वधू संहिता 26 #मराठीकादंबरी

An romantic, comedy & suspense story of a young couple

"तु मेजर वसंत दीक्षितचा नातु आहेस?" बॉसने विचारलं. 

"हो, तुम्ही ओळखता आजोबाला?"

बॉस विचारात पडला काय उत्तर द्यावं म्हणून. 

"तुमचा चेहरा सांगतोय कि तुम्ही ओळखता आजोबाला आणि माझ्या बाबाला सुद्धा." अजय त्याला म्हणाला. 

"हो, मी ओळखतो तूझ्या पूर्ण कुटुंबाला."

"मग सांगा ना, माझ्या बाबाला कोणी आणि का मारलं?"

 हवालदारने दारावर ठक ठक केलं.

"काय झालं ?"

"सर, कमिशनर सर आलेत."

"बरं मी येतोय." अजय हवालदारला बोलून बॉस कडे वळला, "आपण परत भेटू थोड्या वेळाने. तुम्ही आराम करा तोपर्यंत."

"जसं तु म्हणणार. तुझा पाहुणा आहे तोपर्यंत तुझं ऐकावंच लागेल मला."

खोलीचं दार बाहेरून बंद करून अजय कमिशनर साहेबांकडे गेला. 
"नमस्कार सर ! तुम्ही कशाला त्रास केला येण्याचा. मला बोलवून घ्यायचं होतं."

" तुझ्या मॅडमने मला हुकूम सोडला उद्याच्या कार्यक्रमात तु तूझ्या बायकोला घेऊन हजर राहावं म्हणून."

"उद्या काय आहे?"

"आमच्या लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस."

"सर माझी मिस्टर महेंद्र कुमारला एकटं इथे सोडून यायची इच्छा नाही. मी नाही आलो तर चालणार नाही का?"

"मला शंका होतीच तु असं म्हणणार. म्हणून स्वतः आलो तुला आमंत्रण द्यायला." कमिशनर त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाले, "मला माहित आहे हे मॅटर तुझ्या साठी खूप महत्वाचं आहे. पण एक दोन तासासाठी हे विसरून जीवनसाथीलाही वेळ दे. मी कमिशनर असून मला होम मिनिस्टरचं ऐकावं लागतं बाबा . आपण 2-3 इन्स्पेक्टर आणि हवालदार ठेऊ इथे तैनात. कार्यक्रम होताच तु ये इथे परत."

"ओके सर !"

............. 

"मॅडम सरांनी तुम्हाला घ्यायला गाडी पाठवली आहे." हरीशने अंजलीला सांगितलं.

"काय? कुठे जायला? कशाला?" अंजली काही बोलणार त्या आधीच मीराने भर भर प्रश्न विचारले. 

"ते मला नाही माहित. ड्रायवर फक्त पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितलं, इतकंच बोलला."

"अंजु आपल्याला तुरुंगात टाकायचा विचार दिसतोय दाजींचा."

"हो त्यांच्या घरचाच माल आहे जसा जेलात टाकायला."

"माझं नाही माहित. पण तु तर आहेसच त्यांच्या घरचा माल." मीरा अंजलीला कोंबा मारून म्हणाली. 

"मीरा तु... "

"मॅडम, तो सरांनी लवकर बोलवलं म्हणतोय." हरीश बोलला. 

"बरं बरं येतोय आम्ही पाच मिनिटात." अंजली मीराला रागात बघत बोलली.

गाडी पोलीस स्टेशन समोर जाऊन थांबली.

"हा खरंच तुरुंगात टाकेल का मला? याच्या मनात अजूनही शंका आहे म्हणजे माझ्या बद्दल. मला तर वाटलं होतं सगळं निवळलय आमच्यात." अंजलीच्या मनात आलं. ती गाडीतुन उतरणार तोच अजय आला आणि गाडीत ड्रायवर शेजारी बसला. 

"तूझ्या माहितीतल्या एखाद्या चांगल्या साडीच्या दुकानात चल."

"ओके सर !"

"कशाला?" अंजली मधेच बोलली, "मला नकोय साडी वगैरे. तुम्ही एक सॉरी म्हटलं तरीही पुरे माझ्यासाठी."

"मी, तुम्हाला का सॉरी म्हणावं?" अजयने ड्रायवरला गाडी सुरु करायचा इशारा देऊन मागे न बघताच अंजलीला विचारलं. 

"मला वाटलं तुम्हाला वाईट वाटलं माझ्यावर शंका घेऊन म्हणून तुम्ही मला साडी घेऊन देत आहात."

"तुम्ही तुमचा मोठा मेंदू अशा छोट्या छोट्या गोष्टीत खर्च नका करू. शांत बसा."

"गजब माणूस आहे. का, कशाला सांगायला तर हवं. आता कारण जाणून घ्यायच्या curiosity ने माझं पोट दुखतंय." अंजली मीराच्या कानात पुटपुटली. 

"मला वाटतं दाजी तुला वाटतात तितके वाईट नाहीत. तू उगाच त्यांना प्रश्न विचारून भांडावून सोडू नकोस." मीरा तिला म्हणाली. 

"तु कोणाच्या बाजूला आहेस? त्यांच्या कि माझ्या?"

"मी माझ्याच बाजूला आहे."

अजयने त्यांच्यावर एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. ड्रायवरला गाडी थांबवायला लावून तो बोलला. 
"मीरा तू समोर बस. मला अंजली सोबत काही बोलायचं आहे."

अजय आणि मीराने जागा बदलली.

"मी नाही त्यातली अन कडी लावा आतली." अंजली स्वतःशीच बडबडली. 

"ऐकलं मी." अजय म्हणाला, " पण तुम्ही म्हटलं त्यानुसार जगाला दाखवण्यासाठी तरी आपल्याला असं नव दाम्पत्या सारखं वागावं लागेल. दुसरं उद्या संध्याकाळी आपण कमिशनर सरांच्या लग्नाच्या पंचवीसव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जातोय. तिथे आपण शिस्तीत वागाल अशी मी आशा करतो."
अंजलीने चेहरा बनवून डोक्यावर हात मारला.

"मी येणं गरजेचं आहे का?"

"हो, म्हणूनच साडी घ्यायला घेऊन आलो तुम्हाला. ऑफिसच्या सर्वांना माझ्या नवंवधूला बघायचं आहे. नाहीतर मला स्वतःला अशा पार्टीत अजिबात रस नाही. पण तुमच्यामुळे माझेही 2-3 तास वाया जातील असं दिसतंय."

गाडी थांबली. सर्व खाली उतरले. 

"मला साडी नकोय." अंजली दुकानात पाय ठेवताच बोलली. 
"मॅडम एकदा बघून तर घ्या." दुकानदाराने विनंती केली.  दुकानात खूपच सुंदर, रंगीबेरंगी अशा साड्या लावलेल्या दिसत होत्या. त्या बघून अंजलीचा साडी खरेदी न करण्याचा विचार कुठल्या कुठे पळून गेला.

तिने तिच्यासाठी हिरवी बनारसी व निळी शिफॉन सिल्क अशा दोन साड्या घेतल्या आणि मीरा साठी अबोली शिफॉन साडी घेतली. रात्र झाली तरीही त्यांना घरी ड्रॉप करून अजय परत पोलीस स्टेशनला निघून गेला. 

मागील काही दिवसांपासून अजय दोन तीन दिवसातून एकदा अंजलीला दिसे. रात्री तर कधीच घरी राहत नसे. अंजलीही वधू संहिता मधे बदलत्या काळाची गरज म्हणून  स्त्री 'सशक्तीकरण' अभ्यास क्रम सहभागी करावा म्हणून श्रीमती परांजपे सोबत व्यस्त होती. आधी तर श्रीमती परांजपे तिला नाहीच म्हणाल्या. 

"असं कसं आपण कराटे किंवा फाइटिंग वर्ग सहभागी करू आपल्या भावी वधूंच्या अभ्यासक्रमात? कोणालाच आवडणार नाही ते. इथे आई वडील मुलींना शिस्त, सोज्वळपणा, स्वयंपाक, शुद्ध भाषा, एटीकेट्स आणि मॅनर्स शिकायला पाठवतात. कोणत्या कुटुंबाला आवडेल त्यांच्या होणाऱ्या सुनेनं सेल्फ डिफेंसचा अभ्यास करावा हे?"

"ते तर आवडणारच नाही. कारण मग सुनेला मारहाण नाही करता येणार ना त्यांना."

"हा मग तेच म्हणतेय मी अंजु. स्त्री सशक्तीकरण गरजेचं आहे हे तुला आणि मला समजतं. पण रूढीवादी समाजाला नाही समजत ना?"

"मग काय मुलींना असंच रस्त्यावरच्या गुंड्यांचं शिकार होऊ द्यायचं आणि जळू द्यायचं त्यांच्याच सासरच्या मंडळीच्या हातून. तिच्याशी कोणी कसंही वागावं, तिनं मात्र सोज्वळपणेच राहावं. मला तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती."

"अंजु, मला विचार करायला वेळ दे. तुही विचार कर कि असं आपण काय स्पष्टीकरण देऊ पालकांना कि ते मुलींना सेल्फ डिफेंस किंवा कराटेच्या वर्गात टाकायला तयार होतील. कारण आपण त्यांना असं तर नाही म्हणू शकत कि, तुमच्या मुलीला सासरच्यांना प्रति उत्तर देता यावं म्हणून कराटे शिकवा."

"ओके, धन्यवाद तुम्ही विचार करतो म्हणाल्या म्हणून. पण तुरी नका देऊ माझ्या हातावर ."
.............

अजयला जातांना पाहून आज मीरा बोलली, 

"अंजु तु दाजींवर लक्ष द्यायला हवं आता. हे असं रात्रीचं तुला एकटं घरी सोडून बाहेर राहणं बरं नाही."

"त्यांचं प्रोफेशन तसं आहे मीरा."

"अगं पण लग्न होऊनही तुमच्यात तसं पती पत्नी सारखं काही झालं नाही. म्हणून काळजी वाटते मला. एखादी प्रेयसी तर नसेल मिळाली त्यांना?"

"मीरा, मला वाटतं तुझं लवकरात लवकर लग्न लावून दिलेलंच बरं होईल."

"माफी माफी, मला त्यांच्या विषयी असं बोलायला नको. पण आपल्याला काय माहित एखादी सटवी त्यांच्या मागे लागलेली असेल तर. तु त्यांच्यावर नजर तरी ठेवायला हवी ना!"

"हम्म ! बघू." अंजलीच्या मनात आलं, "म्हणजे मला परत जासूसी करावी लागणार तर. मज्जा येईल. मिस्टर खडूस बघू तरी कुठे असता तुम्ही आजकाल."
............
शनिवारी संध्याकाळी अजय अंजली आणि मीराला घेऊन कमिशनर सरांच्या घरी कार्यक्रमात गेला. हिरव्या बनारसी साडीत अंजली खूपच सुंदर दिसत होती. त्यात तिचे लांबसडक काळेभोर केस. सर्वांच्या नजरेत ती भरली.

अजय समोर येईल त्याला अंजलीची ओळख करून देऊ लागला. मंद मंद मधुर संगीत सुरु होतं. 

"आगे भी जाने तु 
पीछे भी जाने न तु
जो भी है, बस यही पल है "

 काही जोडपी एकमेकांच्या हातात, गळ्यात हात टाकून जागेवरच डोलत होती.

"ए अंजु तुम्हीही असंच डोलणार का? मज्जा येईल ना तुम्हाला?"

"मीरा काहीही बरळू नकोस. मला नाही वाटत या खडूस असं काही करेल. त्यापेक्षा आपण छान चमचमीत पदार्थांवर ताव मारू."

"तुला माहितेय अजय त्याच्या बायकोला घेऊन आला आहे. खूपच सुंदर दिसतेय ती." एक इन्स्पेक्टर राजेशला म्हणाला.

"हो का भेटावंच लागेल मग वहिनी साहेबांना." राजेश अजय जवळ गेला. तो कमिशनर मॅडमला अंजलीची ओळख करून देत होता. 

"माझी पत्नी अंजली."

"नमस्ते मॅम."

"सुंदर, खूपच सुंदर. वाटतच नाही तु अक्कलकोटला लहानाची मोठी झालीस म्हणून." कमिशनर मॅडम म्हणाल्या. 

"कसं वाटणार ती एक महिना मुंबईला वधू संहिता प्रशिक्षण संस्थेत भावी वधूचे धडे घ्यायला आली होती." मीराने माहिती पुरवली.

"भेट द्यायला हवी त्या संस्थेला म्हणजे."

"हो नक्कीच, मी घेऊन जाईल तुम्हाला." अंजली म्हणाली.

जवळच उभ्या राजेशने ऐकलं. त्याचा जीव धडधड करू लागला. कमिशनर मॅडमने त्याला बोलवून त्याची अंजलीशी ओळख करून दिली. त्याला चांगलाच शॉक बसला. त्याने रागाचा एक कटाक्ष अजयवर टाकला. 

"I had no idea." अजय त्याला समजेल अशा आवाजात बोलला.

"मला यांना कुठेतरी बघितल्या सारखं वाटतंय." अंजली एकदम बोलली, "आठवलं.. "

अजय आणि राजेशने एकमेकांकडे बघितलं. त्यांना डान्स क्लबची आठवण झाली. कमिशनर मॅडमला जर समजलं कि राजेश, चोवीस तास जीव धोक्यात असलेल्या मिशनचा एक भाग बनला आहे. त्यांनी लगेच कमिशनर साहेबांशी बोलून त्याची सेफ जागी ट्रान्सफर करायला लावली असती. राजेश पटकन अंजलीचा हात अजयच्या हातात देऊन कमिशनर मॅडमला म्हणाला, 

"किती रोमँटिक म्युझिक सुरु आहे. नवंविवाहित जोडप्यानं तर अशा संधीचा फायदा उचलायला हवा. हो की नाही आत्या."

"आम्ही इथेच ठीक आहोत." अंजली अजय एकमेकांकडे तोंड मुरडून एका सुरात बोलले. 

"अरे हो, का नाही. चला तुम्ही तर आता अशा गोष्टींना एंजॉय करायला हवं. तुमचे दिवस आहेत एकमेकांसोबत वेळ घालवायचे आणि समजून घ्यायचे." कमिशनर मॅडम त्यांना म्हणाल्या. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all