असे हे प्रेम वेडे

Written by

असे हे प्रेम वेडे

सौ.वर्षा विशाल ठुकरुल…Velvet Kavisha
आज दहा दिवसांनंतर तो भेटणार म्हणून विभा खुश होती…दहा दिवस खुप काळजीयुक्त समाधानात गेलेत…आज नवीन रुपात तिला तिचा पुर्वीचा विलास भेटेलं….सगळं कसं त्याच्या मनासारखं सजवलयं…. त्याला आवडतं तसं….फुलदाणी ही पांढऱ्या फुलांनी सजलीयं….थोडा मोगराही गुंफलाय त्यात…मोगऱ्याच्या वासाचा वेडा आहे न तो!!…एक गजरा राखून ठेवलाय… तो आला की माळेन केसांत….नाहीतर त्याच्याकडूनच माळून घेईन…. त्याच्या आवडीचा बेत करायचं असं ठरलयं….संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पोचेलं म्हणालाय…दहा दिवसांनी त्याचा सकाळी आवाज ऐकला आणि मोरपीस फिरलं अंगावरून….किती छान आणि गोड!!!..आजचा विलास हवाहवासा, वेडावणारा, अगदी विभाच्या मनातला!!!

मी सौ. विभा विलास जोशी. माझा नवरा विलास इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर..दोन मुलं आणि सासूबाई. छान पंचकोनी कुटुंब. विलास जात्याच हुशार. कंपनीच्या मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी बाहेर पाठवतात त्याला…Out of India… “वर्षांतून चार पाच महिने बाहेर राहील”…लग्नाआधी सगळी कल्पना दिलेली…मी ही ते मान्य केलेलं…कारण विलासला पाहताक्षणी प्रेमात पडले होते मी…तो ही असाच!! जसा आवडला तसा…खुप समजूतदार, क्षणात आपलंस करणारा, नातं हळूवार जपत जपत खुलवणारा….पार खुळी आहे मी त्याच्यासाठी!! आजही …आपण तर कहरच केलाय आज..मुलांना मामाकडे तर सासुबाईंना नणंदेकडे पाठवलयं…त्यांना ही दहा दिवसांनी भेटणार आहे न तो…त्यांना भेटूनच विलास येणार आहे म्हणून येईपर्यंत आठ वाजतील…सकाळपासून मनाने ही कितीवेळा विचारलयं ..”Is this second honeymoon??? ..Yes it is!!!” आपणही मोहरून उत्तर दिलयं की मनाला….

तेरा वर्षे झालीत लग्नाला..मोठा मुलगा अकरा तर धाकटा आठ वर्षांचा… विलास दर दोन तीन महिन्यानंतर दीडदोन महिने बाहेर असतो…आता कंपनीने ही खुप मोठी जबाबदारी टाकलीय त्याच्यावर प्रमोशनसहीत…सुरुवातीला तो असा बाहेरगावी निघाला की घालमेल व्हायची दोघांच्या जीवाची…समजून उमजून केलेलं प्रेम बळंच द्यायचं अशावेळी…या दीडदोन महिन्याच्या विरहाने प्रेम वाढतंच गेलं..आज जशी नटलेयं ना तशीच नटायचे तो येणार असेल त्या दिवशी…मात्र गेले सहा महिने मी हैराण होते विलासच्या वागण्याने…

घराची, घरच्या माणसांची ओढ असलेला विलास कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी जात होता पण तिथे गेल्यावर मात्र त्याचं वागणं बदलू लागलं…नेमक्या ठरलेल्या वेळी फोन करणारा विलास कधीही फोन करु लागला…रात्री, मध्यरात्री, अपरात्री विडिओ call करून मला तुझी आठवण येते..तुला सांगत होतो त्या क्षणांचे विडिओ काढतो…. तु काढू नाही दिलेस..आता मला तुला असं पाहायचं आहे… फोटो पाठव..विडिओ पाठव….तसं पाहायचयं फोटो पाठवं…घरात अजूनही तीनजणं आहेत माझ्यासोबत हेच विसरून जायचा…समजावलं तरी ऐकायच्या मनस्थितीत नसायचा… एकच तुणतुणं….मला तुझी आठवण येते….त्याच्या प्रेमापोटी आपणही त्याचे हट्ट पुरवतं गेलो…त्याला हवे तसे विडिओ, फोटो पाठवत राहिलो…येईलच ना आठवण त्याला.. कुटंबापासून दूर राहतो तर…एकटं वाटतं असेल…आपला ही दिवस कामात जातो पण रात्र अंगावर येतेच की त्याच्या आठवणीने…आपण नाही त्याचे हट्ट पुरवायचे तर दुसरं कोण पुरवणार???? पण इथेच चुकलं की काय माझं तेच कळलं नाही मला…
असाच वीस दिवसांपूर्वी आला ट्रिपवरून….आल्या आल्या दरवाजातच हात पकडून स्वतःकडे ओढलं…..मुले, आई आनंदाने पाहताहेत. तो एवढ्या दिवसांनी भेटणार म्हणून….हे विसरून कसा गेला हा…आपण सावरलं कसंतरी…. मुलेही आता मोठी होताहेत. याला भानच नाही कशाचं…विचित्रच वागणं….आपल्याला हल्ली थोडी कल्पना आलीय त्याच्या वागण्याची…आज काय वाढून ठेवलयं काय माहीत..??? सुरुवातीला कंपनीच्या कामाच्या वेडाने झपाटलेला तो अचानक “कामाच्या” वेडाने कसा काय झपाटला… ???

आपल्याला हल्ली थोडी कल्पना आलीय त्याच्या वागण्याची…आज काय वाढून ठेवलयं काय माहीत..???सुरुवातीला कंपनीच्या कामाच्या वेडाने झपाटलेला तो अचानक “कामाच्या” वेडाने कसा काय झपाटला… ??? विचाराने डोकं फुटायची वेळ आलीयं…जाऊ दे आता नको काही बोलायला. इतक्या दिवसांनी आलाय… विलासने आल्या आल्या बेडवर झोपून घेतलं.. आंघोळ, नाश्ता सगळंच बाकी आहे अजून… का बरं झोपला असेल ??? विचारलं ही. पण हुं की चूं नाही… दमून झोप लागली असेल..झोपू दे निवांत… बेडजवळून निघतच होते इतक्यात त्याने पाठीमागून मिठी मारली…. बापरे, याला काय झालं.. मुलांनी पाहिलं तर काही खरं नाही..” मुलं आहेत रे …तु आंघोळ करून घे ना प्लीज. नाश्ता देते.”…” मला नको तुझा नाश्ता. तुच खा तो. तुला आहे का माझी काळजी? नाहीतर अशी वागली नसतीस. मला झिडकारून नसतं टाकलंस.” …”इतक्या दिवसांनी आलास तर रागावू नको…तुझं आवर..मी बघते सगळं. दहा मिनिटे दे फक्त…” मोठा जाईल क्लासला. पण आई आणि बंटीच काय??? त्यांना कुठे पाठवायचं?? शेवटी आईंना किचनमध्ये बोलावून अडखळत कसंतरी जमलं तसं सांगितलं…त्यांना ते समजलं.. त्यांनी बंटीला ” चल रे बंटी जरा डॉक्टरकडे जाऊन येऊया ” म्हणत एकांताची सोय केली…आणि त्याने पुन्हा तसंच खेचलं…शरीराचे लचके तोडत…सगळं अधाशीपणे उरकलं…तरीही असमाधानीच दिसला….मागच्या वेळेस ठीक होतं यावेळी बिघडलंय सगळं…

संध्याकाळी झोपून उठला तरी पुन्हा तोच त्रागा…..मुलं बाहेर खेळायला, आई मंदिरात, धास्तावणारा एकांत, शरीर ओरबाडणारं मिलन, मी हतबल…रात्री त्याच्या हक्काचा निवांतपणा, माझं विटलेलं मन आणि त्याचं उत्तेजित होऊन सारं उरकून झोपून जाणं…मी पुन्हा हतबल…हा माझा विलास नाहीच…..काय झालयं याला ?? झोपून ही गेला लगेच… आपला विचारही नसावा याला?… दोघे खुप सारे सुंदर असे क्षण जगलोय की धुंदीत….ओढ असायची त्याच्या मिलनाची…रात्रीची वाट पाहताना किती तरी वेळा चोरून मिठ्या मारल्यात की दिवसा उजेडी…..कितीतरी रात्री फक्त हातात हात घेऊन बसून काढल्यात गप्पा मारतं…कधी त्याच्या खांद्यावर विसावलो तर कधी मिठीत…कधी त्याच्या केसांतून हात फिरवताना डोक्यावर डोकं ठेवून झोपून गेलो. तर कधी कुशीत शिरून त्याचा हात अंगावर घेऊन झोपलो….खुप रात्री रंगल्या, रंगवल्या…विरहाच्या नंतरच्या पहिल्या रात्री तर असंच ही भेटायचो. नव्या प्रेमाने, ओढीने, आनंदाने आणि स्वखुशीने… दोन शरीरे एक मन….विरहाचा ताण निघून जायचा…..

सध्या मात्र सगळंच बिनसलंय…तो फक्त शरीराचा भुकेलेला…स्वतःखेरीज काही दिसत नाही त्याला…असा वागतो आहे ना की त्याला फक्त शरीराची ओढ आहे.. मी available नसेन तर हा कोणाकडून आपली इच्छा पुर्ण करून घेईल…उद्या कोणावर बलात्कार करायला ही मागे पुढे पाहणार नाही..विक्रुतीच की ही..

सहा वाजलेत. अख्खी रात्र बसून काढलीय आपण. रडून रडून डोळेही सुजलेतं… हा व्यवस्थित बोलायला हवा आपल्याशी…इतक्यात त्याला जाग आली… विभा काही न बोलताच उठू लागली….सुजलेल्या डोळ्यांकडे त्याचं लक्ष गेलं आणि भानावर आला. “काय झालं विभा? तु रडलीस का?? तुझ्या दंडाला ही लागलयं की!..काय लागलं?? माझ्यामुळे त्रास झाला ना तुला हा?? पण मी तरी काय करू ग! मला काही कळतंच नाही मला काय होतं ते” म्हणत तो स्वतःलाच मारून घेऊ लागला…

विभाने त्याला थांबवत त्याचा चेहरा आपल्या तळव्यांत पकडला..”काय झालयं राजा तुला??.सध्या तु असा का वागतोस?? इतक्या वेळेस आपण जवळ येऊनही तु असमाधानी कसा?? कुठे गेला तुझा हळूवारपणा??? हे कुठून शिकलास सगळं..”कोणत्याही स्त्रीच्या शरीराचा वापर तिच्या संमतीशिवाय करणे म्हणजे बलात्कार.”….असं म्हणणाऱ्या तुला मला काही त्रास होत असेल याचंही भान नसावं? मी नसते तर तु कोणालाही टारगेट केलं असतंस का?? कसा वागतोस. मला तुझं काही कळेनासं झालयं.. तुला दुसरं काही सुचतच नाही सेक्सशिवाय…काल तु आल्यापासुन आईना , मुलांना बसून भेटलास तरी का??….पोरांना ही कळतं नाही पप्पाला काय झालयं ते…मोठी होताहेत रे आता मुलं…..काल दिवसभर मुलांच्या नजरेतून वाचण्यासाठी किती आटापिटा करावा लागला तुझ्या वागण्यामुळे…. एकटेपणा काय तुलाच असतो का??? मी ही इथे एकटीच असते ना तुझ्याशिवाय??? हा एकटेपणा नवीन आहे का आपल्याला???? मग मी ही तुझ्यासारखीच वागू का?? ताळतंत्र सोडून?? विभाला हुंदका अनावर झाला आणि हुंदक्यासोबतच कालपासून आणलेलं उसनं अवसान गळून पडलं पुन्हा डोळ्यातील पाण्याच्या रुपाने…

अगतिक विलास तिला समजवत राहिला..आणि शेवटी बोलता झाला…”विभा, मागच्या वेळेस गेलो ना बांगलादेशला तेव्हा अजून एक कलिग होता चेन्नईवरून आलेला…..मी होमसिक. अस्वस्थ व्हायचो. बैचन वाटायचं. सगळ्यांची आठवण यायची.. निघून यावसं वाटायचं.. त्याच्याशी बोललो… “अरे ये बिबी की याद आ रही है तुझें. उसका सोल्यूशन तेरे मोबाईल में ही है…” आणि मी तेव्हापासून त्या साईड बघायला सुरुवात केली.. सुरुवातीला मज्जा वाटली…कल्पनेत समोर तुला ठेवून सारं पाहू लागलो…ती ट्रिप संपली…पण यावेळी मात्र मी सोलवटून निघालो ग विभा…. त्या साईड पाहताना स्वतःवरचा ताबा हरवून बसलो.. तुलाही त्रास दिला.. स्वतः ही उलटसुलट सगळं करून स्वतःलाही त्रास करून घेतला…त्या साईडवरच्या क्लिपस् पाहून पाहून मन चलबिचल होत राहिलं….बऱ्याचवेळा मोबाईल बाजूला ठेवायचो पण वाढलेल्या बेचैनीसहित पुन्हा घ्यायचो… Addict झालो. अक्षरशः गुलाम झालोय त्या क्लिपस् चा…आणि असमाधानी राहू लागलं मन”….. “अरे विलास! हे काय करून बसलास?? तुला कधी बोलावसंही नाही वाटलं इतक्या दिवसांत?? जे झालं ते झालं..तुला यातून बाहेर यावसं वाटतयं ना?? “हं ” म्हणत त्याने मान डोलावली. “प्लीज मला यातून बाहेर काढ विभा प्लिज.. काही कर. काही सांग. मी ऐकेन सगळं”… “नक्की ऐकशील???”. “हो. तुझी शप्पथ!… ” एक महिन्याची सुट्टी टाक आणि resignation दे. एक महिना आराम करून इथेच नोकरी बघ…package कमी असलं तरी काही फरक नाही पडत….खुप झाली तुझी भटकंती. मला काही नको. जेवढा पगार आणशील त्यात सगळं भागवेन मी…तसेही बरेच लाख आहेत आपल्याकडे. त्यात मुलांच शिक्षण आरामात होईल….करशील इतकं???”

“हो”..

“चल उठ. मग आवर पटकन…आपण डॉ. सानेंकडे चाललोय..”

“अग ते तर psychologist आहेत”…

“हो….आता त्यांचीच मदत घ्यावी लागेल ना राजा..”.. डॉ. साने झाले….मग हिप्नाँटिझमचे तीन सेशन्स….आणि आता हे दहा दिवस विपश्यना केंद्र, इगतपुरी…. अडकला पटकन पण बाहेर निघताना फार सायास पडले…संमोहनाच्या तीन सेशन मध्येच ओके वाटला विभाला तो…..तरीही तिला आता रिस्क नको होती.. म्हणून तिने विपश्यना केंद्रांचा दहा दिवसाचा स्टे बुक केला.. Meditation is the best medicine…..तिथे मोबाईलला परवानगी नाही..शुद्ध, सात्विक खाणं आणि तसेच विचार… मनही तंदुरुस्त..

आज सकाळीच ” विभा, मी निघालोय इकडून..येतोय घरी. आई आणि मुलांना सांग” म्हणाला..आणि विभा बावरली… “आई सीमाकडे आणि मुलं मामाकडे गेलीत…उद्या रविवार आहे. जातो म्हणाले म्हणून पाठवलं रे”…

“कळलं madam, आता तु घरी एकटीच आहेस ना …”

“हं” …

“आलोच मग मी..आई आणि मुलांना भेटून… तोपर्यंत बसा वाट बघत..”

“हं” ..फोन कट्

हा माझा विलास! नाती जपणारा, मनं आणि मला जपणारा. उगाच पाठवलं सगळ्यांना घराबाहेर…त्यांना भेटून आता हा घरी येईपर्यंत खुप उशीर होईल…पण चालतंय की…ही ओढ भारी आहे….श्रेया घोषालचं “अधीर मन झाले”.. आणि “कधी दूर दूर कधी तु समोर” गाणी पन्नास वेळा ऐकून झालीत सकाळपासून…आठ वाजेपर्यंत येतो म्हणालाय तरी आपण कितीतरी वेळा दरवाज्याच्या peep hole ला डोळा लावलाय… ये ना राजा लवकर… किती बोलायचं आहे तुझ्याशी..डोळे भरून पाहायचंय तुला….चुकलंच आपलं सकाळीच जायला हवं होतं त्याला घ्यायला…. दिवसभराची जीवघेणी हुरहूर तरी नसती लागून राहिली…स्वतःच्या हाताने इतकं दूर लोटलंय त्याला गेले वीस दिवस… त्यापेक्षा दुप्पट प्रेमाने शिरायचं आहे त्याच्या मिठीत… अगदी भान हरपून… आजची मी फक्त त्याची विभा…

