अखेर मातृत्व जिंकते तेंव्हा…..

Written by

कितीतरी वेळ कल्याणी हाॅस्पीटलच्या त्या एकाच जागेवर बसून होती आणि तिच्या डोळ्यातलं पाणी कमी होत नव्हतं. शेजारीच पोलीस काॅन्स्टेबल उभे होते आणि सगळ्यांच्या नजरा समोर असलेल्या त्या बेडवरच्या ऋषीकेशवर होत्या. तो कधी शुध्दीवर येईल ह्याचीच सगळे आतुरतेने वाट पहात होते. डाॅक्टरांची सगळी टिम जोमाने काम करत होती आणि त्यांच्या हाती यश यावं हीच सगळ्यांची प्रार्थना होती.

बराच वेळ एकाच जागी बसलेली कल्याणी उठली आणि तिने समोरच्या आयसीयूच्या काचेतून ऋषीला डोकावलं आणि त्याची ती अवस्था बघून तीला परत गलबलून आलं. तीला राहून – राहून एकच प्रश्न पडत होता की, “आपल्या संस्कारात नक्की काय कमी राहीली”? एक आई म्हणून आपण नक्की कुठे चुकलो. तिला तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं आणि ती भुतकाळात गेली.

रवी आणि कल्याणीच्या लग्नाला दहा वर्ष होऊनही घरात पाळणा हलला नव्हता. बरेच डाॅक्टर आणि त्यांची ट्रीटमेंट घेऊनही काही फायदा झाला नाही, म्हणूनच त्यांनी शेवटी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ते अनाथ आश्रमात जाऊन प्रोसीजर पूर्ण व्हायची वाट बघत होते आणि बाळासोबत नवीन आयुष्य कसं जगायचं याची स्वप्न रंगवत होते.

अशातच एक दिवस कल्याणीची कामवाली बाई आपलं दोन महिन्याचं लेकरू घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी काम करण्यासाठी तिच्या घरी आली. पण आधीच्या दोन मुली अन् आता मुलगा होऊनही तिचे भोग काही सुटत नव्हते अन् आजही ती काळेनिळे डाग घेऊन, सुजलेल्या चेहऱ्याने कामाला आली होती. ती आज अतिशय खंगलेली दिसत होती म्हणून कल्याणीने तिला कारण विचारलं. तशी कामवाली बाई ‘आशा’ रडायला लागली. चोरीचकाटी करून सतत मारहाण करणाऱ्या नवरयाला ती कंटाळून गेली होती मुली मोठ्या होत्या पण आताचा मुलगा खुप छोटा होता त्याचं संगोपन तिच्याच्याने होणार नव्हतं म्हणून ती निराश झाली होती. म्हणून ती मोठया कष्टाने म्हणाली की,

“बाईसाहेब तुम्ही मूल घेणारच आहात तर माझ्या ह्या मुलाला पदरात घ्या ,मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार”…. 

बाळाला पहात कल्याणीलाही अगदी गलबलून आलं आणि बरीच वर्ष काम करणाऱ्या आशाच्या ह्या मुलाची आई बनणं तिनं स्वीकारलं.

चोराचा मुलगा पुढे जाऊन चोरच होणार, रक्तातच आहे त्याच्या सगळं … मग तो चांगला कसा बनेल म्हणत सगळ्यांनी कल्याणीला भांडावून सोडलं होतं पण अापण ह्या बाळावर इतके चांगले संस्कार करायचे की, सगळ्यांच्या तोंडाला कुलूप बसेल एवढंच तिने पक्क केलं आणि आईपणाच्या कामाला लागली.

छोट्याशा ऋषीला छोट्या – छोट्या गोष्टी शिकवत ती त्याला मोठं करत होती. रवी आणि कल्याणीने जशी मुलाची अपेक्षा केली होती ऋषी त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत होता. सगळ्यांचा मान राखत तो एक खरा आणि सच्चा माणूस बनत होता ह्याचाच सार्थ अभिमान वाटत होता कल्याणीला….

पण एकाएकी हे काय झालं ?….. ऋषीने कोणत्यातरी मुलीला छेडलं आणि म्हणून त्याला खुप मारलं गेलं, अॅसीड फेकलं गेलं आणि आज तो आयसीयूत आहे अशी परिस्थिती कशीकाय निर्माण झाली. नक्की माझ्या मातृत्वात काय कमी राहिली की, ऋषीने हे असलं घाणेरडं काम केलं. पण हे सगळं जे झालं ते खरं आहे का नक्की काय झालं होतं काल! कोण देणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणत कल्याणी हमसाहमशी रडू लागली.

