‘अन्न’ आणि ‘भुक’ ची जात कोणती?..धर्म कोणता?…

Written by

काल जरा निवांत बसत पेपर वाचत होते. आणि पेपरमधल्या एका बातमीने मन अक्षरशः गढूळ होऊन गेलं.

“आॅनलाईन जेवणाची आॅर्डर घेऊन एका हिंदू माणसाच्या घरी एक मुस्लिम मुलगा गेला आणि त्या हिंदू माणसाने आमचं श्रावण चालू आहे आणि अशामधे एका मुसलमान मुलाच्या हातून ही आॅर्डर आम्हाला नको आहे म्हणत ती जेवणाची आॅर्डर कॅन्सल केली. वरतून मुस्लिम माणसाला अशा कामांना तुम्ही का ठेवता असा प्रश्न विचारत त्या दुसरा मुलगा अशा कामाला ठेवा अशी मागणी केली. कंपनीने शांतभाषेत त्याला उत्तर दिले परंतू आपण यावीरोधात  कायदेशीर  कारवाई करु अशी धमकी देत ह्या हिंदू माणसाने हे प्रकरण ताणून धरलं आणि अजूनही ते तसंच चालू आहे”

मी ही बातमी वाचत त्यावर विचारच करत होते तेवढ्यात माझी आठ वर्षाची लेक गुनगुन सतत काहीतरी मनात बोलत होती आणि काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होती बराच वेळा काय आठतीएस विचारूनही ती मला काहीच उत्तर देत नव्हती. मी तीची ही परिस्थिती बघत होते पण मलाही काही न कळाल्याने मी आपली गप्प राहून तिच्याकडे बघत होते आणि मगाशी वाचलेल्या बातमीचा विचार करू लागले.

आपला भारत देश हा एकमेव असा देश आहे की, जिथे वेगवेगळ्या धर्माचे ,जातीचे, पंथाचे लोक गुण्यागोविदानं नांदतात. विविधतेने नटलेली आपली संस्कृती आज प्रत्येक बाहेरच्या देशाला आकर्षित करते.

आज आपण इतकी प्रगती केली की चंद्रावरही पोहोचलो पण तरीही काही ‘शिकलेले अशिक्षित‘ स्वतःच्या अशा बुरसटलेल्या विचारांनी समाजाला गढूळ करतात.

अन्नाची कुठली जात असते का? …..भुकेला कुठली जात असते का? धर्म असतो का? ……मग ते अन्न घेऊन येणाऱ्याचा धर्म कसा काय दिसला असेल ?

अजूनही आपल्याकडे असले खुप आजारी लोक आहेत ज्यांना माणूसकीचीच अॅलर्जी आहे. अशी वर्तणूक करून आपण आपल्या पुढच्या पिढीला नक्की काय शिकवतोय ह्याचं तरी भान असावं नाही का? …..

माणूस म्हणून जन्माला आलो पण जसंजसं आयुष्य जगू लागलो तसंतसं काही माणसांचं रूपांतर हिस्त्रं पशूत व्हायला लागलय.

नक्की कुठे हरवलीये आपली माणुसकी ?……ज्या राजाचा सगळीकडे दबदबा अजूनही आहे त्या आपल्या शीवाजी महाराजांचा खास माणूस हा मुस्लिमच होता …..आणि त्या मुस्लीम मुलाला अशी वागणूक देण्याआधी त्या माणसाला आपले “ए पी जे अब्दुल कलाम ”  का आठवले नाहीत?….

मुळात धर्म ,जात, पंथ ह्याशिवाय समोरच्याला आपण ह्या एकविसाव्या शतकातही जर माणूस म्हणून पाहू शकत नसलो तर मग आपल्यालाही माणूस म्हणवून घेण्याचा अजिबात अधिकार नाही.

आज प्रत्येकाने हा विचार केला पाहीजे की, “मला कोणत्याही जातीने, धर्माने नाही तर फक्त एक माणूस म्हणून समाजाने ओळखावं ज्यामध्ये धर्म, जातीच्या पलीकडे माणूसकी अजूनही जिवंत आहे”. ……

बरं, पण हे जे प्रकरण झालंय ते कदाचित प्रसिद्धी, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचा केलेला एक घाणेरडा स्टंटही असू शकतो. पण असंकाही करण्याची वृत्ती येते तरी कुठून हेच मला कळत नाही. स्वतः पुरतं जे-जे चांगलं असेल ते-ते मिळवायचं मग ते ओरबडूनका होईना हा आजार जडतो तरी कसा …..जे झालं ते नक्कीच वाईट आहे ,निंदनिय आहे हे मात्र खरंय नाही का? ……..

मी खुप वेळची ह्या वाचलेल्या बातमीवरच विचार करत होते आणि मगाच पासून काहीतरी पाठ करत आठवायचा प्रयत्न करत असणारी माझी लेक काहीतरी विजयी झाल्यासारखं ती माझ्यासमोर आली आणि ताठ उभी राहत तिने मलाही उभं केलं अाणि हात समोर ठेऊन खणखणीत आवाजात तिने म्हणायला सुरुवात केली.

India is my country.
All Indians are my brothers and sisters.
I love my country.
I am proud of its rich and varied heritage……….

मी पण म्हणायला सुरुवात केली.

भारत माझा देश आहे. 
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे……

©Sunita Choudhari.

(टिप :- पोस्ट लिहिण्यास साभार गुगल … पोस्ट मधे लिहिलेलं हे लेखिकेचं वैयक्तिक मत असुन कोणाच्या भावाना दुखावल्या गेल्यास त्याबद्दल क्षमस्व ….)

(माझ्या सर्व मित्रमैत्रीणी आणि वाचकांना माझा नमस्कार .घडलेल्या एका घटनेवर मी माझं मत मांडलं आहे ह्याबद्दल तुमचं मतंही वाचायला मला नक्कीच आवडेल ….धन्यवाद )

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा