अनपेक्षित आनंद….!”

Written by

अनपेक्षित आनंद….!”

फूड अँड नुट्रिशन मध्ये डिग्री घेऊन बेकिंगचा एक कोर्स करून दर्शनाने घरच्या घरी केक ऑर्डर घ्यायला सुरवात केली. घरात कशाचीही कमी नव्हती. नोकर, चाकर सतत हाताखाली काम करायला असायचे. संदीपचा स्वतःचा खाजगी व्यवसाय होता. पण कुठेतरी एक मानसिक समाधान जीवनात हरवल्या सारख्या तिला वाटायच. लग्नाला दहा वर्षे होऊन गेली तरी घरात पाळणा हलला नाही. सगळे उपचार करुन झाले तरीही निष्कर्ष काहीही नाही. घरात नुसतं बसून राहण्यापेक्षा काही तरी करावं म्हणून दर्शनाने बेकरी सुरु करण्याचा मानस संदीप समोर ठेवला. कशाचीही वाट न बघता बेकरीसाठी लागणारी जागा शोधण्यासाठी दोघे कामाला लागले.

दिवसोंदिवस शहराचा विस्तार वाढतच होता. हिरवळ नष्ट होऊन तिथे मोठ्मोठी सिमेंटची इमारत उभी होत होती. पण निसर्ग प्रेमी असलेल्या त्या दोघांनी आपला मनातला हळवा कप्पा जपत शॉपिंग कॉम्प्लेक्स बनत असलेल्या एका ठिकाणी नवीन दहा झाड लाऊन आपली बेकारीची जागा निश्चित केली. अक्षय त्रितीयेच्या मुहूर्तावर एका नामांकिती शेफला सुद्धा सेलेब्रिटी म्हणून बोलावले होते.

बेकरी समोर, आजूबाजूला अनेक नवीन इमारतींचे काम काज चालू होते. शॉपमध्ये बसल्या बसल्या त्या मजुरांची लगबग पाहत राहणे तिचा विरंगुळा झाला होता. ते मजूर आपल्या बायका मुलांसोबत इथेच येईल राहत होते. नवरा बायको दोघेही दिवसभर काम करीत असे आणि त्यांची मुले तिथेच उन्हातान्हात बाजूला साचलेल्या ढिगाऱ्यावर खेळत भटकत असे. नकळत दर्शना त्या मुलांमध्ये अडकत चालली होती. आसपास इमारतीमध्ये सर्व आयटी विभागात काम करणारी कुटुंब. सगळीच बऱ्यापैकी सधन. नवीन आणि चवीला एकदम चटक लावणारे तिचे केक लवकरच त्या विभागात नामांकित झाले. मोठाल्या गाड्यांमधून लोक “दर्शना केक बेकरी” मध्ये केक घ्यायला येत. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हवे तसे घरपोच केक सेवा ती देत होती.

एकदिवस सहजच ती मजुरांची दोन चार मुलं तिच्या बेकरी समोर उभी राहून काचेतून केक न्हाहाळत होती. ते बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे हे दर्शनाच्या नजरेने लागलीच हेरले. चौकीदाराने त्यांना हटकले ,पण दर्शनाने त्याच्या हातावर चॉकलेट ठेवले आणि ती मुले धूम पळत सुटली. त्यांचे ते मळकट हात, अस्ताव्यस्त कपडे आणि चॉकलेट मिळाल्याचा तो आनंद त्यांच्या चेहरऱ्यावर ओसंडून वाहत होता. ती मुले निघून गेली मात्र त्यांची छाप दर्शनाच्या मनात कोरली गेली होती. तिला वाटले ह्या गरिबीने माखलेल्या मुलांचा सुध्दा कधीतरी वाढदिवस असेलच की..? पण कुठे त्यांची परिस्थिती ते साजरा करण्याची..! कसेबसे दोन वेळचं जेवण मिळत ह्यांना…तेव्हा कसली आली त्यांची हौस मौज…! श्रीमंतांची मुले केक खाण्या ऐवजी तोंडाला फासून वाया घालवितात आणि त्यात त्यांचा आनंद व्यक्त करतात आणि ह्या मुलांच्या कल्पनेतही केकला स्थान नाही…विचार करून दर्शना अस्वस्थ झाली.

घरी येऊन तिने त्या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा संदीप समोर व्यक्त केली. संदीप ने स्वतः चा वाढदिवस त्यांच्यासोबत साजरा करण्याची इच्छा बोलून दाखविली.

महिन्याभरात संदीपचा वाढदिवस होता. दर्शना झपाट्याने कामाला जुंपली. मैत्रिणीला हाताशी घेऊन सर्व आजूबाजूच्या सर्व मुलांना एकत्रित केले. रोज तासभर त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. स्वच्छतेचे महत्व त्यांना समजून सांगितले. जणू छोटीशी शाळाच तिथे भरली होती. तिने सगळ्यांना दोन दोन जोडी कपडे सुद्धा वाटप केले.

बघता बघता संदीपच्या वाढदिवसाचा दिवस उगवला. आज सगळी मुले स्वच्छ कपडे घालून, केस विंचरून आली होती. मुलांना बरोबर घेऊन बेकरीच्या बाहेर तिने फुग्यांनी सजावट केली होती. टाळ्यांचा आवाजात संदीप येताच हॅपी बिर्थडे चे गाणे सगळ्या मुलांनी तालासुरात म्हणायला सुरवात केली. संदीप येताच दर्शनाने त्याच्यासाठी मोठा केक बनविला होता. नेहमी काचापलीकडे दिसणारा केक आज सगळ्यांच्या नजरेदेखत होता. तो केक बघताच मुले बहरून गेली होती. टाळ्यांचा गडगडाटात संदीपने केक कापून सर्व मुलांना वाटायला सुरवात केली. किती फोटो देखील काढून झाले होते. केक सोबत चिवडा,चिप्स आणि भेट वस्तू म्हणून वही पेन्सिल देखील मुलांना दिली. बेकरीमध्ये रोजच दर्शना केक बनवत होती. त्यांना ती कधीही देऊ शकत होती. पण मुलांसोबत अशा पद्धतीने आनंद साजरा करून तिने एक वेगळाच सामाजिक विचार सगळ्यांसमोर मांडला.

संदीपला ओवाळणी करतांना निरंजनेतील प्रकाश दर्शनाला जगण्याची नवी दिशा दाखवून गेला. बोटे चाटून पुसून केक खात असलेली मुले आणि त्यांच्या चेहरऱ्यावर असलेलं ते समाधान आणि सुख दोघांनाही पराकोटीचा आनंद देऊन गेलं…!

धन्यवाद…

मैत्रिणिंनो, दुसऱ्यासाठी काही करताना आपल्याला झेपेल इतकंच करावं. तेव्हा कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करता येतं. त्यासाठी हे करायला आपण खूप झटतो. प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे करतो,कोणताही स्वार्थ मनात नसतांनाआणि आनंदाने करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असायला हवा. आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न जेव्हा केला जातो , त्यावेळी जो आनंद भेटतो तो पराकोटीचा असतो.

ह्या वरील उतारा राजश्री बुरकेले ह्यांचा लेखातील आहे.

तुम्हाला काय वाटतं, मला सांगायला विसरु नका. तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत ,तुमची मैत्रीण…

नेहा खेडकर❤✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत