आंतरधर्मीय विवाह

Written by

यश आणि सुयश दोन्हीही जुळे भाऊ. आई वडिलांनी लाडकोडात वाढवलं. त्यांची आधुनिक विचारसरणी होती, आई मात्र काही जुन्या परंपरा सोडायला तयार नसे.
कॉलेज ला असतांना दोघांचं कॉलेजमधल्या 2 मुलींशी सुत जुळलं…अगदी पवित्र आणि निरपेक्ष प्रेम…कसलाही व्यभिचार नाही की कुठल्याच मर्यादेचं उल्लंघन नाही…कॉलेज मधील वेगवेगळ्या उपक्रमात चारही जण एकत्र काम करत…त्या चौघांचा इतका छान ग्रुप जमलेला की ही सगळी एका कुटुंबात असली तर काय धमाल करतील असं सर्वांना वाटायचं…
प्रेम करताना त्यांनी जात, धर्म पहिला नाही…यश ची प्रेयसी हिना मुस्लिम तर सुयश ची जेनी ख्रिश्चन…. आता घरी सांगितलं तरी काही हरकत घेणार नाही असं दोघांना वाटायचं….
प्रेमासाठी सर्व भिंती तोडून ती चौघे एका वेगळ्याच विश्वात रममाण होती…स्वप्नांच्या….आयुष्यात पुढे काय करायचं, कशी आपली स्वप्न पूर्ण करायची याचा सर्व विचार त्यांनी केला होता….इतर जोडपी जेव्हा एकांतात केवळ लगट करायच्या प्रयत्नात असत तेव्हा ही जोडपी मात्र मोठमोठे स्वप्न आणि समाजासाठी काय करता येईल याचीच चर्चा करत असत…
शिक्षण संपले, यश आणि हिना ला सामाजिक कार्यात रस होता…दोघांचा धर्म सोडला तर बाकी विचार, आचार आणि तत्त्व समान होती…त्या दोघांनी मिळून एक सामाजिक संस्था उभारली…समाजासाठी, समाजातल्या गरीब आणि गरजू लोकांसाठी सगळी मदत करत होती…सुयश आणि जेनी ला डॉक्टरकी मध्ये आवड, दोघांनी मिळून एक मोठे हॉस्पिटल उघडून गरजूंना मदत करण्याचे त्यांनी ठरवले होते…
जसजसे वय वाढत गेले तसे नातेवाईकांमध्ये त्यांचा लग्नाची चर्चा सुरू झाली, दोन्ही भावांनी आता घरी या गोष्टी सांगायच्या ठरवल्या…
“आई बाबा, आम्ही तुम्हाला आमच्या लग्ना विषयी निर्णय सांगतोय, आम्ही दोघांनीही आपापल्या जीवनसाथीची निवड केली आहे..”

 

