शापित अप्सरा भाग 59

सुगंधा एक आई म्हणून इनामदार घराण्यातील सर्वांना माफ करेल का?

शापित अप्सरा भाग 59


मागील भागात आपण पाहिले केशर राघव आणि सारिका दोघांना काही शक्ती मिळवून देते. श्रेयसची ह्या कामातील भिमिकडेखील उलगडते. सुपर्णा वेणीची शक्ती मिळवते. डॉक्टर पद्मनाभ आणि इरावती भेटतात. कलिका आपल्या शक्ती मिळवून परत येते. आता पाहूया पुढे.


" आत्या कोण आहेत हे? ही लूक्स लाईक श्रेयस. तू ओळखतेस यांना?"
आश्लेषा प्रश्नांवर प्रश्न विचारत होती.


इरावती समोर पद्मनाभला पाहून स्थब्ध उभी होती. पंचवीस वर्षांपर्वी आपल्या घराण्याला असलेल्या शापामुळे आपण लग्न करू शकणार नाही ह्याला मूर्खपणा म्हणाला होता पद्मनाभ. त्यानंतर जोरदार भांडण करून दोघेही त्याच्याच गाडीवरून परत जायला निघालो होतो.


नंतर झालेला भयंकर अपघात आणि मग गायब झालेला पद्मनाभ आज दिसत होता तिला. खरतर आपल्यासारख्या इतिहास, पुरातत्व आवडणाऱ्या मुलीच्या प्रेमात तो पडला याचाच अनेकींना हेवा वाटायचा. एकामागोमाग एक विचार इराच्या डोक्यात थैमान घालत होते.


" इरावती,तू इथे कशी काय? ह्या सुपर्णाने तुलाही कैद केले आहे का?"
पद्मनाभ स्वतःला सावरत प्रश्न विचारत होता.


" हो,आम्हाला इथे कैद केले आहे. काल रात्रीपासून."
आश्लेषाने उत्तर दिले.


" पण तुम्ही इथे कसे डॉक्टर? ह्या सगळ्यावर तुमचा अजिबात विश्वास नव्हता."
इराने प्रश्न विचारला.

"पंचवीस वर्षांपर्वी माझी प्रेयसी मला ह्याच सगळ्या कारणांनी सोडून गेली. मग डॉक्टरकी करता करता प्राचीन तंत्रविद्या, पुरातत्व यांचा अभ्यास करायला लागलो. तरीही अद्भुत वेगळे काही सापडत नव्हते. परंतु माझी इरा खोटे बोलणार नाही हे देखील माझे मन सांगत होते."
पद्मनाभ तिच्या डोळ्यात बघून बोलत होता.


" डॉक्टर तुम्हाला एक मुलगा आहे. तुम्ही आता माझ्यासाठी अनोळखी आहात."
इराचा आवाज कठोर झाला होता.


" इरा प्रसुतीतज्ञ झाल्यावर तुला मागणी घातली आणि तू नाही म्हणालीस. तुला आठवते आपला अपघात झाला. मी एका बाजूला फेकलो गेलो. तू मात्र तीन दिवस बेशुध्द होतीस. तेव्हा माझ्यातल्या डॉक्टरवर प्रियकराने मात केली.


"आय रीमूव्ह यूअर एग्ज."
डॉक्टर अपराधी स्वरात म्हणाले.


" व्हॉट? तू असे का केलेस पद्मनाभ?"
इरावती प्रचंड चिडली होती.


" कारण मला तुझा अंश हवा होता. तोच अंश श्रेयस पद्मनाभ देशमुख. माझी वहिनी सरोगेट आई झाली आणि श्रेयस ह्या जगात आला. पण त्याला माझा तिरस्कार वाटतो. त्याच्या मते मी त्याला असे जन्माला घालून आईपासून पारखे केले आहे."
पद्मनाभ म्हणाला.
इरावती हे सगळे ऐकून सुन्न उभी होती.




गावच्या बाहेर गुराखी गुरे राखत होते. अचानक म्हशी उधळत पळू लागल्या. त्यातील दोन म्हशी इनामदार महालाच्या आवारात घुसल्या. मालक ओरडतील म्हणून गुरे राखणारे त्यांच्या मागे गेले.

" अय म्हाद्या, तिकड दरवाजाला कसल भारी त्रिशूळ हाय. घ्याच का काढून. इकुन टाकू."
पिंट्या म्हणाला.

पैसे म्हणाल्यावर म्हाद्याचे डोळे चमकले. त्याने दारावर लावलेले त्रिशूळ उपसले आणि दोघांनी म्हशी हाकलत तिकडून पळ काढला.



दारावरचे सुरक्षाचक्र तुटले आणि सुगंधाचा आत्मा मुक्त झाला.


" मला जाळून मारले. आता इनामदार घराण्यातील एकेक माणूस मरेल."
सुगंधा हसत म्हणाली.


सुगंधाने आपल्या शक्तीने धैर्य,अभिजीत यांना संमोहित केले. अचानक उठून धैर्यशील आणि अभिजीत वाड्यातून बाहेर पडले. त्यांना थांबवायचा प्रयत्न शालिनीताई आणि करुणा दोघींनी चालवला होता. परंतु ताकद कमी पडत होती. शेवटी त्या दोघी मागे चालू लागल्या.


रात्र व्हायला आली होती. सगळे साजगाव झोपी गेले होते. आजूबाजूला मानव लांडगे होते. परंतु आता त्यातील कोणीच पुढे येत नव्हते. धैर्यशील आणि अभिजीत महालाच्या आत जाऊ लागले तसे शालिनीताई आणि करुणा दोघीही आत गेल्या आणि महालाचा दरवाजा बंद झाला.



शकुंतला तिच्या शक्ती पुन्हा एकजूट करत होती. तिला बाहेर झालेला प्रकार समजला आणि ती इनामदार महालाच्या दिशेने धावली. नयना आता घाबरली होती. मदतीला कोणाला बोलवायचे? विचार करत असताना तिला महादेव आठवला. तिने त्याला फोन केला. उत्सव असल्याने तो गावातील घरात होता. नयनाचा निरोप मिळताच तो जायला निघाला.



इकडे सुपर्णाने तिच्या गुलामांना आदेश दिला. त्यांनी इरावती,आश्लेषा आणि डॉक्टर पद्मनाभ तिघांना बाहेर काढले आणि एका गाडीत टाकले. गाडी भरधाव वेगाने धावू लागली. इनामदार महालात धैर्यशील,अभिजीत,शालिनीताई आणि करुणा चौघेही स्तब्ध उभे होते. महालात पोहोचताच धैर्य आणि अभिजीत भानावर आले.


" धैर्य,अभी आर यू ओके?"
करुणा त्यांच्याजवळ गेली.


" येस, वुई आर! पण आपण कुठे आहोत नक्की?"

अभिजीत जरा घाबरला होता.


तेवढ्यात अचानक घुंगरू वाजल्याचे आवाज येऊ लागले.

" अभी आपण इनामदार महालात आहोत."
शालिनीताई म्हणाल्या.


सगळीकडून वेगवेगळे आवाज येत होते. तो महाल आणखी गूढ भासत होता.


कलिका साजगावच्या इनामदार महालासमोर प्रकट झाली. परंतु आत जायच्या आधी तिला स्वतः भोवती संरक्षण निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी कलिकाने मंत्र म्हणायला सुरुवात केली. सुपर्णा आणि तिचे साथीदार महालाच्या पूर्व दरवाजासमोर आले. सुपर्णा आता चेटकीण रूपात होती.


" मला अतृप्त ठेवून सुभानराव निघून गेला. आता त्याच्याच वंशाच्या पुरुषाचा बळी देऊन सुगंधाला कैद करणार."

खदाखदा हसत सुपर्णा म्हणाली.


तिचा इशारा होताच तिच्या गुलामांनी पूर्व दरवाजासमोर असलेले संरक्षक कवच तोडले आणि समोरच सुपर्णा तिचा तंत्र विधी करायला सज्ज झाली.



केशर सगळ्यांना घेऊन योगिनी मंदिराजवळ आली. तिने आपल्याकडे असलेल्या मंत्राने मंदिराचा दरवाजा प्रकट केला आणि ते पुढे पाऊल टाकणार इतक्यात समोर मानव लांडगे आणि रक्त पिशाच्च आडवे झाले.


" पुढे पाऊल टाकल तर मराल."
त्यांचा म्होरक्या म्हणाला.


" एका योगिनीला आव्हान द्यायची तुझी हिंमत कशी झाली." केशर चिडली.

" तुला आम्ही अडवू शकतो."
त्याने केशरकडे झेप घेतली.

त्याचक्षणी केशरने हवेत हात फिरवला आणि प्रकट झालेल्या तलवारीने त्याचे धड उडवले. परंतु त्याचे धड पुन्हा जोडले गेले.


" आम्ही अमर आहोत. आम्हाला असली हत्यारे मारू शकत नाहीत."
तो मोठ्याने हसला आणि पुन्हा केशरकडे धावला.

अचानक सारिकाला आवाज ऐकू आला.
" तेजस्वी प्रकट हो!"


सारिकाने तो मंत्र मोठ्याने म्हंटला आणि एक तेजस्वी खंजीर प्रकट झाला.

पोलिस प्रशिक्षण केंद्रात नेमबाजीत अव्वल असलेल्या सारीकाने सरळ त्या मानव रक्त पिशाच्च केशरवर झेप घेताना त्याच्या कपाळाचा वेध घेतला. खंजीर सरळ कपाळात घुसला आणि त्याच्या शरीराने पेट घेतला.

"राघव डोळे बंद करून मंत्र ऐक."
सारिका मोठ्याने ओरडली.

त्यानंतर त्या दोघांनी सगळ्यांना संपवले आणि मग दरवाजा उघडून त्यांनी प्राचीन योगिनी मंदिरात प्रवेश केला.


"आपल्याला सातही चित्र लागतील. माझ्याकडे दोन चित्रे आहेत. उरलेली पाच चित्रे कुठेय?"
केशर चिंता व्यक्त करत होती.
श्रेयस हसला.


" माणसाने काही जादुई यंत्रे बनवली आहेत. उरलेली पाच चित्रे आहेत आपल्याकडे."
सगळेजण आत जाताच दरवाजा बंद झाला.


घुंगरू वाजत होते आणि कोणीतरी आसपास चालत होते. अभिजीत आणि धैर्यशील घाबरले होते. अचानक जळणारी एक आकृती दिसली.

" जशी मी जळाले तसे आता इनामदर घराण्याचे रक्त जळेल." तिच्या क्रूर आवाजाने सगळे स्तब्ध झाले होते.

ओघळणारी त्वचा,जळणारे रक्त आणि मांस यांचा विचित्र वास सगळीकडे भरला होता.

" सुगंधा,ज्यांनी तुला संपवले ते आता नाहीत . आम्हाला मारून तुला काय मिळणार आहे?"
शालिनीताई म्हणाल्या.


" मी तरी काय अपराध केला होता? प्रेम करणे हा गुन्हा होता का?"
सुगंधा अगदी जवळ आली. तिने आपल्या शक्तींनी धैर्यशीलचा गळा आवळला.


सुपर्णाने रिंगण आखले. इरावतीला पकडुन त्या रिंगणात बसवायचा इशारा तिने केला. इरावतीला मध्यभागी रिंगणात बसवून मग सुपर्णाने विधी सुरू केला. आत्मा आवाहन मंत्र जपायला तिने सुरुवात केली. सुगंधाचा आत्मा एका अदृश्य शक्तीने खेचला जाऊ लागला.


धैर्यशीलच्या गळ्यावर असलेली पकड ढीली पडली. इराच्या शरीरात सुगंधाचा आत्मा प्रवेश करत होता. सुगंधाच्या शक्ती हव्या असतील तर तिला मानव शरीरात आणून मग कैद करावे लागणार होते. इरावती प्रचंड वेदनेने किंचाळत होती. धैर्य आणि त्याच्यासोबत सगळे धावत बाहेर आले. सुपर्णाने धैर्यला काळया शक्तीने बांधले. सुपर्णा आता तिच्या ध्येयाच्या अगदी जवळ होती.



सुपर्णा मंत्र म्हणत असताना अचानक तिचे गुलाम पिशाच्च आणि मानव लांडगे दूर फेकले जाऊन जागेवर जखडले गेले. आपल्या विधीत कोण अडथळा आणत आहे यासाठी सुपर्णाने डोळे उघडले. समोर कलिका उभी होती.


" सुगंधाच्या शक्तींवर फक्त माझा हक्क आहे. तुला संपवून मी तो मिळवणार."
कलिका हसली.


" मी सुपर्णा उर्फ कमळा उर्फ अशोबिनी अशा अनेक रूपात ह्या दिवसाची प्रतीक्षा केली आहे."
सुपर्णा हल्ला करू लागली.

तिचे ध्यान हलले आणि रिंगणात कैद सुगंधा मुक्त झाली. सुगंधाने आपल्या शक्तीने आश्लेषाला पकडले. सुपर्णा आणि कलिका दोघींनाही तिने सहज जागेवर जखडून टाकले.


"सुपर्णा आपण एकेकट्या लढलो तर तिला हरवू शकणार नाही." कलिका ओरडली.

तिकडे सुगंधाची नखे आशुच्या गळ्यावर रुतत होती.


सुगंधाला मुक्ती मिळेल का?

कलिका आणि सुपर्णा यांचे काय होईल?

दुष्ट काळया शक्ती जिंकतील का?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all