शापित अप्सरा भाग 57

काय असेल ह्या सगळ्याचा शेवट?

शापित अप्सरा भाग 57


मागील भागात आपण पाहिले सुपर्णा वेणी मिळवते. केशर अंतिम चित्र घ्यायला जाते. इरावती एक स्वप्न पाहते ज्यात तिला मार्ग सापडतो. डॉक्टर पद्मनाभ परत यायला निघतात. आता पाहूया पुढे.


नयना इराला खाली बोलवायला आली होती. इरावती तिच्यासोबत आली. सगळेजण तिची वाट बघत होते. आश्लेषा आता सावरली होती. देवळात सात वाजता आरतीसाठी जायचे होते.


आश्लेषा एकदम म्हणाली,"सुभानरावांचे नंतर काय झाले? त्यांना समजले असेल का सुगंधाला कोणी मारले?"


" याचे उत्तर त्या पुढील फाटलेल्या पानात असणार आहे. कुठे असतील ती पाने?" श्रेयस म्हणाला.


" सुभानरावांनी हा वाडा बांधला. ह्याच महालात असणार ." इरावती म्हणाली.


" आधी आपण देवीचे दर्शन घेऊ. मग पुढचा विचार करू." शालिनीताई म्हणाल्या.


सगळेजण देवळात जायला निघाले. राघव स्वतः च्या अंगावर असलेले चिन्ह का असतील याचा विचार करत होता. कारण ह्या चिन्हाचा काय संबंध असेल ह्या सगळ्याशी? याचा अजूनही काहीच संदर्भ लागत नव्हता. सगळेजण देवळात पोहोचले.



देवळात आरती चालू असताना राघव अस्वस्थ होता. सुगंधाने देवळाच्या कळसावर काय कोरले होते? तीच ही चिन्हे असतील का? असा विचार करत असताना त्याची नजर देवीच्या मूर्तीवर स्थिरावली. देवीच्या उजव्या हातात कोरलेल्या फुलावर ती सगळी चिन्हे होती.


ती बंद कमळाची कळी राघव नीट पहात होता. तेवढ्यात आरती संपली आणि सगळेजण पुन्हा वाड्यात आले. शालिनीताई देवळातून आणलेली ओटी देवघरात ठेवायला निघाल्या तेव्हा इरा त्यांच्या सोबत आली.


" आई , हे देवघर इथे वाडा बांधला तेव्हापासून आहे का ?" इरा अचानक बोलून गेली.


" हो, देवघर खास बनवले आहे असे आजी सांगत असे. " शालिनीताईंनी उत्तर दिले.


इरावती देवघर बारकाईने पाहू लागली. सगळीकडे दिव्य मंत्र कोरलेले होते. त्यातील काही तिला वाचता येत होते. तिने पाच फूट उंच देवाघराचा कळस पाहिला. त्यावर एक मासा कोरला होता. त्याचा डोळा पोकळ होता.


" आई एक मिनिट थांब. मी लगेच परत येते." इरावती धावत आपल्या खोलीत गेली.


तिच्या बॅगेतून तिने आजीने दिलेली ती वस्तू बाहेर काढली. एक डोळा कोरलेली गोटी आजीने आपल्याला दिली होती. इरावती ती गोटी नेहमी आपल्या पर्समध्ये ठेवायची. इरावती ती घेऊन धावत परत आली. तिने पटकन ती गोटी पोकळ जागेवर लावली. मासा दोन भागात उघडला आणि आतून एक कागदाचे पुडके बाहेर पडले.



इरावती आणि शालिनीताई बाहेर आल्या आणि अचानक बाहेरून गुरगुरण्याचा आवाज ऐकू यायला लागला. शालिनीताई खूप घाबरल्या होत्या. वाड्याच्या चारही बाजूंना कोणीतरी असल्याची जाणीव त्यांना होत होती. बाहेर पाहिल्यावर मात्र कोणी दिसत नव्हते अंधारात. अचानक वरच्या माडीवर कोणीतरी चालत असल्याचे इराला जाणवले.



आश्लेषाची खोली तिकडेच होती. इरावती वेगाने धावत वर पोहोचली. तिला पळत जाताना बघून करुणा,धैर्यशील आणि अभिजीत तिच्यामागे आलेच. आतमध्ये कोणीतरी होते. इराने खोलीचा दरवाजा जोरात ढकलला. तोपर्यंत त्या माणसाने आशुला खांद्यावर उचलले होते. इराने खोलीत शोभेची अडकवलेली तलवार उचलली.



" खबरदार एक पाऊल पुढे टाकले तर?" इरावती गरजली.


तो थंडपणे मागे वळला. त्याचे बाहेर आलेले सुळे बघून सगळेच दोन पावले मागे फिरले. तो आशुला घेऊन मागच्या खिडकीत गेला आणि त्याने खाली झेप घेतली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर तो आशुला घेऊन गायब झाला होता.



इरावती आणि सगळे मागे फिरले तर त्यांच्या मागे अजून चारजण उभे होते.


" ही मुलगी जिवंत हवी असेल तर आमच्यासोबत चल." त्यातील एकाने इराला धमकावले.


" नाही,इरा कुठेही जाणार नाही." धैर्यशील पुढे झाला.


" दादा,मला काहीही होणार नाही. मी येते तुमच्यासोबत फक्त आशुला काही करू नका."
इरावती शांतपणे त्यांच्यासोबत चालली होती.



समोर उभ्या असलेल्या राघव आणि सारिका दोघांनाही तिने स्वतः चा जीव धोक्यात घालू नका असे सांगितले. ते चारही जण इराला घेऊन अंधारात गायब झाले.


" शकुंतला, शकुंतला कुठेय? ती आपल्याला मदत करेल." सौदामिनी ओरडली.


" शकुंतला आम्ही आल्यापासून ध्यानात आहे. तिला आजूबाजूला काय घडत आहे कसलीच जाणीव नाही."

सारिकाने उत्तर दिले. सगळेजण सुन्न बसून होते.



केशर तुकाई देवीच्या मंदिरात आली. अंधार पडायला लागला होता. ती गुप्त रूपात मंदिरात ध्यानाला बसली. सर्वत्र अंधार झाला. पुजारी दरवाजे बंद करून निघून गेले. केशर ध्यानातून बाहेर आली. आता ती मंदिराच्या दक्षिणेला निघाली. थोड्या अंतरावर गेल्यावर तिथल्या एका दगडावर चंद्राचा प्रकाश पडला आणि तो दगड चमकू लागला. तिथे असलेल्या चिन्हावर हात ठेवताच दुसरे चित्र सापडले आणि त्याबरोबर केशर सूक्ष्म देह धारण करून साजगावच्या दिशेने निघाली.




शालिनीताई आक्रोश करत होत्या. करुणा आणि धैर्यशील स्तब्ध उभे होते. पुढे काय करायचे काहीच सुचत नव्हते. अचानक एक प्रकाशाची तिरीप आली आणि पाठोपाठ केशर प्रकट झाली. तिला पाहून सगळे घाबरून मागे सरले.

" घाबरु नका. मी केशर आहे."

" केशर? म्हणजे सुगंधाची मैत्रीण?" श्रेयस अधीर होऊन म्हणाला.


"हो,सुगंधा कुठेय?"
असे विचारून अचानक केशर थांबली.


" सामान्य जीवन जगायचा निर्णय घेतला होता तिने."
ती स्वतःशीच बोलली.


" म्हणजे तुम्ही गेल्यावर इथे काय झाले तुम्हाला काहीच माहीत नाही का?"
सौदामिनी म्हणाली.


" नाही,काय झाले सुगंधाला? "
तिने विचारले.


त्याबरोबर श्रेयसने थोडक्यात सगळी हकीकत सांगितली. बाहेर गुरगुर आवाज येतच होता . आपल्या सखीची झालेली दुर्दशा आणि तिचा आत्मा गेले कित्येक दशके अतृप्त असल्याचे पाहून केशरच्या डोळ्यातून धारा वहात होत्या.


" केशर,माझ्या मुलीला वाचव." शालिनीताई म्हणाल्या.


तोपर्यंत वाड्याच्या बाहेर मानव लांडगे फिरत असल्याचे तिच्या लक्षात आले होते. केशरने आपली शक्ती वापरून त्यांना कोठे नेले असेल ते पाहायचा प्रयत्न केला परंतु एका ठराविक ठिकाणी पोहोचल्यावर पुढे सगळा काळोख दिसू लागला. काहीतरी गूढ शक्ती तिला थांबवत होती.


" मी त्यांना शोधू शकत नाही. परंतु सुगंधाशी संपर्क करायचा प्रयत्न मी करते."
केशर म्हणाली.


" केशर,अशी चूक करू नकोस. सुगंधा आता एक अतृप्त आत्मा आहे. तिच्या संपर्कात योगिनी आली तर तिचे शरीर ताब्यात घेऊन ती सुड घ्यायचा प्रयत्न करेल."
शकुंतला मागून म्हणाली.


" मग आता आपण काहीच करू शकणार नाही का?"
हताश होऊन सौदामिनी म्हणाली.


" माझ्या अंगावर काही चिन्हे आहेत. त्यांचा अर्थ तुम्हाला कळेल का?"
राघव म्हणाला.


" मी प्रयत्न करते."
केशरने उत्तर दिले. दोघेही आत खोलीत गेले.



एका अंधाऱ्या खोलीत मशालीच्या अंधुक प्रकाश येत होता. सरावाने इरावतीला आसपास दिसू लागले. आश्लेषा आणि इरावती एकमेकींना बघून प्रचंड आनंदी झाल्या.


" आत्या आपण कुठे आहोत? हे लोक आपल्याला काही करतील का?"
आशु घाबरून विचारत होती.


तेवढ्यात दरवाजा उघडुन एक युवक आत आला. त्याने दोघींकडे बघितले.

" पळून जायचा विचार केलात तर मराल. आता सध्या तरी तुम्हाला इथेच ठेवायचे आहे."
दरवाजा बंद करून तो निघून गेला.



राघवने आपल्या अंगावरील सर्व वस्त्रे उतरवली. त्याच्या अंगावर असलेली सातही चिन्हे बघतच केशर ती वाचू लागली आणि त्याबरोबर राघवच्या शक्ती जागृत होऊ लागल्या आणि एकेक चिन्ह त्याच्या अंगात गायब होऊ लागले. संपूर्ण चिन्हे गायब झाल्यावर केशर थांबली.


" राघव,काळया शक्तिविरुद्ध लढणारे काही योद्धे आहेत. तू त्यांच्यापैकी आहेस. तुला आता चेटकीण,मानव लांडगे,मानव रक्त पिशाच्च यांना मारायच्या, रोखायच्या शक्ती मिळाल्या आहेत." केशर शांतपणे म्हणाली.


" अशीच आणखी सात चिन्हे मंदिराच्या कळसावर आहेत परंतु त्यांच्यात थोडा बदल आहे. ती कशी काय?"
राघवने विचारले.


" त्यासाठी आपल्याला मंदिरात जावे लागेल. तसेच त्या मूर्तीत एक रहस्य सुगंधाने ठेवले आहे."
राघव आणि केशर बाहेर आले.


आताचा राघव वेगळाच दिसत होता. राघव आणि केशर देवळात जायला निघाले.
अचानक केशर म्हणाली ,"ह्या दोघांनाही सोबत घे."
सारिका आणि श्रेयस दोघेही सोबत निघाले.


" आत्या तुझ्या हातात हे काय आहे?"
आश्लेषा म्हणाली.

त्याबरोबर देवघरात सापडलेले कागद आपल्याकडे असल्याचे इरावतीच्या लक्षात आले. तिने मशाल जवळ धरली आणि कागद उघडले.


सगुणाबाईंनी लिहिले होते.
सुगंधाचा प्रवास संपला असे मला वाटले होते. सुभानराव आणि सगळ्यांची पक्की खात्री पटली की कमळाने सुगंधाला मारले. महालाचे बरेच नुकसान झाल्याने आम्ही सगळेजण काही महिने इथून दूर राहायला गेलो. तिथेच आमच्यातील संबंध पुन्हा वाढले आणि इनामदार घराण्याचा अंश माझ्या पोटात वाढू लागला.



महाल दुरुस्त झाला होता. आता लवकरच महालात परत जायचे होते. सगळे कसे छान चालू होते. सुगंधा संपली होती. मी हे युद्ध जिंकले ह्याच आनंदात आम्ही पुन्हा महालात आलो. त्या रात्री आम्ही सगळे झोपलो होतो.


अचानक माझ्या अंगाची आग होऊ लागली. जणू सगळे अंग पेटले आहे. मी घाबरून डोळे उघडले तर समोर तिचा बेसूर चेहरा आला. मी मोठ्याने ओरडले. सुभानराव घाबरून काय झाले असे विचारत होते.


ती मोठ्याने हसून म्हणत होती," सांग त्यांना तुला सुगंधा दिसली."

मी कसेबसे स्वतः ला सावरले. दुसऱ्या दिवशी सासूबाईंना सगळे सांगायचे ठरवून मी रात्रभर जागीच होते.


केशर आणि राघव मंदिरातील रहस्य शोधतील का?

सुगंधाचा आत्मा सगुणाबाई कैद करू शकतील?

सुपर्णा पुढे काय करेल?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर .

🎭 Series Post

View all