वधू संहिता भाग 2

The story is about the young girls self declaration about the marriage thing in retro era. Thank you

वधू संहिता भाग 1 खालील लिंकवर वाचा 

http://irablogging.com/blog/the-bride-code-part-1_6952

वधू संहिता भाग 2

पत्रात लिहिल्या नुसार दुपारी कर्नल वसंत मातोश्रीवर आले. सीमाने त्यांना चहा पाणी दिलं. इकडल्या तिकडल्या जुजबी गप्पा झाल्यावर कर्नल सरळ मुद्द्यावर आले.

"आमची नात सून कुठे दिसत नाही."

"मी घेऊन येते." सीमा अंजलीला आणायला गेली. 

"गुणवंत तुमची तब्येत बरी नाही का?"

"हो, थोडा रक्तदाब वाढला आणखी काही नाही."

"म्हणजे ताण घेताय तुम्ही कशाचा तरी."

"नाही तसं काही नाही."

"काय नाही जावईबापू !" आजी पाटलांना रागवत बोलली, "कर्नल साहेब तुमचं पत्र वाचलं तेव्हापासून काळजीत आहेत हे ."

"हो मी समजू शकतो कारण माझीही एक लग्न झालेली मुलगी आहे. लाडा कोडात लहानाचे मोठे केलेल्या मुलीला लग्न लावून असं,  इतक्या दूर पाठवणं कठीण असतं पित्यासाठी. पण तुम्ही अजिबात चिंता करू नका. जशी ती तुमच्याकडे आहे तशीच आमच्याकडेही दिसेल तुम्हाला. आम्ही अगदी आपल्या मुली सारखंच ठेऊ अंजलीला."

"झालं मग यांच्या घराचं कल्याण." मीरा तोंडातल्या तोंडात पुटपुटली. आजीनी तिच्याकडे डोळे वटारून बघितलं.
"मी अंजलीला बघते." मीरा अंजलीच्या खोलीकडे धावली. 

"काय आहे ना की अंजलीच्या सख्या आईला तिला जन्म देताच देवाज्ञा झाली. त्यामुळे जरा जास्तच जपलं मी तिला.  चौथी नंतर गावात शाळा नाही म्हणून घरीच मास्तरला बोलवून तिचा अभ्यास करवून घेतला. फक्त परीक्षा देण्यापुरती ती सोलापूरला गेली. तिला बाहेरच्या जगाचा अजिबात स्पर्श नाही. आमचा वडिलोपार्जित व्यवसाय मोठा, जमीन जुमला तसा सोलापूरलाही आहे. तरीही मी अक्कलकोटलाच राहणं पसंत केलं ते अंजलीसाठीच. तिला स्वामींची छत्रछाया मिळावी म्हणून. पण आता लग्ना नंतर.... " पाटील बोलता बोलता थांबले. 

"लग्ना नंतर तुम्ही बोलवाल तेव्हा हजर होईल मी अंजलीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला. नाहीतरी सेवानिवृत्त मला काय काम आहे? आपली घरचीच चार चाकी, ड्रायवरला घेतलं की फिरस्ती वरच असतो मी." कर्नल साहेब पाटलांना आश्वासन देत म्हणाले.

"काय बोलू मी आता ! पण तरीही मला अंजली बद्दल काही सांगायचं आहे." पाटील लांब श्वास घेऊन म्हणाले. 

"निसंकोच सांगा. माझ्या मुलाच्या वयाचे तुम्ही. वडील समजून सांगा जे मनात आहे ते." कर्नल खूपच समंजस दिसून आले. 

"अंजलीला मी तिच्यात आणि मंदार मध्ये कधी फरक दिसु दिला नाही. म्हणून जसा मंदार कधी स्वयंपाक खोलीत शिरला नाही, अंजलीनेही कधीच स्वयंपाक खोलीत पाय टाकला नाही. सांगायचं तात्पर्य इतकंच की तिला स्वयंपाक बनवता येत नाही. सासरी गेल्यावर करावंच लागेल घरकाम, म्हणून लग्न होईल तेव्हा शिकेल सर्व. या विचारानं मला तिला स्वयंपाक शीक किंवा कर म्हणावं वाटलंच नाही. तेव्हा तिला व्यवस्थित स्वयंपाक आला नाहीतर सांभाळून घ्याल इतकंच म्हणायचं आहे."

"गुणवंत, त्यात काय इतकं. माझी सून, प्रभा, अंजलीची सासू अगदी सुगरण आहे आणि प्रेमळही. अंजलीला सर्व शिकवेल ती प्रेमाने. तुम्ही नका करू काळजी. "

"आई अंजली.. " पाटलांनी आजीला अंजली अजुन बाहेर आली नाही असा इशारा केला. 

" बघते काय गोंधळ घालताहेत या माय लेकी ." आजीही अंजलीच्या खोलीकडे वळल्या तोच कपाळावर लाल गंधाचा टीका, नाकात बेसर, कानात सोन्याचे रिंग, गळ्यात सोन्याची चैन, हातात तिच्या आईचे दोन कंगन, पायात पैंजण, लांब काळ्या केसांच्या दोन वेण्या, एका वेणीत शेवंतीची फुलं माळलेली आणि केशरी रंगाचं परकर पोलकं घातलेली अंजली, सीमा आणि मीरा सोबत बाहेर आली.

पाटलांनी सीमाकडे चमकून बघितलं. त्यांनी अंजलीला साडी नेसवायला सांगितलं होतं. पण अंजलीने सीमाचं ऐकलंच नाही आणि सीमाला तिच्यावर बळ जबरी करायला कधी जमलंच नाही. जास्त करून आपण बघतो की सावत्र आई कठोर असते, सावत्र मुलीला त्रास देते. इथे मात्र सगळं उलटंच होतं. अंजली तर सीमाला चांगलीच गोल गोल फिरवायची.

कर्नलला पाटलांच्या चेहऱ्यावरून समजलं की काहीतरी गडबड आहे. म्हणून वातावरण हलकं व्हावं यासाठी त्यांनी   अंजलीला जवळ बोलावलं.

"ये बाळ बस इथे." कर्नल अंजलीला पाहून म्हणाले, "अगदी पंढरी नाथाची रखुमाई दिसतेय पोर."

आजीने पाटलांना सगळं ठीक असल्याचा आणि शांत राहायचा इशारा केला.
"मग माझी नात आहेच लाखात एक. चौदाची झाली तेव्हापासून मोठमोठ्या नामवंत घरून मागणी येतेय तिला लग्नासाठी."

"हो हो येतच असेल." कर्नल आजीशी सहमत होऊन म्हणाले. मग त्यांनी अंजलीकडे आपला मोर्चा वळवला, "आवड कशा कशाची आहे बाळ तुला."

"मला ना नदीत पोहायला, रानात भटकंती करायला" अंजली चेहऱ्यावर मोठ्ठ हसू घेऊन उत्सहात सांगू लागली. तिने चौदा वर्षाच्या मंदारकडे बघितलं. त्याने छान अशा अर्थाची मान हलवली. कर्नल कान देऊन ऐकू लागले आणि पाटलांनी डोक्यावर हात ठेवला तर सीमा स्वयंपाकाचे बघते म्हणून तिथून सटकली , अंजलीचे आपले सुरूच होते, 
"मला शेजारच्या संत्या व मीरा सोबत विटू दांडी आणि कंची खेळायला खूप मज्जा येते, झाडावर उंच उंच झोके घ्यायला, गुल्लेरने निशाना लावून आंबे तोडायला, रहस्य आणि हेरगिरी कथानक असलेली पुस्तकं वाचायला ... " अंजली तिच्या आवडी सांगतच होती तो आजी खोकलली आणि मीरा तोंड दाबून हसू आवरत स्वयंपाक खोलीत गेली,  तशी अंजली गप्प झाली. 

"अरे तु शांत का बसली? तुझ्या आवडी निवडी तर माझ्या नातवा सारख्याच आहेत. मला छान वाटतंय ऐकून ." कर्नल अंजलीला प्रोत्साहित करून म्हणाले. 

"हो हो सांग अंजु." आजी खोटं खोटं हसून तिला डोळे दाखवून म्हणाली. 

"मला बाबाला हिशोबात मदत करायला, रामचरित्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मी बाई अशी चरित्र वाचायला आणि भजनं म्हणायला आवडतं." अंजली  एका समजदार मुली सारखा आव आणून म्हणाली. आजीचा जीव भांड्यात पडला. पाटलांनाही बरं वाटलं. 

"अरे वा." कर्नलच्या चेहऱ्यावर चमक आली, "चल मग एक छान भजन म्हण."

अंजलीने पाटलांकडे बघितलं. त्यांनी नजरेनेच म्हण असा इशारा केला.

"कोणतं म्हणू. " तिने अगदी निरागस चेहऱ्याने विचारलं. 

"तुला जे छान म्हणता येईल ते म्हण." पाटील तिला प्रेमाने म्हणाले.

"स्वामी समर्थ माझी आई म्हणते."

"मी पेटीवर स्वर लावतो." मंदार पेटी घेऊन आला. अंजलीने गायला सुरवात केली.

"स्वामी समर्थ माझी आई 
मजला ठाव द्यावा पायी, 
तूझ्या विना आम्हा कोणी नाही, 
तुझीच कृपा भरुनी राही. 

स्वामी समर्थ माझी आई, 
मजला ठाव द्यावा पायी. 

जय स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ.... "

"अप्रतिम." कर्नल खुश झाले, "आवाज खूपच सुंदर आहे हो तुझा. वारसा मिळाल्या सारखा दिसतोय."

"हो, तिची आईही खूप छान गायची. ही पेटी तिच्या आईचीच आहे." पाटलांनी माहिती पुरवली. 

"म्हणूनच. लग्ना नंतर संगीत शिकायची इच्छा असल्यास आम्ही चांगल्या गुरुजी कडे पाठवू अंजलीला."

"हो नक्कीच. खूप छान होईल ते." पाटलांनीही हो ला हो लावलं. पण अजूनही त्यांचा चेहरा चिंतातूर दिसत होता. 

"पाटील, तुम्ही अजूनही चिंताग्रस्त दिसत आहात. काही शंका असेल मनात तर विचारा. नाहीतर असं करा दिल्लीलाच एक चक्कर मारा. मुलीचं होणारं घरही दिसेल आणि प्रभाला भेटून अंजली आमच्याकडे किती आनंदी राहणार याची खात्रीही होईल तुम्हाला. कारण घरातील मोठी बाई समंजस तर सगळं घर सगुण सुफल असं मला वाटतं आणि तशीच आहे माझी सून. अगदी आदर्श सासू आहे तुमच्या मुलीसाठी."

"छे छे असं मुलीच्या सासरी जात नसतात कर्नल आमच्याकडे." आजी म्हणाल्या, "पण तुम्ही म्हणताय तर मारू एक चक्कर आमच्या अंजु साठी."

अंजलीने आजीकडे आश्चर्यानं बघितलं. कारण आजी अगदीच रीती भातीला धरून चालणारी आणि ती म्हणतेय लग्नाच्या आधी मुलाचं घर पाहायचं म्हणून.

"तारीख ठरवून सांगा मग. अंजली आणि अजयचा साखरपुडाच करून टाकू मस्त. माझे सर्व मित्र, नातेवाईकही येतील."

"बापरे, या म्हाताऱ्या आजोबांना इतकी काय घाई झाली आहे मला यांच्या नातवात अडकवायची?" अंजलीच्या मनात आलं, "नातू काय करतो, काय नाही काहीच सांगितलं नाही. अन फक्त माझं त्याच्याशी लग्न लावायच्या मागे लागलेत हे."

लग्न लग्न, हा शब्द ऐकून अंजलीचं डोकं ठणकु लागलं. तिला उठून पळून जायची इच्छा झाली. पण तसं केलं तर खूप गोंधळ होणार म्हणून ती कशीतरी बसून होती.

"हो हो चालेल मला, पण तुम्ही ज्याच्याशी माझं लग्न लावणार तो अजय काय करतो, त्याच्या बद्दल काहीच नाही सांगितलं, ना त्याला सोबत आणलं." अंजली बोलून गेली. तिला होईल तितकं स्वतः बेशीस्त दाखवायचं होतं. म्हणून ती तोंडाला येईल ते बोलत होती. पण कर्नलही आधीच माणसा करवी पूर्ण माहिती काढूनच प्रत्यक्ष तिला बघायला आणि लग्नाची बोलणी इतक्या दूर आले होते. म्हणून त्यांनी काहीच मनावर घेतलं नाही.

"अंजली काय हे. असं नवऱ्या मुलाचं नाव घेऊन नसतात बोलत मुलीनं." आजीनं तिला चांगलंच खडसावलं. 

"असू द्या ताई. आता आपला तो जमाना गेला जेव्हा स्त्रीच पूर्ण आयुष्य नवऱ्याला अहो काहो, पिंटूचे बाबा, बालीचे दादा, साहेब, मालिक असं संबोधत निघून जायचं." कर्नल स्मित हास्य करून म्हणाले. मग अंजली कडे वळून बोलले, 
"अजय पोलीस खात्यात अधिकारी पदावर कार्यरत आहे, ASP म्हणून. सध्या त्याची पोस्टिंग नाशिकला आहे. त्याला सुट्टी मिळणं कठीण म्हणून मीच आलो आणि लहान मुलगा पवन कलेक्टर पदासाठी अभ्यास करतोय. काही दिवसातच त्याची परीक्षा आहे. म्हणून त्यालाही सोबत येणे जमले नाही. ड्रायवर मोहनला सोबत घेतलं आणि आलो." मग ते मोहन कडे वळून म्हणाले, 

"अरे अजयचा फोटो दे बॅग मधून काढून."

तर अंजलीचा होणारा नवरा पोलीस अधिकारी आहे हे ऐकताच काहींच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तर काहींचे चेहरे पडले. स्वयंपाक खोलीच्या दारात उभ्या मीरानी,  अंजलीकडे बघत गळ्यावर सूरी चालण्याची ऍक्शन केली. जसं काही म्हणतेय,

"अंजली तु तर गेली."

अंजलीनेही तिला बघत तोंड मुरडलं. अर्थात तिला म्हणायचं होतं पोलीस अधिकारी असो की कोणीही तिला काहीच फरक पडत नाही.

"हा घ्या फोटो. वर्दीतच काढला आहे." मोहनने अजयचा फोटो पाटलांना दिला. फोटो पाहून पाटलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य खुललेलं पाहून आजीने फोटो मागितला. 

"खरंच, मुलगा अगदी राजबिंडा आहे. आमच्या अंजलीला साजेसा." आजीही खुश झाली.

"हो, अगदी राम सीताची जोडी दिसेल बघा अजय दादा आणि अंजली ताईची ." मोहन म्हणाला.

तशी अंजली ठासून बोलली, "पण मला श्री रामाची सीता मुळीच व्हायचं नाही. श्री रामांनी असं लोकांचं ऐकून सीता त्याग करणं मला अजिबात नाही आवडलं आणि सीता माईचंही असं गप गुमान अरण्यात निघून जाणं पटलं नाही. तसही माझ्या चारित्र्यावर बोट उचलणाऱ्याचं आधी डोकं फोडेन मी आणि नंतर काय करायचं ते करिन. त्यात माझा हक्क मी कधीच सोडणार नाही."

आजीला पोरीचं काय करावं, कसं गप बसवावं असं झालं. तर पाटील आपल्या मुलीचे विचार ऐकून चकित झाले. त्यांना समजलं कि आपली ही कार्टी एकटीच अनेकांना भारी आहे. पण कर्नलला काय वाटलं असेल?

क्रमश :

तळटीप : कथानक पूर्णपने काल्पनिक आहे. मनोरंजन म्हणून लिहिल्या गेलं आहे. तेव्हा शब्दश : अर्थ काढू नये. काही चूक भूल झाल्यास क्षमस्व. 

फोटो : साभार गुगल वरून, पिंटरेस्ट.कॉम 

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all