तिची फरफट (सत्य कथा) भाग -२

तिची फरफट (सत्य कथा) भाग -२
मागील भागात आपण पाहिले की दिव्या उच्च शिक्षित असूनसुद्धा तिला थोडक्या पैशात नोकरी करावी लागत होती. कारण ती ग्रामीण भागात राहत होती. घरगुती कारणामुळे ती शहरात नोकरी करायला जावू शकत नव्हती. आता तिचे लग्न ठरवायचे चालू होते.

तिची फरफट सत्य कथा)- भाग -२

मुलीच्या काळजीपोटी सारिका नवऱ्याला म्हणजे संकेतला म्हणाली, “अहो जरा ऐकता का?, मी काय म्हणते; दिव्याचे आता शिक्षण पूर्ण झालेय मग तिच्यासाठी मुलगा पाहायला हवा ना, तिच्या लग्नासाठी काहीतरी हालचाल करायला हवी दिवसेंदिवस तिचे वय वाढत चालले आहे ना!”

संकेतच्या मनातही सध्या तेच विचार चालू होते त्यामुळे तो सारिकाला म्हणाला, अगं हो गं! तू म्हणतेस ते बरोबर आहे; दिव्याच्या लग्नाचं बघायला हवंय, मी शोधतो स्थळ तिच्यासाठी. तू काही काळजी नको करु, मी आहे ना!”

“पण लग्न करायचं म्हणजे काही खायचं काम असतं का? हवं तसं स्थळ मिळायला प्रयत्न तरी करावा लागेल आपल्याला. शिवाय सगळी चौकशी करूनच लग्न ठरवावं लागेल. पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे.” मुलीच्या भविष्याचा विचार करून सारिका संकेतशी बोलत होती.

हो गं, नोकरी मनासारखी नसेल तर एक सोडून दुसरी करता येते पण लग्न एकदा झाले की परत करणे म्हणजे काही खेळ नसतो. त्यामुळे सगळं कसं निरखूनच बघावं लागेल.” मुलीच्या लग्नाच्या विषयानेच संकेतचे मन कासाविस झालेले. सारिकासोबत बोलताना एकेक शब्द अगदी त्याचे काळीज पिळवटून टाकत होता पण ‘कधीतरी मुलीला सासरी पाठवावे लागते ही जगाची रितच असते ना.’

संकेतने दिव्यासाठी मुले पाहायला सुरू केले. सारिकाही आपल्या ओळखीच्या लोकांना मुलीसाठी स्थळ सुचवायला सांगत होती. हळूहळू दिव्यासाठी मुलं पाहायला येऊ लागली. पण तिच्या लग्नाचा योग काही जुळत नव्हता.

एक दिवस एक मुलगा तिला पाहायला आला. मुलाच्या घरचे सर्व सुशिक्षित होते. दिव्याला पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यांना मुलगी आवडली. दुसऱ्या दिवशी मुलाकडच्या लोकांनी फोन केला आणि म्हणाले, “आम्हाला मुलगी पसंद आहे. आपण पुढच्या आठवड्यात टिळा उरकून घेवूया.

दुसरा आठवडा संपत आला पण नंतर त्यांचा काही फोन आलाच नाही. शेवटी न राहून संकेतने मध्यास्थ्याला विचारले, “काय ओ तात्या, काय झाले, पाहुणे येणार होते टिळा करायला मग का बरं आले नाहीत?”

तेव्हा थोडे बिचकतच तात्या म्हणाले, “आता कसं सांगू तुम्हाला, त्यांना मुलगी आवडली होती पण कुणाकडून तरी समजले की आई वडिल एका जातीचे नाहीत. म्हणून त्यांनी नकार दिलाय. संकेत अन् सारिकाला खूप वाईट वाटले.

दिव्याची जवळजवळ तिशी गाठत आली इतर किरकोळ कारणे असायची पण महत्वाचे सांगायचे झाले तर दिव्याच्या लग्नात एक सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे तिच्या आई वडिलांनी म्हणजे सारिका अन् संकेतने आंतरजातीय विवाह केला होता. त्याचेच परिणाम आता दिव्याच्या भविष्यावर पडू लागले होते.
—---

आता दिव्याच्या लग्नाचे काय होईल. तिचे लग्न जुळेल की नाही ते पाहूया पुढील भागात.

—-------

क्रमशः

©® सौ. वनिता गणेश शिंदे


🎭 Series Post

View all