अगबाई सासुबाई… खरंच जमेल का????

Written by

अगबाई सासूबाई…खरंच जमेल का???

‘अगबाई सासूबाई’ सिरीयल सध्या जोरात चालले. जितक्या नकारात्मक तितक्याच सकारात्मक प्रतिक्रियांमुळेही ती आधीच खूप चर्चेत आहे. पण नेहमीच ते सासू सून परीघ सोडून एका वेगळ्याच विषयाला हात घातल्यामुळे नवीन पिढीही आवर्जून ही मालिका बघतेच. मी कधी बघत नाही पण योगायोगाने शेजारच्या आजी ती मालिका बघत होत्या आणि मी बाजूलाच होते. एक सीन असा होता की अभिजित आसावरी साठी घराबाहेर फुले ठेवतो आणि प्रज्ञा तिच्यासाठीच ठेवलेत अस समजून घेऊन जाते तर यावर आजी अगदी नाक मुरडून म्हणाल्या “ही बया का आली इथे आता”. पुढचा सीन आसावरी अभिजीतच्या भेटीचा होता पण त्यातही प्रज्ञाने लुडबुड केलीच… तेव्हाही आजी अगदीच वैतागून “बया इथं पण टपकली…भेटुदे की त्या दोघांना जरा”अशा म्हणाल्या.

आजींच्या या प्रतिक्रियांवर मी मात्र आश्चर्याने बघत होते… एकीकडे प्रेमविवाहाला विरोध असणाऱ्या आजी मालिकेतील प्रेम स्वीकारतात तेही चाळीशीच्या पुढील वयातलं प्रेम???

खरंच हे त्यांच्या बुद्धीला पटत का किंवा मालिकेत सोडून वास्तवात त्यांच्या जवळपास अशी घटना घडली तर त्या पाठिंबा देतील या घटनेला की विरोधच दर्शवतील..असे प्रश्न विचारावेसे वाटले पण हिंमत झाली नाही.

खरंतर त्यांनी सरळ नाही म्हणूनच उत्तर दिलं असत मला कारण आताच्या काही तरुण पिढीलाही हा विषय पचायला कठीण जातोय तर त्या सत्तरीतल्या आजी कशा सहज स्वीकारतील हे प्रेम. यावरून एक कळाल की एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून किंवा विरंगुळा म्हणून प्रेक्षक अशा मालिका बघतात. टीव्ही मध्ये दाखवणाऱ्या गोष्टी त्यांना एक गोष्ट  स्वरूपातच आवडते पण ती सत्यात उतरलेली आवडत नाही.

प्रेमाला वय नसतं अस म्हणणारे जेव्हा ‘या वयात कोणी प्रेम करत का ? काय गरज या वयात आता अशी थेर करायची?’ अशा प्रतिक्रिया या मालिकेबद्दल देतात तेव्हा हसावं की रडावं काही कळत नाही. खरंतर कीवच येते अशा विचारांची. कोणत्या वयात प्रेम योग्य आणि कोणत्या वयात ते अयोग्य याबाबतही कुठे काही परिमाण लिहून ठेवली आहेत का?? नाही ना…या सीमारेषा आपल्यातल्या माणसांनीच ठरवल्या आणि तेही फक्त स्त्रियांच्याच बाबतीत. तिने विधवा झालं की कसं सगळ्या आनंदापासून दूर राहावं, सगळ्या सुखां पासून लांब रहावं, स्वतःसाठी न जगता इतरांचा म्हणजे समाजाचाच विचार करून जगावं हेच सांगितलं जातं. पण हेच नियम पुरुषाच्या बाबतीत लागू होत नाहीत..त्याची बायको गेली की त्याच्या मनात जरी नसेल तरी त्याच दुसरं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात किंवा त्याला दुसऱ्या लग्नासाठी लगेच    संमतीही दिली जाते.

या मालिकेत एका विधवा स्त्रीच्या जगण्याच्या व्यथेसोबतच एक प्रेमाचं नाजूक नातं उतारवयात फुलताना दाखवलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जोडीदाराची गरज भासतेच. आजूबाजूला आपली मुलं,सून,नातू,सासू,सासरे,आई,वडील अशी जिव्हाळ्याची माणसं असली तरी जोडीदाराची जागा कोणी घेऊ शकत नाही.  ते एक हक्काचं माणूस वयाच्या प्रत्येक वळणावर सोबत हवंस वाटतंच. नियती मात्र कधीतरी जोडीदाराशिवाय जगण्याची शिक्षा देते. ही शिक्षाही स्वीकारून एकटेपणात स्वतःला गुंतवून जगणं चालूच असतं…चेहऱ्यावर उसनं हसं आणून आनंदी आहे हे दाखवणं चालूच असतं पण याच वळणावर केव्हातरी पुन्हा एक आधार आपलासा,प्रेमाचा,जिव्हाळ्याचा वाटू लागला तर त्याला हक्काने आपलं म्हणण्यात काय हरकत असावी? आणि या नात्याला इतरांनी संमती देण्यात तरी काय हरकत असावी??

एकटेपण गडद काळोखापेक्षाही भयानक असते..तोंडावर हसू असलं म्हणजे ती व्यक्ती आंनदी किंवा समाधानी आहे असं म्हणता येत नाही. तिलाही तीच हितगुज करायला,हक्काने भांडायला,हसायला,रडायला हक्काचं माणूस सोबत हवं असतंच पण या वयात लोक काय म्हणतील या विचाराने मनाचा कोंडमाराच जवळ केला जातो. त्या व्यक्तीचे नातेवाईकही तिलाही किंवा त्यालाही हक्काची सोबत हवी असेल असा विचारही करत नाही कारण त्यांचं वय आता प्रेमाचं नसतं असंच मानलं जातं. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत असे निर्णय घ्यावेत अस काही नाही….पण ज्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने ही साथ मिळत असेल, मिळणार असेल तर समाज,जग,चालीरीती यांचाच विचार करून त्यांच्यावर एकटेपण लादण कितपत योग्य आहे???

मालिकेबाबत कित्येकांनी ही आपली संस्कृती नाही बंद करा असे म्हंटले, वेगळे विषयच नाहीत का दाखवायला असे ताशेरेही ओढले, काहींनी जातीवरूनही नको ती विधान केली पण यात दोघांचाही दाखवलेला एकटेपणा कोणालाच दिसला नाही किंवा दिसूनही तो दुर्लक्षित केला असावा…जसं नेहमीच्या आयुष्यात आपण करतोच.

जितकं सहज सुदंर मालिकेत दाखवलं तितकं सहज सोप्प वास्तवात नक्कीच नाही…आणि मालिका  आवडते,विषय वेगळा आणि छान आहे असं म्हणणारेही वास्तव जगात त्यांच्याच माणसांबाबत असे निर्णय घेऊ शकतील का हा मोठा प्रश्न आहे. शुभ्रा जितक्या सकारात्मकतेने या विषयाकडे बघते..सकारात्मक पाऊलं उचलते तस वास्तवात खरंच जमेल का???  तस जमवायचं असेल तर जमेल ही पण मागासलेल्या समाजाच्या चाकोरीतून आधी बाहेर पडावं लागेल. विधवा किंवा विधुर  किंवा उतरत्या वयात कसलं आलं प्रेम या शब्दांपलीकडे जाऊन ती स्वतंत्र व्यक्ती असून तिलाही प्रेम करण्याचा, जगण्याचा अधिकार आहे हे समजून घ्यावं लागेल.

या मालिकेनिमित्त आपला व्यक्ती दुरावल्यानंतर संसाराची जबाबदारी एकट्याने सांभाळल्यानंतर एका वळणावर विसाव्यासाठी हक्काचा खांदा किती महत्वाचा आहे किंवा या बदलाची समाजाला किती गरज आहे हेच दाखवलं गेलंय पण खरंच माणसाच्या मनापेक्षाही चार लोकांचा, संस्कृतीचा अवडंबर माजवणाऱ्या या समाजात निडरपणे हे बदल करणं जमणार आहे का???? विचार योग्य वाटतात पण अशी कृती करायला आपलं पाऊल धजावणार आहे का???? की केवळ एक मनोरंजन म्हणूनच तुम्ही या मालिकेकडे बघता???

विषय नाजूक आहे…तितक्याच नाजूकतेने,संवेदनशीलतेने विचार करून असे बदल व्हायला हवेत हे माझं मत. तुम्हाला काय वाटतं..खरंच जमेल का हे??? सांगा कंमेंट्स मध्ये😊.

लेख आवडल्यास नक्की लाईक,कॉमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच😊🙏.

©सरिता सावंत भोसले

 

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.