"सोबती"

चित्रकाव्यस्पर्धा


दिनकर तो मावळता
साक्षीस अथांग पाणी
झोक्यास ऐकवीत गाते
अवरोही सूर विराणी।
सांजवेळ कातर हळवी
सोबतीस तुझ्या आठवणी
गहिवरतो क्षितिजही सारा
डोळ्यांत दाटते पाणी।
तुजसवे पुन्हा बहरावी
ही अधुरी प्रेमकहाणी
तूच दिलाचा राजा
मी तुझीच प्रेमदिवाणी।
वाट पाहतो झोका
सज्ज झेपावण्यास गगनी
चाहूल तुझी आभासी
उजळवी नभा रंगांनी।
सांज आभेत शोधते तुजला
उत्कट मी विरहीणी
अवखळ मनास समजवतो
मग झोकाच "सोबती" बनूनी।

© डॉ समृद्धी रायबागकर