तिच्या आईला बोलवा भाग 1

तिच्या आईला बोलवा
तिच्या आईला बोलवा भाग 1

©️®️शिल्पा सुतार

विषय मुलीची आई

दोन दिवस झाले मीनाला ताप होता. प्रकाश तिच्याकडे लक्ष देवून होता. तो थोड उशिराने ऑफिसला गेला. पियु शाळेतून घरी आली. तिने आज आईला मदत केली. आठ वर्षाची पियु समजूतदार होती. गोळी घेवून मीना जरा वेळ झोपली.

"आई आजीचा फोन आहे."

मीना फोन वर बोलत होती. तिला भरून आल होत. आई मायेने चौकशी करत होती. "कस वाटतय मीना? डॉक्टर कडे जावून ये."

"हो आई, हे घरी येतांना औषध आणणार आहेत." थोड्या वेळ बोलून तिने फोन ठेवला.

"मीना चहा ठेव." नीलिमा ताई आवाज देत होत्या.

तिला कसकस जाणवत होती. अजिबात उठायची इच्छा नव्हती. ताप ही वाढला होता. ती कशीतरी उठली.

"आई काय होतय?" पियु तिच्याकडे बघत म्हणाली.

"काही नाही बेटा."

"आई तुला ताप आहे तू बस मी करू का?"

"नको."

मीनाने चहा ठेवला. ती आत येवून पडली. पियु नीलिमा ताई कडे गेली. "आजी आईला बर वाटत नाही. तू बघ चहा कडे."

"काय होतय खात पीत ते समजत नाही. नुसत आपल रोगाच घर. आज काय डोक दुखत, उद्या काय ताप येतो. चांगल आहे. ही तशीच, तिची पोरगी तशीच. चांगल खाऊ पिऊ घातल नाही का आईने? दिली तशीच सासरी पाठवून." नीलिमा ताई बडबड करत होत्या.

लग्न झाल तेव्हा माझी तब्येत किती छान होती. केस ही मोठे जाठ होते. तुमच करता करता हे हाल झाले. डीलेव्हरी नंतर कुठे माहेरी राहू दिल. अजिबात आराम झाला नाही. आता बर वाटल की डॉक्टर कडून छान टॉनिक लिहून घेणार आहे. या लोकांच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करायला हव. मीनाने कानावर हात ठेवले.

नीलिमा ताई अजूनही बोलत होत्या.

" लग्नाला दहा वर्ष झाले ना. किती वेळा माझ्या आईचा उद्धार करणार आहात. थोड गप्प बसा." नेहमी शांत असणारी मीना आज चिडली होती. एक तर इतक डोक दुखत ना. त्यात ही बडबड. माझी आई किती चांगली आणि शांत आहे . कश्याला तिला बोलतात ते समजत नाही.

"आता आम्ही बोलायच ही नाही का? इथे आम्हाला निस्तराव लागत." नीलिमा ताई चहा गाळून पुढे घेवून गेल्या.

प्रकाश ऑफिस मधून आला. नीलिमा ताई बाहेर बसून बाजूच्या बाईशी बोलत होत्या. तो आत गेला. मीना कॉटवर झोपलेली होती. पीयू तिच्या बाजूला बसुन अभ्यास करत होती.

" बर वाटत का मीना? "

" हो ठीक आहे. "

" हे घे तुझे औषध. तुला ताप आहे. एक काम करू आपण हॉस्पिटलमध्ये जावून येवू." तो फ्रेश होवुन आला. दोघ निघाले.

🎭 Series Post

View all