असामान्य जगातली बंदिनी

Written by

©सरिता सावंत भोसले

          सुयश कॉलेजच्या कट्यावर गप्पा मारत बसलेला. तसा सुयश टवाळकी करणे,कॉलेजमध्ये टाईमपास करणे,कोणाला त्रास देणे यातला नव्हता. मुलींवर जोक करणे,मुलींवर कंमेंट्स करणे, त्यांची छेड करणे हा प्रकार त्याला बिलकुल आवडायचा नाही. आज लेक्चर ऑफ होत आणि कट्यावर गप्पा मारल्या नाहीत तर ते कॉलेजचे दिवस कसले म्हणायचे नाही का!! मस्त मित्रांची मैफिल रंगली होती तेवढ्यात मागून एक मधुर आवाज त्याच्या कानी पडला, “excuse me….तुम्हीच सुयश का?”  मधुर आवाजाने प्रभावित होऊन तो मागे वळला. समोर घारे डोळे,लांबसडक केस, सुरेख नाक,नाजूक ओठ..त्यावर हलकीशी लाल लिपस्टिक, लाल ड्रेसवर मॅचिंग कानातले आणि ओठांवर गोड हास्य असणारी बंदिनी उभी होती. चेहऱ्यावर जाडसर मेकअप न थापता अतिशय सुदंर दिसणारी मुलगी तो आता पर्यंत फक्त येता जाताच पाहायचा. आज ती चक्क माझ्याशी बोलते मस्त वाटतंय अश्या विचारात तो स्वतःशीच हसत होता. !नैसर्गिक सौंदर्य लाभलेली बंदिनी पाहत असताना ती कायतरी बोलते याच्याकडे त्याच लक्षच नव्हतं.

ती पुन्हा बोलली, “तुम्हीच सुयश का?” बाप रे एवढा रिस्पेक्ट देऊन का बोलते ही मुलगी अस मनातच बोलून त्याने होकारार्थी मन हलवली. ती म्हणाली पाटील सरांनी तुम्हाला वरती लॅबमध्ये बोलवलं आहे. तो तिच्यामागून लॅबच्या दिशेने चालू लागला. चालतानाही तिच्या लांबसडक केसांमध्ये तो हरवून गेला. ती लॅबमध्ये गेली पण हा सरळ चालत तसाच पुढे.

बंदिनीने त्याला परत बोलवून घेतलं. पाटील सर काहीतरी कामात होते. पाच मिनिटे थांबा सांगून ते कामात व्यग्र झाले.

इकडे सुयश बंदिनीच्या सौंदर्याला एकटक न्याहाळत होता.

बंदिनी मात्र एक पुस्तक हातात घेऊन वाचत बसलेली. सरांचं काम संपलं तस त्यांनी बोलायला सुरुवात केली, ” तुम्हाला माहितीये की यावर्षी तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे आणि तेही आम्ही ठरवू तशा टीमनुसार. मागच्या आठवड्यात टीम ठरवल्या गेला तेव्हा तुम्ही दोघेही गैरहजर होता त्यामुळे आता तुमच्या दोघांचीच फक्त एक टीम राहील आणि प्रोजेक्ट तुम्हाला दोघांना करावा लागेल”.

सरांच बोलणं पूर्ण होताच बंदिनी म्हणाली सर आम्ही दोघेच कस करणार? आम्ही एकमेकांना ओळ्खतही नाही. तुम्ही प्लिज माझ्या मैत्रिणीसोबत प्रोजेक्ट करायची परवानगी द्या मला. सरांनी मात्र तीच काही ऐकलं नाही आणि आता टीम बदलणार नाहीत हे जाहीर करून टाकलं. सुयश मात्र काहीच बोलत नव्हता कारण त्याच सरांकडे लक्ष कमी बंदिनीकडे जास्त होत. बंदिनी लॅबबाहेर आली थोडी नाराज होऊनच. सुयश तिच्या मागे आला आणि तिला म्हणाला “मला काही प्रॉब्लेम नाही तुझ्यासोबत प्रोजेक्ट करायला. आता टीम अशाही तयार झाल्यात आणि पाटील सर काही त्यांचं मत बदलणार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीच.” बंदिनी थोडीशी रागात आणि नाराजित सरळ निघूनच गेली. सुयश मात्र  स्वतःशीच हसत चालत होता. मित्राला भेटल्यावर सांगितले प्रोजेक्ट टीम बदल आणि बंदिनीबद्दलही. त्याच्या मित्राकडून त्याला कळाल की बंदिनी फारशी कॉलेजला येत नाही पण हुशार आहे. परीक्षेत अव्वल असते नेहमी. आणि मुख्यकरून ती फार कोणाशीच बोलत नाही. एकच मैत्रीण सोबत असते असली तर नाहीतर ती एकटीच असते. मुलांशी तर ती बिल्कुलच बोलत नाही. बघतही नाही आणि कशी करेल ती तुझ्यासोबत प्रोजेक्ट? कठीण आहे तुझं अस बोलून मित्र निघून गेला.

सुयश बंदिनीच्याच विचारात गुंग होता. बोलत नसली तरी ती माझ्याशी नक्की बोलेल आणि दोघे प्रोजेक्टही चांगलाच करू याची खात्री आहे अशी ग्वाही स्वतःलाच दिली.

