असामान्य जगातली बंदिनी #भाग 2

Written by

©सरिता सावंत भोसले

बंदिनी कॉलेजमध्ये एकटीच बसलेली आणि डोळ्यात अश्रू. सुयशने नकळत तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारले काय झालं? त्यावर ती सुयशवर संतापली. माझ्या अंगाला हात लावायची हिम्मत कशी केलीस? तुम्ही मुलं सगळी सारखी… बोट दिल तर हात पकडायला येता असे आरोप त्याच्यावर करायला लागली. यावेळी सुयश शांत बसला नाही. तू काही बोलतेस म्हणून मी ऐकून घेणार नाही, तू टेन्शन मध्ये दिसलीस म्हणून काळजीने विचारायला आलो इतकच पण माझंच चुकलं. सगळ्या मुलांना एकाच तराजूत बसवत असशील तू पण मी त्यातला नाही असं ठणकावून तो तिथून निघून गेला.

बंदिनीचा राग शांत झाला की तिला तिची चूक कळली पण सुयश आता बोलायला तयार नव्हता. आठवडाभर तरी ती त्याच्याकडे प्रोजेक्टच काम घेऊन जात होती पण तो काहीच बोलायचा नाही. एक दिवस तिने त्याच्या आवडीचा गाजराचा हलवा आणला आणि त्या गोडाने सुयशचा तिखटपणा कुठल्या कुठे पळून गेला. आता प्रोजेक्टच्या कामासोबत त्यांची मैत्रीही पुढे सरकत होती.  बंदिनी त्याच्यासोबत खुलायला लागलेली,हसायला लागलेली,गप्पा मारायची पण मनातलं काही त्याला सांगायची नाही. स्वतःच खाजगी आयुष्याबद्दल ती कधीच काहीच बोलायची नाही. ती नक्की कोण आणि अशी का याच गूढ सुयश साठी अजूनही कायमच होत.पण तो बंदिनीच्या प्रेमात पडलेला.  आधी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात तो पडलेलाच पण आता ती माणूस म्हणून किती चांगली आहे त्याला कळत होतं…ती आवडत होती. प्रत्येक क्षणाला ती सोबत असावीशी वाटायची. आता प्रोजेक्ट संपेल,कॉलेजही संपेल त्याआधी तिला लग्नासाठी विचारायचंच अस त्याने मनोमन ठरवलं. ती नाही म्हणाली तरी तिला तयार करायच आणि त्यासाठी काय हवं ते करायचं असंही त्याने ठरवलं.

 

प्रोजेक्ट संपला…प्रोजेक्टच प्रेझेन्टेशन झालं आणि त्या दोघांचाच प्रोजेक्ट सरांना खूप आवडला. आज उद्या अस करत सुयश आज बंदिनीला प्रपोज करणारच होता. बंदिनी प्रोजेक्टमुळे आज खूप खुश होती या आनंदातच तिला विचारावं अस सुयशने ठरवलं. बंदिनी स्वतःहून सुयशला धन्यवाद बोलायला आली. तीच बोलणं संपल्यानंतर सुयश म्हणाला मला धन्यवाद बोलण्याऐवजी माझी एक इच्छा पूर्ण करशील? बंदिनी थोडीशी घाबरून,विचार करूनच हो बोलते. सुयश तिला संध्याकाळी कॉफीसाठी विचारतो. खूप विचार केल्यानंतर बंदिनी होकार कळवते.

आतुरतेने ज्या क्षणाची सुयश वाट पाहत असतो तो क्षण येतो. थोडी उशिरा का होईना पण बंदिनी पोहचली ठरलेल्या ठिकाणी. कॉफी पिऊन झालं,इकडतिकडच्या गप्पा झाल्या पण सुयशची मनातलं बोलायची हिम्मत होईना. बंदिनी आता उशीर होतोय म्हणून निघायच्या तयारीत होती. सुयशने धीर एकवटून बोलायला सुरुवात केली,

“बंदिनी थोडं थांब मला काहीतरी सांगायचंय. माहीत नाही तुला ते आवडेल न आवडेल पण माझं मन आज मोकळं करूदे. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. याआधी मी फक्त तुला कॉलेजमध्ये येता जाता पाहायचो. मुलींना कधी वाईट नजरेने बघायची सवय नाही. तुझ सौंदर्य मला भुलवून टाकायचं पण तुझ्या प्रेमात पडलोय हे जेव्हा आपण प्रोजेक्टमुळे जवळ आलो तेव्हा कळाल. तू नेहमीच थोडीशी अवघडून,बुजून राहिलीस, कधी चिडलीस,रागावलीस. आपल्या नात्यात बरेच चढ उतार आले पण तू जशी आहेस तशी मला आवडतेस आणि हे वासना किंवा क्षणिक असलेलं प्रेम नक्कीच नाही. मी मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. तुझी साथ मला आयुष्यभर हवी आहे. लग्न करशील माझ्याशी? तू वेळ घे हवतर. मला तुझ्या उत्तराची घाई नाही. तू तुझ्या मनाचा पूर्ण कौल घेऊनच उत्तर दे”

बंदिनी फक्त बघत राहिलेली सुयशकडे. डोळ्यात ना राग ना प्रेम. कोरड्या डोळ्यांनी त्याच्याकडे फक्त बघत होती. सुयशच बोलणं झालं तस तिने त्याला लगेच उत्तर दिलं, “नाही जमणार मला तुझ्याशी लग्न करायला. आणि मी कितीही वेळ घेतला तरी माझं उत्तर बदलणार नाही. तुझ्याशीच काय मी कोणाशिच लग्न नाही करणार. तस मला हळूहळू तुझ्या डोळ्यात माझ्याविषयीच प्रेम दिसायला लागलेलं म्हणूनच मी लांब लांब राहत होते तुझ्यापासून. तू चांगला मुलगा आहेस यात शंकाच नाही पण मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. तुला दुसरी खूप चांगली मुलगी मिळेल बघ तू पण माझ्याशी परत या विषयावर बोलू नकोस”. सुयश काही बोलायच्या आतच बंदिनी तिथून निघून जाते. सुयश नाराज होतो पण हार मानत नाही. तुझा होकार मी मिळवणारच अस मनाला सांगून तोही घरी जातो.

सुयश बंदिनीच्या घरी जातो का? गेला तर तिथे नक्की काय होते?

बंदिनी त्याला होकार देईल का? वाचा पुढील भागात?

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा