…अन् मला लेकीच्या डोळ्यांत माऊलीचे दर्शन झाले

Written by

काल थोडी खरेदी करायची होती म्हणून शाॅपिंगला जात होते पण तेवढयात आठ वर्षाची लेक ‘गुनगुन’ सोबत येण्यासाठी मागे लागली म्हणून मग दोघी मायलेकी मस्त आवरून शाॅपिंगला निघालो.

हवी ती शाॅपींग करून थोडंफार फिरून लेकीला जाम भुक लागली होती म्हणून नेहमीच्या ठिकाणी खाऊ घालायला मि तीला घेऊन गेले.

ओ हो वाह् ! ‘ माँ ‘ मला पनीर पॅटिस घे म्हणून लेकीने समोरचे खाण्याचे पदार्थ पाहून आनंदाने माझ्याकडे त्याची फर्माइश केली.

मला भुक नव्हती म्हणून मी फक्त तिलाच ते पॅटिस घेऊन दिलं. दुकानात गरम होत होतं म्हणून आम्ही बाहेर त्याच दुकानाच्या पाय-यांशी आलो आणि लेक तिथेच साईडला होऊन बसली आणि मी तिच्या समोर उभीच राहिले.

गरम- गरम पनीर पॅटिस आणि त्यावर मस्त चटणी पाहून लेक जाम खुष झाली तिचा हा आवडता पदार्थ होता आणि त्यात हा आवडता पदार्थ बाहेर खाण्याची मजाच काही वेगळी असती म्हणून ती जाम खुष होती.

लेकीने गरम पॅटिसचे तुकडे करून त्याला थोडं थंड केलं आणि चटणी लाऊन तोंडाकडे नेणार तेवढ्यात माझ्या मागून एक आवाज आला .

माऊली….. माऊली. ….

मी मागे पाहिलं तर साधारण ८० वर्षाचे एक म्हातारे बाबा अंगात एक मळकट पांढरा कपडा आणि हातात एक काठीच्या आधाराने पायांवर जोर देत चालत माऊलीचा गजर करत माझ्या शेजारी म्हणजे त्या खाण्याच्या दुकानापाशी आले आणि तिथेच थांबले.

मी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात मला काहीतरी विलक्षण जाणवलं अन् इकडे लेकीला पाहिलं तर तिने तोंडापाशी नेलेला घास अजून तसाच होता.

खा ग् बिट्टू” म्हणत, मी गुनगुन ची तंद्री भंग केली.

“हो खाते ग् ” म्हणत , तिने घास परत प्लेटमधे ठेवला आणि म्हणाली “गरम आहे थांबून खाते ” म्हणत, त्या बाबांना ती न्याहाळू लागली.

इतक्यात बाबांजवळ त्यांच्या हातात लोकांनी दिलेले पाच- दहा रुपये जमले होते आणि मी ही काहीतरी द्यावं म्हणून बॅगेत हात घातला पण मी थांबले आणि लेकीकडे पाहत बसले.

गरम असणारा पॅटिस एव्हाने गारेगार झाला होता पण तरी लेकीला तो अजूनही गरमच वाटत होता. मगाच पासून लागलेली भुक आणि आवडीचा पदार्थ पाहत खुष झालेली माझी लेक क्षणात मला उदास वाटत होती. तिच्या डोळ्यातली मगाची ती चमक नाहीशी होऊन त्यात मला अपार करुणा दिसत होती. हातात असलेला आवडीचा पॅटिस तिला खाल्ला जात नव्हता. ती त्या पॅटिसचे तुकडेच करत फक्त बाबांकडे पहात होती..

बाबा अजूनही तिथेच उभे होते. माऊलीचा गजर चालूच होता…..आणि तेवढयात मी बाबांना म्हणाले,

“बाबा खाता का काहीतरी”?

बाबा काही न बोलता तिथेच अर्धवट मांडी घालू बसले. आणि मी आत जाऊन त्यांना खायला आणलं.

बाबांनी आपल्या तुटक्या दातांनी हसत परत एकदा माऊली म्हणत खायला सुरुवात केली. आणि इकडे माझ्या लेकीनेही गारेढूर झालेला पॅटिस बाबांकडे माऊली म्हणत मोठ्या आनंदात खायला सुरुवात केली.

मी उभीच होते आणि माझ्या समोर, दोन वेगवेगळ्या गटातल्या माऊलींचं दर्शन मला होत होतं.

समोरच्याच्या आनंदात आपण सहभागी होत नसलो तरी समोरच्याचं दु:ख आणि त्याच्या मनातला आवाज जर आपल्या मनापर्यंत पोहोचत असेल तर आपण खरच माणूस म्हणून जगतोय असं समजावं.

माझ्या मुलीनेही असच माणुस म्हणून जगावं हीच शिकवण मी तिला नेहमीच देत आलीये.

आज लेकीच्या डोळ्यात मला समोरच्यांसाठीचं दु:ख जाणवलं आणि तिथेच मी एक ‘आई ‘ म्हणून जिंकले होते.

  • किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
  • किसीका दर्द मिल सके तो ले उधार
  • किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
  • जीना इसी का नाम है …

आज प्रत्येकालाच सिंधूताई , आमटे ,कोल्हे किंवा अशाच प्रकारचे समाजसेवक होता येत नाही. पण दैनंदिन जीवनात आपण एकतरी चांगलं काम करू शकलो तर आपण आपलाच चेहरा आरशात अगदी दिमाखात बघू शकतो नाही का? काही गोष्टी छोट्याशाच असतात पण त्यांचं स्थान खुप मोठं असतं. 
इतका वेळचा न संपणारा पॅटिस आता मात्र लेकीने लगेच संपवला आणि आम्ही निघालो. बाबांचा निरोप घेतला आणि मी माझी स्कूटर चालू केली.

लेक मागे बसली आणि मला मागून मिठी मारत म्हणाली…..”माँ , I Love You”…..

मी साईड मिरर मधून तिला पाहिलं तर, तिच्या डोळ्यात आनंदाची चमक होती आणि ति गाणं गुणगुणत होती….माऊली माऊली रूपं तुझे ……

अन् मला मात्र तिच्या डोळ्यातच ख-या माऊलीचे दर्शन झाले. 

©Sunita Choudhari.

( मित्र-मैत्रीणींनो आणि माझ्या वाचकांनो नमस्कार. काल शाॅपिंगला गेल्यावर माझ्या आणि माझ्या लेकीमधे ‘गुनगुन ‘मधे हा प्रसंग घडला. आणि आपण खरच ‘माणूस ‘ म्हणूनच जगतोय याची प्रचीती मला आली . गोष्ट साधीशीच आणि छोटीशीच होती ….. कदाचित तुम्हाला ह्याबद्दल काही वाटणारही नाही,  पण मला मात्र माझ्यासोबत अशा काही घटना घडल्या की आपण लेकीद्वारे एक चांगलं भविष्य घडवतोय याची पावती मला मिळते. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतय आणि आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला  मला आवर्जुन सांगाल.)

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत