुक्ती देणे हाच शाप संपवायचा मार्ग होता .



काय होईल पुढे?

सुगंधा मुक्त होईल?

कलिका,केशर,कामाक्षी यांचा काय संबंध असेल ?


वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all