“ओह्हहो…छुपे रुस्तम…सांगायचं नाही का आम्हाला…कोण आहेत त्या?”
“माझी मैत्रीण हिना, याची जेनी…”
नावं ऐकताच आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…
“कोणत्या जातीच्या आहेत त्या??”
“काय फरक पडतोय आई…हिना मुस्लिम आणि जेनी ख्रिश्चन आहे….”
“मुलांनो, काय वाढवा करून ठेवलाय…जातीची सोडा तुम्ही तर दुसऱ्या धर्माची मुलगी आणली??समाज काय म्हणेल??काय इज्जत राहील??”
“आई कुठल्या जगात वावरते तू?? आमची मन जुळली ती धर्म पाहून नाही…त्या पण माणसंच आहेत ना?…”
“मी हे होऊ देणार नाही..”
“ठीक आहे, आम्ही आयुष्यभर असेच राहतो….दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही…”
आई भांबावली, तिचा विरोध असला तरी वडील मात्र लग्नाला तयार होते…शेवटी सर्वांना परवानगी द्यावी लागली..आईची नाराजी होतीच…पण मुलांच्या हट्टापुढे शेवटी लग्न आटोपले….
आईच्या मनात आले,
“किती स्वप्न पहिली होती मी, सुना येतील, सडा रांगोळी करतील, पुरणपोळ्या बनवतील….आता काय खायचं?? बिर्याणी आणि केक??”
लग्न आटोपले, हनिमून झाला…दोन्ही सुना आता संसाराला लागल्या…पहिलाच दिवस…सासू उठली…सुना तर काही करणार नाहीत, आपणच नेहमीप्रमाणे सडा रांगोळी घालावी…
उठून पाहते तर काय….हिना रांगोळी काढत होती आणि जेनी तुळशीपुढे पाणी टाकत होती…
सासू डोळे विस्फारून पाहत होती…
जेनी आणि हिना ने घरातल्या परंपरा आधीच शिकून घेतल्या होत्या, शेवटी मुलगी कुठलीही असो, कुठल्याही धर्माची असो….सासरी आल्यानंतर तिथल्या परंपरा जबाबदारीने सांभाळते…..
हिंदू धर्म स्वीकारत असतानाच आपल्या धर्मालाही त्यांनी डावलले नव्हते….
एकदा हिना नमाज पठण करत होती…
“वा हुआ अला कुल्ली शायीन कादिर….”
जेनी बायबल वाचत होती…
“From the rising of the sun to its setting The name of the LORD is to be praised”
आणि इकडे सासुबाईंचे गीतापठण सुरू होते….
“यादादित्यगतं तेजो…जगद्भासयतेऽखिलम् खिलम…”
सासरेबुवा तिघींची प्रार्थना ऐकत होते…
नंतर त्यांनी तिघींना बोलावले आणि त्या श्लोकांचा अर्थ विचारला…
तिघींचे एकच उत्तर आले…
“या जगाचा कर्ता करविता एकच…आपण त्या विधात्याचे अंश…सूर्याचे तेज आणि विश्वातील चैतन्य तोच….”
सासरे बुवा म्हणाले….बघा, भाषा वेगळ्या आहेत पण संस्कार एकच….पद्धती वेगळ्या पण आचार एकच….आणि आपण उगाच जात धर्माच्या नावावर एकमेकांशी भांडत बसतो….
असेच दिवस छान चालले होते…
हळदी कुंकू चा दिवस आला…
जेनी आणि हिना छान साडी घालून तयार झाल्या….बायका खरं तर दोघींची मजा पाहायलाच येणार होत्या पण त्याचं ते मराठमोळं रूप पाहून त्या विसरूनच गेल्या की या मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत…कार्यक्रम पार पडला….हिना आणि जेनी ला हा प्रकार खूप आवडला….”this is better than kitty party…” जेनी म्हणाली आणि सर्वजण हसायला लागले…
एकदा गावाकडे सर्वांना बोलावणं आलं, सासूबाईंच्या एका नातेवाईकाच्या सुनेच डोहाळजेवण होतं… पण त्या बाई मात्र अत्यंक कडक, एखाद्या विधवेची सावलीही सुनेवर पडू देत नसत इतक्या शिस्तीच्या… जेनी आणि हिना ला घेऊन जाताना सासूला जरा टेन्शनच आलं…तिकडे सगळे सकाळीच पोहोचले…डोहळजेवणाची तयारी सुरू होती ऐन वेळी मुलीला फुलांचे दागिने मिळाले नाही…जेनी आणि हिना ने कल्पना लढवून घराबाहेरील फुलं जमा करून तिला दागिने बनवून दिले, हिना ने मुलीच्या हातावर छानशी मेहेंदी काढली आणि घरातलं सगळं अगदी मनापासून त्यांनी आवरलं…अगदी टिपिकल विवाहितांनाही लाजवेल असा त्यांचा कामात चपाटा होता…गर्भार मुलीची सासू शांतपणे हे बघत होती…
कार्यक्रम सुरू झाला, मुलीच्या आईने आणि सासूने ओवाळून झाल्यानंतर पहिल्यांदा आता कोणी ओवाळावे हा प्रश्न होता…
“जेनी आणि हिना ला बोलवा..अशा संस्कारी मुलींचे आशीर्वाद पडू दे गर्भावर….त्यांचा अल्लाह आणि येशू ला पण सांगा…म्हणा कृपा असू द्या आमच्या बाळावर…”
जेनी आणि हिनाच्या सासूला भरून आले, दोघींच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला आणि जेनी व हिना लाही आपण घेतलेल्या परिश्रमाचे चीज मिळाल्याचा आनंद झाला…
लेख कसा वाटला जरूर कळवा आणि असेच काही इतर लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला जरूर लाईक करा

https://m.facebook.com/irablogs

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा