शापित अप्सरा भाग 55

इरावतीला सापडलेला मार्ग ती कसा पूर्ण करेल?

शापित अप्सरा भाग 55


सुगंधाची संपूर्ण कहाणी ऐकून सगळेच स्तब्ध उभे होते. केवळ आपल्या प्रेमासाठी एक समर्थ स्त्री इथे आली आणि तिच्यासोबत काय घडले. इनामदार घराण्यात असलेले एकेक रहस्य उलगडत होते. आता पाहूया पुढे.


" मिस्टर देशमुख , जर सुगंधाने काढलेल्या चित्रांमधली दोन चित्रे केशर घेऊन गेली असेल तर मग आपण ग्रंथ कसा शोधणार? त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न सुगंधाला मुक्ती कशी मिळणार ? "
इरावतीने प्रश्न विचारला .

तेवढयात मृणमयी ओरडली, " सुगंधाने आपल्याकडील वाटेल तितका वेळ जिवंत राहायची शक्ती केशरला दिली होती. जर केशर किंवा त्यांच्यातील कोणी योगिनी अजून जिवंत असेल तर ?"


मृणमयी असे म्हणाल्यावर सगळेजण चमकून शकुंतलाकडे बघू लागले.

" माझे वय एकशे तीस वर्षे आहे . अशी योगिनी सापडू शकते . त्यासाठी मला सूक्ष्म देह धारण लागेल."

श्रेयस आणि राघव दोघेही रात्रभर जागे असल्याने कंटाळले होते.


" आपण सगळेजण आता थोडा आराम करू. रात्र संपली आहे. दिवसा काही हल्ला होणार नाही . " राघवने सुचवले .


सारिका पलंगावर पडल्या पडल्या विचार करत होती . सम्राट सारखा टपोरी माणूस ह्या विषयात कसा घुसला असेल ? त्याने मृणमयीसोबत केलेले प्रेमाचे नाटक . त्याला असलेली सखोल माहिती . नक्कीच कोणीतरी प्रचंड जाणकार त्याला मदत करत आहे .



संध्याकाळ होऊ लागली तसे शालिनीताई घाबरल्या . काहीही झाले तरी रात्री घडलेला प्रकार भयंकर होता. ते लाल डोळे, बाहेर आलेले सुळे,वाढलेली नखे सगळा अमानवी प्रकार होता. विचारांच्या गर्तेत त्या हरवल्या असतानाच अचानक घुंगरू वाजू लागले आणि पाठोपाठ सुरू झाली लावणी.



काल बांधान जाताना अवचित तूमी दिसला
तिथ सख्या माझ्या जीवाचा राघू फसला.


नाक टोकदार अन् अक्कडबाज तुमची मिशी
अंग भरल ऊब आडवं मी झाले येडी पिशी.

ज्वानीच पाखरू माझ्या राया उडत तुमच्या पशी.
मिशी खालचा तीळ बघुनी जीवाचा राघू फसला.

काल बांधान जाताना अवचित तुमी दिसला.


रुंद खांद अन् पोलादी भरली तगडी छाती.
मर्दानी रूप हे पाहून राया जडली तुम्हावर पिर्ती.
जवळी घ्यावं मला साजना यावी इशकाला भरती.

मिठीत तुमच्या असा जीवाचा राघू फसला.
काल बांधान जाताना अवचित तुमी दिसला.


खेळ इशकाचा असा रंगला चढली व्हटाला लाली.
लालबुंद झाली सारी काय लाज चढली माझ्या गाली.
उडवून टाकू बार लग्नाचा पावन आवंदाच्या हो साली .

सोडा राया पाहिलं कुणी जीवाचा राघू फसला.


इरावती,शालिनी, करुणा धावतच आशूच्या खोलीत पोहोचल्या . बेभान होऊन आशू नाचत होती . अमेरिकेत वाढलेली पोरगी बैठकीत गायची लावणी सादर करत होती . इरावती पुढे होणार एवढ्यात करुणाने तिला मागे ओढले .


"इरा थांब . हा सामान्य प्रकार नाही ."
तेवढयात शकुंतला वरती आली .

तिने आपल्यासोबत आणलेली दिव्य भस्मे खोलीत फुंकरली आणि आशू हळूहळू शांत होऊन खाली कोसळली .



"करुणा तिला नीट झोपव . आश्लेषा आता वीस वर्षांची होईल त्या आधीच हा शाप संपला पाहिले ."
इरावती निर्धाराने म्हणाली.


