वधू संहिता भाग 17 #मराठीकादंबरी

A romantic & adventurous love story of a young bride & her groom to be. Thank you

वधू संहिता भाग 17

सकाळी योगा वर्गात ताप सर्दी वाटतेय अशी सबब सांगून  अंजली, मेघा आणि जया गेल्याच नाहीत. नंतरच्या वर्गात त्यांनी डुलक्याच दिल्या. तर शारदा आणि किंजल आल्याच नाहीत. 

अंजलीला सारखं मुलांच्या वस्तीगृहात अजय ठीक आहे की नाही हे पाहायला जायची इच्छा होऊ लागली. संध्याकाळी मंदारला भेटायच्या बहाण्याने तिकडे जायचं तिने मनोमन ठरवलं. पण अजय ठीक आहे हे कसं कळणार? नाव माहित असतं तर मंदारलाच विचारलं असतं की अमुक अमुक या नावाचा मुलगा कसा आहे भेटून सांग. आधीच झोप न झाल्याने तिचे डोळे टम सुजले त्यात अजयची काळजी. लंच ब्रेक ची बेल वाजली. पण तिला जेवायचीही इच्छा होत नव्हती.

मेघा आणि जया तिला धरून डायनिंग हॉल मधे घेऊन गेल्या. सर्व मुली जेवत होत्या तर अंजली टेबलवर डोकं ठेऊन झोपली. 

"अंजली तु जेवण कर बरं नाहीतर परांजपे मॅडमला उगाच आपल्यावर शंका यायची." मेघा अंजलीला ताट वाढून देऊन म्हणाली.

"त्यांना काय शंका यायची. मला ताप सर्दी असल्याचं सकाळीच नाही सांगितलं का आपण त्यांना."

"अगं पण.. " 

मेघा अंजलीला समजावत होती तोच श्रीमती परांजपे एका अरब अमीर शेख सोबत हॉल मधे आल्या.

"हा आमचा डायनिंग हॉल. इथे सर्व मुली नाश्ता, लंच आणि डिनर करतात." श्रीमती परांजपे शेख ला सांगत होत्या, "आम्ही मुलींच्या आहाराची खूप काळजी घेतो. जेवणात रोज मोड आलेले कडधान्य, काकडी, मुळा, दही, ताक, कोशिंबीर असतेच."

"हो हो, दिसतच आहे. आमची दहावी बेगम इथे मुंबईचीच. तिच्या एकुलत्या एक मुलीसाठी आम्ही अशीच संस्था शोधतोय. आमची बेगम म्हणती मुलीचं लग्न झाल्यावरच आमच्याकडे अरब अमिरातला येईल. पण तिची मुलगी खूपच डांबीज असती. पण इथल्या मुलींना पाहून वाटतंय तुम्ही तिला चांगलं वळण लावू शकती."

"हो हो नक्कीच." 

शेखचा आवाज ऐकून अंजलीची झोप कुठल्या कुठे पळून गेली. ती उठून त्यांच्या जवळ गेली. ती त्याला काही बोलणार, विचारणार त्या आधी त्यानेच श्रीमती परांजपेला विचारलं, 

"या मुलीचे डोळे इतके सुजलेले का दिसत असती?"

"तिला ताप सर्दी होती. औषधं दिली आहेत. नाहीच बरं वाटलं तर संध्याकाळी डॉक्टरकडे नेऊ."

"छान छान." मग तो अंजली कडे वळून सर्वांच्या लपून तिच्या हातात एक चिट्ठी देऊन म्हणाला, "आमची मुलगीही तूझ्या सारखीच असती. काळजी घे स्वतःची."

"हो." अंजली प्रेमाने त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, "धन्यवाद !"

"चला, तुमचा इन्स्टिटयूट छान असती श्रीमती परांजपे. आम्ही लवकरच येती आमच्या मुलीला घेऊन. धन्यवाद." 

"हो आम्ही वाट बघू." श्रीमती परांजपे म्हणाल्या. 

"आता मला जोरात भूक लागली." अंजली मेघाने वाढून दिलेलं ताट पुढ्यात घेऊन म्हणाली. 

"चिठ्ठी मिळाली ना, आता भूक लागेलच." जया खोचून बोलली. अंजलीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितलं. 

"माझं लक्ष होतं मॅडम. बोलता बोलता त्यानं एक चिट्ठी दिली तूझ्या हातात. हाच होता ना तो?"

"आपण जेवल्यावर आपल्या खोलीत जाऊन बोलू ना या विषयावर. प्लीज जयू." अंजलीने तिला विनंती केली. 

"ठीक आहे. पण ती चिठ्ठी मी वाचून दाखवणार तुला."

"हो हो वाचेल."

जेवल्यावर खोलीत जाऊन अंजली, मेघा आणि जया तिघीही चिट्ठी वाचायला बसल्या. जया मोठ्याने वाचू लागली. 

"नमस्कार, 
मी आजपर्यंत कधीच कोणत्या मुलीला पत्र लिहिलेलं नाही. त्यामुळे पत्रात काही चूकभूल झाल्यास क्षमा करावी. 

मी इथे सरकारी गुप्तहेर बनून एका महत्वाच्या मिशनवर आलो होतो. त्यात योगायोगाने आपली भेट झाली. तुम्हाला वाटत असेल की माझ्या मनात तुमच्यासाठी काही प्रेम भावना आहे म्हणूनच मी तुमच्यावर आलेला  चाकू हातात पकडून माझा हात कापून घेतला. तर मला तुम्हाला सांगावं वाटतंय की जगात, 'LOVE AT FIRST SIGHT' असं काही असेल पण माझ्या आयुष्यात ते अजिबात नाही. मी माझं जीवन या राष्ट्राला अर्पण केलं आहे. त्यामुळे राष्ट्र हितात झीजू इच्छिनाऱ्या प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न मी करतो. तुम्ही सांगितलेल्या माहितीमुळे मला उमेश आणि वामन बद्दल बरंच काही समजलं. तुमचं देशप्रेम असंच राहू द्या. काल रात्री तुमच्या जागी इतर कोणी असतं तर त्या व्यक्तीलाही मी नक्कीच वाचवलं असतं. 

मला तुम्ही हुशार, धैर्यशील, चाणाक्ष आणि चतुर वाटल्या आणि सुंदर तर तुम्ही आहातच. कोणालाही आवडणार असंच तुमचं व्यक्तीमत्व आहे. 

तुम्हाला मी आवडतो हे जाणून मला खरं तर खूप आनंद झाला. पण केवळ दोन वेळा भेटलेल्या, नाव गाव, त्याच्या मागचं पुढचं काहीच माहित नसलेल्या  मुलासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचा, लग्न करायचा तुमचा निर्णय मला अजिबात पटलेला नाही.

बरं आपण भेटून एकमेकांना जाणून घ्यायचं म्हटलं तर माझं आधीच लग्न जुळलेलं आहे आणि लग्ना सारख्या नगण्य विषयासाठी घरच्यांना विरोध करण्यात आपली एनर्जी खर्च करणार्यांमधून मी नाही. त्यामुळे मी तुमच्यासाठी योग्य वर नाही. म्हणून मला वाटतं तुम्हीही तुमच्या आई वडिलांच्या सहमतीने ते सांगतील त्या आणि  तुमच्या भावनांना समजून घेईल अशा मुलासोबत लग्न करावं.

तसं तर मी आशा करतो की आपली परत आयुष्यात कधीच भेट होऊ नये. पण कधी भेटलोच तर मला तुम्ही ओळखू नये हीच सदिच्छा.

तुमच्या मनात माझ्या विषयी कुठल्याही प्रकारची चुकीची भावना घर करून राहू नये म्हणून ही पत्र लिहायची उठाठेव केली. 

स्वतःची काळजी घ्या. 

LIFE IS PRECIOUS, CHERISH IT!

धन्यवाद !"

पत्र वाचून झालं. जयाने अंजलीकडे बघितलं. तिचा चेहरा रागानं लाल झाला. जयाच्या हातातून पत्र घेऊन ती परत वाचू लागली. 

"तू पत्र वाचल्याने पात्रातील मजकूर बदलणार नाही अंजली." जया तिला म्हणाली, "मला वाटतं तो मुलगा  समंजस म्हणून त्यानं सरळ आणि योग्य तेच लिहिलं आहे."

"मी मला वाटलं ते करिन. माझी मर्जी. त्याला काय गरज मला उपदेश द्यायची. आला मोठा काळजी घे म्हणणारा." अंजली पत्र फाडून कचरा पेटीत फेकून म्हणाली, 

"हेच सगळं सांगायचं होतं तर यायलाच नको होतं त्यानं इथे. कमीत कमी माझ्या संभ्रमातच का होईना आनंदी जगली असती मी त्याला भेटायची वाट बघत."

"तुला दिसत नाही का तुझा संभ्रम तोडण्यासाठी किती मोट्ठी रिस्क घेऊन आलेला तो. परांजपे मॅडम किंवा सरांनी त्याला ओळखलं असतं तर त्याचा किती अपमान झाला असता, त्याच्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात आले असते आणि हे जे सरकारी गुप्तहेर असतात त्यांना सरकार फक्त अंधारात मदत करतो. उजेडात त्यांना कोणीच ओळखत नाही. समजलं !"

"हो ना तुलाही वाटतं ना की त्यानं इथे वेष बदलवून येऊन माझ्यासाठी मोट्ठी रिस्क घेतली. म्हणजे त्याच्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे पण माझ्या मनात त्याला ते नकोय. का यार? का? म्हणून राग येतोय मला त्याचा." अंजली दोन्ही पायात डोकं खुपसून रडू लागली.

"अंजली रडणं बंद कर बरं. आधीच तुझे डोळे सुजलेले. का स्वतःला त्रास करून घेतेय?" मेघा तिला समजावून पाण्याचा ग्लास देत म्हणाली, "हे घे पाणी पी."

"नको मला." अंजली मेघाच्या हाताला दूर करायला गेली आणि ग्लास खाली पडला. थोडं पाणी मेघाच्या अंगावर  "मेघा सॉरी गं. माझं डोकं भणभन करतंय. एकटं सोड मला प्लीज."

"मेघा चल माझ्यासोबत बाहेर. अंजली तुला जितकं रडायचं रड. पण फक्त आज परत हेच रडकेपणा नको. धीर गंभीर राहा आणि नकार पचवायला शीक." जया तिला म्हणाली. 

लायब्ररीत एक अर्धा तास बसून दोघीही खोलीत परत आल्या. अंजली शांत झोपली होती.

"काही गोष्टी ह्या चांगल्यासाठीच होत असतात." जया म्हणाली. 

"हो, पण मला वाटतं त्या अशा प्रकारे नको व्हायला हव्या." मेघा बोलली. 

"हुम्म्म, चल आपणही पडू थोडं. थंडी फार वाटतेय आज."

पुढे दोन तीन दिवस अंजली खूपच शांत शांत दिसली. मुलींमधे तिचं शांत राहणं चर्चेचा विषय झाला. जया आणि मेघाने किंजलला सर्व घडलेलं सांगितलं. आपलं क्लबला चोरून जाण्यानेच हे घडलं म्हणून त्यांनी अंजलीला आनंदी करायचं ठरवलं.

रविवारी किंजल अंजलीसाठी तिच्या एक्स बॉयफ्रेंडने दिलेला रेडिओ घेऊन आली. 
"अंजली यावर तु कुठेही केव्हाही छान छान गाणी ऐकू शकतेस."

"मला नको आहे. खूप महाग वस्तू दिसतेय ही." अंजली गांभीर्याने म्हणाली. 

"त्याचं तुला काय करायचं? तु गाणं ऐक. मला माझ्या मैत्रिणीला असं चिंताग्रस्त पाहून खूप त्रास होतोय."

"बरं बाई लाव."

किंजलने रेडिओ सुरु केला. विविध भारती वर पहिलंच गाणं सुरु झालं, 

"मेरी भीगी भीगीसी पलकोपे रेह गये
 जैसे मेरे सपने बिखरके, 
जले मन तेरा भी किसी के मिलन को, 
अनामिका तुभी तरसे|"

अंजलीचा चेहरा उतरला. तिने रेडिओ ऑफ केला. हसून अंजलीला म्हणाली, "पाच मिनिटात परत ऑन करू."

"ठीक आहे."

पाच मिनिटने रेडिओ सुरु करण्यात आला. 

"ये जो मोहोब्बत है 
ये उनका है काम 
अरे मेहबूब का जो बस लेते हुये नाम 
मर जाये मिट जाये, हो जाये बदनाम 
रेहने दो छोडो भी जाने दो यार 
हम ना करेंगे प्यार."

किंजलनी परत रेडिओ बंद केला. 
परत पाच मिनिटने सुरु केला. 

"जिस गली मे तेरा घर न हो बालमा 
ऊस गली मे हमे... "

रेडिओ बंद 
रेडिओ चालु, 

"ना कोई उमंग है
 ना कोई तरंग है 
मेरी जिंदगी है क्या 
एक कटि पतंग है!"

रेडिओ बंद. "या रेडिओची तर " किंजलने रेडिओ खाली आपटायला उचलला तशी अंजली खळखळून हसायला लागली. तिला हसतांना बघून किंजलने रेडिओ खाली ठेवला.

"तु ठीक आहेस ना अंजु?" किंजलने काळजीने तिला विचारलं. 

"आतापर्यंत नव्हती ठीक. पण आता झाली." ती किंजलला मिठी मारून म्हणाली, "किती प्रयत्न करताय तुम्ही मैत्रिणी मला आनंदी करायचा आणि मी मूर्ख नको त्या व्यक्ती साठी दुःखी होतेय."

"चला देर आये दुरुस्त आये." जया खोलीत एक पातेलं घेऊन येत म्हणाली.
 "हे घे उडीद डाळीचे सूप." मेघाने वाटीत पातेल्यातलं सूप काढून अंजलीला दिलं, "तुझी आजी बनवते तसं नसेल जमलं पण आवडेल तुला."

"अगं तुम्ही दोघींनी इतक्या प्रेमाने बनवलं. नक्कीच आवडणार मला." अंजलीने सूप चाखलं, "हुम्म्म खूपच छान झालंय. तुम्हीही घ्या."

"अरे वा गेट टुगेदर. मलाही सूप हवं." शारदा म्हणाली, "रेडिओ का नाही लावला? मी लावते." शारदाने रेडिओ ऑन केला. अंजली आणि किंजल नी आता कोणतं भयानक गाणं लागेल म्हणून एकमेकींकडे बघितलं. 

"ये शाम मस्तानी 
मदहोश किये जाय 
कोई डोर मुझे खिचे 
तेरी ओर लिये जाय "

गाणं ऐकून त्यांना हायसं वाटलं. सर्वांनी आनंदात सूप पिलं. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all