स्वीट कॉर्न पराठा

स्वीट कॉर्न पराठा रेसिपीज इन मराठी
स्वीट कॉर्न पराठा
सध्या पावसाळ्याच्या म्हणजेच या सीझनमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला भुट्टा. स्वीट कॉर्न, मक्याचे कणीस. रस्त्याच्या कडेला शेगडी पेटवून त्यावर हा बुट्टा भाजतात. त्याला तिखट, मीठ, लिंबू चोळून जेव्हा विकत घेणाऱ्याच्या हातात गरम गरम दिला जातो तेव्हा हायहुय करत खाणे हा सर्वांचा आवडता स्वादिष्ट प्रकार.
मका अत्यंत पौष्टिक असून त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात जे यकृत व पित्ताशयासाठी आवश्यक असतात.
स्वीट कॉर्न पराठा
साहित्य
मक्याची कोवळी कणसे,(स्वीट कॉर्न) कांदा, कोथिंबीर, कणिक, तेल, तिखट, मीठ, जिरेपूड, आवडत असल्यास लसूण पेस्ट.
कृती
मक्याची कणसे त्यावरील कव्हर काढून प्रथम किसून घ्या. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, कांदा टाकून फोडणी तयार करा त्यात चवीप्रमाणे तिखट, हळद, मीठ, जिरेपूड घालून किसलेले कॉर्न टाका. कोथिंबीर टाकून थोडे परतून घ्या व चांगली वाफ येऊ द्या.हे झाले सारण तयार.
कणकेत थोडे तेल व मीठ टाकून कणिक मळून घ्या. त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात वरील सारण भरा व पराठा लाटून घ्या. तव्यावर तेल किंवा तूप सोडून पराठा भाजून घ्या व गोड दह्याबरोबर खायला घ्या. असे स्वीट कॉर्नचे पौष्टिक पराठे खूप छान लागतात. लहान मुलांसाठी तर हा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे.
आणि विशेष म्हणजे ज्या ज्या सिझनमध्ये ज्या ज्या वस्तू मुबलक मिळतात त्या खाल्ल्याच गेल्या पाहिजेत. प्रकृतीसाठी ते चांगले असते.
चला तर मग वाट कसली बघताय, करा की रेसिपी ला सुरुवात.
मस्त खा
स्वस्थ रहा. व्यस्त रहा.
सौ. रेखा देशमुख