अमेरिका वारी

Written by

जसं आयुष्यात एकदातरी युरोपला जाणं, युरोप पाहणं बर्याच जणांचं स्वप्न‌ असतं, तसंच अमेरिका वारीचं ही असतं.
मी साधारण दहावी-बारावीत असताना प्रत्येक चार घरांनंतर एकाला अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायचं असायचं. मलाही तेव्हा पासून खरंतर जायचं होतं अमेरिकेला, पण बस्स फक्त अमेरिका पाहायला, प्रवास करायला…
आणि एकदाचा तो योग आलाच.. अमेरिका टूरचं बुकिंग झालं, जायचा दिवस येऊन ठेपला…आणि मग माझ्यासाठी अती कठिण असा तो अमेरीकेचा (अवघ्या🙃🙄)२२-२४ तासांचा प्रवास सुरू झाला.
अमेरिकबद्दल अनेकांनी सांगितलेले अनुभव, अमेरिकेची वर्णनं आठवायला लागली. अमेरिका म्हणजे प्रामुख्याने ऐकायला मिळते तिथली कमालीची स्वच्छता, शिस्त, मोठाले रस्ते, उंचच उंच इमारती, तिथलं इनफ्रास्ट्रक्चर, प्रसिद्ध युनिव्हर्सिटीज, आय टी कंपन्या, सुबत्ता आणि असंच बरंच काही… सगळंच कसं भव्य दिव्य आणि चकचकीत…
आणि खरंच अमेरीका पाहताना न्यूयाॅर्क, न्यूजर्सी, वॉशिंग्टन,नायगरा, ऒरलॅंडो, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लास व्हेगास ह्या सगळ्याच शहरात जागोजागी अमेरिकेची सुबत्ता, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, जगप्रसिद्ध मॉन्युमेंट्स, त्यांची सौंदर्यदृष्टी, दूरदृष्टी हे सगळं ठळकपणे दिसतं.‌..
न्यूयॉर्क म्हणलं की पहिलं आकर्षण असतं ते अमेरिकेचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च… समुद्राच्या मधोमध लिबर्टी आयलंडवर असलेला हा स्वातंत्र्यदेवतेचा प्रचंड पुतळा लांबूनच आपले लक्ष वेधून घेतो. बोटीतून अगदी जवळ जाईपर्यंत त्याच्या भव्यतेचा अंदाज देखील येत नाही. अक्षरशः नजरेत मावत नाही एवढे मोठे स्मारक आहे हे.
इथलं अजून एक महत्व प्राप्त झालेले ठिकाण म्हणजे वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ची बिल्डिंग आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरियल. ९/११ च्या हल्ल्यानंतर जमीनदोस्त झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींच्या जागी नव्याने ‘वन वर्ल्ड ट्रेड सेंटर’ ही बिल्डिंग बांधली गेली. एकशे दोन मजल्यांची ही अमेरिकेतील सर्वात उंच बिल्डिंग आहे. याच्या वरच्या मजल्यावर (१००-१०२) observatory बांधलेली आहे. इथून संपूर्ण न्यूयॉर्क शहराचा अप्रतिम ह्वयू दिसतो.
ह्याशिवाय लक्षात राहणारी ठिकाणं म्हणजे हडसन नदीवरचा ब्रूकलिन ब्रिज, रॉकफेलर सेंटर, वाॅल स्ट्रीट, आणि रात्रीच्या वेळी रेलचेल असणारा, झगमगत असणारा टाइम्स स्क्वेअर.
अमेरिकेतील दुसरे महत्त्वाचे शहर म्हणजे वॉशिंग्टन डी.सी., अमेरिकेची राजधानी असलेले हे शहर त्याच्या- वॉशिंग्टन मॉन्यूमेंट, लिंकन मेमोरियल, यु एस कॅपिटाॅल बिल्डिंग, व्हाईट हाऊस, पेंटॅगॉन ह्या आणि अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण स्मारकांसाठी/इमारतींसाठी प्रसिद्ध आहे.
पण इथल्या इमारती आणि मेमोरियल शिवाय मला आवडलेल्या , ठळकपणे दिसून येणाऱ्या तिथल्या नद्या, त्यांची प्रचंड मोठी पात्र, खळाळता प्रवाह. मग न्यूयॉर्कची हडसन नदी असो की वॉशिंग्टनची पोटोमॅक…मुख्य म्हणजे मी पाहिलेल्या ह्या नद्या अतिशय स्वच्छ आणि सुंदर होत्या.. ना कुठे पसरलेल्या पाणवनस्पती, ना कचरा. अतिशय व्यवस्थितपणे जतन केलेल्या या नद्यांमुळे अमेरिकेत पाण्याचा प्रश्न कधीच उभा राहत नाही. बऱ्याचशा ठिकाणी नदीच्या पाण्यापासून वीजनिर्मिती ही केली जाते.
अमेरिका आणि नदी म्हणलं कि डोळ्यांसमोर सर्वात आधी उभा राहतो तो प्रचंड नायगरा… नायगरा म्हणजे अक्षरशः आश्र्चर्य आहे… बर्फाचं पाणी वितळून वहात येणारा, वरून खोलवर कोसळणारा लांब-रूंद खळाळता प्रवाह. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूने नायगारा पाहता येतो. जवळपास पूर्ण दिवस आम्ही नायगराला होतो. नायगारा वरुन घेतलेली हेलिकॉप्टर राईड म्हणजे अविस्मरणीय गोष्ट… दिवसा , रात्री, दूरून, जवळून, अगदी आकाशातूनही नायगारा पाहिला, जगलो आम्ही तो अनुभव…. त्याचा आवाज, फेसाळतं शुभ्र पाणी, अंगावर उडणारे तुषार, रौद्र रुप सगळंच न विसरता येणारं… ज्या दिवशी आम्ही तिथे होतो त्या रात्री नायगारावर कॅनडाच्या बाजूने आतिषबाजीचा (fireworks) शो होता. १० मिनीटांची ती आतिषबाजी बघताना हजारो चांदण्या आकाशातून थेट पांढर्या शुभ्र पाण्यात पडतायत असं वाटतं होतं. अतिशय सुंदर अनुभव…
दुसरी मला आवडलेली गोष्ट म्हणजे रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडं. मोठ्या शहरांमध्येही बर्याचशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वेल मेन्टेन्ड लाॅन्स, छोटी-मोठी लेक्स, बगीचे आणि मोठ-मोठी झाडं आहेत. हायवेला लागून असलेली गर्द जंगलं, लांबवर पसरलेली हिरवळ नजरेत भरून राहते.
आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं ओरलॅंडो. लहानपणापासून अनेकशे वेळा ऐकलेल्या, पाहायची उत्सुकता असलेल्या केनेडी स्पेस सेंटर, म्हणजेच ‘नासा’ला भेट द्यायची संधी मिळाली. पूर्ण दिवसभराच्या टूरमध्ये सिम्युलेटरस्, रॉकेट लॉन्चिंग, स्पेस लॉन्चर या सगळ्याचे माहितीपूर्ण शोज, सिम्युलेटर राईड अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी करायला, पहायला मिळाल्या.
ओरलॅंडो बर्‍याचशा लोकांच्या आकर्षणाचं ठिकाण आहे ते इथल्या डिस्ने वर्ल्ड, युनिवर्सल स्टुडियो, सी वर्ल्ड यासारख्या थीम पार्कसाठी. अनेक लाईव्ह शोज, ॲनिमल शोज, स्टंट शोज, 3d शोज, डिस्नेची कार्टून कॅरॅक्टर आणि breathtaking rides… हे सगळं पाहताना, करताना दिवस कमी पडतो. खरंतर प्रत्येकच शो अतिशय वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण आणि आवडणारा आहे. पण मला इथला ‘Soarin’ नावाचा शो खूप आवडला. हा 3D शो आहे. ह्यामध्ये आपल्याला एका खुर्चीवर बसवून ठराविक उंचीवर नेले जातं आणि मग समोरच्या पडद्यावर जगातली बारा आश्चर्यकारक ठिकाण दाखवलेली जातात. कधी आफ्रिकेच्या जंगलात गेल्यासारखं वाटतं, तर कधी आपण पिरामिड ला हात लावतोय असं वाटतं. कधी आयफेल टॉवरच टोक आपल्या हातात येतं तर कधीतरी भारताच्या ताजची सफर घडते.द ग्रेट वॉल ऑफ चायना, नायगरा, Grand canyon सगळीकडे आपण अगदी क्षणार्धात् जाऊन पोहोचतो. कधी पोलर बेअर आपल्या अंगावर धावत येतो, तर कधीतरी मोठा व्हेल पाण्यात उडी मारून ते पाणी आपल्या अंगावर उडवतोय असं वाटतं, आणि क्रिएटिव्हिटीचा कहर म्हणजे जेव्हा आफ्रिकेचे जंगल दाखवतात तेव्हा तिथून गवताचा वास येतो, ताजमहाल दाखवतात तेव्हा गुलाबाच्या फुलांचा आणि निळेशार पाणी आणि समुद्र दाखवतात तेव्हा वॉटर लीलीज सुगंध… खरंच सलाम यांच्या क्रिएटिव्हिटीला.
कॅलिफोर्निया म्हणजे ग्रीनरी, भाज्या, फळफळावळ यांची रेलचेल असलेलं हिरवगार राज्य. कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को मध्ये पाहिलेली अतिशय भारी गोष्ट म्हणजे तिथला ‘लोम्बार्ड स्ट्रीट’. घाटासारखा असलेला भरपूर वळणा-वळणांचा (hairpin turns) हा रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं आहेत, घरांच्या बाजूने आणि रस्त्याच्या प्रत्येक वळणावर सुंदर झाडं लावलीयत आणि विशेष म्हणजे प्रत्येक घराला छोटंसं का होईना पण पार्किंग दिलंय. हा वैशिष्ट्यपूर्ण रस्ता पाहायला एक पंधरा मिनिटाची चढण चढून जायला लागतं. पण वर्थ आहे ही थोडीशी होणारी दमछाक. सॅन फ्रान्सिस्को मधलं हे मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे.
इथला गोल्डन गेट ब्रिज सुद्धा त्याच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. १९३३-१९३७ या अवघ्या चार वर्षात बांधला गेलेला सस्पेन्शन ब्रिज म्हणजे खरंच एक सुंदर आश्चर्य आहे. त्या काळी जेव्हा फार प्रगत इंजीनियरिंग टेक्निक्स नव्हती तेव्हा बांधलेला हा सर्वात उंच आणि मोठा सस्पेन्शन ब्रिज आहे. समुद्रातून बे क्रुझची राईड घेताना भन्नाट, गोठवणारा वारा, समुद्रावर जोरदार हेलकावे खाणारी बोट आणि अगदी जवळून दिसणारा गोल्डन गेट ब्रिज… या पेक्षा भारी संध्याकाळ असूच शकत नाही…
आणि आता लास व्हेगास.. मला खरंतर लास व्हेगास म्हणजे फक्त कसिनो, जगभरातून पैसे उडवायला येणारे लोक,झगमगतं नाईटलाइफ आणि संपूर्ण रात्र जागणारं शहर इतकीच माहिती होती. लास व्हेगासला बरीच वैशिष्ट्यपूर्ण हॉटेल्स आहेत. खूपशा हॉटेल्सच्या आपापल्या वेगवेगळ्या थीम्स आहेत. एक हॉटेल इजिप्तच्या पिरामिड सारखं होतं, तर दुसरं व्हेनिस चे कालवे आणि त्यातल्या गंडोला राईड आठवण करून देणार. आम्ही रहात होतो त्या हॉटेलची थीम नाॅशविनस्टाईनच्या कॅसलची होती. सर्वच हॉटेलची सजावट, फुलांच्या केलेल्या आकर्षक रचना, लाइटिंग अतिशय वेगवेगळं आणि सुंदर. इथल्या रस्त्यांवर वेगवेगळे आर्टिस्ट आपली कला दाखवत असतात. कोणी लाईव्ह पेंटिंग करून दाखवतो, कोणी गाणी गात असतात, कुणी ड्रम्स वाजवतात, डान्स करत असतात, तर कोणी जादूचे प्रयोग दाखवत असतात, कुठे फायर शो, तर कुठे फाऊंटन शो रात्रभर काहीना काहीतरी मनोरंजन करणार चालूच असतं.
या टूरमध्ये एक नवीन ऑडिशन जी आम्हाला पाहायला मिळाली ती होती ‘हूवर डॅम’ इंजिनिअरिंग मिरॅकल. नेवाडा स्टेट मधल्या कोलोरॅडो या नदीवर बांधलेला हा प्रचंड मोठा डॅम. इथे वीज निर्मितीही केली जाते. नेवाडा, कॅलिफोर्निया, अॅरीझोना च्या काही भागात इथून गरजेप्रमाणे वीज पुरवली जाते. याशिवाय नदीचं पाणी अडवून तयार झालेल्या मेड (Mead) हे वॉटर रिझर्व्हायर (तलाव) चा उपयोग आजूबाजूच्या राज्यांना होतो. खरंतर या धरणाबद्दल वाचण्यासारखा, सांगण्यासारखं खूप काही आहे. अनेक माहिती नसलेल्या अनयुज्वल टेक्निक्स, खूप कमी युटिलिटीज असताना खूप कमी वेळामध्ये एवढं प्रचंड स्ट्रक्चर कसं काय बांधलं असेल याचे राहून राहून आश्चर्य वाटतं.
इथेच अजून एक जबरदस्त गोष्ट पहायला मिळते ती म्हणजे ह्याच कोलोराडो नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे लाखो वर्षे झीज होऊन तयार झालेले, अनेक हजार मीटर खोली असलेले ग्रँड कॅनियन (Grand canyon) म्हणजेच लांबरुंद दर्या आणि त्यावरुन घेतलेली एक तासाची हेलिकॉप्टर राईड.
लॉस एंजेलिस ला जाताना वाटेत कॅलिको घोस्ट टाऊन हे अठराशे च्या दशकात चांदीच्या खाणींसाठी उदयाला आलेलं गाव पाहिलं. आता तिथे खाणी शिल्लक नाहीयेत, फक्त एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून हे गाव तसेच्या तसे जतन करून ठेवलंय. लॉस एंजलिस म्हणजे हॉलिवूड, बेवरली हिल्स, पॅरामाउंट पिक्चर्स, चायनीज थिएटर आणि अनेक श्रीमंत आणि जगप्रसिद्ध व्यक्तींच्या राहण्याचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर. आमच्या टूरचं हे शेवटचं डेस्टिनेशन.
अमेरिकेचा झगमगाट, सृष्टीसौंदर्य, इमारती आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये त्यांची असलेली सौंदर्यदृष्टी आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचे जपलेलं वेगळेपण लक्षात राहतं….

मैत्रेयी दीक्षित-समेळ.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत