शापित अप्सरा भाग 56

इराला सापडलेला मार्ग ती कसा अवलंबेल ?

शापित अप्सरा भाग 56

मागील भागात आपण पाहिले सारिका आणि राघव सम्राटला घेऊन येतात . शकुंतला केशरला संपर्क करते . इरावती सुगंधाच्या मुक्तीचा मार्ग शोधून काढते . आता पाहूया पुढे .


एक मॉडेलिंग फोटोशूट करून सुपर्णा परत फॉर्म हाऊसवर आली . आज रात्री सम्राटला स्वतः महालात घेऊन जायचे तिने ठरवले होते . सम्राट आणि त्याच्या माणसांना म्हणूनच वेगवेगळे डांबून ठेवले होते . सुपर्णा बंगल्यात आली . सगळे नोकर बरोबर रात्री आठ वाजता निघून जात . त्यानंतर ह्या बंगल्यात सुपर्णा एकटी असते असे लोकांना वाटायचे . प्रत्यक्षात तिथे रहायचे मानव रक्त पिशाच्च आणि मानव लांडगे जे सुपर्णाचे गुलाम होते .



सुपर्णा सम्राटकडे निघाली . आपल्याकडे असलेल्या चावीने तिने दरवाजा खोलला . लाईट लावल्या आणि सुपर्णा प्रचंड चिडली . सम्राट कुठेही दिसत नव्हता . तिने आपल्या जादुई धाग्याची मदत घ्यायचे ठरवले . परंतु धागा आसपास जाणवत होता . याचाच अर्थ सम्राट कैदेतून निसटला होता .


सम्राट गेला तरी त्याची माणसे आजही तिच्या ताब्यात होती . सम्राटला त्याबाबत तिने सांगितले नव्हते . दोघेजण मेलेले बघून तुझी उरलेली दोन माणसे पळाली असेच त्याला माहीत होते . आता वेणी हस्तगत करायला हवी . पण मृणमयी नसताना हा मंत्र कोण वाचेल? मंत्राची भाषा जाणणारे खूप कमीजण होते. त्यातील एका नावावर तिचे ध्यान स्थिरावले . डॉक्टर पद्मनाभ देशमुख . प्रत्यक्ष एक प्रसुतीतज्ञ असले तरी त्यांनी नंतर पुरातत्व शास्त्रात देखील डॉक्टरेट घेतली होती . तिने मानव पिशाच्च आवाहन केले .


" ही चिठ्ठी आणि सोबत असलेले चित्र डॉक्टरांना दे . त्यांना इथे घेऊन यायचे . जर त्यांचे रक्त प्यायचा प्रयत्न केलास तर माझ्याशी गाठ आहे ."
सुपर्णा त्याला कामगिरी सोपवून सम्राटच्या मित्रांकडे वळली .


केशर ध्यानातून परत आली . तिला आता तिने गुप्त ठिकाणी ठेवलेली चित्रे घेऊन लवकरात लवकर साजगाव गाठायचे होते . पहिले चित्र तिने अशा ठिकाणी लपवले होते जिथे हजारो लोक भेट देतात . परंतु तिथल्या शिल्पांकडे बघायला लाजतात . खजुराहो . केशरने सूक्ष्म देह धारण केला आणि दुसऱ्या क्षणी ती खजुराहो येथे पोहोचली . वात्सायन मुनींनी लिहिलेल्या कामसूत्र ग्रंथावर आधारित शिल्पे असणारा हा प्रचंड मंदिर समूह होता .


अमर व्हायचा ग्रंथ शोधणारे कोणीही इथपर्यंत पोहोचू शकणार नाही याची केशरला पूर्ण खात्री होती . केशर त्या अगदी एका बाजूला असणाऱ्या छोट्याशा मंदिरासमोर उभी राहिली . तिने त्या मंदिरावर कोरलेल्या एका शिल्पावर हात ठेवला आणि त्याबरोबर एका गुप्त पोकळीत ठेवलेले ते चित्र बाहेर आले .


केशर चित्र घेऊन निघाली आणि अचानक एका जागेवर थांबली . कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे असा तिला भास झाला . तिने पुन्हा वळून खात्री केली आणि मग एका निर्जन ठिकाणी सूक्ष्म देह धारण करून ती पुढच्या प्रवासाला निघाली .



सुपर्णा दरवाजा उघडून आत आली . सदा आणि दुसरा मित्र कसे मेले हे बघितल्याने दोघेही घाबरले होते .

" स.. स..सम्राट कुठ हाय ? आमाला इथून जाऊ द्या ."


शंकर गयावया करू लागला.


" व्हय,आमाला पैसाबिसा काय नको ."
पांडू म्हणाला .


" तुम्ही माझे एक काम करा . तुम्हाला परत कधीच त्रास होणार नाही ."
सुपर्णा म्हणाली .

पांडू आणि शंकर आजूबाजूला बघू लागले . खिडकीबाहेर अंधारात लाल डोळे चमकत होते . सुपर्णा समोर उभी होती . आपण काम नाकारले तरी मारणार आहोत . दोघांनी अंदाज बांधला .


" चला , आज हे शेवटचे काम करा आणि पुन्हा परत कधीच इकडे फिरकू नका . "

सुपर्णा त्यांना जरबी आवाजात म्हणाली . दोघेही तिच्या मागे चालू लागले .



डॉक्टर पद्मनाभ आपल्या खोलीत पुस्तक वाचत होते . प्राचीन रहस्य असलेले ते पुस्तक आता संपत आले होते . हल्ली ते हॉस्पिटलमध्ये अगदी गरज असेल तरच जात . नाहीतर त्यांचा संपूर्ण वेळ ह्याच अभ्यासात जात असे .

" सर , तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेय ."
नोकर निरोप घेऊन आला .

इतक्या रात्री कोण आले असेल ? त्यांनी विचार करतच त्या इसमाला आत बोलवायला सांगितले . डॉक्टर बैठकीत आले . समोर तिशीच्या आपसास असणारा एक मजबूत बांध्याचा मुलगा उभा होता .

" कोण तुम्ही ? काय काम होते ? "
डॉक्टर बंगालीत म्हणाले .


समोरील तरुणाने फक्त हातात असलेली चिठ्ठी त्यांना दिली आणि सोबत आणलेले चित्र समोर ठेवले . चित्रावर नजर जाताच डॉक्टरांना आठवली इरावती इनामदार . त्यांनी पटकन चिठ्ठी उघडली .

" तुम्हाला ह्या चित्रांचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करायचा असेल तर खालील पत्त्यावर भेटा ."


जवळपास पंचवीस वर्षांनी महाराष्ट्रात परत जायचे होते . एक मन नको म्हणत होते तर दुसरे मन इरावती भेटेल आणि मुख्य म्हणजे श्रेयस भेटेल यासाठी ओढ घेत होते .

" मी उद्याच्या फ्लाईटने मुंबईला पोहोचतो . तू कोणाकडून आला आहेस ? "
त्यांनी विचारले .

" माझे काम फक्त निरोप पोहोचवणे आणि तुम्हाला सुखरूप घेऊन येणे इतकेच होते . उद्या विमानतळावर भेटू ."
तो युवक वेगाने निघून गेला .

आपण घेतलेला निर्णय पाहून डॉक्टर स्वतः अचंबित होते. त्यांनी नोकराला बॅग भरायला सांगितली .


सुपर्णा दोघांना घेऊन निघाली. तिच्या आजूबाजूला तिचे पहारेकरी होतेच . इनामदार महालात सुगंधा असल्याने सुपर्णा आत प्रवेश करू शकत नव्हती . महाल जवळ येऊ लागताच पांडू आणि शंकर घाबरले .

" पांडू,आता काय करायचे ? "
शंकरने खुणेने विचारले . दोघेही गप्प बसून होते.
" पळून जायचा विचारही करू नका . आजूबाजूला मृत्यू आहे ." सुपर्णा त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाली .

महालाच्या हद्दीबाहेर सुपर्णा थांबली .
" इथून पुढे तुम्हा दोघांना जायचे आहे . उत्तर दिशेला असलेल्या तळघरात वेणी असेल . वेणी मिळताच सरळ बाहेर निघून या . " सुपर्णा समजावत असताना दोघेही प्रचंड घाबरले होते .


सुपर्णा त्यांना महालाच्या हद्दीबाहेर सोडून तिथेच थांबली . शंकर आणि पांडू मागच्या दिशेने आत शिरले . मागील वेळी लावलेली दोरी अजूनही तिथेच होती . कारण कोणीच त्या बाजूला फिरकत नसे . शंकर आणि पांडू दोघेही महालात शिरले .



इरावती शांत झोपेत असताना तिला हाक ऐकू आली .

" इरा,आजवर कोणत्याही मुलीने संसार नाकारून जीवन निवडले नाही . तू तो मार्ग निवडला आणि माझ्या शाप वाणीचा प्रभाव संपला.. मग आता का परत आली आहेस ? "
इरावती समोर साक्षात लावण्य उभे होते .


सुभानराव तिच्यावर भाळले यात काहीच आश्चर्य नव्हते .

" गेल्या कित्येक पिढ्या आम्ही तुझ्या शापाला बळी जातोय . यात आमचा काय दोष ? तू ह्या घराण्याची सून आहेस . आम्ही तुझ्या लेकी आहोत . आपल्याच लेकीला असा शाप का ? "

इरावतीने विचारले .


" माझ्या उदरात असलेला अंकुर मारताना हा विचार कोणीच केला नाही ."
तिचा आवाज क्रूर बनला होता .


" मी इरावती ह्या घराण्यातील लेक तुला आई म्हणून हाक मारत आहे . तुझ्या उदरात असलेला इनामदार घराण्याचा अंकुर आणि माझे रक्त एकच आहे . "

इरावती तिच्यासमोर उभी होती . ती इराला आलिंगन देणार इतक्यात खाडकन दरवाजा उघडला आणि इरावती जागी झाली .इराला मार्ग सापडला होता . स्वप्न अपूर्ण राहिले तरी उपाय सापडला होता . दारात नयना उभी होती .


इकडे महालात पांडू आणि शंकर घाबरत तळघरात आले . अचानक घुंगरू वाजू लागले . पांडू आणि शंकर दोघे सगळीकडे शोधत होते.. तेवढ्यात पांडूने समोर एक संदूक पाहिली.. त्याने संदूक उघडली.. कापलेली वेणी वळवळ करत होती .


" शंकर आर वेणी सापडली ."
पांडू आनंद होऊन ओरडला .

समोरून आवाज येत नव्हता . शंकर थरथर कापत होता . समोर जळालेला बेसूर चेहरा घेऊन ती उभी होती .

" माझ्या महालात घुसलात आता तुम्ही वाचणार नाही . "
ती चालत येऊ लागली .


अचानक शंकरने त्याच्या गळ्यात असलेला देवीचा टाक समोर ठेवला आणि सुगंधा थांबली . तळघरात मागे जिना होता . शंकर आणि पांडू दोघांनी धूम ठोकली.. भयंकर हसत सुगंधा पाठलाग करत होती . महालाच्या बुरुजावर एक अखंड पेटलेली बाई आणि पुढे पाळणारे दोघेजण .


समोर मोठे झाड दिसले . दोघांनी कसलाच विचार न करता उडी मारली . त्याक्षणी सुगंधा जागेवर थांबली . दोघेही सरसर खाली उतरले . बुरुजावर पेटलेल्या अवस्थेत ती तशीच उभी होती . वेणी घेऊन शंकर आणि पांडू धावत सुटले .



सुपर्णा वेणी घेऊन निघाली . शंकर आणि पांडू दोघांना तिने सोडून दिले . आता डॉक्टर पद्मनाभ आले की उरलेले काम पूर्ण होणार होते . विजयी मुद्रेने सुपर्णा घरी निघाली . खजुराहो मंदिरातून केशर सूक्ष्म देहाने निघाली आणि त्याच मंदिराच्या मागे असलेली एक जर्जर म्हातारी तिथून प्रवासाला निघाली . गेले कित्येक दशके ती अर्धवट जिवंत होती . प्राण्यांचे रक्त आणि अधुऱ्या शक्ती घेऊन .



केशर सूक्ष्म देह सोडून तुळजापूर मंदिरात प्रकट झाली . आई भवानीच्या परिसरात होते ते अंतिम चित्र . तुकाई मंदिराच्या टेकडीच्या दिशेने केशर चालू लागली . आता तिला लवकरात लवकर साजगाव गाठायचे होते .



केशर इराला मदत करेल ?

पद्मनाभ सुपर्णाचा हेतू पूर्ण करू शकेल का ?

शापाचा अंत कसा होईल ?

वाचत रहा .

शापित अप्सरा .

©® प्रशांत कुंजीर .

🎭 Series Post

View all