वधू संहिता भाग 5

The bride code is a story of a young & mischievous bride. Thank you

वधू संहिता भाग 5

नाशिक शहर पोलीस स्टेशन.

दारू गोळा आणि हत्यार तस्करी प्रकरणाचा आरोपी बबन, सब इन्स्पेक्टर दया पांडे कडून धुऊन निघाल्यावरही हसतच बोलला, 

"मारुन घ्या साहेब किती मारायचं आहे तितकं. थोडया वेळातच माझ्या बेल चे पेपर घेऊन वकील येईल . मग मि या शहरातुनच नाहीतर या राज्यातूनहि फुर्रर होउन जाईल . तुमच्या पोहोच च्या बाहेर जाईल . समजलं! "

"ते होईल तेव्हा होईल . पण त्या आधीच तु इथेच एन्काउंटर मध्ये मारला गेला तर ?" एक सहा फुट उंच कद काठीचा, लोखंडी सक्त बाहूचा, गौरवर्ण अन नाकी डोळी तरतरीत असलेला तरुण बबन जवळ येऊन म्हणाला. चाळीशी पार सब इन्स्पेक्टर दयाने पटकन त्याला सॅल्यूट मारला आणि बसायला खुर्ची दिली. तरुणाने हाताने च नकोय असा इशारा केला. 

"कोण आहे रे तु? नाशिक मधे नवीनच आलेला दिसतोय. नाहीतर मला असली धमकी द्यायचा प्रयत्न नसता केला तु?" बबन गर्वानं बोलला. 

"बबन जिभेला लगाम लाव. हे ASP आहेत अजय दीक्षित आणि यांनी आता पर्यंतच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात तीन एन्काउंटर केले आहेत. तु सरळ सरळ हत्यार तस्करीच्या मास्टर माईंडची आणि त्या मागच्या हेतूची माहिती दिली नाही तर तुझं नाव त्यांच्या चौथ्या वर्षाचं चौथ एन्काउंटर म्हणून घेतलं जाईल." सब इन्स्पेक्टर दयाने माहिती पुरवली. 

"दया साहेब, " बबन अगदीच निष्काळजीने म्हणाला, "मला वाटतं तुम्ही पोलिसांनी आपल्या या सर्व आयडिया बदलायला हव्या आता. तेच जुने डाव पेच खेळता. बोर नाही होत का तुम्हाला?"

"दया याला गंम्मत वाटतेय तर." अजय त्याची पिस्तूल  साफ करत म्हणाला, "मग याला पुरावा देतोच आज कि मी गंम्मत करत नाहीये म्हणून. नाहीतरी हा आपल्याला कोणासाठी काम करतोय? पुढचा प्लॅन काय काहीच सांगत नाहीये. मग उगाच फुकटची भाकरी खायला जेलात किंवा बेल होऊन बाहेर पडून अजून माज करायला जिवंतच का सोडायचं?"

"हो सर खरंच. हा बाहेर गेला कि उत्पात माचवणार हे नक्की."

"दया तुम्ही कधी एन्काउंटर केलं आहे का कोणाचं?"

"नाही सर."

"चला मग आज करा."

"काय सर?" सब इन्स्पेक्टर दयाने आश्चर्यानं विचारलं. 

"एन्काउंटर," ASP अजिबात गंमतीच्या मूड मधे दिसत नव्हता. आपली पिस्तूल दयाच्या हातात देऊन तो गांभीर्याने म्हणाला, "या माझ्या पिस्तूलने आधी माझ्या खांद्यावर गोळी चालव. मग दोन गोळया या बबनच्या छातीत घाल. तो मेला कि माझी पिस्तूल पुसून त्याच्या मुर्द्याच्या हातात ठेव. केस अशीच बनणार कि, बबनने विचारपूस सुरु असतांना ASP अजय दिक्षितच्या कंबरेतून पिस्तूल हिसकावून त्याच्यावर गोळी चालवली तेव्हा स्वतःच्या बचावासाठी म्हणून सब इन्स्पेक्टर दया पांडेने बबनवर गोळया चालवल्या. त्यात बबन मेला. त्याचं एन्काउंटर झालं."

"ओके सर तुम्ही जसं म्हणाल तसं." दयाने अजयची पिस्तूल बबनवर रोखून म्हटलं. त्यांना वाटलं आतातरी बबन दारू गोळयाची, हत्यारची तस्करी का आणि कोण करतंय हे सांगायला तयार होईल. पण बबन परत हसून म्हणाला.

"हे सगळं सिनेमात नेहमीच दाखवतात राव."

दयाने अजयकडे बघितलं.

"पण हा सिनेमा नाही. शूट हिम !" अजय म्हणाला. तसा बबन दयावर लपकाला. दयाच्या हातातली पिस्तूल खाली पडली आणि त्याच्या कमरेत असलेली त्याची पिस्तूल बबनच्या हातात.

"आपले हात डोक्यामागे घ्या ASP साहेब." बबन पिस्तूल दयाच्या डोक्यावर लावून म्हणाला, "नाहीतर सब इन्स्पेक्टर दयाचा भेजा बाहेर येईल हो आणि जो आपल्या आयुष्यातलं पहिलं एन्काउंटर करणार होता, त्याचंच एन्काउंटर होईल."

अजयने शांततेत, किंचितही विचलित न होता त्याचे दोन्ही हात डोक्यामागे घेतले. त्याचा चेहरा इतका शांत होता कि त्याच्या मनात काय सुरु आहे हे कोणालाच कळणार नाही. 

बबनने जोरात ठहाका मारला. सर्व हवालदारांना आपले हत्यार खाली ठेवायला सांगून, इन्स्पेक्टर दयाला घेऊन तो पोलीस स्टेशनच्या बाहेर पडू लागला.

अजयने त्याच्या उजव्या हाताने, डाव्या हाताच्या ( शर्टच्या ) बाहीतून हळूच चाकू काढला आणि फुर्तीने सटकन बबनच्या दिशेने फेकला. बबनला काही समजायच्या आत चाकू त्याच्या छातीत धसला. तो जागीच गेला. 

अजय आणीबाणीत कामा यावं म्हणून त्याच्या पाठीशी, हातांच्या शर्टच्या बाहित आणि पायाजवळ चाकू लावून ठेवत असे.

दया आणि उपस्थित अजयला आश्चर्यानं बघू लागले. अजयने तिकडे दुर्लक्ष करून बबनची नस बघितली. तो मुक्त झाला होता. 

"सर सॉरी, माझ्या कडून दुर्लक्ष झालं आणि त्याला माझी पिस्तूल घ्यायची संधी मिळाली अन हे सगळं झालं." 

"हुम्म्म !" अजय दोन्ही हात खुर्चीच्या बाजूंवर ठेऊन, डोळे मिटून रिलॅक्स होऊन म्हणाला, "त्याच्या जवळ मिळालेली  एकनएक वस्तू, कागदाचा तुकडा मला आणून द्या. मी बघतो काय करायचं ते."

सब इन्स्पेक्टर दया पांडेनं त्याच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात आजपर्यंत असा इतका शांत अधिकारी बघितला नव्हता.

"हा असा कसा पोलीस अधिकारी आहे. महत्वाचा माणूस असा डोळ्यासमोर मेला. याला काहीच वाटत नाही. रागही आला का नाही समजत नाही याच्या चेहऱ्यावरून. इतकं  भाव शून्य कसं असू शकतं कोणी?" दया, अजयबद्दल विचार करू लागला, "एखादा दुसरा अधिकारी असता तर माझं नाकर्तेपन नक्कीच काढलं असतं त्यानं अन माझी वाट लावली असती. याला का काहीच फरक पडत नाहीये.  कमीत कमी माझ्यावर रागवायला तरी पाहिजे ना याने."

"मी तुम्हाला रागावलं नाही कारण तसं करून बबन जिवंत होणार नाही." दयाला तिथेच उभ पाहून अजयने जणू त्याचा चेहरा वाचला, "तुम्ही बॉडीचा पंचनामा करा आणि शांत रहा."

रात्री जेवण करून अजय नाशिक पोलीस गेस्ट हाऊसच्या आपल्या खोलीत बबनकडे मिळालेल्या वस्तू मधे काही सुराग मिळते का बघत होता. गेस्ट हाऊसमधे काम करणारा सोळा वर्षाचा सदा त्याला बोलवायला आला. 

"साहेब तुमच्यासाठी तुमच्या भावाचा फोन आला होता. पाच मिनिटात परत फोन करतो बोलले ते. "

"त्याला सांग साहेब खूप कामात आहेत. नंतर करतील फोन." अजयला माहित होतं कि संजय कशाबद्दल बोलणार म्हणून त्यानं न बोलायचं ठरवलं. 

