तिची फरफट (सत्य कथा) - भाग - ४(अंतिम भाग)

तिची फरफट (सत्य कथा)- भाग ४(अंतिम भाग)
मागील भागात आपण पाहिले की शेजापाजारीच काहीही सांगून दिव्याचे लग्न मोडत होते. त्यामुळे आता तिने ठरवले की आपण स्वतःच साऱ्य वास्तविकता येणाऱ्या मुलांसमोर मांडायची. ज्याला पटेल तो आपल्याला स्वीकरेल त्यामुळे किमान नकराचे दुःख तरी पचवावे लागणार नाही. चला तर मग छता पुढे काय होते ते पाहूया.


तिची फरफट (सत्य कथा)- भाग - ४ (अंतिम भाग)


अजूनसुद्धा बहुदा समाज पुढारलेल्या गप्पा मारतो पण जेव्हा कृती करायची वेळ येते तेव्हा मात्र कितीही सुशिक्षित असले तरीही माणूस आपली वैचारिक पातळी दाखवतोच, हे सत्य बदलता येत नाही. या खेळात दिव्यासारख्या लोकांची फरफट होत असते. स्वभावाने कितीही चांगले राहिले तरी लोक माघारी चर्चा करून निंदा करतच राहतात.

दिव्याचे वय तीस वर्षे होऊन गेले पण लग्न काही जुळत नव्हते. आता तर शेजापाजारी तिला हसत हसत टोमणे मारत तोंडावर म्हणायचे, “ काय गं दिव्या, आम्हाला लाडू खायला घालतेस की नाही.”

दिव्यापण हसून म्हणायची, “हो तर, घालायचे आहेतच की, मी काही तशीच नाही जाणार कुठे.”

लोकांच्या टोमण्यामुळे ती बिचारी मनातून खुप खचून जायची. पण तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा कुणी विचार करत नसे. जास्तीत जास्त पंचवीस सव्वीस वय झाले की लग्न होऊन मुलगी सासरी गेलीच पाहिजे असा अट्टाहास ग्रामीण भागात जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे गावातील लोकं आपसात कुजबुज करत म्हणायची, “आता काय हीचं लगीन होतंय, तिशी वलांडली की तिनं. कोण करायचं हीच्याशी लगीन. अशीच राहील बिन लग्नाची.”

आई वडिलांना आपली मुलगी जस झालेली नसते पण समाज काही सुखाने जावू देत नसतो.

दिव्याला कोण काय बोलते ते समजायचे. लोकांचे टोमणे ऐकताना तिच्या मनाची जी फरफट होत होती ती असह्य होती पण तरीही ती सगळं हसण्यावारी घेवून आपले जीवन जगत होती. मनातील दुःखाचा चेहऱ्यावर कधी लवलेश दिसू देत नसे.

दिव्याच्या सुदैवाने म्हणा किंवा तिचे पुण्यकर्म म्हणा पण एक दिवस एक मुलगा तिला भेटला. त्याचे नाव आकाश होते. तो तिच्याशी सोशल मीडियाच्या फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आला होता. त्यांची छान मैत्रीही झाली. काही दिवसांनी तो दिव्याला प्रपोज करत म्हणाला, “ मला तू आवडतेस! माझ्याशी लग्न करशील का?”

दिव्या म्हणाली, “हे बघा, मी जे काही सांगते ते जर मान्य असेल तर माझ्या आई वडिलांची परवानगी घ्या, त्यांनी परवानगी दिली तर मग बघू लग्नाचे.”

दिव्याने सर्व परिस्थिती त्याच्यासमोर मांडली. पण त्याला काही हरकत नव्हती. आकाश म्हणाला, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तुझ्या आई वडिलांशी नाही. ते वेगवेगळ्या जातीचे आहेत यात तुझा काय दोष? अन् तसेही मी कसलेच भेदभाव मनात नाही. मला तुझा स्वभाव खुप आवडला आहे. त्यामुळे बाकीचे काही घेणे देणे नाही. मला फक्त समजूतदार बायको हवीय. तू तयार आहेस का सांग?”

सर्व गोष्टींसहित स्वीकार करणारा मुलगा का म्हणून नाकारेल दिव्या? तिलासुद्धा आकाशचा तो स्वभाव आवडला होता. तिलाही वाटू लागले की कुणीतरी चांगला विचार करणारे आहेत या जगात.

दिव्याच्या म्हणण्यानुसार आकाशने दिव्याच्या घरी जावून तिच्या आईवडिलांकडे तिचा हात मागितला. सारिका आणि संकेतने आकाशची माहिती काढली. तो आपल्या मुलीला सुखी ठेवू शकतो हे पटल्यावर त्यांनी रितीनुसार आकाश अन् दिव्याने लग्न लावून दिले.

शेवटी दिव्याच्या मनाची होणारी फरफट एकदाची थांबली होती. लोकांचे टोचून बोलणे आणि टोमणे मारणे या गोष्टी ज्यांना भोगाव्या लागतात त्यांचे दुःख शब्दात मांडता येणे सहज शक्य नसते. लग्न होत नाही या दुखापेक्षा लोक काहीही बोलत असतात ते ऐकून काळीज आतल्याआत तुटत असते. पण आता यापुढे ते दुःख दिव्याला भोगावे लागणार नाही म्हणून दिव्या खूप खुश होती. दिव्याला खुश पाहून संकेत आणि सारिकाचा आनंद गगनात मावत नव्हता.
—--------

समाप्त:

©® सौ. वनिता गणेश शिंदे



🎭 Series Post

View all