"आज आपल्याला देवळात जायचे आहे . आजपासून सात दिवस देवीला अभिषेक होईल आणि त्यानंतर शेवटचे दोन दिवस इनामदार घराणे देवीला मानपान करेल ."
शालिनीताई म्हणाल्या .


आश्लेषाला झोपवून सगळे खाली आले तेव्हा इन्स्पेक्टर सारिका बाहेर जायच्या तयारीत होती .

" सारिका कुठे चाललीस ? " शालिनीताई म्हणाल्या .

" सम्राटला शोधायला . त्याचा ट्रेस लागला आहे . "

हे ऐकल्यावर राघव आणि मृणमयी दोघांनी सोबत यायचा हट्ट धरला .

" तुम्ही सगळे परत येईपर्यंत मी प्राचीन शक्तीद्वारे केशर किंवा तिच्या साथीदार यांच्यातील कोणी आजही जिवंत आहे का? याचा शोध घेते. "
शकुंतला म्हणाली .


सारिका,राघव आणि मृणमयी बाहेर पडले .

" सारिका कुठून लागला आहे सम्राटचा शोध ? "
राघवने विचारले .

सारिका काहीच बोलली नाही फक्त तिने फोन हातात दिला . फोनवर आलेला मॅसेज बघून राघव हादरला .


" प्रसिद्ध मॉडेल आणि पेज थ्री लेखिका सुपर्णा ? सम्राट तिच्यासाठी काम करतोय ? "
राघवचा विश्वास बसत नव्हता .

" राघव,अमर होण्याची लालसा कोणालाही काहीही करायला लावू शकते ."
मृणमयी हताश होत म्हणाली .

" सुपर्णाचे इथून दोन तासाच्या अंतरावर फॉर्म हाऊस आहे . सम्राट तिथेच लपला असल्याची खबर मिळाली आहे ."
सारिकाने उत्तर दिले .



शकुंतला सगळे गेल्यावर वाड्यात एकटीच होती . तिने आतापर्यंत सगळे जाणून घेतले होते . आता केशरचा शोध घ्यायचा होता . तिने ध्यान लावले आणि कुंडलिनी जागृत करून सूक्ष्म देहाने केशरचा शोध सुरू केला .


शकुंतला फार शक्तिशाली नसली तरी ती केशरला शोधण्याइतपत नक्कीच समर्थ होती . तिने सूक्ष्म देहाने संपूर्ण हिमालय पालथा घातला . एका ठिकाणी तिला धर्मशाळा दिसली . त्याच्यावर मराठीत लिहिले होते . सुगंधालय नाव पाहून तिने आत प्रवेश केला आणि समोर साक्षात केशर उभी होती .



शकुंतलाने तिला संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु केशरच्या शक्ती जागृत नव्हत्या . आता एकच उपाय होता केशरला तिच्या शक्ती जागृत करायचा मंत्र देणे . शकुंतला सूक्ष्म देहाने केशरजवळ गेली आणि तिच्या कानात योगिनी शक्ती जागृत करणारा मंत्र म्हंटला .


त्यानंतर अधिक काळ सूक्ष्म देहाने वावरणे शक्य नसल्याने शकुंतला परत आली . ह्या सगळ्या प्रक्रियेत तिची बरीच ताकद खर्च झाली होती .




" मला काहीही करून त्या महालात असलेली वेणी हवीय ."
सुपर्णाची नखे सम्राटच्या गळ्यावर रुतली होती .


ताकद आणि पैसा यांचा हव्यास आपल्याला ह्या संकटात घेऊन आल्याची जाणीव त्याला झाली होती .


" माझी दोन माणसे मारली गेली . आता त्या महालात जायला कोणीच तयार नाही ."
सम्राट कसेबसे म्हणाला .


दुसऱ्या क्षणी तिची धारदार नखे त्याच्या खांद्यात रुतली होती .

" मला ती वेणी आणि आमदाराची पोरगी दोन्ही पाहिजेत . नाहीतर तू अमर होशील पण जनावर बनून ."
मोठ्याने हसत सुपर्णा म्हणाली .


" मृणमयी कशाला हवीय तुला ?" सम्राटने विचारले .


" वेणीची शक्ती जागृत करायचा मंत्र असणारी भाषा ती मुलगी वाचू शकते ."

एवढे बोलून सुपर्णा निघून गेली .

सम्राट तडफडत तसाच उभा होता . तेवढ्यात मागच्या खिडकीजवळ हालचाल ऐकू आली . सम्राट हळूच खिडकीजवळ गेला. खिडकीबाहेर मृणमयी उभी होती .


" तुझ्या गळ्यात असलेला धागा काढून समोरच्या पुतळ्याच्या गळ्यात घाल आणि माझ्यासोबत चल ."

ती हळू आवाजात म्हणाली . सम्राटने तिने सांगितले तसे केले आणि दोघेही हळूच उडी मारून कुंपणाच्या बाहेर आले . सारिका आणि राघव तयारच होते . थोड्याच वेळात गाडी वेगाने बाहेर पडली .



इकडे केशर तिच्या कानात ऐकू आलेला मंत्र नकळत म्हणू लागते . त्याबरोबर तिच्या डोळ्यांसमोर पहिला एका अतिशय देखण्या लावण्यवती स्त्रीचा चेहरा येतो . त्यानंतर तिला सगळे उलगडत जाते आणि ध्यानातून बाहेर येताच पहिला शब्द ती उच्चारते .


"सुगंधा ! सुगंधा कुठे आहेस तू ? "
इनामदार महालात पोहोचायची तयारी करणार तेवढयात तिला आणखी एका योगिनीची हाक ऐकू येते . केशर आपल्या सगळ्या शक्ती जागृत करण्यासाठी ध्यानाला बसते .




सारिका,राघव आणि मृणमयी सम्राटला घेऊन परत येतात . सम्राट सोबत कोणीच काही बोलत नाही .


" मला सुपर्णा सोडणार नाही . तिच्याकडे खूप राक्षसी शक्ती आहेत ."
सम्राट घाबरून बोलत होता .

" याचा विचार तू आधीच करायला हवा होतास ."
सारिका शांतपणे म्हणाली .

सगळे वाड्यावर पोहोचले .

आश्लेषा अजूनही बेशुद्ध होती . तिच्या सगळ्या अंगावर भाजल्याचे बारीक व्रण उमटायला सुरुवात झाली होती . धैर्यशील आणि करुणा दोघांनाही डॉक्टर असूनही काहीच करता येत नव्हते .


इरावती आपल्या खोलीत परत आली आणि तिची नजर पमा आत्याच्या डायरीवर गेली .


" पमा आत्त्या , काय करू म्हणजे आश्लेषा वाचेल ? "

इरावती हताश होऊन बोलली .

" इरा , शापासोबत तिच्या काही शक्ती प्रत्येकीला लाभतात . फक्त त्या मला ओळखू आल्या तरी मी काहीच करू शकले नाही ."
इरावती एकदम कानात आलेला आवाज ऐकून दचकली आणि तिने पमा आत्याची डायरी पुन्हा उघडली .



पहिल्यांदा मला ती स्वप्नात दिसली . सुगंधा! तिचा बेसूर चेहरा पाहून मला दोन रात्री झोप आली नव्हती . त्यानंतर माझे वैवाहिक जीवन सुरू व्हायच्या आधीच संपून गेले .

माझी मानसिक स्तिथी अस्थिर झाल्याने मला काहीही सुचत नसे . तिचा तो जळणारा चेहरा आणि त्याचे माझ्या अंगावर उमटत जाणारे व्रण त्यामुळे मला ती शाप वाटायची . परंतु तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्यातील आई जागी झाली .


लहानगी इरा माझ्या मनाला स्थिर करू लागली आणि अशाच एका शांत क्षणी तिने मला सांगितले," मातृत्वाची अपुरी राहिलेली आस पूर्ण करायची आहे . तरच मला मुक्ती लाभेल ."

तिचा तो ध्यास मला समजला होता . तिच्या शक्ती मला आसपास जाणवू लागल्या होत्या . तिचा स्वीकार करणे आणि तिची आई होण्याची आस पुरी करणे हाच एकमेव मार्ग आहे . पण त्यात अडथळेदेखील येतील कारण अमर होणे आणि शक्तिशाली होण्यासाठी अघोरी शक्ती तिला मुक्त होऊ देत नाहीत . इनामदार घराण्यातील लेकिना तिच्या शापातून तिच्याच शक्ती मुक्त करू शकतील .


डायरी मिटली आणि इरावती खूप दिवसांनी शांत झोपी गेली .


सुपर्णा आणि वेणी यांचा काय संबंध असेल ?

सम्राट आणि मृणमयी काय मदत करतील ?

इरावती शाप संपवू शकेल का ?

वाचत रहा .

शापित अप्सरा .

©®प्रशांत कुंजीर .


🎭 Series Post

View all