अल्लड मुलगी… ते परिपूर्ण आई… भाग 1

Written by

अल्लड मुलगी ते परिपूर्ण आई….
©®जयश्री कन्हेरे -सातपुते #
मृण्मयी लाडाची लेक. अगदी लाडोबा म्हणालात तरी चालेल.. ती होती इतकी गोड की तिला कुणी रागवायचंच नाही.. तिची स्माईल इतकी गोड होती की रागवणारा व्यक्ती देखील विसरून जायचा की हिला रागवायचं आहे..
खूप गोरी किंवा सुंदर असण्याची जी व्याख्या आहे त्या चौकटीत ती नाही बसायची पण तरीही तिला बघताच एक वेगळंच सौंदर्य दिसायचं.. त्यामुळे घरी व कॉलनीत  देखील ती सगळ्यांची लाडोबा होती..
घरी आई मात्र तिला अभ्यासासाठी, थोडी घरकामात मदत करण्यासाठी रागवायची.. पण ही ऐकेल तर न.. सगळ्यात जास्त ओरडा खायची ती ते उठण्यासाठी… झोपेतून उठण्यासाठी.. सकाळची शाळा असायची तर हिला उठवायला अर्धा तास लागायच्या तरी हिचा उठायचा पत्ता नसायचा… उठल्यावर “मी अंघोळ नाही करत… उशिरा झाला ” असं म्हणायची व तशीच शाळेत जायची..  झोप म्हणजे तिला इतकी प्रिय (सगळ्यांना असते ) की कधीही झोप म्हंटल की ही तयार असायची.. कामाचा, अभ्यासाचा जाम कंटाळा यायचा तिला..
हिला इतकी झोप कशी येते व समोर ही अभ्यासाचं कस काय मॅनेज करेल हा विचारलं यायचा आईला… “अग जरा कामात गुंतव स्वतःला म्हणजे झोप येणार नाही दुपारी ” ही काही ऐकायची नाही.. आईला राग यायचा कधी कधी हिचा… सर्वच आईला लग्नाला आलेल्या मुलीची काळजी वाटते. तिला सासरी कुणी बोललं नाही पाहिजे व ती माहेर हुन सगळं शिकून गेली पाहिजे. काही चुका झाल्यावर “तुझ्या आईने हेच शिकवलं का “ असं आईचा उद्धार होतो त्यामुळे तिची आई कधी रागाने तर कधी प्रेमाने तिला समजवण्याचा प्रयत्न करायची.. पण मृण्मयी चा अल्लड पणा काही जायचा नाही..

आई तिला बोलायची “तू आई होशील तेंव्हा कळेल तुला.. आईला किती त्रास होतो ते..आईची काळजी व मुलांना वळण लावण्याची धडपड ही कळेल.  आई काही वेडी नाही मुलांना रागवायला” आणि मग आईची सतत बडबड सुरु राहायची, उपदेश देणारी पण मृण्मयी ऐकेल तर न.. मस्त, मजेत, हसत खेळत मृण्मयी च बालपण गेलं आणि  तारुण्यात पदार्पण केल तिने .. झोपून उठायला तर भारीच कंटाळा यायचा तिला.. बोला कितीही तिला, ती कुणालाच ऐकायची नाही..

     लेक मोठी होतेय.. जशी सगळ्या पालकांना चिंता असते मुलीच्या लग्नाची तशीच मृण्मयीच्या बाबांना देखील हीच काळजी होती… एकदाच चांगल स्थळ मिळालं की बाप होण्याच कर्तव्य पार पाडल्याच समाधान बापाला मिळत. खूप घाई नव्हती त्यांना तिच्या लग्नाची.. पण आता वर संशोधन सुरु केल की दोन.. तीन वर्षात मनाजोग, मुलीला साजेस स्थळ मिळतेच.. तोपर्यंत मुलीच ग्रॅज्युएशन पूर्ण होईलच.. या विचाराने तिचे बाबा वरसंशोधनाला लागले..
मुलगी सुखात राहील असं स्थळ मिळेस्तोवर मृण्मयीच एज्युकेशन पूर्ण होत आलं होत..  मयूर हा चांगला मुलगा मिळाला त्यांना… रीतिरिवाज व सर्व सोपस्कर पार पाडून एकदाचे लग्न झाले मृण्मयी चे. आईने सगळं समजावलं होत तिला कस वागायचं कस राहायचं, सासरची जबाबदारी….. बाकीचं आजकाल मुलींना कळतच व आई त्या विषयावर बोलत नाही सहसा मुलींशी.
लग्न होऊन सासरी आल्यावर मृण्मयीला पहिल्यांदा तिच्या झोपण्याच्या सवयी विषयी ऐकावं लागल.. आणि तिला आठवण आली आईच्या बोलण्याची.. खरंच आई आपल्या भल्याच सांगत होती व आपण.. ??.
हळू हळू सासरच्या वातावरणात रुळायला लागली ती.. आईच्या म्हणण्याने नाही सुधारल्या त्या सवयी एक सून व पत्नी च्या जबाबदारीने सुधारू लागल्या..
आणि वेळ आली तिच्यावर मातृत्वाच्या जबाबदारीची..  अचानक गुड न्यूज आल्याने ती देखील गोंधळली होती.. तिला ही जबाबदारी आताच नको होती.. पण मयूर व घरच्यांना बाळ हवं होत.. तरीही तिने मयूर जवळ तिच्या मानसिकतयारी नसल्याचं स्पष्ट केल.  सगळ्यांचं म्हणणं होत.. “आता बाळ येत आहे तर या पुढील नऊ महिन्यात मानसिक तयारी होईलच.. पदरात आलेल बाळ असं नाकारण चांगल नाही” आईला सांगितलं तर ती पण म्हणाली “अग सुनेची व पत्नीची जबाबदारी संभाळलिस न  मातृत्वाची देखील संभाळशील. काळजी नको करू आम्हाला आजी -आजोबा होऊ दे व तू मातृत्वाचा आनंद घे ”
सगळ्यांची इच्छा आहे मग मी का यांच्या आनंद हिरावू.. हा विचार करून मृण्मयी तयार झाली एकदाची आई बनण्यासाठी.
आई होणं ही किती मोठी जबाबदारी असते हे आता हळू हळू तिला कळू लागलं होत. बाळाच्या चाहुलीमुळे होणाऱ्या उलट्या त्यामुळे तिला होणारा त्रास, भूक लागायची पण जेवायला गेलं की थोडस ही जायचं नाही.. लगेच उलटी व्हायची तिला. वाढणाऱ्या पोटामुळे.. शरीरात होणारा बदल.. आणि मानसिक बदल ती अनुभवत होती.. कधी चिडायची, कधी रागवायची, तर कधी कधी झोप होत नाही म्हणून रडायची देखील.  बाळानी पोटात हालचाल केली की आनंदाने पोटावरून हात फिरवायची, बाळाशी बोलायची व ते लबाड बाळ तिच बोलणं एकूण शांत व्हायचं.. पहिली वेळ होती तिची हे अनुभवण्याची… एका शब्दात सांगायचे तर “अल्लड मुलगी ते परिपूर्ण आई “होणार होती ती.

   (ती माहेरी आली होती डिलेव्हरी साठी.)  हे सर्व अनुभवताना शेवटी तो दिवस आला.. जेंव्हा बाळ तिच्या कुशीत येणार होत. आज तिला सकाळपासून जरा अस्वस्थ वाटत होत.थोडं थोडं पोट दुखायचं पण अजून डॉक्टरनी दिलेल्या डिलिव्हरी डेट ला वेळ आहे म्हणून ती काही बोलली नाही.. आईला मात्र लेकीची अवघडलेली अवस्था लक्षात आली.. तिने लगेच गाडी बोलावली.. आणि मुलीला ऍडमिट केल. बाळाच्या आगमनासाठी लागणारी पूर्व तयारी दोन्हीही आजीनी व बाळाच्या आईबाबांनी केलेली होती. बाळंतपणासाठी लागणार सामान तिच्या आईने आधीच पॅक करून ठेवलं होत. ते सर्व घेतलं जावयाला कळवलं की मृण्मयी ला ऍडमिट करत आहोत..
डॉक्टरांच्या हालचाली सुरु झाल्या..इकडे मयूर देखील एव्हाना येउन पोहचला होता. वेदनेने अक्षरशः विव्हळत होती मृण्मयी… जरा जरी भाजलं तरी अख्ख घर डोक्यावर घेणारी लेक आज वेदनेने विव्हळताना बघून तिच्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. मयूर देखील हळवा होऊन डॉक्टरांच्या बाहेर येण्याची वाट बघत होता..
आणि.
झालं ….
तो क्षण आला…
बाळाच्या रडण्याचा आवाज आला.. आणि सगळ्यांनी एकमेकांनकडे बघून स्मितहास्य केल..
माझी लेक कशी आहे? “ठीक आहे ती ” हे ऐकण्यासाठी मृण्मयी ची आई मात्र डॉक्टर, नर्स येण्याची वाट बघत होती.
थोड्यावेळाने नर्स बाळाला घेऊन आली व “बाळबाळंतीण सुखरूप आहे ” असं सांगितलं तेंव्हा कुठे आईचा (झालेल्या आजीचा ) जीव भांड्यात पडला.  नातू झाला होता. त्याला आजीजवळ दिल… नर्स पुन्हा आत गेली.  थोड्यावेळाने मृण्मयीला रूम मधे शिफ्ट केल….. ती थोडी ग्लानीत होती व त्रासही खूप होत होता तिला.. तरीही बाळाला जवळ घेण्यासाठी ती खूप आतुर होती. त्या अर्धवट ग्लानीत व होणाऱ्या त्रासातही एक स्माईल होती तिच्या चेहऱ्यावर.. एक आनंद होता, खुशी होती मातृत्वाची…. अर्धवट ग्लानीत झोपेच्या अधीन होणारे डोळे ती खुप ताकतीने उघडून बाळाला न्याहारत (बघत )होती.. आज तिच्या आईला आपल्या लेकीचं वेगळंच रूपं बघायला मिळालं. “तू आई होशील तेंव्हा कळेल तुला ” हे त्यांचेच शब्द त्यांना आठवले  व आनंदाश्रू पुन्हा ओघळले..
बाळ जेंव्हा तिच्या कुशीत आलं तेव्हा तिला वेगळाच अनुभव आला.. आणि तिच्या मातृत्व प्रवासाला सुरुवात झाली. आईकडे होती तोपर्यंत रात्रीच बाळ रडलं तरी आई जागी राहायची.. हिने दूध दिल की बाळाला मांडीवर घेऊन रात्र रात्र जागायची आई. त्यामुळे रात्रीच जागरण फारस व्हायचं नाही.  दिवसभर बाळराजे झोपलेले असायचे तर मृण्मयी देखील छान झोप घायची.
आता वेळ आली होती मृण्मयीला सासरी जाण्याची.. बाळ तीन महिन्याचं झालं होत. मयूर दोघांनाही घ्यायला आला होता.  सासरी नातवाच स्वागत खूप उत्साहात झालं.  आणि वेळ आली मृण्मयीवर एकटीने बाळ सांभाळण्याची.  दिवसभर काही टेन्शन नसायच बाळाला बघायचं. तसाही तो दिवसभर छान झोपायचा.. खरी कसोटी होती रात्रीची. एक.. दोन रात्री मयूर जागला बाळासाठी… पण दिवसभर कामाचा व्याप व रात्री नीट न होणारी झोप यामुळे तो लगेच चीडचीड करत होता.  सासूबाई काही रात्रीच्या जागायच्या नाही.  त्याच्या तब्येतीला ते झेपणार नव्हतं.  बाळाची सर्व जबाबदारी आता फक्त हिच्यावर आली होती.  दुपारी पण पुरेशी झोप व्हायची नाही.  आणि रात्री बाळ एकदाच उठल की त्याला घेऊन बसाव लागायचं….
आता या सगळ्यांची तिला सवय व्हायला लागली होती. त्याचे परिणाम शरीरावर दिसत होते..अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे, बाळाला दूध द्यावं लागत होत त्यामुळे नेहमी लागणारी भूक.. आणि जेवायला घेतलं की बाळाचं रडणं सुरु त्यामुळे जेवण पण नीट नाही व्हायचं… एकंदरीत तिचा मातृत्वाचा प्रवास अतिशय खडतर वाटेने जातं होता.. अल्लड मुलगी ते परिपूर्ण आई असा.  या प्रवासात तिची जी ओढाताण होत होती ती बघायलाच नको…
  ही अल्लड मुलगी एक परिपूर्ण आई बनते की नाही हे पुढील भागात… तोपर्यंत ?
क्रमशः…. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते #$$$#नवीन विचार माझे सामाजिकलेखमालिका #$$$#कसा वाटला लेख नक्की सांगा… तुमच्या मातृत्वाच्या प्रवासातील असू शकतो कदाचित… वाचण्यासाठी धन्यवाद ?

Article Categories:
नारीवादी

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा