असामान्य जगातली बंदिनी अंतिम भाग

Written by

 

©सरिता सावंत भोसले

सांग सुयश आता करशील माझ्याशी लग्न? तुझा so called सभ्य समाज स्वीकारेल का एका वेश्याच्या मुलीला तुझी बायको म्हणून? तुझ्या घरचे, बाहेरचे लोक देतील मला तोच सन्मान जो तुमच्या सभ्य समाजातल्या मुलींना मिळतो? मी तर या दलदलीत अडकलेली नाही. मी तुम्ही म्हणता तस कलंकीत वगैरे नाही पण आहे मी वेश्याची मुलगी. करशील लग्न माझ्याशी? काहीही करायला तयार होतास ना तू माझ्यासाठी…. तुझं मन तरी स्वीकारायला तयार आहे का आता मला? तुझ्यासारखे बरेच सुयश असे कितीतरी बंदिनीना लग्नाची स्वप्न दाखवतात आणि हे सत्य जेव्हा कळत तेव्हा समाजातली त्यांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बंदिनीला सहज सोडून जातात. हीच तुमची प्रतिष्ठा, तुमचा सभ्यपणा रात्री या गल्लीत पाय वळतात तेव्हा कुठे जातो रे? तुमच्यासारख्या स्वतःला सभ्य म्हणणारे पुरुषच रात्री याच रस्त्यावर येतात, इथेच स्वतःची भूक शमवतात आणि जेव्हा त्यातून माझ्यासारखी बंदिनी जन्माला येते तेव्हा सहज तिला लाथाडून पुढे निघून जातात. तेव्हा या स्त्रियाच ज्यांना तुम्ही नालायक समजता त्या मातृत्व सिद्ध करतात. जीवापाड सांभाळतात आपल्या मुलांना. स्त्री या वस्तीतली असो किंवा तुमच्या समाजातली असो पण याआई म्हणून ती पवित्रच असते…आपल्या मुलांना कोणत्याही अवस्थेत एकट सोडत नाही.

आणि खर तर या वेश्याव्यवसायाचा सर्वेसर्वा तर पुरुषच असतो ना? तो इथे येतो वर्चस्व गाजवायला, भूक शमवायला,क्षणिक सुख उपभोगायला म्हणून तर हा धंदा चालतो. इथे पुरुष आणि काही बायकाही पैश्याच्या लोभापायी कोवळ्या मुलींना या गर्तेत फसवतात. आणि त्यांना मग इथून मनात असूनही बाहेर निघताच येत नाही. उदर निर्वाहासाठी हा धंदा त्यांना करावाच लागतो. समाजाची तुच्छतेची नजर झेलावीच लागते. फार वाईट असलं तरी हे सत्य आहे आणि माझ्यासारख्या बंदिनीना आमची काही चूक नसताना तुम्ही स्वीकारत नाही. आम्हालाही मग याच गर्दीत हरवून जावं लागतं…… मनाविरुद्ध. प्रत्येक वेळी आमच्याशी नात ठेवा किंवा लग्न करा अस म्हणत नाही आम्ही…..पण माझ्यासारख्या कितीतरी बंदिनी शिकतात तेव्हा त्यांच्या गुणवत्तेवर त्यांना नोकरी तरी द्या. कोणत्या तरी वेश्याची मुलगी अशी ओळख असते म्हणून तिला लाथाडू नका. तिचा अपमान करू नका. तिलाही हे सामान्य आयुष्य जगुदया. असा आहे तुझा सभ्य समाज…. म्हणून मी या सगळ्या पासून खूप लांब राहते. एकटी असते कारण तसच आयुष्यभर राहावं लागतं आम्हाला.

सुयश डोक्याला हात लावून बसलेला असतो. डोळ्यातून अश्रू वाहत असतात. सगळं खरं आहे की स्वप्न हेच त्याला अजून कळत नसत. तो निःशब्द होऊन तिथून निघतो रडत रडत. बंदिनीला त्याच उत्तर माहीत होतच.

त्या भेटीनंतर बरेच दिवस सुयश कॉलेजमध्ये दिसला नाही. तो बंदिनीला दिसला ते परिक्षेदिवशीच. अर्थात तो बंदिनीकडे बघत नव्हता. तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत नव्हती त्याच्यात.

त्यालाही माहीत होतं समाजाच्या प्रतिष्ठे पायी, घरच्यांची इज्जत जाईल म्हणून बंदिनी कितीही चांगली असली तरीही तिला स्वीकारण्याच धाडस त्याच्यात नव्हतं. परीक्षा होतात, कॉलेज संपत. दोघांच्या वाटा वेगळ्या होतात. पूर्णत्वाकडे जाता जाता एक कहाणी अधुरीच राहते.

बंदिनीने कोणाशीच लग्न नाही केलं. तीच शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने नोकरी मिळवली. स्वावलंबी होऊन पहिल्यांदा तिच्या आईला तिने त्या दलदलीतून बाहेर काढलं. आज त्या वस्तीतील जी लहान मूल आहेत त्यांना शिक्षण देण्याच काम ती करते. पुढे जाऊन या मुलांसाठी शाळा काढायचं स्वप्न आहे तीच. या मुलांना ती आईसारख प्रेम देते. त्यांच्या पंखात स्वावलंबी होण्याचं आणि उंच भरारी घेण्याचं बळ देते.

कथेचा शेवट गोड करता आला असता पण मी तस करणार नाही कारण वास्तव ते नक्कीच नाही. तुमच्या मतांचा आदर मी नक्कीच करते पण वास्तवाची साथ सोडून कल्पनेच्या विश्वात रमण मला जरा अशक्य आहे.

मी तरी आजपर्यंत वेश्याच्या मुलीला सभ्य समाजातल्या (दिवसा सभ्य आणि रात्री……) कोणत्याही मुलाने स्वीकारलेलं पाहिलं नाही…तुम्ही पाहिलं ऐकलं असेल तर नक्की सांगा.  वेश्याव्यवसायात अडकलेल्या स्त्रिया आणि इथे अनपेक्षितपणे जन्मलेल्या मुली (ज्या स्वतःच अस्तिव शोधत असतात) यांची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.प्रत्येक स्त्रीचा आदर केला गेला पाहिजे. कोणीच मनापासून हा व्यवसाय स्वीकारत नाही. परिस्थिती तिला या भोवऱ्यात अडकवते आणि त्यांच्या मुलीही त्यात अडकतात. बंदिनी सारख्या काहीजणीच यातून बाहेर पडण्यात यशस्वी होतात पण त्यांना स्वीकारण्याची हिंमत आपला समाज ठेवत नाही.

©सरिता सावंत  भोसले

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा