अद्रुष्य आत्मा

Written by

दोन्ही हात चपखलपणे गोल फिरवून रवी ट्रॅक्टर च्या स्टीयरिंग ला वळण घेत घरापुढे सफाईदारपणे उभी करत होता. दारासमोरील जागेत दोन खुर्च्या टाकून अप्पा आणि दादा खोल चर्चा करत होते.. रवीचे हात आणि डोळे ट्रॅक्टर वर पण कान मात्र त्यांचा बोलण्याकडे टवकारले होते…कानात प्राण आणून त्यांचं बोलणं ट्रॅक्टर च्या कर्णकर्कश आवाजातही ऐकायचा प्रयत्न करत होता…

रवीला पाहताच अप्पा मिश्कीलपणे हसले, दादा रवी कडे एक वेगळ्याच नजरेने पाहत होते, कितीतरी वेळ दादा आणि रवी चे डोळे एकमेकांशी भिडलेले, काहीतरी संवाद करत होते…

“यंदा कर्तव्य आहे बरं का रवी…या साली आटोपून टाकू तुझं…”

“रवी ला समजलं की आपल्या लग्नाचं बोलणं होत होतं… त्याने दादासाहेबांकडे एकदा पाहिले, आणि म्हणाला…”

“नमस्कार, माफ करा पण मी पहिल्यांदाच तुम्हांला पाहतोय, आपली ओळख??”

“रव्या अरे हे शेजारच्या गावातले मोठे बागायतदार, काल मार्केट मध्ये भाव करायला गेलो तेव्हा ओळख झाली, बोलता बोलता मुलांचे विषय निघाले, त्यांचीही मुलगी आहे लग्नाची, म्हटलं चला तोडीस तोड खानदान आहे….बघायला हरकत नाही…काय म्हणतोस…?”

“अप्पा मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का…”

“हो माहितीये, पण तरीही एकदा मुलीला पाहून घे…”

“मी आत्ताच आमंत्रण देतो, उद्या या घरी मुलीला पाहायला…” दादा उतावीळ होऊन म्हणाले…

रवी ला दादांचा उतावीळपणा पाहून हसू आवरले नाही…शर्टावरची मातीची धूळ झटकत तो आत निघून गेला, जात जाता परत एकदा दादांकडे पाहिले, दादा रवी कडेच बघत होते…

दुसऱ्या दिवशी सर्वजण मुली बघायला गेले, आक्कासाहेब फारच उत्सुक होत्या, त्यांच्या लाडक्या रवीचं लग्न ठरवायचं होतं…

रवीने फ़ारशी तयारी केली नव्हती, साधारण तयार होऊन तो निघाला होता त्यामुळे आक्कासाहेब जरा चिडचिड करत होत्या…

शीतल कांदेपोहे घेऊन आली, नजरेत कसलेतरी सूक्ष्म भाव होते… लाजाळूपणा, भीती, चलबिचल.. यातले कुठलेही भाव तिच्या नजरेत नव्हते…पण एक आवेश होता…डोळ्यात एक आग होती…
अक्कासाहेबांना तिचे लोभस रूप, तिचा आत्मविश्वास आणि तिचं वेगळेपण आवडलं…आप्पासाहेबांना तिच्या चेहऱ्याकडे बघून काहीतरी गूढ वाटलं…हा चेहरा कुठेतरी मिळताजुळता भासतोय…छे.. वयानुसार भास होत असतील…

सर्वांची पसंती झाली, रवी ने कसलेही आढेवेढे न घेता होकार दर्शवला… त्याला तिच्याबद्दल काय आवडलं कळलं नाही…दोघांनाही एकमेकांशी बोलायला बाहेर पाठवलं…

त्यांच्या बाहेर जातांनाच्या पाठमोऱ्या आकृतीत ती दोघे कसल्यातरी मिशन ला निघाताय असा अविर्भाव अप्पासाहेबांना वाटला, आणि पुढच्याच क्षणी स्वतःच्या या कल्पनिकतेवर स्वतःलाच हसू आलं….

दादासाहेब मिशन फत्ते झाल्याच्या आवेशात होते…पसंती होण्या नंतर दादासाहेबांचा चहाचा घोट घेण्याचा स्पीड वाढला होता…कारण पुढची कामं करायला आता तयारीला लागायचं होतं… दादासाहेब फारच उतावीळ…

शीतल ला आई नव्हती, दादासाहेबांनी तिचा सांभाळ केला…त्यामुळे आक्कासाहेब शीतल ला आईची माया देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होत्या….

लग्न पार पडलं…सत्यनारायण पूजा आटोपून सर्व पाहुणे निघून गेले, आता संसाराची सुरवात झाली…

आक्कासाहेब शीतल ला आपलं शेत दाखवत होत्या..

“ते बघ तिथे कांद्याची लागवड, तिथे डाळिंब…पाणी केव्हा येतं, सालदार कोण कोण आहेत सर्व माहिती त्या देत होत्या…शीतल बारकाईने सर्व बघत होती…आक्कासाहेब तिला सांगत होत्या ओण तिची नजर एका मोकळ्या वावराकडे सारखी जायची…आक्कासाहेबांचं बोलणं संपलं तसं तिने पूर्वेकडील त्या दिशेला बोट करून विचारलं…”तिथे काय आहे??”

आक्कासाहेबांची इतका वेळ नाचणारी जीभ आता संथ झाली, पदराने कपाळावरचा घाम पुसत त्या म्हणाल्या…

“तिथे कधीही जाऊ नकोस, गेली कित्येक वर्षे आम्ही तिथे पायही ठेवलेला नाही…ती जागा पछाडलेली आहे, भुताटकी आहे तिथे…”

शीतल ने आता आपली नजर त्या जागेवर अजून स्थिर केली…अक्कासाहेबांनी काहीतरी कारण काढून शीतल ला पटदिशी तिथून काढलं आणि घरी नेलं…

शीतल आणि रवी खूप गप्पा मारत…पण कायम एकांतात… नवरा बायकोचं सुत जुळलं हे पाहून सर्व खुश…

रवी आणि शीतल च्या खोलीतून अजब आवाज येऊ लागले…आप्पासाहेब आणि आक्कासाहेब दचकायच्या…पण कसं विचारणार..? नवीन लग्न झालेले…

आप्पासाहेब एकदा रात्री 2 वाजता आवाजाने दचकून जागे झाले, चोर वगैरे आहे की काय ते पाहायला बाहेर आले..अचानक नजर घरासमोर दिसत असलेल्या आपल्या दूरवर पसरलेल्या शेतावर गेली…ज्या जागेत भुताटकी म्हणून कोणीही जात नव्हते तिथे आता एक विचित्र प्रकाश दिसू लागलेला…आप्पासाहेब आधीपासून त्या जागेला घाबरत…अप्पासाहेबांना घाम फुटला…घरात येऊन दार पटदिशी लावून घेतले…रात्रभर घामाच्या धारा आवरत आप्पासाहेब कूस बदलत होते..

दुसऱ्या दिवशी आप्पासाहेब पुन्हा एकदा धीर करत रात्री उठले…पुन्हा तेच…चित्र विचित्र आवाज…आता दोन पांढऱ्या आकृत्या पाठमोऱ्या दिसू लागल्या…अप्पासाहेबांचा श्वास सुटू लागला…शरीर घामाने भिजले गेले…अप्पा लगबगीने दाराकडे धावत सुटले, दाराजवळच्या दोन कुऱ्हाडी…रक्ताने माखलेल्या….अप्पा थरथरू लागले…तिथेच बेशुद्ध… सकाळी पुन्हा लवकर जाग आली…घरात सर्व झोपलेले त्यामुळे अप्पासाहेबांच्या बेशुद्धीचे कुणालाही समजले नाही…

सकाळचे 6 वाजलेले…उठल्या उठल्या कुऱ्हाडीनकडे नजर गेली…काल रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडी आज पुर्वतत झालेल्या…

आप्पासाहेबांचा धीर सुटला…आप्पासाहेब पळत पळत त्या भुताटकीच्या जागेवर गेले..गुढघे टेकवून गयावया करू लागले…

“गंगाराम…सीताराम…माफ करा मला..खूप वाईट केलं मी तुमच्यासोबत…हवं तर मी प्रायश्चित्त घेतो…पण सोडा मला….तुमची जमीन मी हडप केली…माझी मती फिरली होती…तुम्ही पोलिसात जाणार म्हणून मी इथेच… इथेच तुमच्या डोक्यात कुऱ्हाडी घालून मी तुम्हांला मारलं आणि इथेच पूरलं…तुम्ही दोघे जिवलग मित्र होते..म्हणून दोघांनाही मारणं मला भाग होतं… कोणी जमीन कोरून तुमच्या मृतदेहापर्यंत पोहोचू नये म्हणून मी सर्वांचं या वावरात येणं वर्ज्य केलं… “

इतक्यात त्या दोघांचे कर्णकर्कश्श आवाज एकत्रित अप्पांच्या कानात थैमान घालू लागले…”खून…तळतळाट…माफी नाही…घोर अपराध… जमीन…हडप…” असे वाक्य कानावर मारा करू लागले…आप्पासाहेब कानावर हात ठेवत घराकडे पळत सुटले…पळता पळता त्यांचा

दुसऱ्या दिवशी आक्कासाहेब शीतल कडे आल्या, तिला म्हणाल्या…”पोरी, रवी माझा खूप लाडका आहे, पण एक सत्य आहे जे तुझ्यापासून आम्ही लपवलं..”

