अबोल प्रेमपत्रे!!

Written by

गौरी आणि शुभममधले छोटे छोटे होणारे वाद आता वाढतच चालले होते.लग्नानंतरच एक वर्ष छान गेल्यावर एकदम दोघांमध्ये कुरबुरी वाढल्या होत्या.लहानसहान कारणावरून अगदी शुभम घरी येत नाही,मला बाहेर नेत नाही ते गौरी पूर्वीसारखी वागत नाही,सतत चिडते असल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या रोजच झडत राहायच्या.खूप प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर पण थोडं समजून घेण गरजेचं होतं त्यासाठी दोघेही तयार नव्हते.
आयुष्याच्या सुरेख वळणावर गौरी आणि शुभमच लग्न ठरलं.लग्न होण्यास सहा महिन्यांचा अवकाश होता.सोनेरी स्वप्नाचा काळ होता तो दोघांसाठी… बागेतील मोठ्या बहरलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली दोघे बसून कित्येक वेळ गप्पा करायचे.आवडती जागा झाली होती ती त्यांची.दूरवर फिरणं,पाणीपुरीचा ठरलेला कट्टा,एकाच गावचे असून एकमेकांना लिहलेली सुंदर प्रेमपत्रे…. सुखद आठवणी होत्या दोघांच्या एकमेकांसोबत.एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू जपून ठेवल्या होत्या त्यांनी.पण आता हे सगळं गतकाळात जमा झाल होत.
गौरीने त्या दिवशी ठरवलं की आता माहेरी जायचं.तिने तिच सगळं सामान बॅगमध्ये भरलं.एकमेकांना लिहलेल्या स्वतः च्या प्रेमपत्राचा लिफाफासुद्धा तिने कपड्यासकट रागाने भरून घेतला.’मी माहेरी जातेय’असा साधा मेसेज तिने शुभमला केला.त्यानेही ओके उत्तर पाठवले आणि आपल्या कामात व्यस्त झाला.गौरी अचानक आलेली पाहून आईने विचारले ,अग गौरी एकटीच आलीस?जावाईबापू कुठे आहेत?हवं असत तर गौरी सगळं सहज बोलून टाकून शकत होती पण कुठली तरी अदृश्य शक्ती तिला बोलू देत नव्हती. आई ,आधी निवांत होऊ तर दे गौरी बोलली. रात्री पण आई आणि गौरी कितीतरी वेळ गप्पा मारत बसल्या पण गौरीने शुभमबद्दल चकार शब्दसुद्धा काढला नाही.गौरी झोपायला आली पण तिचा डोळा काही केल्या लागेना.मग तिने उगाचंच बॅगेतील कपडे लावणं सुरू केले आणि तिच्या हाती पत्रांचा लिफाफा लागला.तिच्या मनात विचार आला ,किती सुंदर पत्र मी शुभमला लिहिली होती.मनात आणि लेखनात फक्त शुभमच .मग तिने हळूच लिफाफा उघडला आणि पाहिलं पत्र तिने हातात घेतलं।मनातल्या मनात ती वाचू लागली,
प्रिय गौरीस,
“माझ्या मनातल्या आरशाचे
तू आता प्रतिबिंब आहेस
जीवनाच्या पुस्तकातले
तू सुंदर पान आहेस….”
…………………………..
अरे हे काय?शुभमने लिहिलेलं पत्र यात?ती एक एक पत्र काढतच गेली आणि वाचतच गेली.सगळी पत्र शुभमने तिला लिहलेली होती.अरेच्चा चुकीचा लिफाफा घाईघाईने ठेवण्यात आला तर…आणि ती परत गोड आठवणींमध्ये रमून गेली.
इकडे शुभम घरी आला.सवयीप्रमाणे गौरी अशी हाक त्याने मारली.पण घरात शांतता होती.त्याच्या लक्षात आले गौरी तर माहेरी गेली आहे.त्याने चहा बनवून घेतला अणि फ्रेश होऊन थोडा वेळ टीव्ही बघत बसला. झोप येऊ लागल्यावर तो खोलीकडे वळला.अरेच्चा ,हा कसला लिफाफा आहे?त्याने काढून वाचायला सुरुवात केली.
प्रिय शुभम,
“प्रतिबिंब जरी मी असले
तरी त्यात तेज तुझेच आहे
सुंदर पान जरी मी असले
तरी प्रीतीचे शब्द तुझेचआहे”
…………………………………….
आणि शुभमने देखील सगळी पत्रे वाचून काढली.गौरीने लिहिली होती त्याच्यासाठी.
आता गौरीला राहवेना.चुक तिच्या लक्षात आली होती. वाद तर होणारच पण त्याला बाजूला सारून नव्याने सुरुवात करायची असते.घर हे दोघांचं असत,एकाने पसरवल तर दुसर्याने सावरायच असत.तिने पटकन शुभमला मेसेज केला’गुलमोहर’.
शुभमलाही करमनासे झाले होते.मेसेज बघताच हास्य त्याच्या चेहेऱ्यावर उमटले.कारण लग्नापूर्वी भेटायचे असल्यास असा मेसेज ते करायचे.अर्थात उद्या सकाळचा वॉक बागेत. गुलमोहराच्या झाडापाशी…त्याने प्रत्युत्तर म्हणून गौरीला मेसेज केला’बहरला’.आणि दोघंही निश्चित होऊन झोपी गेले.
त्यांच्या बऱ्याच भेटीच साक्षी असलेलं गुलमोहराच झाड बहरलेल होत आणि परत गौरी शुभमच्या नव्या मिलनाच साक्षीदार होत होत.गौरीला आईला एकही शब्द न बोलू देण्यामागची प्रेमाची अदभूत शक्ती कळली होती आणि अबोल असणाऱ्या प्रेमपत्रानी दोघांना बोलत केलं होतं.
वादाच कारण काहीही असल तरी त्याला किती वाढवायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असत.कुठे थांबायचं हे ज्याला कळत त्याच्या संसाराचं वलय दिवसागणिक तेजोमय होत जातं आणि दोघांच्या परिपक्वतेचि अस्मिता जपत जात असत.☺️

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा