#अशीही गोष्ट तिच्या वाढदिवसाची#

Written by

#अशीही गोष्ट तिच्या वाढदिवसाची#
✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)
पहाटे पाचचा गजर झाला तशी सुरेखाला जाग आली. रात्रभर तिची तळमळ सुरूच होती. तशी गेली वीस वर्ष आजच्या दिवसाच्या आधीच्या रात्री तिला झोप येतंच नव्हती. आज सुरेखाचा पन्नासावा वाढदिवस होता. जाग येताच ती बेडवर उठून बसली, आधी देवाचं नामस्मरण केलं. हा दिवस सार्थकी लागू दे अशी देवाकडे प्रार्थना करून तिने स्वतः ला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. थोडं फ्रेश होऊन सुरेखा बागेत फेरफटका मारायला गेली. गुलाबी थंडी जाणवत होती, तिला आजचा दिवस आल्हाददायक भासत होता. तासाभराने ती घरी आली. एव्हाना घरी उठावूठ चालली होती. स्वतःचं आटपून तिने देवपूजा केली. आताशा पूर्ण घर जागं झालं होतं. सुरेखा देवघरातून बाहेर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. वहिनीने तिचं औक्षण केलं, आणि ओवाळून साजूक तुपातल्या शिऱ्याने तिचं तोंड गोड केलं. मग भावाने आणि भाच्यांनी मिळून टवटवीत सुगंधित फुलांचा गुच्छ तिला दिला. सुरेखाला भारावल्या सारख झालं. मग आटपून ती कार्यालयात जायला निघाली, निघताना शेजारच्या निकम काका काकूंचे आशीर्वाद घेऊन आली. त्यांच्या पाया पडल्यावर तिला खूप छान वाटून गेलं.
तिने बुक केलेली गाडी इमारच्या बाहेर उभीच होती. ती त्वरित गाडीत बसली. सकाळपासून व्हाट्सअप आणि इतर ठिकाणी शुभेच्छा येतच होत्या. आता ती निवांतपणे त्या प्रत्येकाला धन्यवाद देत होती. गाडी कार्यालयाच्या दारात येऊन थांबली, ऑनलाइन पैसे देऊन सुरेखा कामाच्या ठिकाणी गेली. मुख्य दरवाज्या पासूनच तिला शुभेच्छा मिळु लागल्या, स्वारी मनोमन सुखावत होती. तिचं केबिन छान सजवलं होत. टेबलवर छानशी फुलदाणी आणि त्यात तिच्या आवडीची टवटवीत फुल ठेवली होती. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तिच्या स्टाफने केक मागवला होता. सुरेखाने केक कापला. खुप सारं फोटो सेशन झालं. सुरेखाने आधीच ताकीद दिल्यामुळे कुणी जेवणाचे डबे आणले नव्हते. आज सगळ्यांना सुरेखातर्फे जेवण होत. दुपारची जेवणं होईपर्यंत दिवस संपायची वेळ येऊन ठेपली होती. पण एक दिवस ते साऱ्यांना चालणारं होतं. निघताना परत तिने गाडी बुक केली आणि घरी आली.
घरी तिच्या बहिणी, भाचवंड, काका-काकू, मामा -मामी आणि इतर बरेच नातेवाईक जमले होते. फारसे बाहेर कुठे न जाणारे निकम काका- काकूही त्यांच्या कुटुंबासह आवर्जून सुरेखाचा वाढदिवस साजरा करायला आले होते. एकूणच सुरेखाच्या भाचवंडांनी तिच्या वाढदिवसानिमित्त जंगी बेत केला होता, त्यात ती चार लोक जी सगळीकडे असतात आणि “या वयात काय गरज आहे मिरवायची, किंवा हिला काय दुसरं किंवा भाचवंडांना काय जातंय फुकटचे पैसे उडवायला” इत्यादी शेरेबाजी करत फिरतात त्यांनाही सुरेखाने अचूक हेरलं होतं. आताशा तिच्यावर असल्या लोकांच्या बोलण्याचा परिणाम होत नसे. थोड्याच वेळात सुरेखा छानशी खादीची इरकली साडी नेसून आली. त्या इरकलीत सुरेखाच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद ओसांडुन वाहत होता. मग परत केक कापला आणि जेवणावळी उठल्या. नंतर नेहमीप्रमाणे गाण्यांच्या मैफिली रंगल्या.
थोड्यावेळाने पाहुणे आपापल्या घरी परतले. पांगापांग झाली तशी सुरेखा आपल्या खोलीत आली. लगेच तिने दार लावून घेतलं आणि उशीखालून डायरी काढली. डायरीमधला फोटो हातात घेऊन तिने एवढा वेळ आणलेलं उसनं अवसान गाळले आणि ती हमसाहमशी रडू लागली. वीस वर्षांपूर्वी तिच्या वाढदिवसाच्या एक आठवडा पहिले निकम काका-काकूंचा मुलगा आणि सुरेखाचा प्रियकर अभयचा तिला फोन आला होता, त्याच पोस्टिंग संपत आलं होतं आणि सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन तो परत येणार होता. आणि ते दोघे सुरेखाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं लग्न करण्याच गुपित सर्वांसमोर सांगणार होते. कौटुंबिक जवाबदऱ्यांमुळे दोघांची लग्न लांबली होती. पण मनाने दोघांनी एकमेकांना आधीच वरले होते. भावा बहिणीची लग्न करून दिली होती. आता सर्व स्थिरस्थावर करून हे दोघेही आपला संसार उभारणार होते. पण ते कदाचित नियतीला मान्य नव्हते. अभय परत आलाच नाही. आजही सरकार दरबारी अभयच्या नावापुढे कागदोपत्री मिसिंग हाच शिक्का कायम आहे. अभय तिच्या या खास दिवशी नक्की येईल या एका आशेवर सुरेखा गेली वीस वर्षे स्वतःचा वाढदिवस न चुकता हसतमुखाने साजरा करत आहे.
✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)
तळटीप: संपूर्ण कथा काल्पनिक आहे. कथेचा कोणाच्या जीवनातील घडामोडींशी संबंध नाही. तरीही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
कथा आवडल्यास नावसहित शेअर करावी ही विनंती.

Article Categories:
प्रेम

Comments are closed.