दाराची बेल वाजली. सात वाजलेत. आता कोण आलं असेल…?? या विचारात विभाने दरवाजा उघडला….”अरे विलास??? Welcome back my love”….विभाला आनंदाने काही सुचेना…. डोळ्यातून प्रेमाश्रु पाझरले…”रस्त्यात traffic नव्हतं म्हणून मग वेळ वाचला आणि आलो घरी…विभा, आंंघोळ करून झोपतो जरा…फार थकायला झालं आज…उठवू नकोस लगेच..” सगळं तटस्थपणे बोलला आणि आंघोळ करून झोपून गेला.
दमला असेल…. झोप होऊ दे नीट त्याची. बिचारा!! आपण डिसिजन घेत गेलो आणि तो ऐकत गेला निमुटपणे..काही न बोलता ..आपल्यावरच्या प्रेमापोटीच ना!! आता काही मी त्याला लांब जाऊ द्यायची नाही… पार दशावतार झाले होते त्याचे… जपायला हवं त्याला जीवापाड…
साडेनऊ झालेतं….दोन तास झोपला की छान! आता उठावं ना याने…पण नाही…ढाराढूर झोपलाय अगदी….किती बोलायचं आहे त्याच्याशी…विचारातच विभा त्याच्या बाजूला जाऊन बसली…..खूपवेळ झोपलेल्या त्याला पाहत राहिली…. हळूच केसांत हात फिरवत हलकेच त्याला हलवून “उठायचं नाहीय का जेवायला?? सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. उठून जेवून घे ना प्लीज. ” असं म्हणाली.. ” जेवण नको. एक ग्लास मसाला दुध दे फक्त. तोपर्यंत झोपतो.”
“बरं.” म्हणत विभा उठून किचनमध्ये गेली. दुध तापत ठेवून बाहेर आली…खिडकीतून बाहेर पाहत उभी राहिली….”आपलं चुकलंच. नवरा आहे तो माझा.. किती बोलले त्याला… अगदीच दूर लोटला स्वतःपासून….दोन अडीच तास झाले. काहीच बोलला ही नाही माझ्याशी…..अरे देवा!! माणूस बनायला पाठवलेलं याला साधू तर नाही ना बनून आला?? “नाही”..पाठीमागून कानाजवळ त्याचा आवाज. केस बाजूला करत तिच्या मानेवर सुंदरसा ओठांचा स्पर्श… तिचं शहारलेलं अंग. त्याचं तिला तसंच स्वतः जवळ धरून ठेवणं. तिच्या हातावर त्याचे हात. घट्ट झालेली मिठी. त्याच्या दणकट बाहुत जखडलेले दंड…त्याच्याकडे पाहण्यासाठी मागे वळवलेली मान…त्याने साधलेली संधी आणि तिच्या ओठांवर टेकलेले ओठ…”चोचीमध्ये चोच घालूनी……” अगदी तसंच….बेधुंद मनं मिठीत विसावलेली…दुध करपून पातेलं तडतडल्याचा आवाज आणि भंगलेली तंद्री… तिच्यामागे तो ही किचनमध्ये… सफेद दूध काळं झालेलं आणि पातेल्याची झालेली दुर्दशा. दोघेही साक्षीदार त्यांच्या प्रेमाचे…”पातेलं जपायला हवं…मी साधू झालेलो नाहीय अजून त्याची आठवण म्हणून” असं विलासने म्हणताच दोघेही हसले…

आकर्षक डायनिंग टेबल , केसांत आलेला गजरा , मेणबत्त्यांचा मंद उजेड, instrumental music ची धून, एकाच ताटात जेवणारे दोन वेडे जीव…चंद्रप्रकाशात रंगलेल्या गप्पा… घड्याळात पडलेले दोनचे ठोके आणि पावलांना बेडरुमचं आकर्षण… सजलेला बेड, फवारलेलं अत्तर, पुन्हा म्युझिकची हलकी धून, बहराच्या वाटेवरचं विरहानंतरचं प्रेम…त्याचा सर्वांगावरून फिरणारा हात आणि तिचे मोहरून येणारे क्षण…डोळ्यांतील प्रेम ओठांनी टिपणारा तिने जगवलेला तिचा जिवलगा… तिला हवाहवासा… विरहानंतरही हळूवार व्यक्त होणारं त्याचं प्रेम…गाण्याची बदलेली धून ” रात बाकी बात बाकी होना हैं जो हो जाने दो….”

म्हटलंत का गाणं तालासुरात… मग बास्स झालं की आता …सगळं मीच कुठे सांगत बसू…इतकं वाचलंत की गुंग होऊन आता जा तसेच पुढे… कारण आधीच सांगितलं आहे तुम्हाला की हा सेकंड हनिमून आहे तेव्हा रंग चढवा तुम्ही त्यांच्या प्रेमाला…तुमच्या पध्दतीने तुमच्या मनासारखा…अर्थात गालातल्या गालात हसत…!!!!

वाचकहो सेक्स addiction बद्दल एक वाक्य ऐकू आलं आणि कथा सुचली…रोमँटिक कथेतून हा गंभीर प्रश्न मांडायचा प्रयत्न केलाय..

सौ.वर्षा विशाल ठुकरुल…Velvet Kavisha

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत