तिची फरफट (सत्य कथा) भाग -३

तिची फरफट (सत्य कथा) - भाग -३
मागील भागात आपण पाहिले की दिव्याचे आई वडील सारिका आणि संकेत यांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे दिव्याच्या लग्नात अडथळे येत होते. दिवसेंदिवस दिव्याचे वय वाढतच होते. तिचा कोणताही दोष नसताना तिची फरफट होत होती. चला तर पुढे काय होते ते पाहूया.

तिची फरफट (सत्य कथा) - भाग - ३

जरी आपण म्हणत असतो की सध्या कुणी जातपात मानत नाही, भेदभाव करत नाही पण तरीही अजून बऱ्याच भागात अनेकजण असे आहेत की ते जातधर्म हा भेदभाव करतातच.

ज्या काळात म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीच्या काळात जातधर्म असा भेदभाव अतिशय जास्त प्रमाणात केला जायचा त्या काळात सर्व भेदभाव झुगारून सारिका आणि संकेत या दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्याकाळी त्यांना खुप विरोधही झाला होता पण तरीही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.

सारिका ही श्रीमंत घरातील उच्च जातीची मुलगी होती अन् संकेत हा गरीब घरातील हलक्या जातीचा मुलगा होता. पण प्रेम आंधळ असतं असंच काहीसं यांचं झालेलं. इतर कोणताही विचार न करता त्या दोघांनी त्या काळात स्वत:च्या मनाने रजिस्टर पद्धतीने कोर्टात लग्न केले. पुढे ते दोघेही आपल्या संसारात रमून गेले.

संकेत अन् सारिका दोघेही सुशिक्षित होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. कष्ट करून पोट भरल्याशिवाय पर्याय नव्हता. सारिका स्वभावाने अगदीच समंजस होती. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता येणाऱ्या प्रसंगाना तोंड देण्याची जिद्द तिच्यात होती. लग्नानंतर संकेत साखर कारखान्यात काम करू लागला, पण एकट्याच्या पगारात घरखर्च भागात नव्हता.

सारिकाला ते समजत होते त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला हातभर लावायचे ठरवले. पण ग्रामीण भाग शिवाय प्रगतशील भाग कमी प्रमाणात असल्यामुळे शेतात काम करण्याशिवाय सारिकाला दुसरे काम मिळणे शक्य नव्हते. आलेल्या परिस्थितीला स्वीकारुन सारिका पडेल ते काम करू लागली. काही दिवसातच त्यांनी छानसा संसार थाटला.

कालांतराने त्यांना एक मुलगा झाला आणि एक मुलगी झाली. मुलगा म्हणजे दिपक आणि मुलगी म्हणजे दिव्या. जिद्दीने दोघांनी मिळून मुलं लहानाची मोठी केली. दिपक कॉलेज करत करत जॉब सुद्धा करत होता. त्यानिमित्ताने तो शहरातच राहायला गेलेला. पण दिव्या ही आई वडिलांसोबत राहत होती. आता तिचे लग्न ठरवायचे चालू होते. आई वडिलांनी आंतरजातीय लग्न केल्यामुळे दिव्याला वारंवार नकार पचवावा लागत होता. वडील एका जातीचे आई दुसऱ्या जातीची, यांचे खानदान चांगले नाही अशा अनेक टीका करून लोक लग्नाला नकार देत होते.

खरं तर लग्नासाठी मुलगी कशी आहे, तिचा स्वभाव, तिची वागणूक, ती सासरी सर्वांना कितपत समजून घेईल, घर कसे सांभाळेल, संसार कसा करेल हे न पाहता आधी खानदान पाहिले जाते. जणू काही त्यांचा मुलगाच मुलीकडे येऊन नांदणार असतो. अजूनही काही ठिकाणी प्रतिष्ठेसाठी मुलीचे गुण पाहण्यापेक्षा इतर गोष्टीना प्राधान्य दिले जाते त्यामुळे मुलगी कशी आहे याकडे आपसूकच दुर्लक्ष होते.

या गोष्टींमुळे दिव्याने ठरवले की इतरांकडून समजण्यापेक्षा जो कुणी पाहायला येणार आहे त्याला आपण स्वतःच सगळं सांगायचं. ज्याला माझा स्वभाव पटेल तो माझ्याशी लग्न करेल अन्यथा अविवाहित राहिले तरी चालेल.

लहानपणापासून परिस्थितीशी जुळवून घेताना तिच्या मनाची कुचंबना होत होतीच पण आताही तिच्या मनाची फरफट चालू होती. तेसुद्धा तिची काहीही चूक नसताना. ती मनातल्या मनात झुरत होती.
—----
दिव्याची फरफट थांबून ती या परिस्थितीतून बाहेर पडेल का? ते पाहूया पुढील भागात.
—-----

©®सौ. वनिता गणेश शिंदे

🎭 Series Post

View all