"बरं." सदा गेला. पण लगेच धावत धावत परत आला. 

"त्यांना खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणे. फोन सुरूच आहे." धावत आल्याने सदाला दम भरून आला.

"ठीक आहे मी जातो. तु खोलीचे दार लावून ये आरामात." अजयला समजलं कि तो बोलल्या शिवाय संजय फोन ठेवणार नाही.

"हॅल्लो, बोल."

"हाय दादासाहेब कसे आहात आपण? आपल्याला लहान भाऊ आहे हे आठवणीत आहे कि विसरलात?" संजयने खोडकर आवाजात विचारलं.

"संजय काही महत्वाचे असेल तर बोल. सरकारने हा फोन आम्हाला महत्वाची माहिती तत्परतेने इकडून तिकडे पोचती करता यावी म्हणून दिला आहे. वायफळ चर्चा करण्यासाठी नाही."

"ओके, आजोबा वहिनीला बघायला गेले होते. सोबत वहिनीचा फोटो घेऊन आले आहेत आणि वहिनी खूपच सुंदर आहे." संजय एका दमात सगळं बोलून गेला. 

"झालं ! ठेवतो मी फोन." अजयने फोन ठेऊन दिला. 

तो खोलीत जायला वळला तो परत फोन खणखणला.

"संजय मला खूप काम आहे. परत फोन करू नकोस." अजय त्याला ठणकावून म्हणाला. 

"मी कर्नल दीक्षित, तुझा आबा बोलतोय." कर्नल त्यांच्या कणखर शैलीत म्हणाले, "मला माहितेय खूप कामात आहेस तू. जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. अंजली दोन तीन महिन्यांनी अठरा वर्षाची पूर्ण होतोय. तेव्हा तीन महिन्यांनी तुझं लग्न आहे तिच्याशी. आतापासूनच सुट्टी घेऊन ठेव. इतकंच सांगायला फोन केला."

"आजोबा, मला लग्न नाही करायचं. तुम्ही का माझ्या मागे पडले आहात. मला फक्त माझ्या कामावरच लक्ष द्यायचं आहे. मला अजून खूप काही करायचं आहे. मी आणखी कोणाची जबाबदारी घ्यायला आताच तयार नाही."

"तू फक्त लग्नात वधूच्या गळ्यात हार टाकायला हजर रहा म्हणजे झालं." कर्नल दीक्षितनी हुकूम सोडला. 

"आबा.."

"काय आबा? सत्तावीस वर्षाचा होणार आहेस. तूझ्या वयाच्या तूझ्या मित्रांना दोन मुलं आहेत. तुला कोणती मुलगी आवडत नाही. तुझी प्रेयसी नाही कि तुझ्यात काही कमी नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रश्न तूझ्या बाबाच्या खुन्याला शोधायचा... तर मित्रांसोबत खेळण्याच्या दिवसात, दिवस रात्र अभ्यास करून, अंग मेहनत घेऊन IPS पास केलीस, ASP झालास. अजून काय हवं? माझा बाप स्वातंत्र्य सेनानी, माझ्या आईचं सहकार्य पदोपदी मिळालं म्हणून कितीतरी पडाव पार पाडले त्यांनी. मी लग्न केल्यानंतरच कर्नल पदावर पोहोचलो. बिन लग्नाचं राहण्यात काय समजदारी मला समजत नाही. 

लग्न झाल्यावर जर कोणी त्याच्या कामावर लक्ष देऊ शकत नसेल तर ती त्या माणसाची कमजोरी. उगीच बाईला नाव ठेवणं बरोबर नाही."

"तसं नाही आबा."

"मग कसं आहे बाळा. अंजली अगदी तुला, तूझ्या स्वभावाला शोभेल अशीच आहे.  आता तुझा कोणताच बहाणा चालणार नाही."

"हो ना, दादामुळे मी आणि माझी तनु सुद्धा लटकलोय." संजय मागून म्हणाला. 

"आबा याचं लग्न लावून द्या आधी. माझी काहीच तक्रार नाही." अजय थंडपने म्हणाला. 

"तुझं झालं कि त्याचाच नंबर आहे. आता काहीच वाद विवाद नको. गुड नाईट."

"गुड नाईट दादा."

"गुड नाईट." अजयने फोनचे रिसिव्हर ठेऊन दिले. 

क्रमश :

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all