अशा मुलांना खुशाल बिनलग्नाचं ठेवावं….

Written by

अशा मुलांना खुशाल बिनलग्नाचे ठेवा…
मध्यंतरी माहेरी गेले होते…आईकडे एका मुलीची आई सांगत होती, “आमच्या मुलीचं लग्न ठरलं आहे..तिचा वाढदिवस आहे आज…”
“अरेवा, मग भावी जावईबापूंनी काहीतरी छान प्लॅन केला असणार…”
“कसलं काय हो, त्याचा आईने मुद्दाम काहीतरी काम काढत त्याला आज दिवसभर गुंतवून ठेवलं…जावई बापूंची खूप इच्छा आहे हो…पण त्याची आई…”
मला माझे दिवस आठवले, माझा वाढदिवस होता तेव्हा माझ्या सासरच्यांना अगदी काय करू अन काय नको असं झालेलं…नवरा कुठे कमी पडला तर सासू पुढाकार घेऊन त्याला माझ्यासाठी सर्व करायला लावायची…पण बाहेर अशीही परिस्थिती असेल याची जाणीव व्हायला लागली….
खूप दिवस त्यांचे बोलणे माझ्या डोक्यात घुमत होते, यावर आता सडेतोड भाष्य करावंच म्हणून हा एक प्रयत्न…
मुलाचं लग्न ठरलं की मुलाच्या आईच्या मनात एक असुरक्षितता निर्माण होते, इतकी वर्षे केवळ आपला असलेला मुलगा आता दुसऱ्या कोणाचा होणार ही दुःखाची भावना नैसर्गिक आहे…पण हीच भावना जेव्हा मोठे रूप घेते तेव्हा ती कुठलीही मजल मारू शकते, अगदी संसार तुटण्यापर्यंत…
घरात मुलाचं लग्न काढायचं म्हटलं की आईला उत्साह भरतो, अगदी मुलगी पाहायला जाईपर्यंत तो टिकून असतो, मात्र जेव्हा मुलगा त्या मुलीशी मनाने जोडला जाऊ लागतो, तिच्याशी जास्त बोलायला लागतो, तिच्या सोबत वेळ घालवू लागतो तसतसा हा उत्साह मावळतो आणि जन्म घेते ती असुरक्षितता…
मुलाचं लग्न होतं….नवीन मुलगी घरात येते, घराशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते…जराशी घाबरलेली असते…अशावेळी मुलगा त्या मुलीला धीर द्यायचा प्रयत्न करतो…मग हे पाहून सासू तुलना करू लागते…”तिला कसा जपतोय…मला कधी विचारत नव्हता.…..तिची किती काळजी करतो…मला नाही केलं कधी…”
मग इथून सुरू होतो एक कलह…कधीही न संपणारा…
सासूची ही असुरक्षितता “सुनेला टोमणे मारणे… मुलाला मुद्दाम गुंतवून ठेवणे…काहीतरी कुरापत काढून चिडचिड करणे….” अशा स्वरूपात बाहेर पडते….
मग त्यांचा या असुरक्षिततेचा बळी म्हणून एका मुलीला का द्यावं??
त्यांना नसेल सहन होणार तर मग खुशाल मुलाला बिनलग्नाचं ठेऊन आपल्या पदराआड ठेवावं…
मुलाला आता संसार आहे, त्यांचे नवरा बायकोचे एक वेगळे जग आहे, त्यांचे काही निर्णय आहेत…हे त्यांना पटतच नसते मुळात…
मुलगी चांगल्या संसाराची, जोडीने मिळून करण्याच्या प्रगतीची स्वप्न घेऊन येते पण अनपेक्षित अश्या सासूच्या असुरक्षिततेची बळी पडते…मग आयुष्यात पुढे जाणं तर सोडाच, पण आयुष्यभर त्यांची तोलतोल करणं आणि त्यांचा राग कमी करण्याचा निरर्थक प्रयत्न करणं यात आयुष्य निघून जात…आणि मग आपण विचारतो…भारतीय लोक इतकीं प्रगत का नाहीत??? अरे बापड्यांनो, इथे माणसाचं सर्व आयुष्य नात्यांमधे इतकं गुंफत जातं की त्याचा अतिरेक होऊन माणूस स्वतःच्या प्रगतीवर धोंडा कसा मारून घेतो हे त्याचे त्यालाच कळत नाही….
माझे मिस्टर आणि मी विकेंड ला आवर्जून बाहेर फिरायला जात असू, सासूचा दंडकच होता तो…नवरा बायको मध्ये संवाद हवा म्हणून त्यांचा हा प्रयत्न.
दर वेळी आम्ही यांच्या मित्राला आणि त्याचा बायकोला येण्या बाबत विचारत असू…पण दरवेळी काहींना काही कारण सांगून ती येत नसत…
यावेळी म्हटलं आज काहीही झालं तरी त्यांना नेउच…त्यांचा घरी गेले, दार वाजवणार इतक्यात काही शब्द कानावर पडले…
“त्या दोघांना काय जातं हिंडायला…ईथे घरातली कामं किती बाकी आहेत…ती कोण करणार…दळण आणायचं आहे, माळा साफ करायचा आहे…किराणा भरायचा आहे…” तिची सासू बोलत होती…

मुलगा म्हणाला…
“आई तुला 2 दिवसापासून मी ही सगळी कामं विचारतोय, तू म्हणायची आता नाही नंतर बघू….आजी नेमकं विकेंड ला आम्ही बाहेर जायचं ठरवलं की तेव्हाच का सुचतं ग तुला..??”
“हो हो, मीच वाईट…अरे लहानाचे मोठे केले तुम्हाला…आणि हे दिवस दाखवताय?? देवा रे, काय गुन्हा केलेला मी त्याची शिक्षा देतोय?? लग्ना आधी नव्हता तू असा…आता कोणी एवढी जादू केली तुझ्यावर???”.
माझ्या मैत्रिणीची काहीही चूक नसतांना तिला यात गुन्हेगार ठरवलं गेलं….काय गुन्हा होता तिचा?? यांच्या मुलाशी लग्न केलं हा?? नवरा बायकोने बाहेर फिरायला जाणं हा इतका मोठा गुन्हा असतो?? तिच्यासाठी तर तो गुन्हाच होता…म्हणून ती घरात कटकट नको म्हणून यायला टाळत असायची….
मी बाहेरून ऐकलं, घरात शिरले…काही ऐकलच नाही अश्या आविर्भावात….
“अगं गायत्री, जायचय ना आपल्याला??”
डोळ्यातलं पाणी लपवत ती मान हलवत नकार देत होती…
मी उत्तरले…
“का ग काय झालं?? अगं नवरा बायको आहात तुम्ही, बाहेर फिरत जा जरा…संवाद महत्वाचा असतो नवरा बायकोत…आणि…”
“घरात खूप कामं आहेत, कशाला पाहिजे हिंडायला??” तिची सासू तोडत मला बोलली…
मी ठरवलं, मी वाईट झाली तरी चालेल पण गायत्री ला न्याय द्यायचाच…
“मावशी काय कामं आहेत हो??”
“दळण करायचं आहे, किराणा आणायचा आहे, माळा साफ करायचा आहे आणि स्वयंपाक कोण करणार तुम्ही गेल्यावर??”
“इतकंच ना?? आम्ही जातो मग यांना घेऊन…जातांना दळण टाकतो आणि येतांना दळण आणि किराणा घेऊनच येतो..आमची कामवाली आहे, तिला पैशांची खूप गरज आहे, तिला पाठवून देते माळा साफ करायला….आणि मी बाहेरून ऑर्डर देते जेवणाची, माझ्याकडून गिफ्ट समजा…अजून काय कामं आहेत??”
सासू गार पडली…मुळात ‘कामं पडलीये’ ही अडचण नव्हतीच…ते फक्त एक कारण होतं दोघांना बाहेर न जाऊ देण्याचं…ते मी solve केलं….आता काय उत्तर देणार होती सासू???
शेवटी गायत्री आणि तिच्या नवऱ्याला मी नेलंच…
गायत्री ला न्याय मिळाला… मनोमन तिने माझे आभार मानले…
इकडे आम्ही गेल्यावर तिची सासू माझ्या सासू बाईकडे आली..तुमची सून कसली आगाऊ आहे हे सांगायला…
मला सासरे बुवांनी फोन करून त्याची कल्पना दिली…(सासरेबुवा माझे गुप्तहेर)
आता माझ्या घरी काय वाढून ठेवलं असेल याचं मला जरा टेन्शन आलं…
आम्ही घरी आलो, सासूबाई माझी वाटच पाहत होत्या…आल्यावर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला…पोरी अगदी उत्तम काम केलंस..असाच धीटपणा आणि दुसऱ्याला न्याय देण्यासाठी झटत राहा…आम्ही आहोत तुझ्या पाठीशी….
त्यांनी गायत्री च्या सासूला माझ्याहून जास्त सुनावले होते…
“सून नंबरी तर सासू दस नंबरी” असं म्हणतच गायत्री ची सासू निघाली असणार..
त्यानंतर ती दोघे आमच्यासोबत यायला अगदी आनंदाने तयार असत…
कदाचित तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल, पण समाजात अशी प्रवृत्ती अजूनही आहे…याला खूप अपवादही असतील….
परीचयातल्या एक काकू नेहमी म्हणत…”मुलगा असो वा मुलगी, आपली सोबत वयाच्या 25 वर्षापर्यंत… नंतर त्यांचा संसार भला आणि ते भले…त्यांचा लग्नानंतर आपण आपलं आयुष्य, आपली राहिलेली छंद जोपासण्यात घालवावी….”
त्यांच्या या तत्वज्ञानाचे मला कायम कौतुक….
एखाद्या मुलीला लग्न करून घरात आणायचं, मुलाची बायको म्हणून….आणि ती बायकोच्या लायकीची नाही, तिचे लाड करायचे नाही, तिला अमुक स्वातंत्र्य द्यायचं नाही असं बायकोच्या सर्व अधिकारापासून तिला दूर ठेवत तिच्या कर्तव्याकडे फक्त लक्ष देऊन त्यावरही बोट ठेवायचं असेल….तर खुशाल आपल्या मुलांना बिनलग्नाचे ठेवा….फुलाप्रमाणे जपलेल्या मुलीचे आयुष्य तुमच्या गलिच्छ विचारांमुळे बरबाद करू नका….
मुलाचं लग्न झाल्या नंतर त्याला त्याचा बायकोचीही जबाबदारी आहे, त्याचा बायकोला प्रेम करण्यासाठी, तिच्यासोबत आयुष्य घालविण्यासाठी तिला आणलेलं आहे…केवळ आईला कामात मदत म्हणून नाही…त्याचा मनात आईची जागा नेहमीच पहिली असेल…पण हे सिद्ध करण्यासाठी त्याचा बायकोला तुसड्याने वागवत, तिचा अपमान करत तिला वाईट वागणूक देणे म्हणजे “संस्कारी मुलगा” नव्हे…ही गोष्ट जेव्हा प्रत्येक स्त्री समजून घेईल तेव्हाच घरातली जोडपी प्रगतीचा नवनवीन पल्ला गाठेल….

लेख कसा वाटला जरूर कळवा आणि असेच लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला जरूर लाईक करा

https://m.facebook.com/irablogs  

Article Categories:
सामाजिक

Comments

  • Ya madhe sasula gunhegar sabit kele aahe…sasu mhanje tya mulachi aai tyane aai la insecurity yeu deu naye…tyacha wagnyat tyane jar ASE dakhavale ki mi toch aahe tar ASE honar nahi.ekhadya weekend la aai la pan nya phirayala.tine tari kadhi majja karayachi

    Sheetal 14th जुलै 2019 5:25 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत