वेध: अंतरीच्या रामाचा

राम: एक महामानव

“मंगल भवन, अमंगल हारी
द्रबहु सु दसरथ, अजिर बिहारी
आ, राम भगत हित नर्तन धारी
सहे संकट किये साधो सुखारी
सिया राम जय-जय
(राम सिया राम, सिया राम जय-जय राम)”

रवींद्र जैन यांच्या या रामगीताच्या गाजलेल्या ओळी आज प्रत्येकाची राम आराधना जागृत करत आहेत.औचित्य आहे रामनवमी या ऐतिहासिक दिवसाचे.आज प्रत्येक राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची खास आराधना आपण करणार आहोत.
ईश्वराच्या अस्तित्वाची,जाणिवेची जणू काही याद्वारे आपण सारेजण कृतज्ञता व्यक्त करतोय,नाही का?

परंतु केवळ पूजाअर्चा,आराधना करून मानवी जीवन सफल होऊ शकते का किंवा झाले आहे का? याविषयी विचारमंथन केले असता,आपल्या सर्वांमधील रामाचा कधी आपण शोध घेतला आहे का? असा प्रश्न भेडसावतो व रामाच्या ठायी असलेल्या कलागुणांचा विचार करण्यास आपण प्रवृत्त्त होतो.

रामाला मर्यादापुरुषोत्तम असे म्हंटले जाते.’ प्राण जाये पर वचन ना जाये ‘ या उक्तीनुसार रामाने आपली कर्तव्यनिष्ठा चोख निभावली.नात्यांबद्दलचा आदर,समर्पण,बांधिलकी यासाठी भगवान राम वनवासाला गेले. त्यांचे हे गुण पाहून त्यांचे बंधू लक्ष्मण आणि भार्या सीता देखील त्यांच्यासोबत वनवासाला निघाले. रामाची गुणसंपदा इतकी थोर होती की वनवासात त्यांना त्यांचे अनेक निस्सीम भक्त भेटले.त्यात सर्वोत्तम बोरे चाखून रामाला भरवणारी शबरी होती, सीतेला पळवून नेणाऱ्या रावणाच्या पाऊलखुणा दाखवणारा जटायू होता,रामाला आपल्या तुटपुंज्या पण ताकदवर वानरसेनेने मदत करणारे महाराज सुग्रीव होते आणि रामाचे परमभक्त श्री हनुमान देखील होते.आजकाल मनुष्याला आपण जर त्याच्या कुठल्याही कमिटमेंटबद्दल (म्हणजे नात्यांची,कामाबद्दलची किंवा एखाद्या तडजोडीची) विचारले तर आपल्याला असे निदर्शनास येते की ही पिढी त्या वेळच्या तरुण रामापुढे जराशी कनिष्ठ किंवा दुय्यम जाणवते.म्हणजे कुठेतरी काहीतरी कमतरता जाणवते.ती कशी ?

आता बघा मर्यादापुरुषोत्तम या एकाच शब्दात अनेक ताकदीच्या गुणांचा अंतर्भाव आहे.ज्यात जिद्द आहे,सातत्य आहे,ध्येय आहे,परिश्रम आहे, वचनबद्धता आणि चिकाटी देखील आहे. या सर्व गुणांचा स्वतः मध्ये अंतर्भाव करून राम नावाचे अजब रसायन इतिहासापासून तर आतापर्यंत ,लोकांच्या हृदयात अजरामर झाले.मग यावरून मानवतेचे उत्तम उदाहरण म्हणून श्रीराम इतके थोर का ठरले हे नक्कीच समजते,हो ना?

मग आपल्या सर्वांच्या ठायी हे गुण आपण आत्मसात केले तर रामासारखी महानता काही अंशी आपल्यात निवास करू शकते,ज्याद्वारे आपण सकल मानव जातीचा विकास साधू शकतो. आता आपल्यापैकी बरेच जण रामरक्षा स्तोत्रपठण करतात.या श्लोकांच्या नित्य पठणाने आपण सकारात्मक तसेच शक्तिशाली बनतो असे सांगितले जाते.खरं सांगू का?यातील ताकद मी स्वतः अनुभवली आहे.खुद्द भगवान राम माझ्या पाठीशी कठीण काळात उभे असल्याचा हा अनुभव मला नेहमीच पराकोटीचे बळ देतो आणि माझी अडचण पेलण्यास मी समर्थ बनते.मग असे आहे काय या रामरक्षेमध्ये? रामाची स्तुती तसेच प्रार्थना करणारे हे स्तोत्र भगवान राम मानवाच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करो असे विवेचन किंवा प्रार्थना रामापुढे मांडते.

मानवी विकासाची गाथा भगवान श्रीराम यांनी आजतागायत आपल्या या स्तोत्राद्वारे समर्थपणे पेलली.मग आपणही रामाच्या सगळ्या नाही तर काही गुणांचा हळूहळू अवलंब केला तर स्वविकास तर साध्य होईलच पण इतरांचाही उद्धार होईल असे मला वाटते.
कठीण काळात खंबीरपणे उभे राहणे,निडर होणे,संयम बाळगणे या साऱ्या गोष्टी स्वतःमध्ये रुजवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रामाची आराधना, रामाबद्दलच्या ज्ञानाचे संकलन आणि वाटप.एकदा का या गोष्टींचे समालोचन जमले की आपल्या ठायी असणाऱ्या,आपल्या अंतरीच्या रामाचा आपण यथार्थ बोध घेऊन,वेध घेवून भगवान रामासारखी अढळ क्रांती नक्कीच घडवू शकतो.

अंततः एवढेच म्हणावेसे वाटते,

“कलियुगात करते मी
वेध अंतरीच्या रामाचा,
व्हावा साक्षात्कार मजसवे
सकल जणांच्या विकासाचा..”

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे