हिला सासरी पाठवा.. भाग २

नणंद भावजयीची अनोखी कथा
हिला सासरी पाठवा.. भाग २


"आई, प्रतिक बोलला का गं त्या अनुशी?" फोनवर रडत स्मिता विचारत होती.

"काल माझ्यासमोरच बोलत होता. पण ती ऐकते का कोणाचं? ती काही तुझ्यासारखी नाही गं.." कुंदाताई तिची समजूत काढत म्हणाल्या.

"माझंच नशीब खोटं गं.. लग्नानंतर ना सासर आपलं झालं ना माहेर आपलं राहिलं."

"मी तरी काय बोलू? आता घर तिचं, नवरा तिचा.. हुकूम तिचा." कुंदाताई सुस्कारा सोडत म्हणाल्या.

"कोणाशी एवढं गुलुगुलू बोलते आहेस.. " पाठून सासूबाईंचा आवाज येताच स्मिताने पटकन फोन ठेवला.

"तुला मगाशी चहा करायला सांगितला होता ना.. वाजले बघ किती?" चिडून नीताताई म्हणाल्या.

"चारच तर वाजले आहेत. तीन वाजता तर जेवणं झाली ना?" स्मिता कशीबशी म्हणाली.

"जास्तच उलटं बोलायला लागली आहेस? आणि यावेळी तुझ्या माहेरच्यांनी पण तुला ठेवून घेतले नाही वाटतं? गेलीस काय, आलीस काय?" कुत्सितपणे हसत त्या म्हणाल्या. त्यांचे बोलणे ऐकून स्मिताला अनु आठवली. सहा महिने होताच घरावर आपला हक्क दाखवणारी.. आणि ती? लग्नाला सहा वर्ष झाली तरी घाबरुन इथून पळ काढणारी.

"उभ्या उभ्या तंद्री लागली का तुझी? उठ आणि चहा ठेव. नाहीतर महेश आल्यावर सांगतेच त्याला." नीताताई म्हणाल्या.

"चहा हवाय तर उठा आणि हाताने घ्या. मी आता थोडा वेळ आराम करणार आहे." अनुला डोळ्यासमोर ठेवून स्मिता म्हणाली. स्मिताने केलेला अपमान बघून नीताताई मात्र चिडल्या. पण महेश आल्यावर तोच काय ते बघेल हिच्याकडे म्हणून गप्प बसल्या. पाच वाजताच नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला न लागता स्मिता स्वतःचं आवरून बाहेर जायला निघाली तेव्हा मात्र त्यांना गप्प बसवेना.

"अगं महेश यायची वेळ झाली ना? चाललीस कुठे? तो आल्यावर त्याला चहापाणी कोण देणार?"

"मी नसताना तुम्ही करायचात ना? मग आत्ताही करा. मी जरा खरेदी करुन येते." चप्पल घालत स्मिता घराबाहेर पडली सुद्धा. दुपारी अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला होता. तोच विचार अमलात आणायला ती बाहेर पडली होती.

"ही वेळ आहे का, घरी यायची?" महेशने रागात विचारले. त्याचा आवाज ऐकून दरवेळेस स्मिता जशी घाबरायची तशी आज घाबरली नाही हे बघून त्याला आश्चर्य वाटले.

"यावेळेस माहेरहून येताना जादूटोणा करुन आली आहेस का? घाबरत नाहीस? आईला उलटं बोलते आहेस. तुझं हे भूत ना उतरवतो थांब." महेश दातओठ खाऊन पुढे येत म्हणाला.

"खबरदार.. माझ्या अंगाला हात जरी लावलात तर." स्मिताचा आवाज ऐकून महेशही चरकला.

🎭 Series Post

View all