“कोणतं सत्य??”

“रवी आमचा मुलगा नाही, 7 वर्षाचा असताना आमच्याकडे काम मागायला आला होता, मला दया आली, पोटचं पोर नाही म्हणून त्यालाच मुलगा मानलं..त्याला कधीही आई बापाची कमी जाणवू दिली नाही…आमचा मुलगाच आहे तो…” शीतल आता काय प्रतिक्रिया देते या विचाराने आक्कासाहेब घाबरल्या होत्या….

शीतल च्या चेहऱ्यावरचे हावभाव जराही बदलले नाही…

“हरकत नाही आक्कासाहेब…”

शीतल ने इतकी थंड प्रतिक्रिया दिली हे पाहून आक्कासाहेबांना नवल वाटले…तिचा समजूतदार पणा असेल म्हणून आक्कासाहेबांनीही जास्त विचार केला नाही.…

इकडे अप्पासाहेबांचे मन थाऱ्यावर नव्हते, मधूनच घाम फुटायचा, कोणाशीही ते बोलत नव्हते..एक एक क्षण घालवणं कठीण हिउन बसलेलं… झोपायचीही सोय नाही, झोपलं की स्वप्नात परत सीताराम आणि गंगाराम….

अप्पासाहेबांनी एका मंत्रिकाकडून राख आणली, ती त्या जागेवर टाकून भूतपिशाच नाहीसे होईल असा मंत्रिकाचा सल्ला होता…आप्पासाहेब ते घेऊन वावरात निघाले, आक्कासाहेब त्यांचा पाठोपाठ आल्या…”थांबा जरा मलाही येउद्या, कोथिंबीर काढून आणू म्हणते….” 

आक्कासाहेबांमुळे दादांना काही जाता आलं नाही, आता रात्री सगळे झोपले की मगच जावं लागणार..

रात्री सगळे झोपले, आप्पासाहेब 2 वाजता उठून त्या जागेवर गेले…आज भयाण वारा सुटला होता, वाऱ्याचा तो घोंगवणारा आवाज खूप भयानक होता…खरं तर दादांची त्या ठिकाणी जायची हिम्मत नव्हतीच पण एकदाचा सोक्ष मोक्ष लावावा म्हणून दादांनी एकदाची हिम्मत केली….

एकूण वातावरण पाहता दादांची घाबरगुंडी उडाली…दादा जसजसे जागेकडे जात तसतसा वारा अजून घोंगवायचा… आवाज अजून तीव्र व्हायचा….

दादांनी थरथरत्या हातानी खिशातली पुडी काढली आणि त्या जागेवर राख ओतली…राखेचा शेवटचा कण खाली पडला तसे दादा वाऱ्याचा वेगाने पळत सुटले….पण कुणीतरी दादांचा पाय पकडला…वळून पाहतो तर कुणीही नाही…दादा जिवाच्या आकांताने पाय सोडवायचा प्रयत्न करत होते, कितीतरी वेळ झटापट चालली…इतक्यात लक्ख प्रकाश पडला… मुसळधार पाऊस सुरू झाला, दादा पुरते भांबावले.…जोरदार आवाज झाला आणि आकाशातल्या विजेने दादांना घेरलं…दादांनी श्वास सोडला…

दुसऱ्या दिवशी पंचनामा झाला…अक्कासाहेबांना शीतल धीर देत होती, रवी सोपस्कार करण्यात व्यस्त होता…

इन्स्पेक्टर दराडे हवालदार शिंदे ला घेऊन घटनास्थळी पोचले…
दादांचा मृत्यू नेमका विजेने झाला की त्यांना करंट दिला गेला?? याचा शोध ते घेत होते…

“घरात कोण कोण असतं…?”

“रवी, शीतल, मी आणि …..”

“सावरा स्वतःला, मला सांगा दादा इतक्या रात्री शेतात काय करत होते??”

“माहीत नाही, काही दिवसांपासून ते जर घाबरलेले दिसले, कारण विचारलं तर सांगत नव्हते…”

“रवी कुठे होता??”

“रवी आणि शीतल त्यांचा खोलीत झोपले होते….”

त्यांनी घराची झडती घेतली…

रवी च्या खोलीत त्यांना कुंकवाच्या डब्या, कुऱ्हाडी आणि बॅटरी मिळाल्या..

तपास करतांना त्यांना सत्य समजले…त्यांनी तडक आक्कासाहेबांकडे धाव घेतली….

“रवी आणि शीतल….का केलंत तुम्ही असं?? काय कमी होतं तुम्हांला??”

“इन्स्पेक्टर, काय बोलताय?? माझी पोरं…काय केलं…??”

“तुम्ही सांगता की मी सांगू??”

हो…हो शीतल आणि मी मिळून दादांना घाबरवलं… आमच्या बापाला शांती मिळवायला…दादांना मारायचं होतं….”

“रवी, शीतल…काय बोलताय तुम्ही???”

“आक्कासाहेब, माफ करा….मी कामाच्या शोधात इथे नव्हतो आलो..मुद्दामहून आलो होतो…सूड घ्यायला….माझ्या बापाच्या खुनाचा….सीताराम चा….”

“आणि मीही माझ्या बापाच्या….गंगारामच्या खुनाचा सूड घ्यायला..अप्पासाहेबने आमच्या गरीब बापांची जमीन बळकावली.आम्हाला रस्त्यावर आणलं…आमचा बाप पोलिसात गेला तेव्हा रात्री वावरात बोलवून कुऱ्हाडीने वार करून निर्दयीपणे आमच्या बापाला मारलं…..रवी चा बाप आणि माझा बाप, पक्के मित्र…म्हणून एकसोबत दुसऱ्यालाही मारलं….” डोळ्यातून आग फेकत शीतल म्हणाली….

“अप्पांना त्यांचा कर्माची जाणीव व्हावी म्हणून आम्ही आमच्या खोलीतून त्या जागेपर्यंत एक भुयारी मार्ग तयार करत होतो, तो झाला आणि आम्ही दोघे त्या ठिकाणी जाऊन बॅटरी ने, पांढऱ्या कपड्यांनी दादांना घाबरवत होतो…आप्पा कधी त्यांचा गुन्हा काबुल करतील आणि तो रेकॉर्ड करून आम्ही आप्पाना अटक करवू याचीच वाट आम्ही पाहत होतो…कुऱ्हाडीला कुंकवाच पाणी लावलं..सकाळ व्हायच्या आत ते पुसलं….जोपर्यंत आप्पांना शिक्षा होत नाही तोपर्यंत कसलाच विचार करायचा नाही असा ठाम निर्धार केला..शीतल आणि मी, याच एका विचाराने फार पूर्वी एकत्र आलो, पण मिशन फत्ते करायचं तर दोघांना एका घरात राहून करायचं होतं….मग दादासाहेबांना हाताशी घेऊन आम्हीच ते जमवून आणलं….शीतल चा काका, दादासाहेबांना पूर्वकल्पना देऊन मार्केट मध्ये भेट घडवून आणली, ते अचानक नव्हतं…पूर्वकल्पित होतं… आम्ही लग्न केलं… आणि आमचं काम सुरू केलं….”

“इन्स्पेक्टर साहेब, करू का यांना अटक??” शिंदे म्हणाला…

“नाही….यांनी जरी कट रचले असले तरी अप्पासाहेब वीज कोसळूनच गेले…त्यांचा मृत्यू आकस्मिक आहे, हत्या नाही….”

“साहेब पण हे कसं घडून आलं??”

शिंदे, विज्ञान कितीही पुढे गेलं तरी काही गोष्टींची उकल  त्यालाही जमलेली नाही….निसर्ग शेवटी त्याचा हिशोब चोख बजावतो….अप्पांना ऐकू येणारे आवाज यांनी काढले नव्हते….”

“मग कोणी काढलेले??”

“सीताराम आणि गंगाराम च्या अदृश्यावस्थेत भटकणाऱ्या आत्म्यांनी..सगळ्या गोष्टींची उकल या निसर्गाने दिलेली नाही, काही गोष्टी निसर्गावरच सोपव्यवा लागतात.”

आक्कासाहेब हे सगळं ऐकून स्थब्ध झाल्या….पण अप्पांच्या या कृत्याची त्यांना चीड आली….
शीतल आणि रवी आता आक्कसाहेबांसाठी जगत होते….
ज्या वावरात सीताराम आणि गंगाराम ला पूरलं होतं तिथे शांती करण्यात आली, त्या मातीला गंगेत विसर्जीत करण्यात आलं…दोघांनाही आज मुक्ती मिळाली होती

Article Categories:
भयपट

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा