तिची फरफट (सत्य कथा) भाग -१

तिची फरफट (सत्य कथा) भाग -१
तिची फरफट (सत्य कथा)- भाग १

दिव्याचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. लहानपणापासून तिला जबाबदारीची जाणिव होती. ती स्वभावाने अगदी समंज्यस होती. परिस्थितीशी तडजोड करणे हे तिला अवगत होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे आई वडिलांना हातभार लावावा म्हणून ती जॉब शोधू लागली. खेड्यात राहत असल्यामुळे तिला मनासारखा जॉब मिळणे कठीण होते.

ग्रामीण भागात कितीही शिकलं तरी जास्त पगाराची नोकरी मिळतच नसते त्यामुळे मग कमी पैशात तडजोड करावी लागते. घर सोडून शहरात जॉबसाठी जायचे म्हटले तर ओळखीचे असे कोणीच नसते आणि त्यात ही दिव्या लहानपणापासून ग्रामीण भागात वाढलेली. शहरातील वातावरणात मिसळून जाणे तिला अवघड वाटायचे.

पण तरीही एक दिवस ती आपल्या आईला सारिकाला म्हणाली, “ए आई ऐक ना!, अगं मी पुण्याला जावू का गं जॉबसाठी?”

सारिका म्हणाली, “अगं दिव्या, एक तर तू गाव सोडून कधी कुठे गेली नाहीस, शिवाय इथे पाहतेस ना तुझ्या आजीची काय अवस्था आहे ते. तरीही तू बघ बाई, मी काय सांगणार तुला, तुला योग्य वाटेल तो निर्णय घे; माझे कोणतेही बंधन नाही.” आम्ही तुला निर्णय स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे तूच ठराव काय ते.”

आईच्या बोलण्यावर दिव्या काही बोलू शकली नाही, कारण घरात अंथरुणाला खिळून असलेली तिची आजी वयस्कर होती अन् शेवटचे दिवस ढकलत होती. दिव्याचा आजीवर खूप जीव होता त्यामुळे शेवटच्या क्षणाला आजीची साथ सोडायची नाही असा विचार करून ती जॉबसाठी मोठ्या शहरात गेली नाही. दिव्याची आई सारिका ही स्वत:चं अशक्त आणि कमजोर असल्यामुळे ती एकटी सासूची सेवा करू शकत नव्हती. या कारणाने दिव्यालाच आईची मदत करावी लागत असे या कारणांमुळे ती गाव सोडून किंवा घर सोडून कुठेही गेली नाही.

पण इतके शिक्षण घेवून रिकामे कसे बसायचे म्हणून दिव्या एके ठिकाणी अवघ्या चार पाच हजार रुपयात जॉब करू लागली. तिला मनातून वाईट वाटायचे पण घर सोडून जायचे कसे? ‘आईला किंवा आजीला अशा अवस्थेत सोडून देणे म्हणजे स्वार्थी विचार करण्यासारखे झाले’ असे दिव्याला वाटतं होते.

दिवस पुढे सरकत होते तीन चार वर्षे झाली अन् एक दिवस अचानक दिव्याची आजी हे जग सोडून निघून गेली. दिव्याला आपली लाडकी आजी गेल्याचे खुप दुःख झाले पण आई वडिलांनी तिला सावरले. दिवस जातील तसे हळूहळू दुःख कमी होऊ लागले. दिव्याचे शिक्षण पूर्ण झालेले शिवाय तिचे लग्नाचे वयसुद्धा निघून चालले होते. गावाकडे मुलींचे लग्न लवकरच करण्याची पध्दत असते.सारिकाच्या मनात दिव्याच्या भविष्याची चिंता सतावत होती. लवकरात लवकर तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. या विचाराने सारिका अस्वस्थ होऊ लागली.
—---------------

दिव्याच्या लग्न ठरेल का. त्यासाठी तिला कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल ते पाहूया पुढील भागात.


क्रमशः

—---------

©®सौ. वनिता गणेश शिंदे




🎭 Series Post

View all