बंदिनी दुसऱ्यादिवशी परत सरांना विनंती करायला गेली मैत्रिणीसोबत प्रोजेक्ट करण्यासाठी पण सरांनी ऐकून घेतलं तर नाहीच पण ठणकावून सांगितले की प्रोजेक्ट तर तुम्हाला दोघांनाच करावा लागेल नाहीतर प्रोजेक्टचे तुमचे मार्क्स कट होतील आणि हे मार्क्स पुढे किती महत्वाचे असतात ते मी वेगळं सांगायला नको तुम्हाला. आता मात्र बंदिनीला सुयश सोबत प्रोजेक्ट करण्याशिवाय पर्याय नसतोच. सुयश तर मनातून खुश होतो. बंदिनी नाईलाजाने त्याच्या सोबत थोडं बोलून कोणता आणि कसा प्रोजेक्ट करायचा हे ठरवून निघून जाते. सुयश विचार करतो एवढी सुंदर आहे ही मुलगी पण अशी विचित्र का आहे? बोलायलाही पैसे पडतात अशी बोलत असते.. पण स्वभावाने वाटते चांगली.

दुसऱ्या दिवशी बंदिनी आणि सुयश प्रोजेक्ट निमित्त कॉलेजमध्ये भेटतात. लेक्चर ऑफ असत मग कॅन्टीन मध्ये जाऊन बोलू अस सुयश बंदिनीला म्हणतो पण बंदिनी काही तयार होत नसते. कॅन्टीन मधेच निवांत प्रोजेक्ट बदल बोलता येईल आणि काम करता येईल असं सुयशने समजावल्यावर बंदिनी कॅन्टीनमध्ये त्याच्यासोबत येते. कॅन्टीनमध्ये सुयश चहा घेतो. बंदिनीला काहीच नको असत. प्रोजेक्टचे काम लवकर

करू आणि निघू अस ती सुयशला सांगते. सुयश तिला म्हणतोही अग तू  नेहमी एवढ्या घाईत का असतेस? आणि एवढी अबोलही का असतेस? काही टेन्शन आहे तर सांग मला…मी मदत करू शकतो जमलं तर. त्यावर ती जरा रागातच म्हणते, “प्रोजेक्टसाठी आलोय तेच करूया. मी अशीच आहे आणि अशीच राहणार. ”  सुयश काही न बोलता प्रोजेक्टचे काम सुरू करतो. आता ते रोजच प्रोजेक्ट निमित्त भेटतात,बोलतात पण प्रोजेक्ट बद्दलच. इतर मस्करीच बोलणही बंदिनीला  आवडायचं नाही. सुयश तिच्या या गूढ वागण्याचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न करायचा पण काही हाती लागायच नाही. उलट तो तिच्याशी मस्करीत बोलायला गेला की  ती चिडायची. सुयशला आता सवयच झालेली तिच्या या वागण्याची आणि तीच चिडणं त्याला आवडायला लागलेलं.

जशी सुंदर दिसते तस मनही तीच सुंदर आहे पण थोडीशी कुठेतरी हरवलेली आहे, खूप काहीतरी मनात अडी धरून बसलय तिच्या अस सारख वाटायचं त्याला. काही असल तरी तिची कंपनी तो मिस करायचा. ती एकही दिवस आली नाही की हा बैचेन व्हायचा. मग कट्टयावरच सगळा दिवस घालवायचा. त्याच्या मनाच्याही आधी त्याच्या मित्रांना कळलेलं की बंदिनी त्याला आवडू लागले. मित्र तिच्या नावाने त्याला चिडवायचे आणि हळूच याच्या गालावरची कळीही खुलायची.

एक दिवस सुयश कॉलेजला आला नव्हता. दुसऱ्यादिवशी तो दिसताच बंदिनी त्याच्यावर खूप चिडली,नको नको ते बोलली पण सुयश मात्र काही न बोलता प्रोजेक्टच्या कामाला लागला. बंदिनीला नंतर कळाल की सुयशच्या मित्राची आई खूप सिरीयस होती म्हणून तो मित्रासोबत  पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये होता. हे कळल्यावर बंदिनीला कसतरी वाटलं की सत्य माहीत नसताना सुयशवर उगाच चिडलो. सुयश कडे जाऊन लगेच सॉरी बोलून तिने आपली चूक कबूल केली. सुयशनेही तिला माफ केलं. मित्राच्या आईसाठी काही मदत असेल तर सांग मी नक्की करेन हेही बोलायला ती विसरली नाही. मित्राच्या घरी दुसरं कोणीच नाही, वडील पण नाहीत हे कळल्यावर बंदिनी स्वतः जेवणाचा डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये हजर. आठवडाभर ती स्वतः जेवण घेऊन जात होती हॉस्पिटलमध्ये. यावेळी सुयशला एक वेगळीच प्रेमळ,काळजीवाहू बंदिनी बघायला मिळाली. यादरम्यान सुयशचही वेगळं रूप बंदिनीला कळाल आणि हळू हळू  दोघांमध्ये मैत्री होऊ लागली.

सुयश आणि बंदिनीच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होते का? बंदिनी इतर मुलींसारखी का वागत नाही? नक्की बंदिनी कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वाचा पुढील भागात.

लेख आवडल्यास कंमेंट्स, लाईक नक्की करा. शेअर करा पण नावासहितच??.

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा