वधू संहिता भाग 22 #मराठीकादंबरी

Romantic comedy & suspense story of a young mischievous bride & her dashing groom. Thank you

"असा कसा गेला तो मुंबईला? तुम्ही दोघं करत काय होते? संजय एक छोटीशी जबाबदारी नाही सांभाळता आली तुला, मग IAS बनून पूर्ण जिल्याला काय संभाळशील?" अजय मुंबईला गेल्याची बातमी ऐकून मेजर चांगलेच खवळले. "उद्या संध्याकाळी रिसेप्शन ठेवलं आहे. सर्व नातेवाईक आणि मित्र परिवार नव दाम्पत्याला आशीर्वाद द्यायला आपल्या घरी येणार आणि हा मुलगा."

"बाबा, तुम्ही त्रास नका करून घेऊ. घरी येऊ द्या त्याला एकदा चांगला दम देते." आत्या म्हणाली.

"हो गं दम देऊच पण ही दोन्ही मुलं करत काय होती?"

"मला माफ करा काका. मी त्याला थांबवून ठेवण्यात असमर्थ ठरले. मीच त्याला नीट शिकवण देऊ नाही शकली." प्रभा डोळे पुसत म्हणाली. 

"प्रभा तुझा काय दोष नाही. पण आपल्या घरी सून म्हणून आलेल्या मुलीला काय सांगणार आपण? तिला काय वाटेल, जेव्हा तिला कळेल कि तिचा नवरा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिला सोडून आपली ड्युटी पूर्ण करायला गेला."

"माफ करा मी तुमच्या मधे बोलतेय." हॉलमधे मेजरचा रागवण्याचा आवाज ऐकून अंजली त्यांना म्हणाली, "पण मला वाटतं यांच्या साठी (अजय ) यांचं कामच पूजा आहे. Work is worship म्हणतात ना तसं. त्यामुळे मी नाही वाईट वाटून घेणार."

"तु समजदार आहेस बाळ पण माझा नातू नालायक आहे. आताच जर इतकी ढिल देशील तर हातातून निसटून जाईल तो." मेजर अंजलीला म्हणाले, "त्या कमिशनर सोबतच बोलतो मी."

त्यांनी कमिशनरला फोन लावला. 

"आपण लवकरात लवकर अजयला परत पाठवायची कृपा करावी."

"तसं होणं अशक्य. आम्हाला त्याची आणि त्याला आमची गरज आहे."

"गाडलेल्या मुर्द्यांना उकरून काय मिळणार आहे तुम्हाला?"

"ती अजयची इच्छा आहे."

"पण त्या इच्छापूर्तीने त्याला दुःखच मिळेल हे माहित आहे ना तुम्हाला तरीही तुम्ही त्याला आणखी वाव देताय?"

"आम्ही फक्त देशाप्रती आमचं कर्तव्य पार पाडतोय."

"आम्हीही आमचं आयुष्य या राष्ट्राला अर्पण केलं आहे. तेव्हा देशभक्तीचे धडे आम्हाला नका देऊ. अजय उद्या दिवस बुडण्याच्या आत इथे हवा आहे."

"ते अशक्य आहे."

"कमिशनर खूप हिम्मत वाढली आहे तुमची."

"मला महत्वाचे काम आहे. बाय बाय !" कमिशनर साहेबांनी फोनचे रिसिव्हर ठेऊन दिले.

"याची इतकी हिम्मत." मेजर वसंतने रागातच फोन उचलून फेकून दिला.

"उद्या सकाळी मी मुंबईला जातोय अजयला घ्यायला. संजय रेल्वे किंवा विमान, ज्याचं तिकीट होईल ते काढ नाहीतर कारनेच जाईल ."

"मी तुमच्या सोबत येऊ इच्छिते. मला बोलायचं आहे त्यांच्याशी." अंजली बोलली.

"ठीक आहे."

"पण दादा असं नवीन सुनेला घराबाहेर घेऊन जाणं बरोबर नाही. तिच्या अंगावरची हळदही उतरली नाही अजून." आत्याला अंजलीचं मुंबईला जाणं पटलं नाही. 

"येऊ दे तिला. तिचा नवराच नाही इथे तर काय अर्थ हळद उतरवण्यात."

विमानाची तिकिटं मिळाली. मेजर अंजलीला घेऊन मुंबईला गेले. त्यांनी डायरेक्ट मुंबईचे पोलीस कमिशनर कार्यालय गाठलं. अजय तिथेच कमिशनर सोबत होता.

"सर तुम्ही मला बोलावलं?"

"मला वाटतं तु दिल्लीला परत जावं."

"का सर तुम्हीच तर बोलले होते कि बॉस ची सुरक्षा माझ्या हातात आहे. माझं इथे असणं गरजेचं आहे आणि आता अचानक म्हणताय दिल्लीला परत जा. माझं काही चुकलं का?"

"नाही, माझंच चुकलं. मी असं लग्न होताच तातडीने तुला फोन करायला नको होता."

"हे काय बोलताय?"

दारावर थाप पडली.

"यस?"

"सर, मेजर वसंत दीक्षित आले आहेत भेटायला."

"आजोबा इथे?"

"हो, कालच त्यांचा फोन आलेला. पण वाटलं नव्हतं ते इतक्या तातडीने इथे येतील." कमिशनर म्हणाले, "जा अजय भेट त्यांना."

"यस सर, जय हिंद सर "

"जय हिंद !"

"नमस्कार आजोबा !" अजयने मेजरला वाकून नमस्कार केला, "तुम्ही इथे?"

"कारण तुला सांगावं लागेल का?" मेजर शांत राहायचा प्रयत्न करून बोलले, "चार लोकात तमाशा नको. चल तुझ्या खोलीवर जाऊन बोलू."

"हो!" अजयची नजर डोक्यावरून अर्धा चेहरा झाकेल इतका मोठा पदर घेतलेल्या अंजलीवर पडली.

"तुझ्यामुळे तिलाही भटकावं लागत आहे." खोलीत जाताच आजोबा परत कडाडले, "नवीन सून पण अजून एकही संस्कार नीट पूर्ण झाला नाही तिचा."

"आजोबा तुम्हाला चांगलं माहित आहे. माझ्या साठी लग्न फक्त एक फॉर्मॅलिटी होती. झालं."

"पण माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी नव्हती." आपलं घुंघट सांभाळून अंजली शांतपने बोलली, "माझ्या आई बाबानी तर पूर्ण चाली रीती संस्काराने मला इथे पाठवले. तुमच्यावर मला सोपवलं. त्यांना तुम्ही मला सोडून परगावी आल्याचं कळलं तर किती दुःख होईल हे सांगायला नको आणि वर समाज त्यांना टोमणे देईल ते वेगळं. तेव्हा तुमचं असं मला न सांगता निघून येणं अजिबात पटने नाही. लग्न पायातील बेडी वाटते तर ती घालायच्या आधीच विचार करायला हवं होतं. आता दुनियादारी म्हणून तरी जिथं तुम्ही तिथं मी. एक तर तुम्ही दिल्लीला चला नाहीतर मला इथेच तुमच्या सोबत ठेवा."

मेजरच्या चेहऱ्यावर एकदम आनंदाचे भाव आले. आपलं काम फत्ते झालं. असं त्यांना वाटलं 

तर अजयला आश्चर्य वाटलं की इतकं मोठं घुंघट घेतलेली ही छोटीशी दिसणारी मुलगी इतकं कसं बोलु शकते. 

"अंजली मला माफ करा पण ना मी दिल्लीला येऊ शकत ना तुम्हाला इथे ठेऊ शकत. प्लीज समजून घ्या. मला माझ्या कामावर दुर्लक्ष करणे अशक्य म्हणजेच तुम्हाला मी अजिबात वेळ देऊ शकणार नाही."

"चालेल. मीही वचन देते जेव्हापर्यंत तुमची इच्छा होणार नाही, एकाच घरात राहूनही मी माझा चेहरा तुम्हाला दाखवणार नाही. कारण चार भिंतीच्या आत काहीही झालं तर चालतं पण बाहेर दुनियादारी निभवावीच लागते. तुम्ही तुमची ड्युटी करा. मी तुमच्या मधात कधीच येणार नाही. कधी कशासाठी रोक टोक करणार नाही."

"पुन्हा एकदा विचार करा. कारण मी खूप मुडी आहे."

"मग तर छान जमेल आपलं. कारण मीही काही कमी मुडी नाही."

नाईलाजाने अजयला अंजलीला ठेऊन घ्यावं लागलं. अंजलीला सोबत म्हणून मीराला काही महत्वाचे सामान घेऊन दोन तीन दिवसांनी रेल्वेने पाठवतो असं सांगून मेजर दिल्लीला निघून गेले.

अंजली पुढे काय करायचं आता या विचारात असतांनाच दारावर थाप पडली. अंजलीने पदर तोंडावर घेऊन दार उघडलं तसा दारावर थाप देत उभा असलेला अजय तिच्यावर जाऊन पडला. अंजलीच्या चेहऱ्यावरून पदर बाजूला झाला आणि अजयचा डोळे मिटलेला चेहरा तिला दिसला. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. वाटलं त्याला जोरात कडाडून मिठी मारावी. पण त्याचं खडूस रूप आठवताच तो डोळे उघडायच्या आत अंजलीने परत तिचं तोंड झाकले आणि उठू लागली. 

"हे असं दार उघडतात होय? कोणी चोर वगैरे असलं म्हणजे." अजय संतापून म्हणाला.

अंजलीला आधीच खूप धडधड होऊ लागली. त्यात त्याला संतापलेलं पाहून तिला काय करावं सुचलं नाही. ती रडायला लागली.

"अरे तु रडतेय का आता?" तो तिच्यावर पडल्याचे आठवून   अजयने तिला विचारलं, "तुला लागलं का कुठे?"

"सगळीकडेच लागलं. इतकं वजन वाढवून ठेवतात होय. आजपासून तुमच्या साठी स्वयंपाक मी बनवणार."

"चालेल."

"मी चहा पाणी आणते." अंजली किचनमधे जायला वळली. अजयने तिला हात पकडून थांबवलं,

"थांब एक मिनिट. आधी दार कसं उघडायच ते शिकून घे. दार किंवा दाराची बेल वाजली की ही साखळी टाकून, किंचित दार उघडून विचारायचं 'कोण आहे?' म्हणून. नाहीतर या छोट्याशा दुर्बीण मधून बघावं. नंतरच आपल्या ओळखीची व्यक्ती आहे याची खात्री झाल्यावरच दार उघडावं. समजलं?"

"हो." अंजली मान हलवून हो म्हणाली, "मी जाऊ मग चहा बनवायला."

"जा मी कुठे थांबवलं?"

"थांबवलं नाही, फक्त माझा हात पकडून ठेवला आहे."
 हातावर लक्ष जाताच अजयने तिचा हात सोडला. अंजलीचा हात बघून त्याला परत, वधू संहिता आणि क्लब मधे भेटलेली ती आठवली.

"असं का होतेय? अंजलीच्या स्पर्शात, शारीरिक हालचालीत मला ती का आठवतेय?"

"बापरे, याला कळलं की ती मीच आहे तर काय करेल हा? आता आपल्याला आणखी सावध राहायला हवं." अंजली चहा उकळायला ठेऊन विचार करू लागली.

"मला जाळलेला चहा आवडत नाही." स्वयंपाक खोलीच्या दारातून तो म्हणाला.

अंजली विचारातून बाहेर आली पण घाईत चहाचे गरम पातेलं तिने हातानंच धरलं. 

"आई गं !" ती किंचाळली. तिची बोटं भाजली.

"छान!" त्याने पटकन तिची बोटं पाण्यात बुडवली. अंजलीला त्याचं असं काळजीनं धावून येणं खूप आवडलं. ती गालातल्या गालात हसली. त्याचं लक्ष गेलं. 
"हसतेस काय? असे उपद्व्याप करशील तर माझं माझ्या कामावर लक्ष कसं लागेल? म्हणून मला या लग्नाच्या भानगडीत पडायचं नव्हतं"

सांडशीने पातेलं धरून दोन कपात चहा ओतून तो अंजलीला बोलला.

"मिस्टर अजय दीक्षित, नव्हतं करायचं मग लग्न. मी माझ्या बाबाच्या घरी आनंदी होते." त्यानं दिलेला चहाचा कप घेऊन ती बेडरूममधे जात बोलली, "उपकार केले जणू लग्न करून माझ्यावर.

"जास्त बोललो का मी?" त्याने स्वतःला बेसिनवर लावलेल्या आरशात बघून विचारलं. त्याच्या प्रतिबिंबाने होकारार्थी मान हलवली.

रात्री आठ वाजता मेस वरून डबा आला. अजयने बेडरूमचे दार वाजवून तिथे डबा ठेवला.

अंजलीने दार उघडलं, "मला भूक नाही." डबा पाहून ती म्हणाली. 

"आता काय उपाशी राहून पोलीस नवरा प्रताडित करतोय असं दाखवायचं आहे जगाला?"

"तुम्ही... मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर." अंजली त्याला बोट दाखवून बोलु लागली. 

"ASP !" तो तिच्या बोटाकडे बघून बोलला.

"तेच ते मिस्टर ASP मला अजिबात ब्लॅकमेल करायचं नाही. मला भूक लागली की जेवेल मी. पण आतातरी माझा जेवायचा मूड नाही."

"ठीक आहे मग. मीच खाऊन घेतो. कारण मला खूप भूक लागली आहे. पण लक्षात असू द्या घरात इतर काहीच नाही खायला."

"हुम्म्म्म !" अंजलीने बेडरूमचे दार लावून घेतले. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all