सुन आमची पण मुलगी परक्या घरची (भाग-३-अंतिम)

लग्नानंतर आपली जबाबदारी संपली मुलगी आता परक्या घरची झाली.हे दाखवून देऊन आईवडील आपल्या मुलीचा हक्काचा आधार अलगद काढून घेत असतात.
मोनाला आता आईचा रागच आला तिने आईला विचारले " माझे सासरचे लोकं समजदार नाही कि, तुम्ही मला चांगले सासर बघुन दिले नाही, नेमकं खरं काय?" त्यावर आई काहीही न बोलता सरळ बाहेर निघून गेली.

दोन दिवसातच प्रियाचा वाढदिवस होता.आईवडिलांनी धुमधडाक्यात साजरा केला,आईने भाऊ आणि वहिनी ला स्वतः पिक्चर ला पाठवले, प्रियाने छान शिवलेस ड्रेस घातला,रेड लिपस्टिक लावली, छान मेकअप केला, गळ्यात मंगळसूत्र तर घातले नाही,उंच हिल ची सॅंडल घातली आणि जातांना सासु चे पाया पडायला आली,
मोनाला वाटले आता काही खरं नाही आता आई प्रियाला तर बोलेलच पण भाऊची चांगली खरडपट्टी काढेल.पण
आश्चर्य तसं काही झालंच नाही उलट आईने प्रियाचे कौतुक केले, आणि बोलली " छान दीसतेस, लवकर या संध्याकाळी वाढदिवस करायचा आहे"
मोनाल आनंदी व्हावे की, दुःखी तेच समजत नव्हते
ति आईला म्हणाली "आई आत्ताच नवीन लग्न झालेली तुझी सुन गळ्यात मंगळसूत्र न घालताच शीवलेस ड्रेस घालून बाहेर जाते आता तुला कोणी नावं ठेवणार नाही का? फक्त मुलींसाठी तुझे सर्व नियम होते का? सुनेसाठी नाही का?"  यावेळी ही आई काहीही बोलली नाही.
अशा प्रकारे आईचे सुनेप्रती चांगले आणि समजदारीने वागणे पाहुन मोनाला आश्चर्य वाटत होते.

यापेक्षा ही मोठी गोष्ट म्हणजे प्रियाच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तर मोनाच्या आईने सुनेला माहेरी जाऊच दिले नाही कारण काय तर प्रियाच्या माहेरी चांगले दवाखाने आणि डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात.
पुर्ण बाळंतपण ,बाळाची काळजी ,सुनेची काळजी सर्व सर्व मोनाच्या आईने अगदी आनंदाने केले. सुनेला पुर्ण आराम देत होती, हातात गरमागरम जेवणाचे ताट देत होती. मोना भाच्याला बघायला माहेरी आली तेंव्हा हे सर्व पाहून मोनाला थोडे वाईट वाटले. कारण तिला तीचे पहिले बाळ झाले होते तेव्हा ची गोष्ट आठवली आणि आज आईला तिने खुप ऐकवले.

" आई तु एवढा मोठा भेदभाव कसा काय करु शकते,सहसा बाया मुलींना प्राधान्य देतात, सुनेला नाही, मुली परक्या घरी जाणार म्हणून त्यांची लहान पणापासून काळजी घेतात,लाड करतात,त्यांची हौसमौज पुरवतात पण तु तर तेही केले नाही, लग्नानंतर दोन दिवस माहेरपणाला आली तर, सारखे आपले काम,काम करायला लावायची, आणि माझ्या सासरचे लोकं मला इतका सासुरवास करायचे हे मी तुला सांगायची तर तु मलाच सांगायचीस , बाईच्या जातीला थोडं फार सहन करावं लागतं, पण माझ्या साठी तु आणि पप्पांनी कधीही माझ्या सासरच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, असं कसं करु शकता तुम्ही? आणि आता तुझ्या सुनेसाठी तर तु आई होऊन वागतेस, मुलीसारखं सांभाळते, मी म्हणत नाही की,तु सुनेशी चांगले वागु नको पण मुलींशी तर मुलींसारखी वागली असती ना? "

हे सर्व ऐकून आई मोनाला बोलते " हे बघ मोना काहीही झालं तरी प्रिया आमच्या घरची सुन आहे, आमचा नातु आमच्या वंशाचा दिवा आहे,त्यांची काळजी आंम्ही घेतलीच पाहिजे, कितीही केलं तरी तु मुलगी म्हणजे आमच्या साठी परकीच आहे, आमच्या सुनेचे मन राखणे ही आमची जबाबदारी आहे, आणि हे सर्व तुला पहावत नसेल तर तु जाऊ शकते तुझ्या घरी."
मोना आईचे नवे रुप पहात होती आई पासुन सासु होईपर्यंत आणि आपल्या वहिनीला चांगली सासु मिळाली म्हणून खुश व्हावे की, आपल्या आईने आपल्याला सासु चांगली पाहुन दिली नाही याचे वाईट मानावे हेच तिला समजत नव्हते..

वाचकहो लेखात असे सांगायचे नाही की,मोना ची आई वाईट होती,पण काही घरांमध्ये खरोखरच असे प्रसंग पहायला मिळतात जे मुलीला परकीच मानतात, एकदाचे लग्न लावून दिले की,आपली जबाबदारी संपली असे समजून वागतात, पण सुनेने आपल्या शी चांगले वागावे, आपला मुलगा आणि सुन आपले आहेत
म्हणून त्यांच्याशी चांगले वागतात, त्यांच्या चुकीच्या गोष्टी ही सहन करतात..

©®✍️सौ.दिपमाला अहिरे.