मैं ना भूलुंगी…

Written by

शीतलच्या सोसायटीत एक नवीन कुटुंब राहायला आलेलं… शीतल वरच्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये राहायची अगदी तिचा खाली त्यांचा फ्लॅट होता

नवरा, बायको आणि दोन मुलं…. ती बाई होती पंचेचाळीस -पन्नास च्या  आसपास, साधारण, सावळीशी, आणि टापटीप राहणारी, जवळपास शितालच्याच वयाची …. नवरा पासष्ट च्या आसपास, गोरा गोमटा, थोडा वार्धक्याकडे झुकणारा.. दोन कॉलेज मध्ये जाणारी मुले…. मुले खुपच सुंदर होती… दोघांनाही न शोभणारी… शीतल मनात विचार करायची कुणावर गेली असेल मुले….

सगळं सामान लावून झाले, मुलांचे ऍडमिशन झाले आणि नवरा आपल्या शहरात निघून गेला… तिथे त्याचा व्यवसाय होता. आणि ती बाई मुलाच्या शिक्षणासाठी इथे शिफ्ट झाली होती…

येता जाता शीतल ची आणि तिची नजरा नजर व्हायची…. मग एकमेकींकडे बघून हसणे आणि एकदिवस एकमेकींशी ओळख झाली…

मी शीतल जोशी , तुमच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहते.
मी शिप्रा…
आणि अग, तुम्ही आम्ही काय बोलतेस, तू म्हटलं तरी चालेल…

ओके , शिप्रा… ये ना माझ्याकडे, पुढच्या रविवारी..

नक्की, तसंही मला माझ्या व्यवसायाकरिता भेटायचेच होते तुला.. .

ठीक आहे, मग ये नक्की..

पुढच्या रविवारी शिप्रा शीतलकडे आली…
चहा, कॉफी झाल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या… आणि हळूच आपलं व्हिजिटिंग कार्ड तिने शीतलच्या हातात ठेवल…

“शिप्रा देशपांडे  पाटील “

विजिटिंग कार्ड वरचं नाव वाचताच शीतल म्हणाली, अय्या, तू माहेरची देशपांडे
अग, मी पण माहेरची देशपांडेचं …

शिप्राच्या चेहऱ्यावर हलकीशी दुःखाची रेष उमटली…

नाही, अग माझं सासरचे आडनाव आहे….

मग माहेरची पाटील का? जनरली आधी माहेरचं आणि नंतर सासरचे लावतात म्हणुन विचारले…

पाटील पण सासरचेच…..

शीतलच्या विस्फारलेल्या डोळ्याकडे  पाहत शिप्रा म्हणाली, अग थांब, सगळं सांगते तुला, तो खुप मोठा इतिहास आहे…

शिप्रा भान हरपल्यासारखी भूतकाळात जाऊन सांगू लागली….

अभिलाष पाटील आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकायचो… अभिलाष एकदम हँडसम, आणि अभ्यासात हुशार मुलगा होता. सगळ्या मुलींना तो आवडायचा पण त्याला  मात्र मी आवडायची.. आमचं प्रेमं प्रकरण सुरु झालं होत.. … आमचं क्लास बुडवून कॅन्टीन मध्ये भेटणं वाढलं होत. आम्ही भेटायचं ठरवायचो… तो माझी वाट पाहायचा आणि मी मात्र विसरून जायची.. मग धावत पळत जायची.. तो फुरंगटून बसायचा…

सॉरी, अरे मी विसरलेच होते रे…

असं कस विसरते ग तू नेहमी नेहमी .. अशांनी एक दिवस तू मला पण विसरशील…

अरे, असं कस तुला विसरेल… सगळं विसरेल पण तुला “मै ना भुलूंगी “असं लाडात येऊन म्हटलं की तो विरघळून जायचा…

आता आम्ही बाहेर पण भेटायचो.. आणि मला नेहमी उशीर व्हायचा आणि मी म्हणायचे अरे मी विसरलेच होते.. तशीही मी थोडी विरारभोळीच होते… बऱ्याच गोष्टी विसरायचे आणि त्याचा डायलॉग पक्का होता.
असं कस विसरते ग तू.. अशांनी एक दिवस तू मला पण विसरशील…

आणि माझा पण पक्का होता अरे, असं कस तुला विसरेल… सगळं विसरेल पण तुला “मै ना भुलूंगी “

चार एक वर्षे आमचं प्रेमं प्रकरण सुरु राहील. त्याने एक व्यवसाय सुरु केला होता.. त्याचा व्यवसायात नीट जम बसला होता. आता आम्हाला लग्न करायचे होते. पण जात आडवी आली आणि दोघांच्याही आई वडिलांकडून विरोध होता.   मी माझ्या  आईवडिलांना मनविण्याचा खुप प्रयत्न केला पण ते तयार नव्हते. शेवटी आम्ही त्यांच्या मर्जीविरुद्ध लग्न केले….

आता आमचा संसार सुरु झाला होता… माझा विसरभोळा स्वभाव तसाच होता.. आताही मी बरेचदा त्यांनी काही महत्वाचे पेपर दिले किंवा पैसे दिले तर विसरायची…
आणि मग, नेहमीप्रमाणे सॉरी विसरली रे …
आणि,  तुला “मै ना भुलूंगी “असं म्हणुन त्याच्या मिठीत शिरायची.. त्यालाही ते खुप आवडायचं…

मी आनंदाने गृहिणीपद स्वीकारले होते… तो भरपूर कमवायचा म्हणून मला नोकरीची गरजही नव्हती आणि आवडही नव्हती… वेगवेगळ्या डिशेश करून खाऊ घालणे यातच मला समाधान वाटायचं…

मी दोन मुलाची आई झाली होती… सगळं अगदी आनंदात सुरु होत.. मोठा मुलगा चार वर्षाचा आणि धाकटा दोन वर्षाचा…

सकाळी ऑफिस ला गेला…. सायंकाळी लवकर येणार होता… छोट्याचा दुसरा वाढदिवस होता… सगळी तयारी झाली होती.. छोटीशी पार्टी ठेवली होती… मी नेसण्यासाठी साडी काढली… अरे ब्लॉऊस तर आणायचं विसरलेच… मी अभिलाष ला फोन केला..

अग, असं कस विसरतेस ग तू…

प्लीज घेऊन ये ना.. लवकर.. आता पाहुणे येण्याची वेळ झाली….

मी अभिलाष ची वाट पाहू लागली… खुप वेळ झाला तरी तो आला नाही…. आणि अचानक अभिलाष चा फोन वाजला…

मॅडम,……. दुसऱ्याच माणसाचा आवाज आला…

अहो, अभिलाष कुठे आहे…

मॅडम त्यांचा ऍक्सीडेन्ट झाला…. सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय…

मला काही सुचेना,मी  अभिलाषच्या  मित्राला फोन केला .. ते ताबडतोब आले…
आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो.. डॉक्टरांना भेटलो..

मॅडम,वरून काही दिसत नसलं तरी  आतमध्ये खुप लागलंय.. खुप रक्तस्राव झालाय  .. ऑपरेशन करावे लागेल… आपण प्रयत्न करू.. परिस्थिती गंभीर आहे…आता सगळं देवाच्या हातात..

मला काही सुचेना… मी त्याला भेटायला गेले…

पूर्ण शुद्धीत होता…

आलीस शिप्रा, मला वाटलं यायचं  पण विसरते की काय?
माझ्या डोळ्यात पाणी आले…. मनात म्हटलं, तुला, मै ना भुलूंगी…..

अग, वेडाबाई, रडतेस कशाला.. बघ मला काही झालं नाही.. चार दिवसात मी बरा होणार….

ऑपरेशन झाले, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण व्यर्थ.. त्याची प्रकृती खालावली..डॉक्टरांनी  शेवटचं भेटायला सांगितलं..

मी त्याला भेटायला गेले… हातापायाला नळ्या लागल्या होत्या…. माझ्याकडे पाहून कसनुसं हसला..
क्षीण आवाजात बोलू लागला, “मला इतक्यात नाही मारायचं ग…शिप्रा मला विसरशील का ग?अश्रू भरल्या डोळ्याने तो बोलत होता.. . असं वाटतं होत त्याला खुप  जगायचं आहे….पण मी हतबल होते…. मी काहीही करू शकत नव्हते

माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते… मी हातात हात घेऊन म्हटलं…. मै ना भुलूंगी…. त्याही परिस्थितीत त्याच्या चेहऱ्यावर हसू आले….

नाही शिप्रा…. मला विसरायचं ग… तुझ्या समोर एवढं मोठं आयुष्य आहे….ते नव्याने सुरु करायचं..  मला विसरायचं ग…. त्याचा हात माझ्या हातात होता…. तो क्षीण आवाजात म्हणतं होता मला विसरायचं ग.. आणि अचानक त्याच्या हाताची पकड सुटल्याचे जाणवले मी हंबरडा फोडला.. मै ना भुलूंगी…

अशाप्रकारे तो मला अर्ध्यावर सोडून निघून गेला.. कधीही घराबाहेर न पडलेली मी मला सगळीकडे अंधार दिसू लागला. त्याचा व्यवसाय, त्याची जमापुंजी, त्याची विमा पोलिसी कशाचीही मला माहिती नव्हती . कुठून सुरवात करू काही कळेना..
दोन मुलांना सांभाळू की त्याचे व्यवहार पाहू…

त्याचा मित्र मात्र सतत सोबत होता…शशी देशपांडे
ते वयाने खुप मोठे होते.. आणि अभिलाष शी चांगली मैत्री होती. नेहमी घरी यायचे.. त्यामुळे आमची ओळख होती. त्यांनी मला खुप धीर दिला..ते म्हणायचे तू, काही काळजी करू नको.. मी बघतो  सगळं…

अभिलाष चे धंद्यात अडकलेले पैसे, विमा पोलिसी चे मिळणारे पैसे काढून देण्यासाठी त्यांनी मदत केली. मी नोकरीसाठी प्रयत्न केला पण जेमतेम शिक्षण, त्यामुळे चांगली नोकरी मिळाली नाही … कमी पगाराची नोकरी करायची आणि मुलांना पाळणाघरात किंवा सांभाळायला बाई ठेवायची हे परवडण्यासारखे नव्हतं…
अभिलाषचे मिळालेले पैसे फिक्स डिपॉजिट करून त्यावरील व्याजावर माझा खर्च सुरु होता… गरज पडल्यास शशी मला मदत करायचे…
जवळपास पाच वर्षे असे चालले.. आता मुलंही शाळेत जाऊ लागली होती.. मुलांचा खर्च वाढला होता.. थोडी ओढाताण व्हायची पण आमचं व्यवस्थित भागत होत.

शशी माझ्याकडे नेहमी यायचे त्यामुळे लोकांची पण कुजबुज सुरु झाली होती.. पण मी मनात म्हणायची, माझं मन साफ आहे ना मग जगाची फिकीर का करायची….

शशी च येणं आता कमी झालं होत.. तो म्हणायचा माझ्यामुळे तुझी बदनामी झालेली मला आवडणार नाही… फोन करून माझा हालचाल जाणून घ्यायचे…

आणि एक दिवस शशी घरी आले… आणि माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मी ठाम नकार दिला.

अहो, काय बोलताय तुम्ही… मी अभिलाष ला विसरू शकत नाही. दुसरं लग्न करणे म्हणजे त्याच्या प्रेमाची प्रतारणा करणे….

बघ शिप्रा.. मी जबरदस्ती करीत नाही. तू तुझा निर्णय आरामात घे.. राहिला अभिलाष चा प्रश्न तर त्याचीही इच्छा होती की तू तुझं आयुष्य नव्याने सुरु कराव…
तू अभिलाष ला विसरावं असं मी म्हणतं नाही…

हे बघ शिप्रा, तू प्रॅक्टिकली विचार कर. नाही म्हटलं तरी तुला आधाराची गरज आहे…. मी इतके दिवस अविवाहित राहिलो.. मला लग्न कराव असं वाटलंच नाही पण आता वाटतं की मलाही आधार हवा .अग, शारीरिक गरजपलीकडे पण माणसांच्या गरजा असतात.. माणसाच्या मानसिक व भावनिक गरजा भागवण्यासाठी कुणाच्या तरी साथीची गरज असते.
कुणाची तरी सोबत असावी लागते …. आपण हे लग्न आपली एकमेकांची गरज म्हणुन करू या…

तू विचार कर… असं म्हणुन शशी निघून गेले…

मी खुप विचार केला.. अभिलाषचे “मला विसरणार तर नाही”? आणि माझे “मै ना भुलूंगी “हे शब्द आठवले… नाही अभिलाष… मी नाही करू शकत लग्न……

पण दुसऱ्या क्षणी शशी ने वेळोवेळी केलेली मदत, अभिलाष चे शेवटचे शब्द आठवले तू नव्याने आयुष्य सुरु कर…

माझं मन खुप द्विधा मनस्थितीत होते… शेवटी विचार केला खरंच आपल्याला आधाराची गरज आहे…

मनात म्हटलं, अभिलाष मी लग्न करते रे, पण तुला विसरणं शक्यच नाही….. कस विसरू तुला? अरे आपली मुलं जी बिलकुल तुझी प्रतिछाया आहेत.. त्यांना पाहिलं की तू आठवतोच मला… या जन्मात तरी मी तुला विसरणार नाही “मै ना भुलूंगी “फोटोतून अभिलाष हसल्याचा भास झाला.

आणि आम्ही लग्न केले… लग्ना आधीच मी शशीला सांगितले होते मी अभिलाष चे नाव सोडणार नाही… आणि शशी सोबत लग्न करून मी फक्त  अभिलाष चे नाव लावले असते तर त्यांना  कदाचित  वाटले असते की  मी त्यांना  स्वीकारले नाही. म्हणुन मी दोन्ही नाव लावायचं ठरविले….. आणि मी माझं नाव…
शिप्रा देशपांडे पाटील असं लावते….

.जेव्हाही पाटील अक्षर, उच्चारते, लिहिते किंवा ऐकते तेव्हा मला अभिलाष आठवतो…

आज माझ्या दुसऱ्या लग्नाला दहा वर्षे झाली पण जेव्हाही मी एकटी असते तेव्हा मला अभिलाष चे शब्द आठवतात, तू मला विसरणार तर नाही ‘आणि आजही मनात म्हणते मै ना भुलूंगी…

शिप्राच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते… शीतल तीला पाठीवरून थोपटू लागली..

©अर्चना अनंत धवड

लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि माझे आणखी लेख वाचण्यासाठी मला फालो करा

धन्यवाद

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा