असामान्य जगातली बंदिनी

Written by

#असामान्य_जगातली_बंदिनी  #भाग_3:

©सरिता सावंत भोसले

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सुयश बंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती बोलत नाही. असे आठ दिवस रोज सुयश तिच्याशी बोलण्याचा, तिला मनवण्याचा प्रयत्न करतो पण बंदिनी काही मानत नाही. एक दिवस कॉलेज सुटल्यावर तो रस्त्यात तिला गाठून बोलण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यासाठी मी हवं ते करेन, लग्न झालं की सगळी सुख तुझ्या पदरात टाकेन, तुझ्या घरच्यांना पण मी तयार करेन पण तू हो बोल अस बरच काही तो बोलतो. बंदिनी म्हणते ठीक आहे तुला घरच्यांनाच भेटायचं आहे माझ्या …तर संध्याकाळी सात वाजता ये इथेच. आपण जाऊ माझ्या घरी. सुयश थोडा घाबरला आणि परत खुशही झाला की घरी घेऊन जाते म्हणजे हिचा होकार आहे फक्त आता तिच्या घरच्यांना मनवायच.

 

संध्याकाळी सुयश बंदिनीच्या मागे चालू लागतो. अर्थातच तिच्या काळ्याभोर लांबसडक केसांमध्ये तो हरवून जातो. त्यांसोबतच थोडीशी भीती, थोडीशी उत्सुकता,थोडासा पोटात गोळा,थोडा आनंद आणि डोळ्यात बंदिनी आणि त्याच्या लग्नाची स्वप्न अशा संमिश्र भावना घेऊन तो तिच्या मागे पावले टाकत होता. हळूहळू पावले एका अंधारमय वाटेवर निघाली. जिथे लाईट नव्हती. वस्ती विरळ. जिथे सामान्य माणूस एकही दिसत नव्हता. पुढे जायला लागल्यावर त्याचे पाय थरथरायला लागले. पायाचा वेग मंदावला. डोक्यात अनेक प्रश्नाचं आणि विचारांचं एकाच वेळी युद्ध चालू झाल.

तिथला तो अंधार, आजू बाजूची वस्ती बघून बंदिनीला हाक मारून तो म्हणाला, “अग तू कुठे चाललीयेस? तुझ्या घरी जायचंय ना? मग इथे का घेऊन आलीस मला? इथे लोक का येतात हे माहीत नाही का तुला? अग हा रेड लाईट एरिया आहे. वेश्या व्यवसाय चालतो इथे. माझा जीव गुदमरतोय इथे, चल लवकर इथून. आपल्या सभ्य लोकांची यायची जागा नाही ही”.

बंदिनी त्याच्याकडे हसून म्हणते, “आपल्या नाही सुयश… तुमच्या सभ्य लोकांची यायची जागा नसेल कदाचित ही. पण मी इथेच राहते. माझी आई इथलीच आहे. याच दुनियेत माझं कुटुंब आहे. सुयश आश्चर्याने बंदिनीकडे बघतच राहतो. काही वेळ त्याच्या डोक्यात कोणीतरी मोठ्याने आघात करतय अस वाटू लागत. “बंदिनी…पण तू इथे कशी काय? तू तर हॉस्टेलला राहतेस ना?” थरथरत्या आवाजात तो बंदिनीला विचारतो.

“हो हॉस्टेलला राहते मी…ती ही या वेश्याजीवनासारखीच काटेरी गोष्ट आहे.

माझी आईही सामान्य मुलींसारखच आयुष्य जगत होती. तिच्या बापाने तीच लग्न लावुन दिल आणि तीही सुखी संसाराची स्वप्न बघत आली सासरी. काही दिवसानीच तिच्या नवऱ्याने… जो चोवीस तास दारूच्या नशेत बुडालेला असायचा..त्याने पैशासाठी आणि दुसरी बाई घरात आणण्यासाठी धोक्याने माझ्या आईला या दलदलीत आणून विकल. फिरायला जाऊ म्हणून नवरा घेऊन आला आणि या घाणेरड्या वस्तीत विकून गेला या धक्याने ती पार कोलमडून गेली. पण इथली जनावरं बाईच मन नाहीत बघत तर शरीरच बघतात. तिचाही आत्मा मेला आणि रोज रात्री शरीराचा चुराडा व्हायचा. इथून पळून जाता येत नाही आणि मरणही येत नाही म्हणून मुडद्यासारखीच जगत होती ती.

यातच तिला प्रेमाचे चार शब्द बोलणारा, तीच मन जपणारा, तिचे अश्रू पुसणारा, लग्नाची स्वप्न दाखवणारा हरी भेटला. त्याला भेटून ती सुखावली. कडक उन्हात पावसाच्या सरी बरसाव्या अस वाटलं तिला. त्याच्या प्रेमात आकंत बुडाली आणि यातच तिला दिवस गेले. ज्या दिवशी तिने ही गोड बातमी हरीला दिली त्यादिवशी हरीने तिच्याशी सगळे संबंध तोडले. त्याच्याशी लग्न हे एक स्वप्नच बनून राहील तिच्यासाठी. दुसऱ्या दिवशी तोच हरी दुसऱ्या उंबरठ्यावर पैसे उडवताना दिसला तिला. आता तिचा माणसावरून विश्वासच उडालेला. गर्भपात करावा म्हणून तिला सुचवलं गेलं पण एका निष्पाप जीवाचा बळी तिला घ्यायचा नव्हता आणि बायको नाही पण आई होण्याचं सुख तिलाही उपभोगायच होत.

आणि तिच्या पोटी माझा जन्म झाला. मुलगी झाली म्हणून तस तिला थोडं दुःखच झालं कारण ती जे जिवंतपणी मरणयातना भोगते त्या माझ्या नशिबी येऊ नये असं तिला वाटायचं. तिने लहानपणापासून मला या सगळ्यापासून लांब ठेवलं. थोडं कळायला लागल्यावर या वस्तीत त्या भिंतीआड नशेत धुंद असणाऱ्या पुरुषाकडून बाईची काय घुसमट होते ते समजायला लागलं. मला आईने शाळेत घातलं. संध्याकाळी मी घरी असताना कोणाला घरात घ्यायची नाही पण तरीही एक दिवस असाच नशेत धुंद असलेला पुरुष दारात आला…तिने त्याला हाकलवण्याचा प्रयत्न केला पण तो जायला तयार नव्हता. त्याने रागाच्या भरात माझ्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा माझी आई दुर्गा बनली. काठी घेऊन त्याच्या डोक्यात घातली तसा तो पळाला. माझ्यासाठी धारण केलेला तिचा तो रुद्रावतार बघून मीच घाबरलेले. त्या दिवसानंतर आईने मला या दलदलीपासून लांब हॉस्टेल मध्ये ठेवलं.

तेव्हापासून तिने मला इथे यायला बंदीच केली. तीच येते मला भेटायला कधीतरी. रोज इथे मनाविरुद्ध राहते, मनाविरुद्ध  खेळ करते आपल्याच शरीराचा…फक्त माझं शिक्षण पूर्ण व्हावं,मी नोकरी करावी….या गर्दीत मी ही हरवून जाऊ नये म्हणून.

 

बंदीनीच सत्य तर तुम्हालाही समजलं. तुम्हाला काय वाटत सुयश स्वीकारेल बंदिनीला? त्याने तिला स्वीकारावं की नाही? तुमचं मत सांगा कंमेंट्स मध्ये. अंतिम भाग प्रकाशित होईलच पण तुमच्या मतांनंतरच…तेव्हा नक्की सांगा.

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा