तेरा साथ है तो भाग 1

तेरा साथ है तो

तेरा साथ है तो भाग 1
मुझे क्या कमी है

©️®️शिल्पा सुतार

रात्रीचे जेवण झालं. रमाच सगळं आवरून झाल. ति हॉल मधे एकटी बसली होती. सासू सासरे बाहेर बसले होते. तिने टीव्ही लावला. आवाज हळू केला. छोटी नणंद तिच्या रूम मधे बसुन काहीतरी लिहीत होती. उगीच तिला डिस्टर्ब नको. 

मोठी नणंद बाळंतपणाला आली होती. तीच बाळ झोपल होत. ती फोन वर बोलत होती. टीव्ही वर ही काहीच कार्यक्रम नव्हते. पण करणार काय? ती उगीच चॅनेल बदलत होती. दिवस तर निघून जात होता. रात्री खूप कंटाळा येत होता. रमाला अजिबात करमत नव्हत. तीच लक्ष मोबाईल कडे होत. 

 यांचा केव्हा फोन येईल? ती वाट बघत होती. तिने उगीच फोनचा आवाज मोठा आहे का ते बघितल. 

साधारण पणे रोज रात्री साडे नऊ वाजता प्रशांतचा फोन येत असे.

प्रशांत आणि रमाच्या लग्नाला आता वर्ष होईल. लग्नानंतर प्रशांत एक आठवडा घरी होता. तेवढा त्याचा सहवास तिला लाभला होता. तो नोकरी निमित्त शहरात रहात होता.  पंधरा दिवसातुन एकदा गावी यायचा.  ते ही एक दिवस सुट्टी मिळायची. 

दोघ सोबत रहायला आतूर असायचे. तेवढीच त्या दोघांची भेट होत होती. बाकी कुठे सोबत जाण नाही की येण नाही. लग्नानंतर ही ते फिरायला गेले नाही. फोन वरच संसार सुरू होता. 

सासुबाईंचा मुलावर खूप जीव होता. तो घरी आला की रात्रीच त्यांना त्याला सगळं सांगायच असायच. ते कमी की अजून रमा साठी जास्तीच काम काढलेल असायच. ती खोलीत गेली की त्या आवाज द्यायच्या. "रमा अग हे नीट ठेव. भांडे आवरून घे. गॅस नीट पुसला नाही. आधी इकडे ये. मला अस घाणेरड काम आवडत नाही." 

रमा प्रशांतच सगळं लक्ष एकमेकांकडे असायच. ती पटापट काम उरकायची. चार पाच तास ही त्यांना सोबत रहायला मिळायच नाही. सकाळी लवकर उठाव लागायच. नाहीतर त्या ओरडायच्या. 

"तुम्ही दोघ अस झोपून रहातात. घरात बाकीचे लोक आहेत. कस वाटत? "

दुसर्‍या दिवशी ही तसच काहीही झाल तरी सासुबाई तीच काम कमी करायच्या नाहीत. प्रशांत वाट बघत बसायचा. कधी कधी तो तिच्यावर चिडायचा ही. "हे काम उद्या कर ना." 

पण तिच हातातल काम टाकायची हिम्मत होत नव्हती.
" आले पाच मिनिट. " ती म्हणायची. 

 लग्न झाल्या पासून रमाचा सासरच्या लोकांसोबतच वेळ जात होता. सासरी तसं कडक वातावरण होतं. सासूबाईंचा दरारा इतका होता की त्यांच्यासमोर कोणीच काही बोलत नसे. 

बऱ्याच वेळा प्रशांतने रमाला नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाऊ का म्हणून आईला आडून आडून विचारलं होत . पण त्या जमू देत नव्हत्या. एक ना अनेक कारण देत होत्या. 

रमा नाराज होती. दरवेळी तो गावाला निघाला की ती रडायची. "मला घेऊन चला. माझ इकडे मन लागत नाही. अगदी नेहमी साठी नाही तर निदान दोन चार दिवस तरी येते." 

त्याचा ही पाय निघत नसे . पण तो घरच्यांना घाबरत होता. काहीही कारण सांगून तिला न्यायच टाळत होता. तिला सांगणार तरी कसं की आई नाही म्हणते. 

रमा तिकडे नवर्‍या कडे गेली तर घरी करेल कोण? मोठ कुटुंब होतं. सासुबाई त्यांच काम काढून घेत होत्या. 

रमा गप्प झाली होती. तिने तिच्या सुखी संसाराची किती स्वप्नं बघितली होती. घरात सासू सासरे तिला चालणार होते. पण नवरा सोबत हवा होता. तोच तिच्या वाट्याला येत नव्हता. तिला घरकामाच काही वाटत नव्हत.

रमाचा फोन वाजत होता. ती पटकन फोन घेवून किचन मधे गेली. तिच्या रूम मधे इतर वेळी नणंद रहात होती. तिच्या समोर मोकळ बोलता येत नव्हत. 

"झाल का जेवण." प्रशांतचा आवाज आला. 

"हो. तुमच?" तिने विचारल. त्याच्याशी बोलतांना ती खुश होती. 

" खाल्ल काहीतरी." त्याने सांगितल. 

"काय होत आज जेवायला? काय झालं? भाजी चांगली नव्हती का?" तिला काळजी वाटली. 

"घरच्या सारख जेवण कुठे मिळत. रोज त्याच भाज्या. पाण्या सारखी डाळ." त्याने सांगितल. 

"तुम्ही तब्येतीची काळजी घ्या ना. स्वतः करुन खा. नाहीतर मी म्हणते ना मला घेवून चला तिकडे." रमा म्हणाली.

🎭 Series Post

View all