आपलं मातृत्व खरंच हारलं का?  आणि त्याच्यातलं रक्त खरंच जिकलं का हा प्रश्न तीला राहून-राहून सतावत होता.

तेवढयात कल्याणीच्या पाठीवर कोणाचातरी हात आला तिने वळून बघितलं तर ऋषीची मैत्रीण ‘सायली’ होती कल्याणीला पहात ती तिच्या मिठीत शिरली आणि रडू लागली. सायलीचे आई-वडीलही होते आणि त्यांच्या सोबत मोठे पोलीसही आले होते. कल्याणी हे सगळं पाहून भांबावली तिला काय चाल्लंय काहीच कळत नव्हतं. आणि मग शेवटी सायली बोलती झाली.

काकू !…..ऋषी आणि मी काल काॅलेजवरून घरी येत होतो. प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता म्हणून आम्हाला तिथेच खुप उशिर झाला होता. आम्ही निघालो तसं आमच्या काॅलेजचा सराईत गुंड आमच्या मागे आला. तो खुप दिवसांपासून मला सतावत होता म्हणुन मी त्याची पोलिसात तक्रारही केली होती आणि त्याचाच बदला म्हणून काल तो आमच्या मागे आला. “सायलीला सोडून निघून जा”, सांगूनही ऋषी तिथून गेला नाही आणि अचानक गुंडाच्या त्या मित्राने अॅसिडची बाटली काढली. चार – पाच जणांच्या मधे ऋषी आणि मी एकटे होतो आणि आतातर अॅसीडही होतं म्हणून त्यांचा सामना करत ऋषीने मला पळवून लावलं आणि स्वतः त्यांच्याशी झुंजत राहीला पण शेवटी ते अॅसीडही त्याच्याच वाट्याला आलं आणि अर्धा जळालेला चेहरा, भरपूर मार खात तो आज ईथे आला. सायली हमसाहमशी रडत होती. पुढे ती म्हणाली,  झाल्या प्रकरणाने मी घाबरले होते मी लगेच पोलिसांना कळवलं होतं पण आज त्याच्यावरच गुन्हा कसाकाय दाखल झाला याचं वाईट वाटलं. मी घरी सगळं सांगितलं आणि कमिशनर सरांना घेऊनच इकडे आले.

काकू! ….. आपला ऋषी गुन्हेगार नाही. त्याने ‘कृष्ण’ बनत त्याच्या सखीची इज्जत वाचवली तीला ख-या अर्थाने जिवनदान दिलंय. मला मिळालेला तो असा ‘सखा’ आहे जो न घाबरता एकट्याने झुंज देत त्याच्या ‘सखीचं’ रक्षण करत राहिला …. सायली रडतच सगळं सांगत होती.

तेवढयात डाॅक्टर आले आणि “ऋषी आता बरा आहे सांगत त्याची स्टेटमेंट घेऊ शकता सांगितलं”.

असं सांगताच कल्याणीने वा-याच्या वेगाने आयसीयूकडे झेप घेतली. ऋषी जवळ पोहोचताच त्याला पहात ती रडायला लागली. आणि त्याला हलकेच मिठीत घेत म्हणाली, माझ्या मातृत्वाने आज जन्मजात रक्तावर विजय मिळवलाय. “आमच्या घरातील हा ‘कृष्ण’ स्त्रीच्या रक्षणासाठी घायाळ झालाय , तिच्यासाठी विद्रुप बनूनही तो, अजूनच सुंदर बनलाय,…आज ‘स्त्रीची’ इज्जत वाचवत त्याने माझ्या मातृत्वालाही जिंकवलंय”.

©Sunita Choudhari.

(मित्र- मैत्रीणींनो आणि माझ्या वाचकांनो नमस्कार. आज मी कृष्णाच्या  त्या ‘सख्याचं’ रुप घेऊन आलीये ज्याने त्याच्या ‘सखीची’ इज्जत वाचवली होती. तुम्हाला आजची कथा कशी वाटली मला नक्की सांगाल. धन्यवाद .)

 

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा