शापित अप्सरा भाग 58

सगळी रहस्ये एकेक करून उलगडणार.

शापित अप्सरा भाग 58


मागील भागात आपण पाहिले केशर आणि राघव मंदिरात रहस्य शोधायला जाताय. इरावती आणि आश्लेषा एका ठिकाणी कैद आहेत. तिथे त्यांना सुगंधा मृत्यू पावल्यावर पुढे काय झाले ते समजते आहे. सुपर्णा डॉक्टर पद्मनाभ यांची वाट बघत आहे. आता पाहूया पुढे.


रात्रभर जाग्या राहिलेल्या सगुणाबाई सकाळी आपल्या सासूबाईंच्या दालनात पोहोचल्या. एवढ्या सकाळी अशा अवस्थेत त्यांना पाहून गुणवंताबाई घाबरल्या.

" सगुणाबाई काय झाले? एवढ्या का घाबरल्या तुम्ही?"

" आत्या,ती इथेच आहे. आपल्याला सोडणार नाही ती."

" सगुणाबाई शांत व्हा. नक्की काय झाले?"

" आत्या मला सुगंधा दिसली. संपूर्ण जळालेली. मला म्हणाली तू सांग सुभानरावांना मला कोणी जाळले."


सगुणाबाई सांगत असलेली हकीकत ऐकून गुणवंताबाई काळजीत सापडल्या. त्यांनी विचार केला आणि त्यांच्यासमोर एकच नाव आले. कलिका.


आपल्याला ह्यातून केवळ तीच वाचवू शकते. तात्काळ कलिकाला भेटायला हवे.

" सगुणा,मी आजच कलिकाकडे जाते. तीच यातून मार्ग काढू शकेल."
सगुणाबाईंना हा पर्याय योग्य वाटला.


गुणवंताबाई गुप्त मार्गाने महालाच्या बाहेर पडल्या. आपला कोणीही पाठलाग करणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन त्या महालातून बाहेर पडल्या. कलिका आता प्रचंड शक्तिशाली झाली होती. ती आपला काळया जादूचा पंथ वाढवत होती. बाहेर गुणवंताबाई आल्याचे समजतात ती नाराज झाली.


" बोला इनामदार बाई,आता तुमच्या मनासारखे झाले सगळे.आता कशाला आलात?"
तिने नाराजीचा सुर लावला.


" कलिका,आम्हाला मदत करायचे वचन दिले आहेस विसरू नकोस."

असे म्हणून त्यांनी सगळी हकीकत सांगितली.

एका योगिनी स्त्रीचा आत्मा कैद केला तर आपल्याला प्रचंड शक्ती मिळतील. हा विचार करून तिने होकार दिला.


सुभानराव रात्र दिवस सुगंधाचा विचार करत असत. त्यांना महालात करमत नसे. ते मळ्यातील घरात किंवा जहागिरीत फिरून बाहेरच थांबत. परंतु कालचा प्रसंग त्यांना काळजीचा वाटला. सगुणाबाई अंघोळ करून आल्या आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली.


" त्या चेटकीण कमळाचा आत्मा आपल्याला त्रास देतोय. आपल्या होणाऱ्या बाळाला त्याने काही केले तर?"

" नाही,काय वाटेल ते झाले तरी असे व्हायला नको. यावर उपाय करायला हवा."


" उपाय आहे. आपल्याला ह्याच महालात तिला कायमचे कैद करून महाल सोडावा लागेल."
तसेही त्यांचे मन इथे रमत नव्हते.
त्यांनी होकार दिला.


" मी दोन दिवस मळ्यात जातोय."
सुभानराव म्हणाले.


"राव,आजच आई एका समर्थ मांत्रिक स्त्रीला सांगून आल्यात. ती येतच असेल. तुम्ही इथेच थांबा."
सगुणाबाईंनी त्यांना महालात जाऊ दिले नाही.


थोड्याच वेळात कलिका तिथे आली. तिने रिंगण आखायला घेतले. परंतु आपण सुगंधाला कैद करू शकलो नाही तर?


कलिकाने विचार बदलला आणि सोबत आणलेल्या साधू पुरुषांना आत एक दुष्ट चेटकीण आत्मा आहे. तर तिला तुम्हीच ह्या महालात बंदिस्त करा असे सांगितले.


त्याबरोबर यज्ञ सुरू झाला. कलिका देखील तिथेच होती. महालाच्या चारही दरवाजात सुरक्षा यंत्र बसवले गेले. स्वतः सुभानराव प्रत्येक दरवाजा बंद करत होते. सुगंधाचा विश्वास बसेना. शेवटचा दरवाजा बंद करताना तिने प्रकट व्हायचा प्रयत्न केला.


कलिका सावध होती. तिने आपल्या शक्ती वापरल्या. दरवाजा बंद झाला परंतु सुगंधा कलिकाच्या संपूर्ण शक्ती घेऊन गेली. महाल कायमचा बंद करून सगळेजण बाहेर पडले. सुगंधा इनामदार महालात कायमची बंद झाली.


आपल्याला सुभानरावांनी कैद केल्याचे तिला दिसले. त्यानंतर लवकरच सगुणाबाईंना चार मुलगे आणि एक मुलगी झाली. परंतु मुलगी मोठी होताच सुगंधाचा शाप आपला प्रभाव दाखवू लागला.


सुभानरावांच्या समोरच मुलीने पेटवून घेतले आणि जाताना शाप सांगितला. आपल्या बायको आणि आईने केलेला विश्वासघात सहन न झाल्याने सुभानरावांनी त्याच रात्री आपले जीवन संपवले.

इराने कागद बंद केले. सुगंधाचा आत्मा सूड का घेऊ इच्छितो याचे उत्तर मिळाले होते.



सारिका , श्रेयस आणि राघव तिघेही केशर सोबत मंदिरात जायला निघाले. रस्त्यावर असलेले मानव लांडगे आता लांब उभे होते. आजूबाजूने त्यांना घेरत होते. केशर आणि राघव सावध होते.


अचानक एका मानव लांडग्यांने झेप घेतली. राघवने हवेतच त्याचा जबडा पकडला आणि त्याला दूर फेकून दिले. राघवचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. केशर फक्त मंद हसली. आता मानव लांडगे दूरच रहात होते. मानव रक्त पिशाच्च देखील राघवकडे बघून दूरच होते.


" वेग वाढवा,त्यांची संख्या वाढल्यास ते राघवकडून आवरले जाणार नाहीत."
केशर म्हणाली.


चौघेही धावत निघाले. केशर एकटी शक्ती वापरून जाऊ शकत होती. परंतु यांना सोडून जाणे धोक्याचे होते. दूरवरून कळस दिसू लागला आणि त्याबरोबर पाठलाग बंद झाला. मंदिराचा दरवाजा उघडुन त्यांनी आत प्रवेश केला. केशर देवीच्या मूर्तीसमोर उभी राहिली.


देवीच्या उजव्या हातात असलेले फुल प्रकाशात चमकत होते. त्यावर असलेली सातही चिन्हे जागृत झाली होती. केशरने मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्यातील एकेक चिन्ह इन्स्पेक्टर सारिकाच्या देहात सामावले गेले.

" याचा अर्थ काय आहे?"
श्रेयस गडबडला.


"सांगते आधी आपण कळस पाहू."
केशर सगळ्यांना घेऊन वर गेली. प्रत्येक मजल्यावर एकेक चिन्ह होते.


चिन्ह वाचताच त्यातून एकेक अक्षर श्रेयसच्या हातावर उमटत होते. सातही अक्षरे उलटली आणि सगळे खाली आले.

" हे सगळे काय आहे? माझ्या हातावर हा कसला टॅटू आहे?" श्रेयस घाबरला होता.


" अमर व्हायचे रहस्य असलेला ग्रंथ प्रकट करण्यासाठी चंद्राच्या प्रकाशात हा आठ अक्षरी मंत्र म्हणायचा आहे."
केशर समजावत होती.


" पण ह्यात सातच अक्षरे आहेत. आठवे अक्षर कुठेय?" सारिकाने विचारले.

केशर चालत श्रेयसजवळ गेली. तिने आपल्या गळ्यात असलेले पदक काढले आणि श्रेयसला घातले.


" यात आहे आठवे अक्षर. ग्रंथ केवळ शोधायच्या हेतूने जी व्यक्ती प्रयत्न करेल त्यालाच ही अक्षरे मिळणार होती. आता चला लवकर. आपल्याला ग्रंथ शोधायचा आहे."

चौघेही मंदिरातून बाहेर पडले.



खजुराहो मंदिरातून केशर बरोबर बाहेर पडलेली ती वृध्द स्त्री स्मशानात आली. तिने आपले रक्त समोरील रिंगणात शिंपडले. गेले दीडशे वर्षे आपल्या शक्ती पुन्हा मिळवायचा प्रयत्न करत ती थांबली होती. केशर परत यायची वाट बघत. सगळा विधी पूर्ण झाला आणि कलिका तिच्या मूळ रूपात प्रकट झाली. तिने सूक्ष्म देहाने साजगावकडे प्रयाण केले.



डॉक्टर पद्मनाभ मुंबई विमानतळावरून निघाले तेव्हापासून इरावती आणि तिच्या आठवणी त्यांना सतावत होत्या. आपल्याला मुलगा झाला असेच तिला श्रेयसला बघून वाटले असणार याची त्यांना खात्री होतीच. श्रेयसदेखील त्यांचा तिरस्कार करत असे. आजवर मनात ठेवलेली अनेक रहस्य त्यांना त्रास देत होती.


जवळपास दहा बारा तासांचा प्रवास करून ते सुपर्णाच्या फार्म हाऊसवर पोहोचले. सुपर्णा त्यांच्या स्वागताला तयारच होती.


" वेलकम डॉक्टर,तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आलात. आधी फ्रेश व्हा."
सुपर्णा गोड आवाजात म्हणाली.

" होय,प्रवासाने थकवा आलाय. मी फ्रेश होऊन आलोच. लगेच कामाला सुरुवात करू."
डॉक्टर आत जात म्हणाले.


सुपर्णा हसली आणि तिने इशारा करताच सगळे साहित्य तिथे हजर करण्यात आले. आता ती डॉक्टरांची वाट बघत होती. डॉक्टर फ्रेश होऊन बाहेर आले. सुपर्णा त्यांची वाट बघत होती. कॉफीचा मग त्यांना देऊन ती समोर बसली. डॉक्टरांनी तिच्याकडे असलेले चित्र आणि मजकूर वाचला.


" सुगंधा नावाच्या योगिनी स्त्रीने काढलेली चित्रे आहेत. तिच्याकडे एक दिव्य ग्रंथ होता असे सगळेजण म्हणतात."
डॉक्टरांनी मजकूर वाचून सांगितले.


" डॉक्टर तुमचा विश्वास आहे ह्या सगळ्यांवर?"
सुपर्णा म्हणाली.

" कम ऑन मी एक डॉक्टर आहे. माझा कधीच यावर विश्वास नव्हता."
डॉक्टर रागाने म्हणाले.


सुपर्णा हसली आणि तिने त्यांना आणखी एक कागद दिला. डॉक्टरांनी कागद हातात घेतला.


" हा आणखी एक अंध विश्वास. चेटकीण स्त्रियांनी लिहिलेले जादुई मंत्र."


असे म्हणत त्यांनी मंत्र वाचायला सुरुवात केली. मंत्र वाचताना वातावरण बदलत गेले. वेणी जागृत झाली. मंत्र वाचून संपताच डॉक्टरांच्या समोरच ती वेणी सुपर्णाच्या केसात जोडली गेली आणि सुपर्णा मूळ रूपात प्रकट झाली. तिने तिच्या गुलामांना आदेश दिला.


" डॉक्टरांना आत घेऊन जा. आपल्याला उद्या त्यांचा फार उपयोग होणार आहे."


डॉक्टर पद्मनाभ अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते. पंचवीस वर्षांपूर्वी इरावती असेच शाप वगैरे सांगून निघाली होती. त्याच रागात तिचा झालेला भीषण अपघात आणि पुढे झालेली ताटातूट त्यांना आठवत होती. मानव रक्त पिशाच्च त्यांना एका अंधाऱ्या खोलीत ढकलून निघून गेले. समोर मशालीच्या मंद प्रकाश आणि त्यात उभ्या असलेल्या दोन स्त्रिया. अचानक दोघांच्या तोंडातून निघाले. इरावती? पद्मनाभ?



कलिका,सुपर्णा ग्रंथ मिळवू शकतील?

सुगंधाला मुक्ती मिळेल?

श्रेयसच्या जन्माचे रहस्य काय असेल?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all