हिला सासरी पाठवा.. अंतिम भाग

नणंद भावजयीची अनोखी कथा
हिला सासरी पाठवा.. भाग ३


"माझ्या अंगावर ओरडतेस? तुझी ही हिंमत?" महेश रागाने लाल झाला होता.

"कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करू शकते मिस्टर महेश." दरवाजात उभ्या असलेल्या इन्स्पेक्टरला बघून महेश आणि नीताताईंच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले.

"पण मी काहीच केले नाही. विचारा ना हिला. स्मिता, तू सांग ना.." महेश स्मिताला विनंती करू लागला.

"त्यांनी सांगितलं म्हणूनच मी इथे आले. तुमचा शब्दनशब्द मी रेकॉर्ड केला आहे. खरंतर आत्तासुद्धा तुम्ही आरामात तुरूंगात जाऊ शकाल एवढा पुरावा आहे माझ्याकडे." इन्स्पेक्टर बोलत होत्या. "काय करताय मॅडम? जबानी देताय?"

"मॅम, हा पुरावा तुमच्याकडेच राहू देत. मी रात्रभर विचार करते आणि उद्या येते."

"तुमची इच्छा.. पण यांच्या केसाला जरी धक्का लागला ना.. तरी तुमच्या डोक्यावरचे सगळे केस जातील.. हे लक्षात ठेवा." दम देऊन इन्स्पेक्टर बाहेर पडल्या.
******

"फक्त आणि फक्त हिच्यामुळेच माझी मुलगी मला दुरावली. दोन दिवस झाले तरी फोन आला नाही तिचा." कुंदाताई चिडून बोलत होत्या. अनु ठोंब्यासारखी त्यांचं ऐकत होती.

"फोन कशाला करायला हवा? इथे मी अख्खीच्या अख्खी आले असताना." स्मिताचा आवाज ऐकताच कुंदाताई आनंदल्या. स्मिता मात्र कुंदाताईंकडे न जाता अनुकडे गेली.

"तुझे कसे उपकार मानू.. हेच समजत नाहीये."

"तिचे कसले उपकार? तुला इथे यायला नाही म्हणायचे." कुंदाताई रागाने म्हणाल्या.

"हो.. ती तसं बोलली म्हणून तर मला समजलं. प्रत्येक वेळेस तिथून पळून जाण्यापेक्षा त्यांच्याशी दोन हात केलेले चांगले. आणि तुझ्या मैत्रिणीला पण खूप खूप थँक यू सांग. तिच्यामुळे सुतासारखे सरळ आले आहेत दोघेही. बरं मी निघते आता. नाहीतर दोघेही सुटकेचा निश्वास सोडतील." स्मिता हसत आली तशी गेली सुद्धा.

"हे नक्की काय होतं, सांगशील का? ताई तुला थँक यू बोलून का गेली?" गोंधळलेल्या प्रतिकने विचारले.

"ते मी भाऊजींना आणि त्यांच्या आईला डोस दिले ना म्हणून." अनु हसत म्हणाली.

"म्हणजे?"

"ते मला समजलं, की बाळ होत नाही त्यांचा सासरी छळ होतो आहे. त्यातून त्यांचा सतत पड खाण्याचा स्वभाव. मग ते दोघे मायलेक त्याचा फायदा उचलतात. ताईंना घटस्फोट घ्यायला लावून दुसरं लग्न करायचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच ते त्यांना त्रास देत होते."

"पण मग हे आम्हाला का नाही समजले?"

"तुम्ही कधी चौकशी केली? मुलगी घरी आली की तिची समजूत काढायची. दोनचार दिवसांनी परत तिला सासरी पाठवायचे. पण तिची अडचण ना समजून घ्यायची ना सोडवायची." अनुने तिचा मुद्दा मांडताच कुंदाताई गप्प झाल्या.

"पण त्यांनी तिचे बरेवाईट केले तर?" प्रतिकने काळजीने विचारले.

"तेवढे धीट नाही ते. आणि आता ताईंना तिथे रहायचे आहे. त्यांना जर वाटलं तर हे घर त्यांचंच आहे. पण त्यांनी तिकडचा हक्क का सोडायचा?" अनुचे बोलणे ऐकून प्रतिक सुखावला.

"हुशार गं माझी बायको.." अनुला तो लाडाने मिठीत घेणार तोच त्याला कुंदाताई दिसल्या.

"खरंच रे. किती हुशार आहे ही.. आणि मी मूर्ख हिलाच दुष्ट समजत होते." कुंदाताई अनुची अलाबला घेत म्हणाल्या. "देवाजवळ साखर ठेवून आले मी."

"पण अजून एक.. तू हे सगळं मला का नाही बोललीस? उगाच मला पण फुकटचं टेन्शन." प्रतिक कपाळावर आठ्या आणत म्हणाला.

"कारण काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात." त्याला टपली मारत अनु म्हणाली.

"हो का.. आता यापुढे घेईन बरं.." अनुला मिठीत घेत प्रतिक म्हणाला.


एखाद्या गोष्टीकडे बघायचे दोन दृष्टिकोन असतात.. नवरा बायकोचे भांडण झाले की एकतर तू माहेरीच येऊन रहा किंवा येऊच नकोस असे दोनच पर्याय वापरले जातात. पण त्यापलीकडेही काही करता येऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न करणारी ही कथा. याचा वापर व्हिडिओ करण्यासाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all